मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंतीचा मोठ्ठा बार करायचा आमचा दरवर्षीचा शिरस्ता. तशी तब्बल वीस दिवसांची पदरात पाडून घेतली होती. त्यात कुडाळचा एक शूट, मुंबईचा एक शूट आणि कुटुंबासमवेत नगर जिल्ह्यात देवदर्शन, नाशिक आणि आसपासच्या परिसरात भ्रमंती केल्यानंतर एक जंगी बाइक राइड करण्याचा प्लान शिजला. किमान हजार किलोमीटर तरी राइड करायचीच असेच मी आणि ध्रुवने ठरवले होते. त्या दृष्टीने प्लॅन आखायला सुरुवात केली. आम्हा दोघांचाही कॉमन इंटरेस्ट म्हणजे जुनी मंदिरे, त्यांची बांधणी, मूर्ती धुंडाळीत जमेल तसे त्यांचे कोडे उलगडत बसणे.
या महत्त्वाकांक्षी आणि ऑफबीट राइड प्लॅनसाठी बाइक्सचे सर्व्हिसिंग, हेल्मेट्स, राइडिंग जैकेट्स, सॅडलबॅग, तंबू अशी सारी तयारी आधीच करुन ठेवली होती.
ध्रुव ठाण्यातली कंपनी सोडून पुण्यात येणार होता, आणि २६ डिसेंबर हा त्याचा शेवटचा दिवस होता.तो उरकून पुण्यात येऊन पुन्हा त्याच दिवशी राइडला निघणे जवळपास अशक्य होते. म्हणून ठाण्याहूनच सुरु होणारा प्लॅन आखला. पहिल्या दिवशी ठाणे-घोटी-अकोले सिद्धेश्वर आणि मुक्काम असा इरादा ठेवून आम्ही पुण्याहून पहाटे साडेपाचलाच गाड्यांना सॅडलबॅग बांधून ठाण्याकडे कूच केले. पुणे-खंडाळा-खोपोली-पनवेल करत ठाण्याला ध्रुवच्या फ्लैटवर सामान टाकले आणि मी आराम केला. दरम्यान त्याने ऑफिसचे शेवटच्या दिवसाचे सारे सोपस्कार उरकले. लवकर लवकर म्हणालो तरीही सारे आटोपून ठाणे सोडायला संध्याकाळचे साडेचार झाले होते. म्हणजे काहीही झाले तरी आमचा आज सिद्धेश्वर मंदिर पाहून मुक्काम करण्याचा बेत फसला होता. अकोल्याच्या आधीच कुठेतरी मुक्काम ठोकावे असा विचार करतच ठाण्याच्या बाहेर पडलो. ठाणे-नाशिक रस्ता तसा चांगला असल्याने व्यवस्थित ८०किमी प्रतितासाच्या वेगाने क्रूज करता येत होते. अंधार पडण्याच्या आम्ही किमान घोटी-बारी यांच्या मधला घाट ओलांडण्याचे मनाशी ठरवले होते. पण घोटीत पोचता पोचता नारायणराव टाटा म्हणाले आणि हायवेवर असतानाच आकाशात संध्याकाळचा लालिमा पसरला.
