Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
Showing posts with label ट्रेक. Show all posts
Showing posts with label ट्रेक. Show all posts
no image
2013 चंद्रगड ट्रेक मंगळगड

चंद्र-मंगळ मोहीम

सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात त्रिंबक-दुर्गभांडार-अंजनेरीचा भन्नाट ट्रेक झाल्यानंतर नाशिक रिजनची तर खरंच चटक लागली होती. असं वाटायचं भसाभस नाशकाचे दौरे करावेत. म्हणजे शेर के मुँह को खून की लत पड गयी थी. पण ऑक्टोबरात अस्मादिकांचं "बाप" या पदावर मोठ्ठं आणि गोड प्रमोशन झाल्यानं ‘शेर’चे मायाळू गाय-वासरु झाले होते. शिवाय प्रेमाचा सगळा डोस घरातच वापरला जात असल्याने सह्याद्रीच्या वाटेला काही शिल्लक राहतच नव्हते. पण जशा लेकीला भेटायच्या नावाखाली सासुरवाडीला चकरा वाढल्या तशा त्यांच्या शेजारी पाजारी लोकांच्या नजरा "आलात का परत" अशा अर्थाच्या व्हायच्या आत ती मोनोटोनी बदलायला हवी होती. म्हणून नाशिक नाही तर निदान जरा पुण्याच्या आसपासच्या डोंगररांगांत पाय मोकळे करावेत म्हणून एक लहानसाच (?) दोन दिवसांचा बेत आखण्याचा विचार केला. शिवाय इस्रोने एका मागोमाग एक चांद्रयान आणि मार्स ऑर्बिटर नावाच्या मोहिमांची घोषणा केली, वरताण मंगळावरच्या मोहिमेला यान पाठवून आम्हांला प्रेरणा दिलीच होती तर आम्हीही चंद्र-मंगळाची मोहीम आखली. जिथे शिवरायांनी अफजलखानाला अस्मान दाखवले अशा मोर्‍यांच्या जावळीच्या जंगलात जायचे म्हणून आम्हीही जरा जास्तच थ्रिल्ड होतो. अमित अर्थात ककु (कराडचे कुलकर्णी), आंबेगाव बुद्रुकचे अजय ऊर्फ राजकुमार काकडे आणि दादर-ठाणे लोकलचे धक्के खाणारा (non-प्रांजळ) वाघ असे भिडू यावेळी सोबतीला होते. त्यातला वाघ आधीच राजकुमाराच्या शरणी जाऊन राहणार होता. पण मध्येच एका खंड्याने वाघाची शिकार केली आणि असा त्यांचा असा काही बेत झाला की वाघ राजमहालापर्यंत पोचलाच नाही. शेवटी तो रात्री उशिरा ’ककु’च्या गुहेत आश्रयास गेला आणि दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे मी या दोघांना फोन करुन उठवलं आणि वॉचमनला माझाच फ्लॅट या सोसाय़टीत आहे या थाटात गेट उघडायला लावले. दोघे जवळपास तयार झाले होते. पण त्यानंतर फक्त वीस मिनिटे ककु (अमित) हॉल ते बेडरुम अशा सात चकरा मारुन विसरलेली एक एक वस्तू घेऊन येत राहिला आणि शेवटी कुलूप लावल्यावरही नळ बंद करायचा विसरलाच. फायनली आंबेगावातून अजय काकडे नावाचं झोपेतलं मुटकुळं गाडीत टाकून ककुने जी काही सॅंट्रो बुंगवली ती थेट नटराजला इडल्या हाणायलाच थांबवली.
इडल्या तशा ताज्याच होत्या पण चटणी फ्रीजमधली कालची होती. पण वरुन चहा गेल्यावर ती पोटातल्या पोटात गरम झाली. आज वाघोबांकडे गो-प्रो नावाचं खेळणं होतं, ते पाहता पाहताच भोर फाट्यावरुन वळालो की रस्ता कसा आपला एकदम ओळखीचा वाटायला लागतो. बंद काचांआडून थंडी डोळ्यांना जाणवत होती. निघताना एकमेव अव्हेलेबल असलेली तीन वर्षांपूर्वी गाडीत पडलेली एकमेव गाण्यांची सीडी सिस्टीममध्ये सरकावली आणि ती चालू व्हावी म्हणून हात जोडून धरले. तर काय आश्चर्य... सुरुवातच सुरेल अभंगांनी झाली. मग काय... माहोल जमायला उशीर थोडाच होणार. भाटघर धरण, मांढरदेवी फाटा, भोर चौकातला शिवाजी पुतळा, थोडे पुढे गेल्यावर नेहमी दिसणारे ते आदर्श वडाचे झाड, रोहिडा, रायरेश्वराचा रस्ता हे नेहमीचेच ओळखीचे गडी हातांत हात गुंफून पाठीशी उभे असल्याचा भास घडवत होते. कित्येकदा नीरा-देवघर धरणाच्या जलाशयाच्या साक्षीने वळणांची गुंफण विणत या रस्त्याने वरंध घाटातून कोकणात उतरलो असू पण दरवेळी काहीतरी नवीन गवसतंच. एका ठिकाणाहून छोटा ब्रेक घेऊन नटून थटून आलेल्या नारायणाचे जलाशयाच्या पार्श्वभूमीवर काही फोटो काढले आणि मागल्या वेळी दोन-चार-पाच करताना , कावळ्याच्या वाटेवर ज्या मामांकडे बॅगा टाकल्या होत्या तिथेच भजी आणि चहा आपलासा केला.

वरंध उतरुन गेलो की ढालकाठी नावाचं गाव लागते तिथून कांगोरी ऊर्फ मंगळगडाच्या पायथ्याला जाणार्‍या गावास डावीकडे वळालो. पिंपळवाडी विचारत विचारत आम्ही जात होतो. तब्बल अर्धा तास झाल्यावर आम्ही एकदाचे पिंपळवाडीच्या गोगावले वस्तीला पोचलो.तिथेच अम्याला आणि वाघाला ’वाघ मारायची" लागण झाली. त्यांचे ते सोपस्कार उरकल्यावर आम्ही रस्ता विचारुन घेतला. एक कच्चा गाडीरस्ता वर अर्ध्यापर्यंत जात होता. पण भैरवगडाचा अनुभव गाठीशी असल्याने आम्ही गाडी गोगावलेवस्तीच्या शाळेपाशीच लावली. पाणवठ्यावरुन पाणी भरुन घेतले आणि समोरच्या वाटेन वन-टू-वन-टू सुरु केले. घाटमाथा उतरुन आलो की कोकणातले किल्ले तसे कस काढतातच. घाम निघत होता, धाप लागत होती, पाणी रिचवत आम्ही वाट काटत होतो. पण कातळकड्याच्या खालचे मधल्या टप्प्याचे पठार काही येईना. माथा तर दिसतोय पण वाट सापडेना. मग काय... केला सुलतानढवा... आणि गाठले पठार. पठार होते मात्र सुंदर... नुकत्याच परत गेलेल्या पावसाने कमरेइतके वाढलेले गवत चढत्या वाटेसरशी छातीइतके आणि पुढे डोक्याइतके झाले होते. पठारावरुन कड्याच्या डाव्या अंगाने ठळक वाट वर कातळाच्या बगलेतून आडवी जाते आणि पुढे वर चढते. जंगल आणि कारवीच्या झाडीतून जाणारी वाट संपली की गडाचा पहिला दरवाजा. आणि त्यापलीकडे त्याचे माची.
दरवाजातून आत गेल्यावर लहानशी खिंड आणि डाव्या हाताला विस्तीर्ण माचीची सोंड घुसली आहे. त्याच्या टोकाशी कांगोरीनाथाचे मंदिर. वाटेवर जाताना उजवीकडे मोठे टाके. पाणी इमर्जनीमध्ये पिण्यायोगे आहे. लहानशी घुमटी सोडली तर बाकी सगळं मंदिराचं पंधरावीस फुटी आवार उघडं बोडकं. कधीकाळी बसवलेले पत्रे उडून गेलेत. आवारात स्वयंपाकाची काही भांडी आहेत. म्हणजे मुक्काम करावा लागला तर सोय होईल. आपलं काम झालं की ती नीट स्वच्छ करुन ठेवायची अशी अपेक्षा असते. घुमटीत काही नीट, काही भग्न मूर्ती, अनेकांनी कांगोरीनाथाला वाहिलेले धातूचे घोडे, काही समया. तिथेच असलेल्या बाटलीतल्या तेलाचा वापर करुन आम्ही तिथे दिवा लावला. थोडा आराम केला आणि मंदिराच्या मागे असलेला बुरुज, तटबंदी पाहून परत बालेकिल्ल्याकडे निघालो. माचीच्या टोकावरुन आम्ही मोहनगड, रायरेश्वराचे नखिंड, प्रतापगड अशी ओळखपरेड घेत चंद्रगडही शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केला गेला. खिंडीत परत येऊन बालेकिल्ल्याच्या डाव्या अंगाने बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट धरली. ती वाट जिथून वर चढली होती तिथे दाट झाडी माजली होती. पायात काही ठिकाणी पायर्‍या ठेचकाळत होत्या हीच काय ती योग्य वाटेवर असल्याची खूण. डावीकडे एक मोठी बांधीव विहीर आहे. त्याच्यापुढे डोक्याएवढे उंच गवत, झाडी आणि वाड्यांचे काही अवशेष ... सगळाच मामला दाट गवतात. सगळे नीट पाहून घेतलं आणि परत फिरलो आणि खिंडीत येऊन थोडा आराम करुन पायथा गाठला. येताना एके ठिकाणी गवताखाली दगड न दिसल्याने माझा पाय असा काही मुरगाळला की असा काही विव्हळलो की किंकाळीचा आवाज पंचक्रोशीत घुमला असेल. कळवळून तिथेच आडवा पडलो आणि जरा आराम घेतला. पुढचा उतार सगळा नीट सावकाश पावलं टाकत उतरला आणि पुन्हा गोगावलेवाडीत पोचलो. शाळेशेजारील पाणवठ्यावर फ्रेश झालो आणि शेजारच्या "सुपर मार्ट"मध्ये राजकुमारांच्या आवडीचे पेय म्हणजे "थंपास" प्यायले. तिथे चिक्की आणि बिस्कीटे घेऊन आम्ही चंद्रगडाकडे जायला महाडच्या दिशेने निघालो तेव्हा दुपारचे साडेतीन वाजले होते. सकाळी खाल्लेल्या स्टीम्ड इडल्यांची एव्हाना फक्त स्टीम शिल्लक होती. महाडवरुन पोलादपूरच्या दिशेने गाडी दामटली पण एक डोळा सदैव रस्त्याच्या कडेला कुठे बरे हॉटेल दिसतेय का याकडे लागून होता. तसे दिसताच तिथे गाडी घालून मेनू कार्डकडे न पाहता डोळे झाकून चिकन हंडी, बटर रोटीची ऑर्डर सुटलीदेखील. पोटोबा शांत झाल्यावर पोलादपूरवरुन गाडी डावीकडे महाबळेश्वरच्या दिशेने घातली, सावित्री धरणाच्या कडेकडेने जाणार्‍या रस्त्याने कापडे गावात येऊन पोचलो. कापडे गावात थोडं मुक्कामासाठी वाण-सामान भरलं. त्यावरुन आठवलं घरी वाण-सामान भरलं नाही म्हणून ट्रेकला निघतानाच टोमणे पडले आहेत. तर असो... घरोघरी मातीच्या चुली !!!
चंद्रगडच्या पायथ्याचे गाव म्हणजे ढवळे. कापडे गावातून ढवळे फाटा आहे. तो जातो नरवीर तानाजी मालुसर्‍यांच्या उमरठ या गावातून. आम्हांला अर्थातच ते स्मारकही पहायचे होते. ढवळे गाव पंचवीस किलोमीटर आणि पोचायला साधारण तासभर असा अंदाज धरुन आम्ही निघालो होतो. पण रस्ता एवढा ओम पुरीछाप होता की ढवळ्याला पोचायला तब्बल दोन तास लागले. ढवळे १२ किमी असा मैलाचा दगड पाहिला तेव्हाच सूर्य अस्तावला होता आणि हळूहळू संध्याकाळचे धुके सभोवतालच्या दरीवर विळखा घालत होते. आम्ही सातच्या सुमारास ढवळे गावात पोचलो, तेव्हा चांगलाच अंधार पडला होता आणि आमचा मुक्कामास पौर्णिमेच्या रात्री ढवळी नदीचा काठ गाठण्याचा बेत फसला आणि गावातल्या मंदिरातच झोपण्याचा शहाणा निर्णय झाला. ढवळे गावातल्या रवी मोरेला शोधले आणि त्याच्या पडवीत जरा वेळ आराम करुन त्याच्या वडिलांशी गप्पा झोडल्या. आख्खं आयुष्य जावळीचं जंगल पाहिलेला माणूस, गाठीला दांडगा अनुभव, त्यात सार्‍या कुटुंबालाच भजनाचा मृदंगाचा ध्यास. मुंबई-पुण्यातले मोरेंचे नातेवाईक, त्यांचे पोलिस-मिलिटरीतले सोयरे, जावळीतली जनावरं, त्यांची विळी, कमरेचे अडकावणे अशा एकदम आडव्या-तिडव्या गप्पा मारुन झाल्यावर आम्ही आमच्याकडचे मॅगी करुन घेतले आणि ते पोटात ढकलून जरा निवांत होतो नाही तेच तांब्याभर दूध उकळून आमच्या समोर आलं. त्या पौर्णिमेच्या दुधाळ चांदण्या रात्री साखर घातलेले ते दूध पिऊन आम्ही जे काही झिंगलो म्हणता... विचारता सोय नाही.
नंतर निवांतपणे साडेनऊला ढवळे गावाच्या आसपासच्या रस्त्यावर ओढ्याकडे चक्कर टाकली. जगन्नियंत्याने पिठूर चांदणे ढवळी नदीच्या खोर्‍यात शिंपले होते, थंडगार वारा वाहत होता. चांदण्याचा सुगंध रोमारोमात भिनला होता. गोठ्यात गाईंच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिणाट शांत होत आलेला. एखाद्या घरातले बाळ कुरकुरत होते. अगदी कानाशी चाललंय असं वाटणारा गावातल्या भजनाचा सूर टिपेला भिडला होता. त्या टिपूर चांदण्यात रात्रीच्या फेरीचा आनंद आम्ही घेत होतो. मंदिराच्या पडवीत परतलो तेव्हा कीडामुंगीचा त्रास नको म्हणून तंबू उभा केला. काही भिडू त्या मंदिराच्या पारावर गप्पा टाकीत बराच वेळ बसून होते.
सकाळी उठून चहा घेऊन रवीच्या सोबतीने आम्ही चंद्रगडाच्या दिशेने कूच केले. वाटेतली कोळीवस्ती मागे टाकली की एक पुसट वाट जंगलात घुसते. जावळीचे जंगल म्हणजे काय चीज होती ते प्रत्यक्ष अनुभवत होतो. आता माणसांचा पायरव वाढला असूनही अगदी वीस फुटांवर माणूस आला तरी दिसणार नाही अशी जाळी. प्रकाशाकिरणांना शिरायलाही अगदीच जंगलाने उपकार केल्यासारखी जागा दिलेली. त्यातून कुठेतरी तळाशी येऊन किरणांनी रांगोळी रेखलेली. तासाभराच्या चढणीनंतर आम्ही म्हसोबाच्या खिंडीत पोचलो. तिथे थोडा आराम करुन वरच्या दिशेने नजर टाकली. आता वाट अगदी छातीवरच आणि घसार्‍याची. नेटाने पाय रोवून वर चढावे असेच. वीस मिनिटांतच आपण पहिल्या चौकीशी पोचतो. उजवीकडे दूरवर महाबळेश्वरचे आर्थरसीट डोंगराच्या आडून डोकावत असते. त्याच्यासमोर एक आडवाच्या तिडवा डोंगर पसरलेला. चंद्रगडाच्या कड्याच्या अंगाने सूर्य त्याची किरणं फेकीत होता. वाटेत ठिकठिकाणी झाडांवर ठोकलेले ओम नमः शिवायचे फलक म्हणजे आपण योग्य वाटेवर असल्याची खात्री. अर्थात सोबत रवी असल्याने चुकण्याची शक्यता नव्हतीच. आणखी पाऊण तासाने आम्ही माथ्यावर पोचलो.
माथ्यावर उघड्यावर एक सुबक नंदीशिल्प आणि महादेवाची पिंड. वर्षानुवर्षे अशीच उघड्यावर ऊनवारा झेलीत. त्या रुद्राला ना राऊळीची आस ना कुणा भक्ताच्या फुलांची. तिथे बाटलीतल्या पाण्याने रवीने त्याला अंघोळ घातली आणि अगरबत्ती लावली. तिथून आणखी थोडे पुढे बालेकिल्ल्यावर काही वाड्यांची जोती आणि उत्तर टोकाशी एक दिंडीवजा दरवाजा. तो उतरतो समोरच्या बुरुजात. बुरुजाशीच एक पिण्याच्या अमृतासमान थंडगार पाण्याचे टाके. तिथे आम्ही थोडे ताजेतवाने होऊन परत फिरलो. तासाभरात म्हसोबाची खिंड आणि कोळीवस्तीमार्गे ढवळे गावात उतरलो. कोळीवस्तीवर भात झोडण्याचे काम चालू होते, त्याचे काही छान फोटो मिळाले.
परतीच्या वाटेत येता येता खोपडचा मोरझोत नामक धबधबा आणि उमरठे गावात तानाजींची आणि शेलारमामांची समाधीचे दर्शन करुन कापडे गावातून आंबेनळी घाट चढायला लागलो तेव्हा दुपारचे दीड-दोन वाजले होते. प्रतापगड फाट्याला पुन्हा एकदा चिकनहंडी आणि बटररोटी अशी डोळेझाक ऑर्डर देऊन आत्मशांती करवली. पुन्हा परतीच्या रस्त्यावर तोच सोपस्कार घडला.... डिस्कशन = व्हॉट नेक्स्ट !!
01:45
1
त्रिंबकगड-दुर्गभांडार-अंजनेरी
2013 अंजनेरी ट्रेक त्रिंबकगड दुर्गभांडार