घोटी नाक्यावर थोडावेळ चहाब्रेक घेऊन आम्ही घाट चढायला सुरुवात केली. रात्र पडल्याने अंधारात हेडलाइटच्या प्रकाशात सावधानतेने घाटांच्या वळणांशी लगट करत आम्ही बारीला पोचलो. मुक्काम करायचाच आहे तर मग रस्त्याच्या आजूबाजूला किंवा एखाद्या शाळेत झोपण्यापेक्षा भंडारदराच्या बॅकवॉटरलाच तंबू लावावा असे दोघांच्या 'एकमताने' ठरवले. दुसऱ्या मताला आमच्या दोघांत फारच कमी वाव मिळत असतो. तर ते असो... मुक्काम ठरला आणि आम्ही साडेआठच्या सुमारास शेंडीला पोचलो. रात्री अंधारात जेवणाची सोय शोधली, अर्थातच कोंबडी सोबत होती, पण ती ताटात. जेवण झाल्यावर मुक्कामाची जागा नक्की करुन सामान सोडले आणि पुन्हा एकदा आमच्या दोघांत आइस्क्रीम खाण्यावरुन एकमत झाले. हिवाळ्यात रात्री साडेदहा वाजता, ९-१० डिग्रीला आम्ही भंडारदरा सारख्या हिलस्टेशनला आइस्क्रीम शोधत फिरत होतो आणि गावकरी आमच्यावर हसत होते. शेवटी अर्धातास फिर फिर फिरलो तेव्हा कुणीतरी आमची कीव येऊन सांगितले एमटीडीसीच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हांला आइस्क्रीम मिळेल. तिथे जाऊन पाहिले तर तिथेही आमच्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि आइस्क्रीम नसल्याची सुवार्ता दिली. पण हार मानू ते आम्ही दोघे कसे. फायनली आइस्क्रीमचे डोहाळे पावकिलो श्रीखंडावर भागवले आणि त्याच्या गुंगीने जलाशयाच्या काठावर सुखाने ताणून दिली.
सकाळी पक्ष्यांच्या आवाजानेच जाग आली. डिसेंबराची थंडी आणि त्यात भंडारदर्यासारख्या ठिकाणी जलाशयाची सोबत म्हणजे आपोआपच अंघोळीचा विचार गळून पडला. जलाशायच्या पार्श्वभूमीवर सुर्योदय आणि सकाळची लालिमा नभी पसरली होती. त्या दर्शनाने उत्साह दुणावला. आजचा टप्पाही तसा मोठाच होता. अकोले, ताहाकारी, सिन्नर एवढे सगळे पाहून कोपरगावशेजारील कोकमठाण इथे पोचायचे होते. आमचा फक्त बाईक चालवण्याचा निर्धार आणि अनोळखी गाव म्हणजे मुक्कामाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सुर्यास्तापूर्वीच पोचणे आवश्यक होते. ‘शंभो’ची गोळी घेऊन. तोंडं खंगाळली, बॅगा भरुन बाईक्सला आवळल्या आणि शेंडी गावातल्या एसटी स्टॅंडजवळील प्रसिद्ध गवती चहाच्या टपरीपाशी बाईक्स उभ्या केल्या. शाळकरी पोरं, युनिफ़ॉर्मातले कॉलेज कुमार सकाळच्या पहिल्या `यष्टी’ची वाट पाहत असताना आम्ही गवती चहा पिऊन थंडी पिटाळण्याचा प्रयत्न करत होतो. चहावाल्या मामांच्या बोहनीच्या वेळी प्रत्येकी एक पारलेजीचा पुडा आणि सोबत अडीच ग्लास चहा पिऊन झाला तेव्हा अर्धा सेल्सिअसने गरम झाल्यासारखे वाटले तेव्हा कुठे आम्ही पुन्हा बाईकला टांग मारली. पुढील टप्पा होता अकोले, अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे एक गाव.