त्रिंबकगड-दुर्गभांडार-अंजनेरी

लडाखनंतर विशेष अशी भटकंती काही घडलीच नव्हती. कॅमेरा आणि फोटोची खाजही घरातच किंवा फारतर लक्ष्मीरोडला गणपती विसर्जनाची मिरवणूक शूट करुन शांत केली होती. लडाखमुळे खरं तर खूप ट्रेक मिस झाले होते. परंतु हिमालयाचे सौंदर्य आपल्या जागी आहे आणि  सह्याद्रीचे राकट कड्यांचे सौंदर्य आपल्या जागी. त्यातून नाशिक परिसर म्हणजे अनेक दुर्गशिल्पांचा खजिनाच. अर्ध्यावर चढत गेलेले सौम्य ते मध्यम चढावाचे टप्पे आणि तिथून अचानक आकाशात उठलेले ताशीव कातळकडे, त्याच ताशीव कड्याच्या पोटातून खोदलेली कुठेतरी लपलेली वाट, ती चढून वर गेले की अनेकविध दुर्गशिल्पांचा अमाप खजिना, आश्चर्य वाटावं अशा अनेक गोष्टी, नवल करावं तेवढं थोडं असं काहीसं सगळं... आता हेच वर्णन धोडप, साल्हेर या किल्ल्यांना किती शोभतेय. तर अशी ही नाशिक परिसराची महती. आता दोन दिवस जोडून मोहीम आखायची तर मग आजवर फक्त बागलाण भटकून चटक लागलेली असताना नाशकाला डावलून कसे चालेल? हाच बेत मनात ठेवून यावेळी बेत आखला होता त्रिंबकगड-दुर्गभांडार आणि अंजनेरी. भिडू होते पुण्याहून अजय, सध्या ठाण्याची कर्मभूमी असलेला पुणेकर ध्रुव (धुरड्या), केदार (केयो) आणि गजानान (गज्या). पुणे-नाशिक या भंगार रस्त्याचा प्रवास नको आणि ठाण्यातून "जास्तीची मेजॉरिटी" झाल्याने पुण्याहून शुक्रवारी संध्याकाळीच गाडी काढून ठाण्यात पोचलो. तिथे धुरड्याच्या सध्या बॅचलर असलेल्या घरी मुक्काम ठोकून शनिवारी पहाटेच मुंबई-नाशिक हायवेने सुट्ट्या-सुईईई करणार होतो. तत्पूर्वी रात्री ठाण्यात बिट्टू-दा-धाबामध्ये जोरदार मेजवानी झोडण्यात आली आणि वरुन देवांगची कुल्फीही हाणली गेली.
झोपण्यापूर्वीच उद्याच्या सॅक भरुन तयार ठेवल्या. रात्री कशीबशी तीन-साडेतीन तासांची झोप झाली असेल तोच सगळ्यांचे मोबल्यातले गजर खणखणले आणि सगळे खडबडून जागे झाले. पावणेपाचलातर आम्ही ठाण्याच्या नाक्यावर टोल भरुन इगतपुरीच्या दिशेला सुटलोही होतो. बाहेर पडून सूर्य उगवता चहाचे अर्घ्य अर्पण करुन धुक्याने वेढलेल्या कसारा घाटात पोचलो. नुकतीच न्हालेली सुंदरी केसांवरचे पाणी निथळत असताना जशी दिसेल तशीच सुंदर मंत्रमुग्ध करणारी सकाळ होती. पाऊस नुकताच पडून गेलेला, रस्त्यावर त्याची ओल अजूनही तशीच, दाट धुक्याने वेढलेला कसारा घाट आणि अतिशय तुरळक वाहतूक.
मुंबई नाशिक रस्ताही तसा एकदम मक्खन. गाडी कधी शंभर-सव्वाशेच्या घरात पोचत होती तपास लागत नव्हता. इगतपुरी परिसर आम्हांला एवढे दिवस का इकडे आला नाहीत असा जब विचारत होता. आता ध्रुव आलाय ठाण्यात आणि त्याने खास आमच्यासाठी "होऊ दे खर्च" म्हणत ठाण्यात तब्बल २ बीएचकेचा फ्लॅट (‘भाड्या’ने) घेतलाय मग आता रेग्युलर येऊ असं आश्वासन त्या डोंगररांगांना देऊन घोटीगाव मागे सारले. घोटी-लेफ्ट-अप्पर वैतरणा धरणाच्या कडेकडेने जाणारा रस्ता-हिरवीगार झालेली भातशिवारं. शाळेत चाललेली पोरं, सकाळची लगबग असलेल्या टमटम आणि  वडाप. अशा वातावरणात आम्ही तिथे आलो म्हटल्यावर काय... आपल्या वायुदलानं सुद्धा आकाशात जेट स्मोकट्रेल्सची कमान करुन स्वागत केलं. (कस्सं बरोबर समजतं त्यांना आम्ही आलोय ते) ;) घोटी, वाकी, भावली अशी गावं मागे सोडत आम्ही निघालो. सोबतीला डावीकडे दूरवर त्रिंगलवाडी, उजवीकडे कावनईची संगत.
घोटीवरुन त्रिंबकला जाताना पूर्वी दूरचा वळसा पडत असे. पण आता एक नवीन रस्ता झालाय ज्याने ५०-६० किमीचं अंतर २२ वर आलंय. हा नवा रस्ता सातुर्ली गावावरुन उजवीकडे वळालं की वैतरणा आणि मुकणे धरणाच्या फुगवट्यांच्या मधून जातो. रस्त्याच्या दोहो बाजूंनी जलाशय आणि मधोमध बांधलेल्या पुलावरुन गाडी घालायची. सुंदर परिसर. त्यात सकाळची वेळ. कुणाच्याही मनातला फोटोग्राफर जागा व्हावा असा नजारा. पण आजचा ट्रेकचा टप्पा अधिक असल्याने मनाला आवर घातला आणि सोनगड-बिंडाकडून खरोलीमार्गे पहिने गावात आलो. पहिने गावाशीच क्लाईंबर्समध्ये फेमस पहिने नवरा-नवरी सुळके आहेत. आता समोरला विस्तीर्ण सह्याद्रीविस्तार नजरेत सामावत नव्हता. देवाचा डोंगर, पहिने सुळके, त्रिंबकगड, कार्वी, अंजनेरी अशी सगळी रांग समोर दिसत होती. स्टाईल तीच. नाशिकछाप. अर्ध्यावर चढत गेलेले सौम्य ते मध्यम चढावाचे टप्पे आणि तिथून अचानक आकाशात उठलेले ताशीव कातळकडे. आमचे पहिले लक्ष्य म्हणजे त्रिंबक आणि दुर्गभांडारही समोर दिसल्त होते. आव्हान देत नव्हे तर प्रेमाने अंगाखांद्यावर बागडायला बोलावणारे. पहिने गावात एका काकांशी गप्पा मारत मारत काही फोटो काढले आणि  सोबतच सभोवतालच्या डोंगररांगेची नावं घेत उजळणी करुन घेतली.

पंधराच  मिनिटांत अंजनेरीच्या बगलेतून निघून त्रिंबकला वळसा देत त्र्यंबकेश्वरमध्ये पोचलो. तद्दन तीर्थस्थान जसे असते तसेच दृश्य. टपर्‍यांची दुकानं,थोडीफार अस्वच्छता, भटकी कुत्री आणि सतरा गावचे भक्त. अर्थातच मंदिरात जाण्यात रस नव्हता. आमचा देव तर तिथे वर... डोंगरात वसलेला, शोऑफ भक्तांच्या गर्दीला कंटाळून. सकाळचे "जेवाय जेवाय जेवाय" व्हायचे असल्याने आधी ते काम केले. नाशिक फेम रस्सावडा, पाववडा आणि इतर काही खावून आम्ही त्रिंबकच्या पायथ्याला गाडी लावली. आजकाल कार असल्याने बरी सोय आहे. सगळंच कॅरी करावं लागत नाही. कॅमेरा, पाणी, टोपी आणि एखादे इमर्जन्सी खाणे एका पिट्टूमध्ये भरले की झाले काम. चढाई सुकर होते आणि गाढवओझेही टाळले जाते.

पाऊस सरला होता, पण बंद झाला नव्हता. मधूनच एखादी सर येऊन सभोवताल चिंब करुन जाई. क्षणात सरकन चकाकते ऊन पडत असे. सगळीकडे नुकत्याच झालेल्या आषाढाने हिरवेगार झालेले. वरुन चकाकते ऊन. बालकवींची शाळेत शिकलेली कविता आठवली.
श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

थोडी चढण पार केल्यावर एका व्यापार्‍याने धर्मशाळा बांधलेली आहे. सध्या ती वापरात नसली तरी मुक्कामास योग्य अशीच जागा आहे. अगदी स्वयंपाकासाठी वेगळी खोली, महिलांना वेगळी खोली, समोर प्रशस्त पडवी अशी दुमजली इमारत. नक्कीच त्र्यंबकेश्वरला येणार्‍या भक्तांसाठी त्या काळी ही इमारत बांधलेली असावी. ती पाहून आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात त्रिंबकच्या कातळात खोदलेल्या पायर्‍या सुरु झाल्या. त्रिंबकगडावरील ब्रह्मगिरी हेही तीर्थस्थान असल्याने वाटेवर बर्‍यापैकी गर्दी होती. पायर्‍यांवर पावसामुळे शेवाळले होते. जिथे हवे तिथे (आणि नको तिथेही) रेलिंग्ज लावलेले होते. शिवाय वाटेवर भाविक खायला टाकत असल्याने सोकावलेल्या माकडांचाही उपद्रव वाढला आहे. हातात काठी असली की त्यांना थोडा धाक असतो अन्यथा पाठीवरच्या सॅकवरही हल्ला करतात. तासभर चढाई करुन पहिल्या टप्प्यावर पोचताच सामोरा येतो तो गडाचा पहिला दरवाजा. सातवाहनांचा वारसा सांगणार्‍या अखंड कातळात कोरलेल्या पायर्‍या आणि अखंड कातळात कोरलेला दरवाजा. आपल्या जवळच्या जुन्नर भागातही अशा किल्ल्यांचे जिवधन, हडसरसारखे नमुने पाहण्यास मिळतात. या पायर्‍या चढून गेल्यावर माथ्यावर प्रशस्त सपाटी आहे. एवढे मोठे सपाट असूनही राबता किल्ला  म्हणावा असे विशेष अवशेष आढळत नाहीत. थोडेफार घरांची जोती दिसतात आणि उजवीकडे थोडेफार तटबंदीचे अवशेष. मात्र पायर्‍या, दरवाजा मात्र अतिशय शाबूत आणि सुरेख. तिथे एका मामांकडे लिंबूपाण्याचा डोस घेऊन ताजेतवाने झालो आणि एकदम मळलेल्या वाटेने शिखराकडे जाता येते. समोर श्रावणाची स्वच्छ हवा असल्याने आजूबाजूचे अंजनेरी, त्र्यंबकेश्वर गाव स्पष्टपणे नजरेस येतात. शिखराच्या वाटेवर चढून गेलो की आपण माथ्यावर पोचतो आणि मग जाणवतो तो नाशिकचा सुप्रसिद्ध भर्राट वारा. अगदी चालता माणूस उडून जाईल असा. शिखरावरुन फोटो काढून आम्ही एका सोंडेच्या बगलेत असणार्‍या गोदावरी मंदिराकडे निघालो. तिथेही माकडांचा उपद्रव होताच. दर्शन घेऊन आम्ही कड्याला समांतर वाटेने जटा मंदिराकडे निघालो.
जटा मंदिराच्या मागे जी मळलेली वाट जाते तीच पुढे दुर्गभांडार या त्रिंबकच्या जोडकिल्ल्याकडे. फार कमी लोकांना हे अखंड कातळात कोरुन बनवलेले अनोखे दुर्गशिल्प ठाऊक आहे. जटामंदिर पाहून यात्रा संपली असा समज करुन परत फिरतात. तसेच आजही घडत होते. पण आमची तीर्थयात्राच वेगळी. खरी यात्रा तर आता सुरु झाली होती. आम्ही जटामंदिराच्या मागल्या टाक्यातून पाणी भरुन घेतले आणि त्या एकांती वाटेवरुन मागचा रस्ता धरला. अतिशय निसरड्या वाटेवर आम्ही चालत होतो तरी कमरे-छाताडाइतक्या वाढलेल्या गवतामुळे ते जाणवत नव्हते. रानफुलांनी बहरलेली वाट जास्त वापरात नसल्याने झाडीही बरीच वाढली होती. त्या फुलांच्या ताटव्यांतून चालताना थकवा असा जाणवतच नव्हता. वीस मिनिटांतच आम्ही कड्याच्या एका टप्प्याच्या टोकाशी पोचलो तरी किल्ल्याचा दगडही दृष्टीस पडेना. समोर दिसली फक्त समोर खाली एक कातळभिंत त्याच्या टोकाला समोरच्या कातळात जाणारे एक तीन फुटी भगदाड. पण तेथपर्यंत पोचायला वाटच दिसेना. पुन्हा थोडे मागे येऊन पुसट झालेली डावीकडे गेलेली वाट घेतली आणि समोर दिसले ते अभूतपूर्व. 



अतिशय अरुंद अशा खाली उतरत जाणा‍र्‍या पायर्‍या. अगदी अंधारात गेलेल्या, पाताळात नेतात की काय असेच वाटावे. त्यांची रजना तरी किती अनोखी. आम्ही अगदी त्याच्या माथ्यावर आठ-दहा फुटांवर होतो तरी दिसल्या नाहीत. दुर्गरचनेचा अदभुत आविष्कार. त्या पंचावन्न पायर्‍या उतरत गेलो की समोर दिसतो तो दुसरा एक आविष्कार. अगदी माणूस जाताना सरपटतच जावा अशी रचना केलेला दरवाजा. म्हणजे किल्ल्याच्या संरक्षणासाठी आठ-दहा वर्षांचं पोर जरी तलवार घेऊन  पलीकडे बसवलं तरी एकजण किमान चार तास किल्ला लढवील. सरपटताना आली मान बाहेर की चालवा तलवार, एवढा सोप्पा कारभार. तिकडे धड आणि इकडे मुंडक्यांचा ढीग. त्या रचनाकाराला मनोमन सलाम करुन आम्ही त्या निरुंद कातळभिंतीवर पोचलो. दोन्हीकडे एकदम सरळ खाली सुटावलेले तीन-चारशे फूट कडे आणि पाच-सात फुटी निरुंद नैसर्गिक भिंत. तुच्यावरुन चालत गेलो की समोर तसाच एक दुसरा दरवाजा. त्यातून घुसून तशाच चाळीस-पंचेचाळीस पायर्‍या चढून आपण किल्ल्याच्या दुसर्‍या कड्याच्या पोटात पोचतो. तिथे माथ्यावरुन जाऊन टोकाशी असलेल्या बुरुजावर पाचच मिनिटांत पोचतो.

हा बुरुजदेखील अखंड कातळात कोरलेला. बुरुजात उतरायला वाट आहे, इथे जरा जपूनच गेलो. कारण डाव्या हाताला खोल दरी आहे. बुरुजावरुन उजवीकडे खाली ब्रह्मगिरी, गंगाद्वाराचे दर्शन होते. समोर हरिहर (हर्षगड) आणि बसगडाचेही दर्शन घडते. बास संपला किल्ला. रुढ अर्थाने खरं तर किल्ला म्हणावा असे अवशेष म्हणजे एक कोरीव मारुतीची मूर्ती आणि खोदीव पायर्‍या, सरपटत जावे लागेल असा दरवाजा. विशेष काहीच नाही, पण विशेष बरंच आहे. संरक्षणासाठी सज्ज दरवाजा, पायर्‍या आणि अरुंद भिंतीचा नैसर्गिक आविष्कार. एवढा सुंदर किल्ला प्लान केल्याबद्दल ध्रुवने मला तिथल्या तिथे एक सिक्रेट बक्षीस जाहीर करुन टाकले. (जे अजून दिलेले नाही). ते सगळे मनःचक्षूंमध्ये साठवून आम्ही परत फिरलो. पुन्हा फुटाफुटाच्या
 छातीवर येणार्‍या पायर्‍या, दरवाजातून सरपटणे असं करत अलीकडल्या कड्याशी आलो. तब्बल सात वर्षांनी फुलणारी कारवी इथे बहरली होती. अर्थातच कॅमेरे सरसावून फोटो काढले. नंतर आल्या वाटेने परत न जाता कड्याच्या डावीकडून येणारी, त्याला पूर्ण वळसा घालून जाणारी पुसट पायवाट पकडली. अर्थात ही वाट नवख्या ट्रेकर्ससाठी नाही. अतिशय अरुंद म्हणजे काही ठिकाणी फक्त फूट असलेली वाट फक्त उंचीला आणि खोल दरीच्या दृश्याला सरावलेल्या डोळ्यांचीच. त्या वाटेने पुन्हा शिखर चढण्याचा त्रास वाचल्याने आम्ही अर्ध्या तासातच लिंबूपाणी असलेल्या हॉटेलवजा टपरीवर पोचलो. पुन्हा तिथे ताजेतवाने होवून माहिती घेतली असता समजले की खाली त्या धर्मशाळेच्या मागे एक मोठे विहीर आहे. परतीच्या वाटेवर झरझरा पाय उचलत आम्ही ती पिण्याच्या पाण्याची विहीर पाहून तासाभरात पायथा गाठला. आता पुढे आमचा मनसुबा होता अंजनेरीचा माथा गाठून मुक्काम टाकण्याचा. पुन्हा त्याच त्र्यंबकेश्वरच्या हॉटेलात जेवण करुन घेतले. मुक्कामात अधिक स्वयंपाक रांधून अधिक श्रम न करता लगेच खाता येईल असा सुका खाऊ आणि भरपूर फळे बॅगांमध्ये टाकली.
त्र्यंबकेश्वरच्या बाहेर पडलो आणि अंजनेरीच्या दिशेने कार काढली तेव्हा दुपारचे तीन वाजत आले होते. अंजनेरी अर्धा ढगांत लपलेला होता. सुर्यास्त अंजनेरीच्या माथ्यावरुन फोटोत बंदिस्त करायला मिळावा म्हणून आम्ही घाई करत अंजनेरी पायथा गाठला. अंजनेरीच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या वनखात्याच्या तपासणीनाक्यापर्यंत गाडी जाते. फक्त रस्ता थोडा (!!??) खराब आहे आणि ऑफरोड ड्राईव्ह, अपहिल ड्राइव्ह असं सगळं कसब लहानशा स्विफ्ट गाडीवर आजमावून आम्ही तिथे पोचलो. तिथून पुन्हा पाठपिशव्या पाठुंगळी मारुन आम्ही अंजनेरी चढायला सुरुवात केली. अगदी रेस अगेन्स्ट टाईम. तासभर लागला पहिल्या पायर्‍यांपर्यंत पोचायला. या पायर्‍यांच्या मध्यावरच डावीकडे कातळात जैन लेणी खोदलेली आढळली. हा चारपाच लेण्यांचा समूह असून आतमध्ये अनेक सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. सुर्यास्ताला माथा गाठायचा असल्याने आम्ही ती लेणी परतीच्या वाटेवर पाहण्याचे ठरवले आणि पाय उचलून माथा गाठला. माथ्यावर दूरवर पसरलेले हिरवेगार पठार आणि त्याच्या टोकाला एक अंजनीमातेचे लहानसे मंदिर. शिवाय सुर्यास्ताच्या फोटोंचा भ्रमनिरास करणारा प्रसंग म्हणजे दाटून आलेले कुंद ढग :-( . आता मुक्काम टाकणे एवढाच उद्देश उरला होता. म्हणून तो प्रसिद्ध आश्रम शोधण्याच्या उद्योगाला लागलो. मंदिराच्या मागे थोडेसे वर चढून गेलो की आणखी एक आश्चर्य आपली वाट असते. ते म्हणजे एक नितळ पाण्याने काठोकाठ भरलेला तलाव. तलावाच्या बाजूने जाणार्‍या वाटेने शिखराच्या डावीकडून पुढे पाचच मिनिटांवर तो दाट झाडीत आश्रम नजरेला पडला. निबीड अरण्यात, गर्द वृक्षांच्या छायेत, माथ्यावर पानांच्या मधून येणार्‍या बिलोरी झळाळीत कुण्या योग्याने हा आश्रम वसवला त्याला खरंच दाद द्यायला हवी.
आश्रम आधी दिसतो आणि त्याच्याकडे जातानाच्या वाटेवर उजव्या हाताशी अंजनेरीची प्रसिद्ध सीतेची गुहा अर्थात सीतागुंफा. दोन खोल्यांची ही गुंफा असून भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. त्या गुहेतही मुक्काम करता येतो. पण त्या आश्रमात आधीच एक मोठा ग्रुप वस्तीला आला होता आणि खरा गड अनुभवण्याच्या उद्देशाने गोंगाट टाळण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही आधीच्याच अंजनीमातेच्या मंदिरात मुक्काम टाकण्याचे ठरवले. आश्रमाच्या नळकोंडाळ्याशी फ्रेश झालो, पाणपिशव्या भरल्या आणि मंदिराकडे माघारी पोचलो. तिथे मंदिर झाडून घेऊन कोनाड्यातला दिवा पेटवला तशी ती गुहा उबदार प्रकाशाने उजळली. गारठा वाढला होता. जेवणाला अजून वेळ असल्याने आम्ही उबदार स्लीपिंग बॅगमध्ये पडून बराच वेळ गप्पा मारत होतो. बाहेर जो काही सुसाट वारा सुटला होता तसा आजवरच्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. माणसालाही सरळ उभे राहता येणार नाही एवढा त्याचा जोर. दरम्यान त्या मंदिरात हिंदीभाषक ट्रकवरच्या ड्रायव्हर-क्लीनरची एक जोडी आली. त्यांना अंधारात रस्ता सापडणार नाही म्हणून अजय आणि ध्रुवने सुरक्षित आश्रमात नेऊन सोडले. ते परत आल्यावर आम्ही जेवण उरकले आणि पुन्हा स्लिपिंग बॅगच्या उबेला शरण गेलो. दिवसभराच्या शिणवट्याने गप्पा मारता मारता डोळा कधी लागला ते कळलेच नाही.
दुसर्‍या दिवशी मी सोडून बाकी मंडळी शिखरावर जाऊन आली. माथ्याला एक लहानसे मंदिर आहे. मंडळी परतल्यावर सीतागुंफेजवळ सर्वांनी "सांगाती सह्याद्रीचा"फेम पोजमध्ये एक एक फोटो काढून घेतला आणि ती जैन लेणी पाहून पायथ्याला आलो. एका पुस्तकात वाचल्याप्रमाणे अंजनेरीच्या पायथ्याच्या गावात प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आहेत असं वाचलं होतं. उतरतानाच समोर खोर्‍याच्या तळाशी ती हेरुन ठेवली होती. प्रत्यक्षात तिथे गेलो तर आम्ही खरंच अचंबित झालो होतो. अतिशय सुंदर आणि सुबक प्रमाणबद्ध मूर्ती, विविध प्रकारचे एकूण आठ मंदिरे, निबंध वाटावेत असे प्रचंड शिलालेख, मंदिरसंकुले असा प्रचंड मोठा खजिना आढळला. तशीच पुरातत्त्वखात्याची अनास्थाही पाहण्यास मिळाली. कधीतरी २००८ साली सर्वेक्षण केल्याच्या नोंदी काही शिल्पांवर आढळल्या आणि नंतर मंदिराला कुंपण घालण्यापलीकडे विशेष काही संवर्धन केलेलं आढळलं नाही. एक प्रचंड शिलालेख तर पालथा पडला होता, आम्हीच तो नीटनेटका करुन ठेवला. 



तो सुंदर ठेवा आणि ट्रेकच्या इतर आठवणी, नाशिक स्टाईलचे डोंगर, कालचा पठारवरचा वारा, दुर्गभांडारची कातळभिंत, सरपटायला लावणारा अजब दरवाजा असे सगळे आठवतच आम्ही नाशिकमार्गे ठाण्याकडे जाणारा मक्खन रस्ता धरला. अर्थातच येताना एका ढाब्यावर चिकन तोडणे आणि पुढला ट्रेक कुठे यावर चर्चा झडणे हे सोपस्कार पूर्ण केले गेलेच. 
01:25
0
खादाडमाची… ऊप्स ! राजमाची !
2013 ट्रेक राजमाची

खादाडमाची… ऊप्स ! राजमाची !