शेंडी-राजूर-अकोले असा वळणावळणांचा दुतर्फा सुबत्ता असलेल्या उसाच्या शेतांच्या मधून जाणारा घाटदार रस्ता आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणात सुरु झालेली लगबग. रानातून घुमणारे मोरांचे आवाज, सोनकोवळ्या उन्हाला बसलेली गावकरी मंडळी, आसपासच्या गोठ्यांमधून चाललेली धारा काढण्याची लगबग, घराबाहेरील चुलींमधून उठणारी धुराची वलये, गावच्या कट्ट्यावर दूधगाडीची वाट पाहत बसलेली मंडळी, त्यांचे ऍल्युमिनिअमचे आणि काही शेंदरी रंगाचे प्लास्टिकचे कॅन, राखुंडीने दात घासत बसलेली पोरंसोरं असं सारं दृश्य डोळ्यांत साठवत आमच्या बाईक्स रस्ता कापत अकोल्याच्या दिशेने दौडत होत्या. त्यात आमचे रायडिंगचे पेहराव पाहून माना वळवून पाहणारे गावकरी आरशात दिसत होते. अकोल्यात पोचलो तेव्हा सकाळचे आठ वाजले असतील. चहाचे अजून एक आवर्तन करुन घेतले आणि नाश्त्याचा बेत थोडा पुढे ढकलत आधी सिद्धेश्वराचे मंदिर पाहण्याचा दोघांचाही बहुमताने निर्णय झाला. आम्ही दोघे असतो तेव्हा निर्णय बहुमतानेच होत असतो. जेव्हा दोघांची मते विरुद्ध दिशेला पडतात तेव्हा निर्णय कायम खाण्याच्या बाजूने लागतो ;-)
सिद्धेश्वर मंदिर शोधण्यास विशेष सायास पडले नाहीत. बर्यापैकी लोकांना ठाऊक होते. अगदी मंदिराच्या तटात गाडी जाऊ शकते. गाड्या नीट पार्क करुन ठेवल्या. कॅमेरे काढून एकदम कुणाला भिववून टाकण्याऐवजी जरा आसपासचा आढावा घेतला.
पुजारी आणि दर्शनाला आलेल्या भक्तगणांशी गप्पा मारुन मंदिरात कुठे आणि काय काय आहे त्याची माहिती जाणून घेतली. एकंदर परिस्थिती पाहून थोडेफार समाधान वाटले. मंदिर कुठेही ऑईलपेंटने न रंगवता आणि कॉंक्रीटचे आधार न लावता नीट जपले होते. मुख्य सभामंडपातून प्रवेशाऐवजी मागच्या बाजूने प्रवेश सुरु होता आणि सभामंडप कुलूप लावून बंद केला होता.

खिडक्यांमधून डोकावले असता तिथे मोठा शिल्पखजिना आहे जे जाणवत होते. त्यामुळे काहीही करुन कुलूप उघडून आत जायला मिळाले पाहिजेच असे मनाशी ठरवले. मंदिराच्या पुजार्याकडे चावी असते आणि ती कुणाच्या तरी शिफारशीवर मिळेल अशी माहिती समजल्यावर आम्ही आसपास दर्शनास येणारे भक्त हेरु लागलो. एक जरा गावात वजन आहे असे वाटणारी व्यक्ती दिसलीच. रासने मामा. कॅमेरे पाहून त्यांचेही कुतूहल जागे झालेच होते. त्यांच्याशी बोलून आमच्या दौर्याचा कार्यक्रम थोडक्यात सांगितला, आम्हांला माहिती असलेल्या काही मूर्तींची माहिती त्यांना करुन दिली. आणि मग हळूच सभामंडपाच्या चावीचा विषय काढला. त्यांनीही तत्काळ पुजार्याला कुलूप उघडून देण्यास सांगितले. आमच्यासोबत पुन्हा नव्या नजरेने सभामंडप पाहिला. सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप हा तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष देतो. एक मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप अशी त्रिदलीय रचना असलेले हे मंदिर असून अतिशय नाजूक कोरीवकाम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका, विविध देवदेवतांची आणि यक्षांची शिल्पे, सागरमंथनासारखे काही पुराणप्रसंग, बाह्यभागात अश्वदल, गजदल असा सारा खजिनाच तिथे दिसत होता.