अजून राजमाची केला नाहीस? जीव दे!
काय? तू राजमाचीला गेलेला नाहीस? अरारारा…
मी पहिला ट्रेक राजमाचीचा केला.
असे ट्रेकला कालपरवा सुरुवात केलेली पोरंसुद्धा मला चिडवत होती. कारण एवढे ६०-६५ ट्रेक्सनंतरही राजमाची मला खंडाळ्याच्या घाटातूनच खिजवत होता. त्याच्यापर्यंत काही पोचता आले नव्हते.दोनवेळा राजमाचीच्या उद्देशाने लोणावळ्यात जाऊन पोचलेलो मी प्रत्येक वेळी अचानक प्रचंड मोठा पाऊस आला आणि मध्ये असलेल्या ओढ्याची भीती म्हणून स्थानिकांचे सल्ले ऐकून मी जायचे टाळले होते. एकदा तर राजमाचीच्या उद्देशाने गेलेलो मी स्वतःला चक्क भुशी डॅमच्या पाण्याने बाटवून घेतले होते हे आज सांगण्याचीही मला लाज वाटते. पण या वेळी मात्र कडक उन्हाळ्यातच दुपारी पुण्यातून कूच करुन संध्याकाळी राजमाची सर करण्याचा चंग बांधला होता. साथीला होता खूप जुना ट्रेकंगडी श्रीकांत ऊर्फ शिक्रांत ऊर्फ घंटासिंग. सुरुवातीचे काही ट्रेक आणि कोकण बाईक सफरी त्याच्यासोबत केले होते. तेव्हापासून श्रीकांत वेडा श्रीकांत हेच गणित पक्के डोक्यात बसलंय.या दिवसांच्या कडकडीत उन्हात दुपारी पावणेबाराला घरातून निघून श्रीकांतचे घर गाठले आणि परिक्षित तिथे पोचलाच होता. आधीच्याच आठवड्यात अमित आणि अजयने राजमाची ट्रेकमध्ये काय काय खाल्ले त्याचे अतिरंजित वर्णन करुन खुन्नस दिली होती. त्याचा वचपा आज काढने का हय असा पण करुनच बाईकला किक मारली.
पहिलाच स्टॉप चार किलोमीटरवर.“सरकारमान्य” नीरेचा स्टॉल दिसला. सरकारला मान्य असेल तर आपण का मोडता घाला उगाच? आपसूक बाईकचे ब्रेक कसे लागले कुणास ठाऊक, बहुतेक बाईकलाही आमची खोड माहित असेल. नीरा उपवासाला चालते… पासून नीरा गर्भवतीला उपयुक्त आहे…पर्यंत सगळे फायदे पुन्हा एकदा वाचून काढीत दोघांनी दोन दोन टंपास ती अमृतासमान चीज रिचवली. पुन्हा बाईक थोडी पुढे काढली आणि देहू फाट्याच्या जरासंच पुढे “गोटी सोडा” दिसला. श्रीवर्धन ट्रिपमध्ये गोटीसोडा कसा बनवतात हे प्रत्यक्ष पाहिले होते, तेव्हापासून पर्‍याला तो चाखायचा होता. म्हणून मग पुढे गेलेली गाडी रॉंग साईडने बरीच मागे आणीत लिंबू-सोडा घेतला. हाय काय अन नाय काय! देहूरोड टोलनाक्याला बाकी लोकांची वाट पाहत सावलीला बसकण मारली. समोरुन कुल्फीवाला आमच्याच दिशेने येत असल्याचा भास झाला. आम्ही घेतली नाही तर त्याचा धंदा कसा चालेल म्हणून तीच पडत्या फळाची आज्ञा मानून पु्न:श्च एकदा हाय काय अन नाय काय!
सगळी मंडळी आल्यावर तेथून अर्ध्या-पाऊण तासातच लोणावळा गाठला. तिथे एकदा ब्रेक घेऊन ओळख परेड झाली ती फक्त नावापुरती. परिक्षित ऊर्फ चीफ फायरफायटर, श्रीकांत ऊर्फ शिक्रांत ऊर्फ(परोपकारी) गंपू, प्रशांत गुर्जी, सुबोध, योगेश ऊर्फ डेप्युटी फायरफायटर,चेतन ऊर्फ अध्यक्ष ऊर्फ ५००, आदित्य ऊर्फ ३५० ऊर्फ सगळ्यांचा सुपरवायझर,माधव ऊर्फ सेक्रेटरी ऊर्फ डेप्युटी शेफ आणि मी पंक्या ऊर्फ चीफ शेफ. चीफ शेफ मीच असल्याने सगळे खाण्याचे ठरवण्याची आणि ते जमवण्याची जबाबदारी माझीच होती. पुण्यातूनच खिचडीचे साहित्य बॅगेत टाकलेले. पण ट्रेकला काहीतरी गोड पाहिजेच म्हणून जिलेबी शोधण्याचे फर्मान सोडले. पण लोणावळ्यात कुठेच हलवाई सापडेना. पण पुढे तुंगार्लीत दुकान आहे हे समजले म्हणून जरासे हायसे वाटले.ते शोधण्याचे होल ऍंड सोल काम माझेच होते. पण त्यात मला काहीच अवघड वाटले नाही, कारण असल्या गोष्टी ठरवून विसरायचे म्हटले तरी माझ्या नजरेतून सुटणार नाहीत. तुंगार्लीत गाडीवरुन सुसाट जातानाही गरमागरम जिलेबी तळणारा हलवाई पाहून काय सांगू… अत्यानंदाने डोळे पाणावले माझे. करकचून ब्रेक लावून तिकडे पाय केले, जिलेबी ही काय फक्त पैसे देऊन घेण्याची चीज नसतेच, कमीत कमी दोन केशरी वेढे तोंडात गेलेच पाहिजेत. मग या सुसंस्कृत(?) कामाला मीच पुढे. एक किलो घेताना छटाकभर विरघळलीच मुखात… हाय काय अन…. !
राजमाचीचा रस्ता तसा चिरपरिचित. लाल धुळीने आणि दगडगोट्यांनी परिपूर्ण. माणूस झोपला नाही तरी दिसणार नाही अशा खाचखळग्यांचा. जणू प्रत्येक ट्रेकरला आपुल्या स्वप्नातल्या गावा आल्याचा मनभरुन फील देणारा. तसाच सराईत बाईकरचाही कस काढणाराही. अशात ५०० आणि ३५० मात्र त्यांचे बुलेटनामक घोडे यथेच्छ दौडवित होते. कसल्या म्हणजे कसल्याच रस्त्याचा परिणाम त्यांच्यावर होत नव्हता. त्यांचे फायरिंग आख्खे रान दणदणाटून टाकत होते. पण अशातच चीफ फायरफायटरची गाडी पंक्चर झालेली दिसली.त्यामुळे मी त्यावरुन उतरुन त्याने एकट्यानेच जबरदस्त कौशल्याचे प्रदर्शन करत कशीबशी गाडी चालवत राजमाचीच्या पायथ्यापर्यंत आणली. तिथे नशिबाने एका“राहुल”कडे पंक्चर निघेल असे समजले. त्याने चाक खोलून एकच लहानसे पंक्चर आहे असे सांगितले तेव्हा हायसे वाटले. त्याला सकाळी येऊन गाडी घेऊन जातो असे सांगितले. आता वेळ झाली होती चहाची. फक्त चहा कसा जाणार बरे? मग बिस्किटे हवीतच. बिस्किटांचा डब्बलबार काढीत चहा भुरकावला. हाय काय आन… !
मग सगळे सामान पाठुंगळी मारुन आम्ही किल्ला चढाईला सुरुवात केली. अर्ध्यावर आलो तेव्हा सुर्याजी (उन्हाळ्यामुळे“पिसाळे” म्हणता येईल) आपले दिवसाचे काम डिलिव्हर करुन लॅपटॉप आणि डेस्क आवरत असल्याचे समोर दिसले. पण दिवसाच्या शेवटी आमच्या कॅमेरात रिपोर्टिंग करण्याचे बाकी असल्याने आमचीच वाट पाहत होते. मग त्यांना अधिक वेठीस न धरता लगेच आहे तिथे जरा बरी जागा पाहून सुर्याजीला summon करुन त्याची कॅमेरात हजेरी घेणे चालू केले. इकडे विरुद्ध बाजूस बालेकिल्लाही अप्रेजल झाल्यासारखा सोनसळी चमकत होता. आता बरेच फोटो झाले, पोटाला काही नको का?प्रशांतने गूळ शेंगादाणे आणि सुबोधने चिक्की आणली होती. हाय काय अन…. !
तेथून निघून बालेकिल्ल्यावर पोचलो तेव्हा साधारण अंधार झालेला. पाण्याची सोय केली, कपडे बदलले आणि पुन्हा चिवडा आणि भडंगवर हाय काय अन…. ! जिलेबीच सुगंध दरवळत होता. तेवढ्यात तिथे आगंतुक असे एक सद्गृहस्थ आणि त्यांची दोन लहान मुले गडभेटीस आली होती. त्यांच्याशी गप्पा मारत मारत आधी केलेल्या भटकंतीच्या गप्पा मारत त्यांना जिलेबी ऑफर केली. त्यांना परतीच्या प्रवासासाठी आमचा एक टॉर्च दिला. त्यांनीही काहीही अडचण आल्यास किंवा मदत लागल्यास सांगा इथे पाठवू शकतो असे सांगितले.त्यावरुनच ही कुणीतरी असामी असावी असा अंदाज आलाच. तर ते खरंच होते.इन्स्पेक्टर श्री. घनवट. त्यांचे आभार मानून त्यांना निरोप दिला आणि चीफ फायरफायटर आणि इतर टीमला सरपण गोळा करायला पाचारण केले. त्यातून सुपरवायझर आणि चीफ शेफने गुपचुप टांग मारली ;). चीफ फायरफायटरने जरा बरी आग लावल्यावर त्यावर हेडशेफने (म्हणजे मी) खिचडीसाठी आधण ठेवले. खिचडीत आपला हातखंडा आहे. त्यात ही तर डाएट खिचडी होती, कारण तेल आणलेच नव्हते. असिस्टंट फायर फायटर त्यांना सेक्रेटरीने दिलेल्या गॉगलच्या सहाय्याने डोळ्यांचे रक्षण करीत अग्नी फुलवत होते. तो फुलल्यावर त्यात कांदे आणि बटाटे आगीत भाजायला टाकले. ते भाजेपर्यंत कुणाला दम निघतोय. आला बाहेर की पुनःश्च हाय काय अन…. ! आधण वाफेला आल्यावर त्यात खडा मसाला, बिर्याणी मसाला, बटाटे आणि एक पनीरची रेडिमेड भाजी अशी आहुती दिली आणि हेडशेफ आणि सेक्रेटरी कम डेप्युटी शेफ यांनी संगनमताने त्यात करेक्ट मापात मीठ घालण्याचे अतिशय अवघड यज्ञकर्म पार पडले. दर तीन मिनिटांनी उघड झाकण, बघ पाणी, कमी आहे, ओत पाणी अशी कर्मकांडे चालूच होती. साईड बाय साईड भाजलेल्या कांदे-बटाट्यांचे “हाय काय अन नाय काय”चा सपाटा चालूच होता. खालून गावातून आलेल्या अंडाकरी आणि भाकर्‍या आपली उपस्थिती सुगंधातून जाणवून देत होते. कर्जतहून मुंबईचे तीन ट्रेकर आले होते, त्यांनाही आग्रहाने जिलेबी खाऊ घातली.
खिचडी रटरटली तशी पंगत बसवली. बरेच काय काय सामान काढले गेले. जेवण ट्रेकचे आहे की श्रेयस-सुकांतामधले असा प्रश्न पडावा. अंडाकरी, भाकरी, आमची खिचडी, भाजके कांदेबटाटे, लोणचे, लसूण चटणी,मुरांबा आणि जिलेबी. आडवा हात मारला प्रत्यकाने. हाय काय आन… ! एवढे खाऊन पुढे एकमेकांना हात देत कसेबसे उठलो आणि अंधारात चांदण्या मोजीत शतपावली केली तेव्हा कुठे आडवे व्हायला पोटात जागा झाली. रात्री गारव्याला गप्पा छाटत, मागच्या ट्रेकच्या उजळण्या करत आणि पुढल्या ट्रेकचे मनसुबे रचत डोळा कधी लागला कुणालाच कळले नाही.
सकाळी सुर्याची किरणे उलगडली तीच मुळी अंधाराची घडी विस्कटत. उगवतीला आकाशात रंग फाकले आणि प्रत्येकजण आपापली आवडती कामे करु लागली. म्हणजे फोटोबाज फोटो काढायला पळाले आणि झोपबाज मस्त गारव्याला घोरत पडले होते. जसा तो केशरी रंग हळदीचा झाला तसा त्याचा चटकाही बसू लागला.
सगळ्या कॅंपला जाग आली. हेडशेफने फक्कड चहा बनवला आणि चहासोबत पुन्हा एकदा चपाती-धिरडी हाय काय आन नाय काय! सोबत कालची उरलेली जिलेबी आणि बिस्किटांचा डबलबार. मी आलं घालून केलेला चहा मैफिल न जमवेल तर तो हेडशेफ कसला? सकाळी सकाळी तापत्या उन्हातही जी काही जमली होती त्यातून प्रत्येकाबद्दल माहित नसलेले पैलू सामोरे आले. खरंच सह्याद्रीत भटकंती ही एकच अशी गोष्ट आहे की जिथे कालची झालेली ओळख एका रात्रीत मैत्री बनून जाते. त्यासाठी ट्रेकरच्याच वंशा जावे तेव्हा कळे.ग्रुप फोटो आवरुन कॅंप आटोपला. कचरा गोळा केला आणि खाली आलो. खाली लिंबू सरबत… हाय काय अन नाय काय !
आता घरचे वेध लागले होते. वेळेत घरी पोचलो तरच पुढल्या ट्रेकला परवानगी मिळते हा विकेट पडलेल्या ट्रेकर्सचा आतापर्यंतच्या अनुभवावरुन आत्मसात केलेली गोष्ट. पण राजमाचीवरला थंडगार तलाव खुणावत होता. त्यात डुंबून पुण्याची वाट धरली. येताना पुन्हा एकदा कामशेतला वडापाव आणि कोल्ड्रिंक्स. हाय काय अन …!!
23:28
0
जंगलातला रुद्र-भैरवगड (आणि दातेगड, अजिंक्यतारा)
2013 कोयना ट्रेक दातेगड भैरवगड

जंगलातला रुद्र-भैरवगड (आणि दातेगड, अजिंक्यतारा)

राजमाची ट्रेक हा खरं तर एक फिलर ट्रेक होता. म्हणजे जायचे होते कुठे तरी दूरच्या ट्रेकला, पण ऋतू आणि वेळेचे गणित न जमल्याने तो छोटुला-पिटुकला(?) ट्रेक म्हणून राजमाची केला. त्यामुळे उन्हाळ्यातही करायचे ट्रेक असतात हे पक्के झाले. असाच एखादा ट्रेक असावा आणि तो जास्त उन्हात पायपीट करायला लावणारा नसावा असा शोध चालू केला होता. असा ट्रेक म्हणजे एखादा वनदुर्गच हवा. आणि पश्चिम महाराष्ट्रात जंगल म्हटले सर्वात आधी नंबर लागतो तो कोयनेच्या जंगलाचा. सुर्यकिरणांनाही शिरायला वाव मिळणार नाही अशी दाट जाळी, जनावरांचा मुक्त वावर आणि मे वैशाखाच्या उन्हाने आटलेले हिरवेगार थंड पाणवठे. पश्चिम महाराष्ट्राचा पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं नाव सध्या भारतभर गाजतंय. अशाच काही प्रतिबंधित जंगलात काही वनदुर्ग वसले आहेत त्यातलाच एक म्हणजे भैरवगड. रुद्रभैरवाच्या मंदिराने पावन झालेली भूमी तसल्याच रुद्रभीषण जंगलाने वेढलेली आहे, आणि त्याची राखण करणारे वाघ-बिबटे-अस्वलं असे भुत्या. पण निसर्गावर त्याचे नियम पाळत मनापासून प्रेम करणार्‍या आमच्यासारख्या टोळभैरवांना त्याचीच कधी भीती वाटतेय होय. म्हणूनच जाऊन त्या कोकणकड्यावरल्या भैरवासमोर जाऊन लोटांगण घालावे आणि पुढे असेच त्याने आपल्या वेगवेगळ्या गडांवरील स्थानांवरुन बोलावणे करावे यासाठी भैरवगडाकडे वाकडी वाट करायची असे मनसुबे रचत चार टोळभैरव मी, अमित, अजय आणि अनिरुद्ध शुक्रवारी संध्याकाळी आपापले बोचकी आवळून कराडच्या दिशेने निघाले.
घरातून निघताना अमितच्या घरी चहा घेऊन गाडीला चावी मारली आणि मुग्धाने बांधून दिलेली टपोरी जांभळं खात खात रस्त्याच्या दोहोबाजूंनी मावळतीच्या रंगात न्हालेल्या सिंहगड, पुरंदर, वैराटगड असे आसपासचे किल्ले आणि बाकी इतरही गतकाळच्या आठवणींना उजाळा देत भुईंजच्या ’विरंगुळा’च्या मिसळपर्यंत जाऊन पोचलो. (बे)चव तशी काही खास नाही, उगाच मिरची टाकून जाळ केलेला होता. ती मिसळ त्रास देणार हे पक्के होते. तिथून समोरच दिसणार्‍या वैराटगडावरल्या मंदिराला ओळख देऊन चंदन-वंदनची जुळी जोडी पाहत पुढे कराडचा रस्ता जवळ केला. कराडला पोचलो तेव्हा अमितचे आई-बाबा वाटच पाहत होते. त्याच्या आईच्या हातची सर्वांगसुंदर कढी-खिचडी आणि मुरांबा खात तृप्त मनाने मांडी मोडली आणि अक्षरशः एकमेकांना हात देऊन उठवले. त्यातच कराडच्या वर्तमानपत्रात आलेल्या एका बातमीने ट्रेकवर प्रश्नचिन्ह उभे केले. व्याघ्र प्रकल्पात जाणारे घाटावरले मार्ग निरीक्षणाखाली आणले असले तरी कोकणातून वर येणार्‍या घाटवाटा मात्र मोकळ्याच सुटल्या होत्या. त्या वाटांनी शिकारी घुसून परस्पर शिकारी करुन पुन्हा कोकणात उतरुन जात आहेत. थोडेसे मन खट्टू झाले होते. या एकाच बातमीमुळे वनविभागाची गस्त वाढली तर प्रवेश असलेल्या क्षेत्रातही आम्हांस जाता आले नसते.
साशंक मनानेच पहाटे पाच वाजता चहासोबत घर सोडले आणि पाटणचा रस्ता कापू लागलो. थंडगार पहाटवार्‍यात दातेगडाच्या डोंगररांगेच्या कुशीतले पाटण सकाळचे आळोखेपिळोखे देत होते. डावीकडे मोरगिरी किल्ला निस्तब्ध उभा होता. समोरच्या पठारावरल्या पवनचक्क्या रात्रपाळी करुन धूसर प्रकाशात जणू दमलेल्या दिसत होत्या. अजून सूर्य उगवायचा होता. कोयनेचे खोरे हिरव्यागार शिवारांसरशी आपल्या समृद्धपणाची खात्री पटवून देत होते. कोयनानगरकडे जाणारा फाटा मागे टाकून आम्ही हेळवाक गावाच्या मुख्य चौकात आलो. ट्रेक खरंतर इथूनच सुरु होणार, पण ‘चाफ्याचा खडक’ नावाच्या धनगरपाड्यापर्यंत गाडी जाते असे ऐकून होतो. हेळवाक गावात काल रात्रीच्या मिसळीचा वाघ मारुन झाल्यावर चहा-नाश्ता करुन आम्ही माहिती काढायला सुरुवात केली. एकच ‘ट्रिकी’ टप्पा होता, पण बाकी रस्ता ठीक आहे असे समजले. प्रयत्न करावयाचे ठरवले. परंतु एक टप्पा चढून गेल्यावर, एका खड्या चढणीवर अगदी पिठासारख्या मऊशार मातीमुळे गाडीची चाके जागेवरच फिरु लागली. गाडीच्या प्रयत्नांचे निश्वास धुळीच्या लोटांद्वारे हवेत विरु लागले. तेव्हा मात्र गाडी सोडून पायांवर भिस्त ठेवावी असे ठरवले. जोखमीने गाडी पुन्हा खाली आणून एका वस्तीवर लावली आणि सॅक पाठुंगळी मारुन चढाई सुरु केली. पिठूळ मातीत बुट जवळपास अर्धा-एक इंच फसकत होते, त्याची धूळ उठून आजूबाजूला विसावत होती. एव्हाना सकाळच्या उन्हाचा कोवळेपणा जाऊन हळुवार चटके बसू लागले  तशी धापही लागू लागली. श्वास आणि पावलांची गती वाढवत एका पठारावरुन चालतच ‘चाफ्याचा खडक’ गाठला. जयराम कोळेकर घरातून समोर आले आणि वाटाड्या म्हणून यायला तयार झाले.  समर्थांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली गुहा, जिथे दासबोधाच्या रचनेचा आरंभ करुन पुढे शिवथरला पूर्ण केली अशा हेळवाक-रामघळीत आम्ही रात्री मुक्कामी जाणार होतो. रामघळ तशी चाफ्याच्या खडकावरुन अगदीच पंधरा मिनिटांच्या अंतरावर. आम्ही भैरवगड करुन पुन्हा चाफ्याच्या खडकाला येऊन मग रामघळीत मुक्कामी जाणार होतो. म्हणून उगाच ओझे का सोबत नेऊन रान का तुडवायचे म्हणून आम्ही अधिकचे सामान वाटाड्याच्या घरात टाकले, आणि फक्त टोप्या, पाणी आणि जरुरीचे खाण्याचे सामान घेऊन खर्‍या अर्थाने ट्रेक चालू केला.


आमचा वाटाड्या एक समोर मोठ्याने धनगरी गाणी म्हणत निघालेला, पाठीशी लावलेला कोयता एका लयीत त्याच्या अडकावण्याशी कुई-कुई आवाज करत असायचा आणि त्याच्यामागे आमची वरात. पाडा मागे टाकल्यानंतर येणारा उजवीकडचा पहिलाच डोंगर आमचा कस लावू पाहत होता. वाटेत एके ठिकाणी पाणवठा होता. थंडगार पाण्याने तो थकवा कसाबसा शमवला. त्यानंतर एका प्रदीर्घ पठारावर आमची पायपीट चाललेली. वर वैशाखातला सूर्य कळाकळा आग ओकत होता. त्यात आमच्या माना भाजून निघत होत्या. त्यापासून स्वतःला कसेबसे टोप्या-चष्म्यांनी वाचवत भैरवाच्या ओढीने अंतर कापीत निघालेलो. वाटेत तोरणाच्या झाडांना फळे लागलेली आढळली. एखाद्या उंच शिडशिडीत बांध्याच्या तरुणीने अंगभर पिवळ्या-गुलाबी मोत्यांचे दागिने घालावेत अशी तोरणाची झाडं दिसत होती. अवीट गोडीची चव जिभेवर रेंगाळत असतानाच जांभळाची बेटं दिसू लागली. सुरुवातीला जर्द लाल आणि नंतर काळ्या जांभळाचे घोसच्या घोस दृष्टीस पडू लागले. उन्हात लोलकासारखी चमकणारी जांभळं मनसोक्त खाऊन आम्ही आमची तोंडं लाल करुन घेतली.
आता खरी वनखात्याची हद्द सुरु झाली होती, कारण खुणेचा बांध आला होता. डोंगरउताराशी अगदी घनदाट म्हणतात तसले जंगल. सगळीच झाडे एकमेकांशी स्पर्धा करीत आकाशाला गवसणी घालू पाहत होती. त्या झाडांभोवती वेली आपल्या असंख्य बाहूंनी फेर धरुन केशसंभार सावरीत नाचत होत्या. अवघ्या अरण्याने चैत्राची पालवी घेऊन हिरवा वैशाख साजरा करण्याचे ठरवले होते. सुर्यकिरणांच्यात जमिनीशी बिलगण्याची अहमहमिका लागलेली. पण झाडे आणि वेलींच्या जाळीतून त्यांनाही बरेच कष्ट पडत होते. आणि आमचे कष्ट वाचत होते. जागोजाग प्राण्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देणार्‍या खुणा (जसे विष्ठा) नजरेस पडत होत्या. अशातच दाट झाडी संपून अचानक आम्ही एका डोंगराच्या बोडक्या टोकावर येऊन पोचलो. तिथून समोर अवघे वाघोणे नदीचे खोरे दिसत होते. खाली तळाशी सदाहरित वृक्षांची गच्च जाळी, उजवीकडे दूरवर धक्का (संगमनगर), नाव, पाथरपुंजवरुन येणारा लालमातीचा नागमोडी रस्ता मध्येच जाळीत गुडूप झालेला. ते टोक उतरुन आम्ही खाली उतरलो आणि भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या वाघोणे गावच्या घरांची जोती दिसू लागले. भग्न भिंती, आजूबाजूला शेतीसाठी केलेली आणि आता उखडून गेलेली बांधबंदिस्ती, विदीर्ण वाघजाईच्या मंदिराचे अवशेष सगळे मिळून जुन्या वाघोणेची अर्धवट राहून गेलेली गोष्ट सांगत होते. गावकर्‍यांच्या कित्येक स्वप्नांवर त्या आघाताने पाणी फिरवले असणार याचा विचार चमकून गेला. मन थोडे विषण्ण झाले आणि त्यासरशी थकवा गडद झाला. पाण्याची जागा बघून विसावा घेण्याचे ठरवले. पंधरा मिनिट चालल्यावर एक ओढा दिसला. कडक उन्हाळ्यातही या काही मैलांच्या परिसरात हा भरपूर पाणी असलेला एकमेव ओढा. तिथे थोडा दम टाकून सगळे गडी ताजेतवाने झाले आणि भैरवगडाला शेवटचा धक्का देण्याच्या निर्धाराने उठले. पुन्हा एकदा जंगली जांभळांची चव घेत आम्ही दाट जाळीत घुसलो. एका कोरड्या ओढ्याच्या पलीकडे जाताना खडकावर अनिरुद्धला रानमांजराचे दर्शन झाले.


अजिबात ऊन लागत नसल्याने वाटचाल तशी सुखकर होती. पण वाहता वारा मिळत नसल्याने एक प्रकारचा गच्चपणा दाटून राहिलेला. पण भैरवाच्या ओढीनं कुणीच तक्रार करत नव्हते. साधारण पाऊण तास चालल्यावर एका जाळीतून अचानक आम्ही एका पठारासमोर आणि त्यावरल्या मोठ्या मंदिरासमोर उभे ठाकलो. शेवटी रुद्रभैरवाने दर्शन दिले. तिथे आधीच एक चौघांचा पुण्यातला ग्रुप आला होता. त्यांच्याशी ओळख करुन घेत असतानाच पुण्याच्या एव्हरेस्टवीरांनी ‘समिट’ केल्याची बातमी समजली. टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले आणि जरा अंग टाकतोय तोच गाडीच्या इंजिनाचा आवाज आला. पाहतो तर समोर दोन जीप येऊन उभ्या राहिल्या. आम्ही जिथे मरमर करत चार-पाच तास जंगलातून चालत-चढत-आपटत इथे पोचलो होतो तिथे एक रिसॉर्टवाले ‘किड्स कॅंप’च्या नावाखाली गाडीत मेंढरं भरावीत अशी कॉन्व्हेंटच्या पोरांची जत्रा घेऊन आले होते. यांचा इन्स्ट्रक्टर जरा गुर्मीतच दिसत होता. आमच्याकडचे प्रत्येकाच्या कमरेला असलेले बियर ग्रिल्स सर्व्हायवल नाईफ पाहून उगाचच आमच्याशी बोलायला लागला.  आधीच तो माणूस डोक्यात गेला होता. त्यात “हंटिंग इज माय प्राईम हॉबी” आणि “मी बोहरी आळीत असे नाईव्ह्ज  पाहिले आहेत” असे बोलून त्याचा तिथेच कडेलोट करुन टाकावा असा आमच्या मनात आलेला विचार आम्ही शिताफीने परतावून लावला होता. मंदिरासमोर उजवीकडे असलेला भैरवगड पहायला निघालो तेव्हा त्याने त्याच्या किड्सची (मराठीत किडं) तिकडे उतरणीवर लाईन लावून ट्राफिकजाम करुन टाकले होते.


दुसर्‍या रस्त्याने उतरुन आम्ही पटकन त्यांच्या पुढे जाऊन किल्ल्याचे भग्न झालेले बुरुज आणि  दरवाजाचे अवशेष पाहून आलो तर हा माणूस इकडे किड्सना पुढे दुसर्‍या लीडर्सच्या हाती पाठवून स्वतः मंदिराच्या शेडमधे आडवा झाला होता. का तर म्हणे पाठ दुखतेय. तेव्हाच आम्ही “हंटिंग इज माय प्राईम हॉबी” म्हणणार्‍याचे ‘बोहरी आळीचा जखमी हंटर’ असे नामकरण करुन टाकले. थोडेफार बरोबर आणलेले खाणेही आम्ही थोडेसे खाऊन उरले होते आणि ‘बोहरी आळीचा जखमी हंटर’ त्यांच्या जेवणाची गाडी आली नव्हती म्हणून कुणावर तरी फोनवर उखडला होता. मुलं शांत होती पण यालाच खायची घाई झाली असावी. त्याच्या नशिबाने अर्ध्या तासाने गाडी आली. आम्ही आधीच्या वाटाड्याला (त्याला घाई असल्याने) परत पाठवून दुसर्‍या एका जयरामसोबत (हा जयराम लांबोर) चाफ्याच्या खडकाकडे परतण्याचे ठरवले. भैरवनाथाचं चांगभलं केलं आणि तिथला गुलाल भाळी लावला. शेजारी वाघजाईदेखील आशीर्वाद देत होती. मंदिराच्या शांत, धीरगंभीर, थंड गाभार्‍यात सगळा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. आम्ही घटकाभर तिथे विश्रांती घेतली आणि परतीच्या वाटचालीस निघालो. सोबत सातार्‍याचे दोन भिडू होते.

परतीची वाटही अशीच बिकट ठरली. एकतर कमी खाल्लेले आणि पुन्हा दोन अंगावर आलेले डोंगर चढून पायपीट करायची. थकत, धापा टाकत वाघोणे खोरे चढून आलो. रस्त्याने उतरतीला लागलेली तरीही चटका देणारी किरणे आणि आमच्या पावलांचे आवाज यांखेरीज काहीच नव्हते. अचानक पठारावर धडाधड दगड कोसळल्यासारखा आवाज झाला. आम्ही सारेच दचकलो. या सपाट मैदानात दगड कुठून कोसळले म्हणून आवाजाच्या दिशेने पाहिले तर दोन गवे चौखूर उधळत डावीकडल्या झाडीत दिसेनासे झाले. पुढल्याच क्षणाला उजवीकडेही तसाच आवाज. आम्ही गव्यांच्या कळपाच्या मधून गेलो होतो हे पाहून शहारलो. आता अनिरुद्ध थकला होता. मग आमच्यात अंतर पडत गेले. अस्ताला चाललेल्या सुर्यासरशी सावल्या लांबल्या. अंधार पडण्याआधी जयरामसोबत जाऊन रामघळीचा रस्ता माहित करुन घेणे ही माझी जबाबदारी होती, म्हणून मी त्याच्यासोबत चालत होतो आणि बाकी तिघे मागे पडले. रामघळीत येऊन पोचलो. अहाहा ! काय सुंदर जागा, पूर्वाभिमुख अशी गुहा, पश्चिमेच्या वार्‍याच्या आडोशाला, चांगली शंभर-दोनशे फूट लांब, चारपाच टप्प्यांत. समोरुन पावसाळ्यात मोठा धबधबा कोसळत असेल, खाली खळाळता ओहळ असेल या कल्पनेनंच मन आनंदून गेलं.
गिरीचे मस्तकी गंगा।
तेथुनि चालिली बळे।
धबाबा लोटती धारा।
धबाबा तोय आदळे॥
कपाटे नेटक्या गुंफा।
तापसी राहती सदा।
नेमस्त बांधली नाना।
उत्तमे निर्गळे स्थळे॥
अशा अनेक रामघळी समर्थांनी शोधून काढल्या, ठीकठाक केल्या आहेत. तिथून बाकी तिघांना बरेच आवाज दिले तरी काहीच उत्तर येईना. अंधारुन यायला लागलेले. काळजी वाढली. जयरामसोबत पाड्यापर्यंतचा रस्ता कापला आणि पाणी पिताच तिघांचा पत्ता काढण्यासाठी पुन्हा जंगलाच्या दिशेने गेलो. खूप हाका मारल्यावर कुठूनसा क्षीण आवाज आला. मंडळी सुखरुप होती, जराशी वाट चुकली होती.



पाड्यावर पोचलो तेव्हा जनावरे गोठ्यांत परतत होती. आया-बाया पाणवठ्यावरुन हंडे-कळश्या डोक्यावर घेऊन निघाल्या होत्या. चुली पेटल्या होत्या. पाडा धुराने वेढला. पाड्यावरल्या मठावरुन घंटेचा नाद खोर्‍यात घुमला.
सांज ये गोकुळी, सावळी सावळी.
सावळ्याची जणु, सावली..
धुळ ऊडवीत गाई निघाल्या
शाम रंगात वाटा बुडाल्या
परतती त्या सवे
पाखरांचे थवे
पैलघंटा घुमे राउळी
सांज ये गोकुळी..
पाड्यावर चुलीवरचा गरमागरम खडा चमचा चहा पिऊन तरतरी आली. तिथेच जयरामच्या घरी जेवण तयार करायला सांगितले. उन्हाळ्याचे दिवस असूनही गारठा वाढला होता. अगदी ओसरीवरही संध्याकाळी आम्हांला स्लीपिंग बॅगमध्ये पडून रहावे लागले एवढी थंडी. गप्पा निवत होत्या आणि त्या सांजवार्‍यात जनावरांच्या घंटेच्या किणकिणाटात कधी आमचा डोळा लागला ते समजलेच नाही. जेवण तयार झाले तसे जयरामने आवाज दिला. अर्धवट ग्लानीत जेव्हा मस्तपैकी तिखट आमटीभात खाल्ला तेव्हा सगळे भानावर आले. सकाळी पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन आम्ही रात्री दहाच्या सुमारास रामघळीचा रस्ता धरला. टॉर्चच्या उजेडात वीस मिनिटांतच तिकडे पोचलो. अमावस्येची रात्र असल्याने आकाश चांदण्यांनी भरलेले दिसत होते. जणू भैरवाच्या दर्शनानंतर “आकाश सारे, माळूनि तारे” आमचे अभिनंदन करायला आले होते. आकाशभर चांदण्यांचा सडा पडलेला. घळीसमोरच्या दरीत काजव्यांचा जागर. मधेच ते इकडून तिकडे उडत तारेच जमिनीवर आल्याचा भास व्हायचा. पाठ टेकली तशी कधी निद्रादेवीच्या अधीन झालो ते कळलेच नाही. रात्री एकदोन वेळा मध्येच जमीन उकरल्याचा आवाज वगैरे यायचा. अस्वलांचा वावर असल्याने दचकून जाग यायची. टॉर्चच्या प्रकाशात आसपास काही नाही आणि सगळे सुरक्षित आहे याची खात्री करुन आपोआपच पुन्हा झोप लागायची.

भल्या पहाटेच कस्तुराच्या मंजुळ आवाजाने जाग आली. अर्धवट झोपेत असताना कमीत कमी अर्धातास तरी तो आपल्या पहाटेच्या गाण्याने मोहिनी घालत होता. साथीला शिंजीर, कोकीळ होतेच. सुतारही टॉक..टॉक.. करत तालवाद्याची साथ देत होता. पूर्व क्षितिजावर फटफटले तसे आम्ही घळीतला आमचा मुक्काम आवरुन पुन्हा पाड्यावर आलो. सकाळच्या हळदुल्या उन्हात पाड्यातली लगबग पुन्हा वाढली होती. धारा काढल्या, जनावरं रानात सोडली गेली, पोरं इकडेतिकडे खेळायला पळाली, कोंबड्या खुराड्यातून बाहेर पळाल्या. आम्ही चहा पिऊन टाकोटाक हेळवाक गावात आलो आणि तिथे नाश्ता उरकून घेतला.


येताना तांबड्या धुळीच्या रस्त्यात एक हरणटोळ साप दिसला. एखाद्या गाडीखाली यायचा उगाच, म्हणून त्याला बाजूला करता करता त्याचेही काही फोटो काढले.

आता हाताशी पूर्ण दिवस होता म्हणून पाटणजवळचा दातेगड पहायचे ठरवले. पाटण-केर-टोळेवाडी करत आम्ही दातेगडाच्या पायथ्याला पोचलो. तिथल्या गुराखी मुलाने पूर्ण गड फिरुन दाखवला. मोठमोठ्या गणेश आणि हनुमान मूर्ती, प्रचंड मोठी पायर्‍या असलेली  विहीर आणि त्याभोवती गुंफल्या गेलेल्या दंतकथाही ऐकवल्या. उतरताना गडाच्या पायथ्याला करवंदाच्या जाळ्या दिसल्या. मनसोक्त तोही रानमेवा खाऊन घेतला.


पुढे पाटणच्या पठारावरुन पवनचक्क्यांच्या जंगलातून अतिशय खराब रस्त्याने ठोसेघर गाठले. तीस-पस्तीस किलोमीटरच्या अंतरासाठी दीड तास गेला. त्यात ‘बोहरी आळीचा जखमी हंटर’ची टोळी इकडेही भेटली. ठोसेघरला जेवण करुन पाण्यात डुंबल्याने सगळा शीण नाहीसा झाला आणि आम्ही अजिंक्यतारा पाहण्याच्या उद्देशाने सातार्‍याच्या दिशेने निघालो.
आठदहा किलोमीटरवर आल्यावर सज्जनगडाच्या फाट्याशी अमितला अचानक कॅमेरा बॅग सोबत नाही याची जाणीव झाली. त्यातच पाण्यात उतरण्याच्या आधी अजयने स्वतःचा ब्लॅकबेरी, पाकीट ठेवले होते. त्यामुळे पुन्हा ठोसेघरला जाऊन त्या हॉटेलमध्ये चौकशी करणे भागच होते. अमितचा जीव कंठाशी आलेला. गेल्याच आठवड्यात ट्रायपॉड हरवलेला, त्यात कॅमेरा गेला तर बायको घरात घेईल का याची काळजी. पण तिथे हॉटेलमध्ये विचारताच त्या भल्या मालकाने अमितने विसरलेली जपून ठेवलेली बॅग हाती दिली. एकदाचा अम्याचा जीव भांड्यात पडला. आता या प्रसंगाची वसुली अम्याकडून पार्टी घेऊन केली जाईलच याची (मुग्धाने) कृपया नोंद घ्यावी.
सुर्यास्ताच्या समयी अजिंक्यतारा आणि तिथली गडफेरी आटोपून आम्ही पुण्याचा परतीचा मार्ग कापू लागलो तो पुढला प्लॅन काय करायचा याचा विचार करतच. दुसर्‍या दिवशी अनिरुद्धचे सुंदर इमेल इनबॉक्समध्ये येऊन पडले होते.
वाह, काय होते ते तीन दिवस.
म्हणतात ना, सुरुवात चांगली झाली की शेवटही गोड होतो. अगदी तसंच झालं.
काकूंच्या हातची गरमागरम खिचडी, त्यावर आंब्याचा मुरांबा ह्यांनी सुरुवात आणि शेवट आंब्याच्याच मिल्कशेकने.
ऑफिसला जाताना रुक्ष आम्हांस आठवण करुन देतोय तो कराड-कोयनानगरचा रस्ता, हिरवीगार शाल पांघरलेली झाडं, त्यातून वाहणारे कालव्याचे पाणी.
एरवी एसीमध्ये बसून काम करणार्‍या शरीराला आठवतीये घातलेली घामाची ओलीचिंब अंघोळ.
बिल्डिंगच्या आजूबाजूला चार झाडं लावून स्वतःस निसर्गप्रेमी म्हणवणार्‍या आम्हांस घनदाट जंगलातली पाऊलवाट.
बर्गर-पिझ्झा खाऊन फुगणार्‍या पोटास दाखवली धनगराच्या हातचे साधाच पण अमृत असलेला आमटीभात आणि रानमेव्याची चव खास.
डनलपची गादी जास्त मऊ की समर्थांचं अस्तित्त्व असलेली रामघळीतली आमची झोपायची जागा जास्त मऊ?
ऑफिसमधून घरी आल्यावर झालेली दमणूक खरी की गडाचे चढउतार खाचखळगे पार करुन पाठ टेकवल्यावर जाणवलेली दमणूक खरी?
23:44
0
स्वप्नातला ट्रेक:  नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड
Blog कोकणकडा ट्रेक नळीची वाट भटकंती मराठी हरिश्चंद्रगड

स्वप्नातला ट्रेक: नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड

सह्याद्रीत ट्रेकिंग करणार्‍या लोकांमध्ये २ प्रकार असतात.
१. हरिश्चंद्रगड पाहण्याची इच्छा असलेले.
२. हरिश्चंद्रगड पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा असलेले.

मी दुसर्‍या प्रकारातला. हरिश्चंद्रगड नावाने केलेले गारुड दोन-तीन भेटींनंतरही तसेच आहे. त्यातच नळीच्या वाटेची भूल. प्रत्येक ट्रेकरच्या आयुष्यातला स्वप्नवत ट्रेक- नळीच्या वाटेने हरिशचंद्रगड. असाच एकदा आलेला चान्स हुकला होता. त्याचा पश्चात्ताप आजपर्यंत होत होता. त्यानंतर चार वर्षांनी योग जुळून आला. रोहनच्या मेलवर सुरुवात झाली होती खरी, खूप जण तयारही झाले होते. पण तोच येत नाही म्हटल्यावर एकएक शिलेदार गळून पडले. पण काहीही झाले तरी मी आणि देव्याने हा ट्रेक करायचाच असे नक्की केलेले. संदीपही (सँडी) कित्येक दिवसांपासून ट्रेकसाठी डोके खात होता. कळसूबाईच्या नादखुळा ट्रेकच्या वेळी त्याच्या अफाट नॉनस्टॉप स्टॅमिनाची खात्री पटली होती. पुण्याहूण तीन वीर तर नक्की झाले होते. मुंबईवरुन स्नेहल इरेला पेटली आणि आणखी तीन साथीदार घेऊन तयार झाली. असे एकूण "वेडात वीर मराठे दौडले सात..."

नळीची वाट म्हणजे तब्बल दहा-बारा तासांचा प्रस्तरारोहणाचा (रॉक क्लाईंब) समावेश असलेला खडतर मॅरेथॉन ट्रेक. त्यातच भर म्हणून आम्ही परतीसाठी तेवढाच खडतर साधले घाट निवडला होता. निव्वळ खाज, दुसरे काय? त्यामुळे ऊन चढायच्या आधी जास्तीत जास्त कव्हर करणे गरजेचे होते. म्हणजे रात्री प्रवास करुन सकाळी लवकर सूर्योदयाला बेलपाड्यातून सुरुवात करणे क्रमप्राप्तच. शुक्रवारी रात्री पहाटे दोन वाजता पुण्याहून निघायचे नक्की केले. मुंबईवरुन स्नेहल आणि कंपनीही रात्रीच निघाली. तिला एसटीनेच ये अशी तंबी दिली. जेवणानंतर थोडी झोप काढावी असा प्लान होता, पण स्नेहल आणि कंपनीचे फोनवर फोन चालू होते. मग कसली आली झोप? माळशेज घाटात रात्रीच्या लूटमारीचे काही किस्से ऐकले होते त्यामुळे आणि रस्ता चांगला मिळेल या हेतूने आम्ही लोणावळा-खोपोली-कर्जत-मुरबाड असा मार्ग नक्की केला होता. सँडीला घरुन पिक करुन देव्याकडे पोचलो आणि देव्याच्या कारने एक्स्प्रेस हायवेने खोपोली एक्झिटला बाहेर पडून उतरत असताना हायवेवर दोन स्पीडब्रेकर असे लागले की जणूकाही अख्खा हरिश्चंद्रगड वाटेत उभा केला. चहा प्यायला एका टपरीवर थांबलो तर तिथे तीन नमुने (बहुतेक शूटिंग स्पॉटबॉयचे काम करणारे असावेत) असे काही डेंजर डायलॉग मारत होते की बास्स... डोक्याला संगीत रुमाल, सिल्व्हर प्रिंटचे टीशर्ट, एम्ब्रॉयडरी केलेल्या जीन्स आणि तोंडात बिडी असतानाच हातात गायछापचा बार तयार करण्याचे कौशल्य पाहून आपण किती अडाणी आहे याची खात्री पटली. ‘भ’ आणि ‘म’ जडवून तयार केलेल्या शिव्या आणि बुगी-वुगी सारख्या विविध कार्यक्रमाच्या सेट्सची चर्चा रंगली होती. शिवाय त्या कार्यक्रमाचे अँकर कसे प्रत्यक्षात वाईट दिसतात आणि मेकपचे थर लावून कसे कॅमेरासमोर येतात हे ऐकून मी ते कार्यक्रम पाहत नाही याचे अपार समाधान वाटले. चहा संपवून कर्जतनंतर मुरबाड रोडवर लागलो आणि चांगला रस्ता असेल या अपेक्षेला सुरुंग लागला. खूप वाईट रस्ता, खड्डे, पुलाची कामे चाललेली असे करत कसेबसे मुरबाडला पोचलो. आणि मुरबाडवरुन काही मिनिटांतच नाणेघाटाला बायबाय करत मोरोशीला आलो. दरम्यान मुंबईकरही मोरोशी एसटी शेडमध्ये पोचले होते. त्यांची रात्रभर काही ‘धारा’तीर्थी लोकांनी चांगलीच करमणूक केली होती. कसेबसे ते लोक दोनेक तास झोपले.

अंधारातच त्यांना जागे केले आणि टॉर्चच्या प्रकाशात पुढील दोन दिवस एकत्र राहणार्‍या रानटी सह्य-भुतांची ओळखपरेड झाली. देवेंद्र, संदीप, चैतन्य, अमेय आणि कल्पक. एका दुधाच्या पिकप गाडीला रस्ता विचारुन घेतला आणि दोन लॉटमध्ये कारने बेलपाड्याला पोचायचे ठरले. मी, चैतन्य (बहुतेक तोच असावा, अंधारात दिसला नाही नीट) आणि स्नेहल आणि बॅगा घेऊन देव्या आम्हाला घेऊन वळणावळणाच्या रस्त्याने एका गावात टाकून गेला आणि दुसर्‍या लॉटला घेऊन आला तोवर फटफटले होते. गावाला जाग आली तसे आम्हाला समजले की आपण चुकीच्या गावात आहोत. मग काय पुन्हा स्वारी निघाली पुढल्या गावात. पण या वेळी सात जण एका फोर्ड कंपनीच्या फिगो‘वडाप’मध्ये सामानासहित कोंबून घेऊन गेलो. या गाडीला फक्त पिवळी नंबरप्लेटच लावायची बाकी आहे नाहीतर आमची ही नेहमीचीच स्टाईल आहे.

दिवस उजाडता बेलपाड्याला पोचलो आणि गावातल्या एका घरात चहा पिऊन आणि थोडे ब्रेड-बिस्किट खाऊन वाटाड्या घेतला. थोडी घासाघीस करुन नक्की केले आणि गाडी त्यांच्या हवाली करुन निघालो. पाठीवर अवजड सॅक्स, त्यात प्रत्येकी तीन लिटर पाणी, खायचे सामान, कपडे, मुक्कामासाठीचा शिधा, बेडिंग, रोप्स असा अंदाजे आठ-दहा किलोचा मामला.

अतिशय प्लेझंट थंडगार हवा, अंगात ताजा जोम, कोकणकड्याची आणि नळीच्या वाटेची ओढ, हरिश्चंद्रगडाचे वेध या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून की काय पहिला तासभर पावले झपझप पडली. खूपसे अंतर पार झाले आणि आम्ही नळीच्या तोंडाशी येऊन पोचलो. मध्येच गरुडांचे आवाज येत होते. देव्या एका गरुडाच्या जोडीच्या मागे गेलासुद्धा. पण बहुधा फोटो मिळाला नाही. नळीत गेल्यावर खायचे काढले तर वरुन माकडे गोळा होतात आणि मग तिथून दगड निसटून अंगावर पडतील म्हणून इथेच काहीतरी खायचे ठरवले. इथून पुढे वाटाड्याला निरोप देऊन पुढे जायचे होते. सरळ नळीने वर जायचे आणि वर गेले की उजवीकडची वाट घेऊन माथ्यावर निघायचे असा सल्ला मिळाला. म्हणजे तशी शोधायला सोपीच वाट असेल असे वाटले.

कोकणकड्याच्या मागून सूर्याची तिरपी किरणे शिखरांच्या मधून निघून खाली दरीला सोनसळी करत होते.  पुन्हा एक ब्रेक घेऊन थोडेफार फोटो वगैरे काढले आणि वर कूच केले. एकदोन पॅच वगळता वाटचाल तशी सोप्पी वाटत होती. पण जसेजसे ऊन चढले तसे आजूबाजूचा खडक तापू लागला बारा वाजता आम्ही निम्मी उंची गाठली होती. या रेटने आम्ही लवकरच रेकॉर्ड ब्रेक वेळात नळीच्या वाटेने वर पोचणार असे वाटत होते. पण मध्ये एक २० फुटी रॉक पॅच आला. तसा सोप्पा वाटत होता पण सॅक घेऊन शक्य नव्हते. मग मी आधी वरती जाऊन रोप लावला.
हळूहळू सगळ्या सॅक वर ओढून घेतल्या आणि बाकी पब्लिक वरती पोचले. इथून पुढली वाट अतिशय खडतर होती. निसरडा खडक, जिथे पाय ठेवू तिधला दगड निसटून जायचा. हात लावू तो दगड हातात. एकही चूक करायला जागा नाही. चूक झाली की ती शेवटचीच समजायची. निसरडी माती आणि वरुन ऊन यामुळे खूप वेळ गेला. साधारण दीड वाजता आम्ही एका ‘वाय’ जंक्शनला पोचलो. तिथे काहीच ऍरोमार्किंग नव्हते. उजवीकडची वाट आहे असे ऐकले होते, पण डावीकडच्या रॉकफेसवरुन माथ्यावरचे झाड दिसत होते. तसे उजवीकडे काहीच चिन्ह नव्हते. म्हणून आधी तो डावीकडचा ट्राय करायचे नक्की केले. मग तिथे वरती ‘सेफ्टी बिले’ लावण्यासाठी रोप अँकर करणे गरजेचे होते. पण त्यासाठी काहीच मिळेना. जवळपास तासभर प्रयत्न केला. पण काहीच साध्य होईना. मी अर्धा वरती जाऊन एका हाताने होल्ड घेऊन पंधरा मिनिटे लटकत दुसर्‍या हाताने रोप फेकून अँकर करायचा प्रयत्न केला. पण फोल ठरला (खांदा अजूनही दुखतो आहे). देव्या दुसरीकडून कुठे रस्ता आहे का ते पहायला वर जाऊन आला. पण तिकडेही काही मार्ग दिसेना. परत तिकडून खाली येताना अगदी त्याच्या भाषेत सांगायचे तर "फाटून हातात आली". दरम्यान कल्पकने एक बसल्या बसल्या झोप काढली. चैतन्य, संदीप आणि मी रोप टाकायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. पण यश येत नव्हते. दीड-दोन तास एकाच ठिकाणी वाया गेले.

मग कुणीतरी पुन्हा बरेच खाली गेले आणि उजवीकडे एक मार्क पाहिला. मी पण आलेल्या इवल्याशा रेंजचा फायदा घेऊन सम्यकला फोन करुन खात्री करुन घेतली. आता मोर्चा उजवीकडे वळाला. झाडाला रोप फिक्स करायला लागणारच होता. तिथेपर्यंत पोचायला काहीच मार्ग नाही, होल्ड्स नाहीत, निसरडा खडक, उभे रहायला फक्त दोघांना जागा. एकवेळ माघारी जाण्याचाही विचार शिवून गेला. देव्या पूर्ण ड्रेन झाला होता. क्लाईंबला माझ्या आणि त्याच्याही हातात त्राण शिल्लक नव्हते. त्यानेही बसल्या बसल्या झोप काढली. सॅक मागे ठेवून फक्त दोघे तिघे उभे राहून दोर फेकत राहिलो. वीसेक प्रयत्नांनंतर रोप सुरक्षितपणे अँकर झाला असे वाटले. देव्याला उठवले आणि सगळ्यात कमी वजनाचा म्हणून चैतन्य दोरावरुन कॅरिबिनरचा बिले लावून वर गेला आणि रोप नीट बुंध्याला अँकर केला. देव्या वर जाऊन पुढील मार्ग पाहून आला. आणि एका अति-धोकादायक ट्रॅव्हर्सनंतर आपण पोचतोय असे त्याने जाहीर केले. जरा हुरुप आला. पण झाडाच्या तिथे फक्त दोघांना पुरेल एवढीच जागा. मग सॅक खाली ठेवून दोन-तीन जण चढवायचे, नंतर बॅगा ओढायच्या आणि त्यांना सेफ ठिकाणी पोचवून उरलेल्यांनी वर जायचे असे ठरले. चैतन्य, कल्पक वर केले. बॅगा पोचल्या. एका बॅगच्या हूकने दगा दिला आणि ती दोरावरुन तुटून थेट शंभर फूट खाली आदळत गेली. कॅमेरा बाहेर उडून पडला. नशिबाने जिवंत राहिला. संदीपने पुन्हा अफाट स्टॅमिनाचे उदाहरण देत ती बॅग आणली. स्नेहल वर जाताना पायाऐवजी हातावर जोर देत होती त्यामुळे हवा तेवढा पुश न मिळाल्याने मध्येच लटकत राहिली. पाय लटलट कापू लागले. थोडी घाबरली, पण ती रणरागिणी रडली नाही. देव्याने अचूक शब्दांत धीर दिला. काही झाले तरी आम्ही तुला पडू देणार नाही असे सांगितले आणि आम्ही तिला ‘बक-अप’ करत आणि देव्याने हात देत वर ओढून घेतले. पुढे तो अतिधोकादायक ट्रॅव्हर्स एकदम शंभर फूट दरीला एक्स्पोझ होता. पाय ठेवायला अर्धा फूट जागा. क्रॉस करताना उलटे वळून पहायचे नाही असे सांगूनही अमेय तीनदा तेच करत होता. शेवटी देव्याने असा काही झापला की बास्स... मी उरल्या सुरल्या बॅगा घेऊन रॅपअप करत शेवटी वर आलो. एकेक करत ट्रॅव्हर्स पार केला आणि अतिशय निसरड्या पॅचवरुन वर माथ्यावर पोचलो. एक ‘वाय जंक्शन’ आणि एक रॉक पॅच पार करायला तीन तास गेले.

पाच वाजता आम्ही दाट झाडीतून माथ्यावर पोचलो आणि डायरेक्ट आडवे झालो. कोकणकड्याचे दर्शन झाले. असे वाटले आलो आता. पंधरा मिनिटे सगळ्यांनी पॉवर नॅप मारली. पाणी सगळे संपले होते. घसे कोरडे पडले. पण आता इलाज नव्हता. एक लहान टेकडी पार करुन वर येऊन पाहतो तर काय? अजून एक रॉक पॅच आमची वाट पाहत होता. आता कुणातच त्राण शिल्लक नव्हते. सगळ्यांचेच अवसान गळून पडले. पण इलाज नव्हता. परतीचा मार्ग बंद होता. सुर्यास्त होण्याच्या आत तो पार करणे जरुरीचे होते. देव्याकडे अजिबात ताकद शिल्लक नव्हती. पाणी नसताना त्याने पंधरा-सोळा ग्लुकोजची बिस्किटे कशीबशी खाल्ली. तो पॅच एकदम कोकणकड्याच्या मुखाशी. म्हणजे तोल गेला किंवा चूक झाली तर एकदम तळाशी, एक किलोमीटर खोल. वरुन फक्त फुले वाहायची. चैतन्य बसाबसा वर पोचला. मागोमाग मी. पण होल्ड्सना स्नेहलचा हात पुरेना. मग मी पुन्हा अर्ध्यावर खाली येऊन तिला धरायला पाय देऊन दोन वेळा वर खेचले. एका कोकणकडा पहायला आलेल्या ग्रुपने पाणी दिले. आणि या वाटेने आलो हे ऐकून अगदी तोंडात बोटे घातली. एकेक करत वर पोचलो आणि सूर्यनारायण आपले दिवसाचे उरलेसुरले रंग आम्हांवर उधळीत आमचे अभिनंदन करत होते.

मुख्य कोकणकड्याला पोचल्यावर एक चहाचा स्टॉल होता त्याला एकदम पंधरा लिंबू सरबताची ऑर्डर दिली आणि जरा आमची देह-बॅटरी चार्ज केली. हळूहळू सुर्यास्तानंतर चालत साडेसातला मंदिराशी पोचलो. एक रिकामी गुहा शोधली, आतमध्ये ती टॉर्चच्या प्रकाशात चेक करुन घेतली (विंचू, मुंग्या, वटवाघळे यांसाठी) आणि थंडगार पाण्याने फ्रेश झालो. गुहापण अशी काही झक्कास होती की बास... डुप्लेक्स अपार्टमेंट, समोर टेरेस, आत एकात एक अशा दोन रुम्स, आधीच करुन ठेवलेली चूल. कोकणकडा चढून आल्याचे समाधान आणि आनंद म्हणून की काय आम्ही दोनतीन मेणबत्त्या लावून दिवाळी साजरी केली.

आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. आधण ठेवले, सूपची पाकिटं फोडली, टोमॅटो आणि मिक्स व्हेज सूप एकत्रच केले. त्यातच ‘सूप्पी नूडल्स’ टाकल्याने अजूनच लज्जत वाढली. नवमीच्या चांदण्यात आकशातले तारे मोजत, थंडगार हवेत हरिशचंद्रगडाच्या गुहेच्या समोर बसून वाफाळलेले गरमागरम सूप पिण्यात काही औरच मजा असते. तो क्षण आम्ही सातही जण आयुष्यात कधीच विसरणार नाही. नंतर सावकाश पोटभर नूडल्स बनवून खाल्ल्या. आणि जमिनीला पाठ टेकली.



डोळे मिटले आणि विचार करु लागलो. एक स्वप्न चार वर्षांनी पूर्ण झालंय. नळीच्या वाटेने कोकणकडा चढून हरिश्चंद्रगडाचे. बारा तास आमची ‘वाट’ लागली म्हणून काय झाले नळीचीसुद्धा ‘वाट’ आहे. पुढच्या पिढीला सांगण्यासाठी काहीतरी गाठीशी बांधलंय. आयुष्यभरासाठी ठेवा मिळालाय. कधीही न विसरण्यासाठी. ट्रेकिंगमधले पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. आज किती समाधान वाटतंय. दुखरे हातपाय काय उद्या परवा थांबतीलही, पण हा अनुभव दुसरीकडे कुठे मिळणार आहे का? उद्याचाही परतीचा प्रवास असाच नाट्यमय असणार आहे, साधले घाटातून. एक न पाहिलेली वाट... पाहू आपली किती वाट लावते. झोप कधी लागली ते समजलेच नाही...
10:48
31
मोहरीचे पठार आणि लिंगाणा दर्शन
ट्रेक भटकंती मोहरी रायलिंगी सह्याद्री

मोहरीचे पठार आणि लिंगाणा दर्शन

एकदा जेवायच्या आधी एखादी गरमागरम भजी तोंडात टाकली तर पुढे वाट पाहवेल का? तसेच काहीसे झाले. ट्रेकचा आणि भटकंतीचा मुख्य सीझन पाऊस पडल्यावरच सुरु करणार आहे. पण मागल्या आठवड्यात मुळशी-ताम्हिणीत केलेल्या कँपिंगमुळे आता पाऊस पडेपर्यंत वाट पाहवत नव्हते. मग काय बझ्झवरही "कुठे भटकंती करावी बरे वीकेंडला? काही तरी वेगळी जागा पाहिजे. मागच्या वीकेंडला जसे सिक्रेट लेकला जाऊन राहिलो तशी काही तरी" असे टाकून भावनेला वाट करुन दिली. त्यावर "घरीच थांब..काहीतरी वेगळी जागा म्हणून.." अशी टिप्पण्णीही आली होती. शुक्रवार रात्रीपर्यंत तरी काहीच ठरले नाही. पण काहीच झाले नाही तर रविवारी ताम्हिणीची प्लस व्हॅली उतरायचे मनाशी पक्के केले होते. अशातच रात्री साडेदहा वाजता ध्रुव ऊर्फ धुरड्याचा फोन आला, "काय रे, काही आहे का?". झाले मग प्लॅन सरासर मनात तयार झाला. बोराट्याची नाळ जिथे सुरु होते ते मोहरीचे पठार - लिंगाणा दर्शन. नवख्यांना माहीत नसेल म्हणून सांगतो की या ट्रेकच्या जागा आहेत. घाटाचे शेवटचे टोक, पुढे कडा ओलांडला की एकदम कोकणातच पोचतो आपण.
अनेक ट्रेकर्स रायगडला या वाटेने जातात. झाले ध्रुवला तसा मेसेज टाकला. त्याचा रिप्लाय आला नाही म्हणून मग कॉल केला (किती घाई, जरा दम धरवत नाही). दुस~या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त तिथून काढायचे नक्की केले. म्हणजे ऐकीव/वाचीव माहितीवर तर्क लावून पोचायला दीड तास, आणि पठारावर पोचायला दीड तास असा हिशोब लावून साडेचारला निघायचे नक्की केले. सध्या तरी धुरड्या आणि मी, दोघेच नक्की होतो.

सकाळी महापालिकेचा कर भरणे, वाणसामान आणणे, बँकेत जाऊन काही कागदी घोडे नाचवणे, अशी क्षुद्रातिक्षुद्र कामे उरकून घेतली. सुहासला फोन करुन आऊटडोअरसाठी आलेल्या खास बुटांच्या ब्रँडची माहिती दिली आणि ते दुपारी जाऊन विकत घेतले. तोवर श्रीकांतपण यायला तयार झाला. शेवटी तीनजण जाणार हे नक्की झाले. कडक उन्हात बाईक दामटत ध्रुवच्या घरी पोचलो. तिथे बाईक लावली. माझी कॅमेरा बॅटरी चार्ज नव्हती ती तिथे चार्जिंगला लावली. त्याच्या स्कॉर्पिओमध्ये सामान टाकले. श्रीकांतने खाण्यासाठी मॅगी आणि ध्रुवच्या घरुन डब्यातून सूप पावडर घेतले. तंबू आणि इतर गोष्टी लोड केल्या. आणि निघालो. कात्रजवरुन नवीन हायवेला लागलो. पाचसात किमी गेल्यावर बॅटरी आठवली. मग काय मनातल्या मनात लई शिव्या दिल्या असतील मला या दोघांनी. पण इलाज नव्हता. पुन्हा निघालो.

रस्त्यात जाताना गप्पाटप्पा चालल्या होत्या. पूर्वीचे भटकंतीचे अनुभव गिरवायला सुरुवात झाली. धुरड्याचे लग्न झालेले आणि माझे होऊ घातलेले. श्रीकांतला विचारले तर म्हणे "दूरदूर पर्यंत संबंधच नाही". झाले हे कार्टं दरवेळी काही ना काही बोलून जाते आणि बाकीच्यांना तेवढेच निमित्त. आता सा~या ट्रेकमध्ये एकच डायलॉग "दूरदूर पर्यंत संबंधच नाही".

नसरापूर ओलांडून तोरण्याच्या रस्त्याने पुढे निघालो. बराच वेळ झाला. आता सूर्यास्त मोहरीच्या पठारावअरुन मिळणार नव्हता. म्हणून घाई करुन उपयोग नव्हता. राजगडाच्या समोरुन जाताना नेढे दिसले आणि पूर्वी केलेल्या राजगड ट्रेकच्या आठवणी जाग्या केल्या. नेहमीचे उद्गारही काढून झाले "गडांचा राज, राजांचा गड, राजगड!!" तोरणा जवळ आला तसा सूर्यास्त होऊ लागला होता. आकाश ढगांविना तसे निरसच होते आणि फोटो काढण्यासाठी उंचावर जावे लागले असते म्हणून तसेच पुढे गेलो. तोरणा पायथ्याला वेल्ह्यात पोचलो तेव्हा अंधार झाला होता. वेल्हा हे तालुक्याचे गाव. प्रत्येक ग्रामीण तालुक्याच्या गावाला एक शाप असतो. तो म्हणजे दारुचा. तिथेही असे काही 'हवेतले' 'धारा'तीर्थी वीर दिसले. गावात रस्ता विचारून पुढे मार्गस्थ झालो. आता अजून एक गोष्ट आठवली. काडीपेटी. सगळेच आणायला विसरलो होतो. आता? रस्त्यात जाणारी एक मोटारसायकल थांबवून विचारले दुकान कुठे आहे? आणि माचिस कुठे मिळेल? पुढे पासरी गावात मिळेल असे उत्तर आले. आणि एक तिरकस कटाक्षही. माचिस विचारल्यावर अजून काय होणार? :-) पासरीच्या रस्त्याला लागलो. अतिशय निबीड अरण्यातून जाणारा रस्ता होता. जीवेघेणी वळणे. गाडी चालवतोय की गेम खेळतोय असे वाटत होते. थोडीही चूक सुधारायला संधी मिळणार नव्हती. जरा लक्ष इकडे-तिकडे की "आठ बाय चार, आणि फोटोला हार" (आठ बाय चार हे मयताला स्मशानात मिळणा~या जागेचे माप). डावीकडे अगदी डोक्यावर तोरण्याची बुधला माची आकाशात घुसली होती. दाट जंगलामुळे रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. कानंद खिंड ओलांडून पुढे आलो आणि समोर सह्याद्रीच्या विराट रुपाचे दर्शन घडले. पश्चिमेला मावळतीचे रंग पसरले होते. डावीकडे खाली दरी धुक्याने दाटली होती.  मध्येच एखाद्या वाडीतून निघालेली धुराची वलयं घरधनीणीने केलेल्या गरमागरम भाकरीची आणि उकळणा~या कढणाची साक्ष देत होती. एखादा किलोमीटर पुढे आलो असेल तर समोर आता फक्त एक दरी आणि समोर सह्याद्रीची एक रांग आणि त्यावर मावळत्या चंद्राची कोर. मग फोटोगिरी तर व्हायलाच पाहिजे.


अर्धा तास तिथे घालवला. एक एसटी आम्हांला पास झाली. आणि मिट्ट काळोख झाल्यावर तिच्यामागे पुढे निघालो. हेतू हा की अंधारात तिच्या रस्त्याशी असणा~या ओळखीचा आम्हांला फायदा व्हावा आणि आम्ही तिच्यामागे सुरक्षितपणे गाडी चालवावी. पण ड्रायव्हर काका भलतेच वाहतूक सौजन्यशील हो! मागून स्कॉर्पिओ येते म्हटल्यावर त्यांनी एसटी साईडला घेऊन आम्हांस पुढे जायची खूण केली. पाचच मिनिटांत पासरीला पोचलो. तिथे कोप~यावर दुकान होते. काडीपेटी घेतली. चहाची चौकशी केली तर बिनदुधाचा मिळेल असे उत्तर आले. अग तो बेत रद्द केला.

मागून ती एसटी आली आणि त्यातून एक भाऊ पत्नी आणि एका पाचसात वर्षाच्या पोरासह उतरले. नाक्यावर कुणाशी तरी बोलत होते हारपुड गाडी चुकली आणि आता वरोती गावापर्यंत सहा किलोमीटर पायी जावे लआगेल अथवा दुस~या एखाद्या गाडीची वाट पहावी लागेल. आम्ही त्याच रस्त्याने जाणार होतो, म्हणून म्हणालो, "मग चला आमच्याबरोबर". सामान गाडीत ठेवले. गप्पा मारत मारत निघालो. दीपक कुमकर नाव त्यांचे. कुणाच्या तरी लग्नासाठी गावी आले होते. त्यांनी माहिती दिली की हारपुडला कुठे रहायची सोय होईल आणि कोण मदत करेल. शिवाय आडबाजूला असणा~या या गावांमध्ये सॅटेलाईट फोन आहे हेही त्यांनीच सांगितले. मोहरीचे पठार, तिथे पाण्याची सोय आदी महत्त्वाची माहिती मिळाली. वरोतीला त्यांना सोडले तर चहा पिण्याचा आग्रह झाला. चहा हवाच होता आम्हांला. गावची माणसे किती साधी असतात? तीनचार किलोमीटरच्या लिफ्टसाठी तुमचे उपकार झाले, देवासारखे भेटलात असे अनेकदा ऐकवले. त्यांचा निरोप घेऊन निघालो आणि हारपुडच्या रस्त्याला लागलो. रस्ता अतिशय खराब आणि दरीच्या बाजूने वळणांचा होता. अगदी "आठ बाय चार सिच्युएशन"! वॅगन आर न आणता स्कॉर्पिओ आणली हा शहाणपणा होता हे लक्षात यायला लागले.

रात्री साडेआठला हारपुडला पोचलो. गाव सामसूम झाला होता. मुक्कामी एसटीचे ड्रायव्हर-कंडक्टर झोपायची तयारी करत होते. आम्ही सामान उतरवत असताना एकदोन पोरेसोरे जमा झाली. एक जरा वयस्कर काका दिसले,परसूकाका. त्यांना सोबत येण्यासाठी विचारले. ते तयार झाले. घरी जाऊन सांगून देऊन आले. आम्ही आमचे सामान पाठीवर लादले. कॅमेरा बॅगा, जेवणाचे सामान, तंबू, प्रत्येकी दोनेक लिटर पाणी, वैयक्तिक सामान, अवजड ट्रायपॉड असा जामानिमा बराच जड झाला होता. पण इलाजही नव्हता. हारपुडच्या पुढे दरीतून पायवाट होती. पहिल्या शंभर पावलांतच बरे झाले माहीतगार माणूस सोबत घेतला असे वाटायला लागले. मिट्ट काळोख. चंद्रकोर केव्हाच मावळलेली. डोळ्यांत हत्ती घुसायला लागला तरी दिसायचा नाही अशा परिस्थितीत टॉर्चच्या प्रकाशात वाटचाल सुरु केली. एक दरी उतरलो. आणि चढ लागला. झाले. सगळी मस्ती जिरायला लागली. धाप लागली. एका ठिकाणी ऐन उन्हाळ्यात झ~याचे थंडगार पाणी प्यायला मिळाले. खूप बरे वाटले. वा~याच्या दिशेला आडवा पर्वत पसरला असल्याने हवा लागत नव्हती. चढाईमुळे धाप लागत होती, त्यात प्रत्येकी कमीत कमी दहा किलोचे ओझे. आलटून पालटून तंबूची बॅग एकेकाच्या हातात. अंगातून नुसते पाण्याचे पाट वाहत होते. सगळे कपडे पावसात भिजल्यासारखे भिजले. व्हायचा तो परिणाम झाला. माझ्या पायात क्रँप, बोटावर बोट चढले. दहा मिनिटे त्यात गेली. पण तसाच पुढे झालो. आणि पुढचा पर्वत चढून उतरलो. शेवटचा तिसरा डोंगर कस काढणारा होता. अगदी जीवावर आले होते. पण मोहरीच्या पठाराला भेटायला जीव तेवढाच उत्सुक होता. प्रत्येक पंधरा मिनिटाने बसून दम टाकावा लागत होता. कसाबसा वर आलो. आणि अंधारात लिंगाण्याने दुरुन आऊटलाईन दर्शन दिले. मोहरीच्या वाडीतली सोलर पॅनलची लाईट दूरवर चमकली आणि आमचे डोळेही. मोबाईलला रेंज आली. घरी फोन झाले आणि खुशाली कळवली.

आता शेवटला टप्पा. त्या पठारापर्यंत पोचायचे. जाताना वाडीतली कुत्री भुंकत होती. तीन तास ट्रेक करुन आम्ही पठारावर आलो. पाण्याची सोय होती. एक मोठी विहीर. एवढ्या उंचीवर क्रेनचे साहित्य डोक्यावर आणून ही विहीर खोदली आहे. विहीर आणि पाणी पाहून डोळेच विस्फारले. एवढ्या उन्हाळ्यातही विहीर अर्ध्याहून अधिक भरलेली होती. आता मुक्कामासाठी जागा शोधली आणि सरपण जमा केले. चूल करुन आग पेटवायचे काम श्रीकांत अण्णा करत होता, तोवर आम्ही तंबू उभारुन घेतला. सामान आत टाकले. पण आग पेतली नव्हती. शेवटी तिघांच्या अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने पेटली. पोटातही तशीच आग पेटली होती. आधी सूपसाठी आधण ठेवले. परसूकाकांनी आम्हाला पाण्याची कळशी आणून दिली आणि घोंगडी पांगरुन झोपले पण. रात्री साडेबारा वाजता एका प्लेटमध्ये तिघांनी चमच्यांनी सूप ओरपले. आता जरा बरे वाटू लागले. डोके चालायला लागले. मग ता~यांच्या फोटोसाठी ट्रायपॉडवर कॅमेरे सेट केले आणि स्वयंपाक करायला घेतला. तो करताना गोव~या वापरत होते. आणि गोवरीला=गौरीला पेटव अशी कोटी चालली होती. गप्पा रंगत होत्या. विनोदाला उधाण चढले होते. प्रत्येक जण कुठले सरपण कसे जळेल आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग होईल यावर पीएचडी करुन आल्यासारखे भाष्य करत होता. रात्री दीडला मॅगी रटरटले आणि आम्ही तुटून पडलो. ते झाल्यावर कॅमेराकडे जरा पाहिले तर त्याचे काम चालू होते, पण दवामुळे पूर्ण भिजला होता. लेन्सवर पण दव जमा झाले होते. अक्षरश: ठिबकत होता. घाईघाईत तो तंबूत आणला आणि कोरडा केला. तंबूत आतूनही दव जमा झाले होते. तसेच आडवे झालो. एवढे थकलो होतो की पाठ टेकल्याबरोबर झोप लागली.

सकाळी झुंजूमुंजू झाले आणि पक्ष्यांचा किलबिलाट कानी आला. डोळे उघडले तर तंबूचे दव अंगावर पडून आम्ही काहीसे ओले झालो होतो. ध्रुवने खिडकीतून बाहेर पाहिले तर पहिली प्रतिक्रिया होती, "पंक्या, बाहेर बघ जरा". अगदी दाट धुके आणि पूर्वरंग. स्वर्गात आल्याचा भास होत होता. क्षणार्धात कॅमेरा सरसावून बाहेर येईतो धुके गायब. निसर्गाची जादू, डोळ्यांनी अनुभवता आली, हेही नसे थोडके. आता उठून काल रात्री अंधारात हरवलेला लिंगाणा शोधू लागलो. दूरवर धुक्यात लिंगाण्याचा सुळका दिसत होता. आणि त्यामागे भटक्यांचे दैवत रायगड. राजांची राजधानी आणि शेवटची भूमी. डोळ्यांचे पारणे फिटले. आसपासचे काही फोटो काढले. जवळून दर्शन घेण्यासाठी रायलिंगीच्या पठारापर्यंत जाण्याची इच्छा होती पण आवरती घेतली. कारण ऊन चढायच्या आधी परत हारपुडला पोचायचे होते. सणासुदीचा अक्षयतृतीयेचा दिवस होता. घरची बोलणी नको म्हणून आवरते घेतले. तंबू खाली घेऊन गुंडाळून ठेवला. आणि सात वाजता परत निघालो. आता काल आम्ही कसल्या रस्त्याने आलो तो दिसत होते. सह्यकड्याचे विराट रुप आता छातीत श्वास भरुन पाहून घेतले. ढगांनी वेढलेला लिंगाणा निरोप देत होता. पुन्हा दोन टेकड्या चढउतार करुन शेवटची तिसरी कस लावत होती. मागून ढग सह्याद्रीचा अडथळा पार करुन देशावर ओसंडत
होते. पाठलाग करणा~या ट्विस्टरसारखे ते दृश्य होते. वाटचाल करताना कधीही चार पावले वाट वाकडी करुन बाजूला गेले की करवंदाच्या जाळ्याच जाळ्या होत्या. मनसोक्त तो रानमेवा पोटभर खाऊन घेतला. शेवटची चढण लागण्याआधी एका घळीतून एक ओढा वाहत होता, तिथे जरा फ्रेश झालो आणि हारपुडकडे वाटचाल केली. अर्ध्या तासातच गावात पोचलो. परसूकाकांच्या घरी चहा झाला. एकदम टिपीकल गावरान गुळचाट चहा मस्त लागत होता. चहाने जरा तरतरी आली आणि आम्ही गाडीत बसलो. पुन्हा खराब रस्त्याने वरोती, कानंद खिंड करत वेल्ह्याला आलो. मध्ये एकदा पुन्हा "करवंदी" ब्रेक झाला. वेल्ह्यात नाष्टा झाला. आणि पुण्याकडे कूच केले, पुन्हा एकदा नवीन अनुभव आयुष्याच्या गाठोड्यात बांधून...!!!

आता एवढ्यावर आम्ही  थांबू का? आमचे समाधान झाले का? छे... "दूरदूर पर्यंत संबंधच नाही"...!!!

Fact file:
Name: Plateau of Mohari/Railingi (मोहरीचे पठार / रायलिंगीचे पठार)
Nearest motorable village: Harpud, Post-Singapur, Dist Raigad.
Route: Pune-KhedShivapur-Nasarapur-Velhe-Pasari-Varoti-Harpud
Distance: around 90-100km from Pune.
Tips: Avoid extreme seasons because heat, heavy rain and waterfalls. September end and October start is the best time to visit to witness the floral coronation of Sahyadri. Be prepared for a tough walk.
Stay: Can be done in open land of plateau or Moharichi wadi.
Surrounding: Raigad, Lingana, Torana.
07:02
19
Older Posts
Subscribe to: Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • पाऊसवेडा !
    पाऊस रानारानांत, पानापानांत आणि मनामनांत रुणझुणू लागला की सह्यभ्रमरांना साद घालतात ते सह्याद्रीचे कडे.राकट कडे, उन्हाळ्यात वणव्यांनी उजाड...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • कार: पेट्रोल की डिझेल?
  • मी भटकंती का करतो?
  • सध्या तरी आम्हांला "अमन" पाहिजे
  • पुण्यातला मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा: वृत्तांत

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1