रासने मामांनी आम्ही कसले फोटो काढतोय हे कुतूहलाने पाहिले, कौतुक केले. आणि बोलता बोलता गावातील आणखी एका पुरातन गंगाधरेश्वर मंदिराचा उल्लेख केला. मग तो धागा आम्ही कसला सोडतोय? अधिक माहिती विचारुन घेतली आणि त्यांनाच आम्हांला तिथे सोडण्याची गळ घातली. रासने मामा आम्हांला त्या मंदिरात घेऊन गेले नसते तर आम्हांला खरेच ते सापडले नसते. गावातल्या अगदी लहानशा गल्लीत घरासारखा दिसेल असा दरवाजा असलेले मंदिर असले तरी आतमध्ये मात्र प्रशस्त होते. पुण्यातील पोतनीस कुटुंबाच्या खाजगी मालकीचे असलेले हे मंदिर अलीकडच्या काळात म्हणजे साधारण पेशवाईत बांधलेले आहे. अतिशय सुबक शिवलिंग, सभामंडप, गणेशमूर्ती, कमलदल कोरलेले खांब, प्राचीन काचेची झुंबरे, फरसबंदी प्रशस्त आवार यामुळे हे मंदिर अगदीच चुकवू नये असे.
गंगाधरेश्वरानंतर आता वेध लागले होते पोटार्थी क्षुधेश्वराचे. त्यामुळे तडक मोर्चा अगस्ती कॉलेजसमोरच्या चौधरी मामांच्या ‘हाटेला’कडे वळवला. तिथे तर्रीबाज मिसळपाव, डिसेंबराच्या थंडीत घाम काढणारा रस्सावडा असं काही चापून घेतले आणि त्याला वरुन चहाचा तडका लावला. पुढचा टप्पा होता ताहाकारी जगदंबा मंदिर. देवठाणमार्गे ताहाकारीला जाणारा रस्ता तसा थोडा खराबच होता. त्यात आता ऊनही चढायला लागले होते. देवठाण-सावरगावपाटच्या दरम्यान डावीकडे एक सुंदर जलाशय दिसला. हिवाळ्यात सोनेरी झालेली गवताळ कुरणे, काढणीला तयार असलेल्या गव्हाची शेते आणि त्यांच्या पलीकडे निळाशार जलाशय डोळे निववत होता. त्या जलाशयापासून वीसच मिनिटांवर ताहाकारी समोर दिसू लागले. मंदिर मोठे सुरेख. या मेगाराईडसाठी ध्रुवने जागाच अशा शोधून काढल्या होत्या की हरएक मंदिर पाहताना डोळ्यांचे पारणे फिटावे. पण या मंदिरात मात्र तथाकथित जीर्णोद्धराच्या नावाखाली गावातल्या प्रगतीशील (?) कारभार्यांनी कॉंक्रीटचे खांब आणि वरुन तसलेच घुमट उभारले होते. त्यामुळे गावात शिरताना ’आढळा’ नदीच्या अलीकडून पाहूनही हीच ती मंदिरे अशी खात्री पटत नव्हती. बाईक्स पार्क करुन आधी थंड पाण्याने शिणवटा घालवला आणि मंदिरात प्रवेशते झालो. मंदिर मोठे नेत्रदीपक होते. चोहोबाजूंनी शिलाखंडांनी बांधलेल्या पुरुषभर उंचीच्या भिंतींनी आवार बंदिस्त केलेले होते.
रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला दंडकारण्याचा परिसर म्हणून ओळखला जातो. या गावासह सभोवताली असलेले हिरवाईने नटलेले डोंगर गावाची शोभा वाढवितात. या गावाच्या प्रवेशद्वारातच आढळा नदीच्या तीरावर श्री जगदंबा मातेचे मंदिर आहे. श्री जगदंबा मातेचे हे मंदिर संपूर्ण चिर्या॔नी बा॔धलेले आहे. ह्या मंदिराची बा॔धणी हेमाडपंथी पध्दतीची असून मंदिरा बाहत्तर दगडी खा॔ब आणि पाच कळस आहेत. मंदिराच्या बाहेरील भि॔तीवर शिल्पे कोरलेली आहेत.
सभामंडपाच्या छताचा मी आजवर पाहिलेला महाराष्ट्रातील सर्वोत्तम नमुना. आठ व्याल आणि स्त्रीरुपातील अष्टदिक्पालांनी तोलून धरलेलं छत. छताच्या मधोमध दगडात कोरलेलं आश्चर्य म्हणजे लटकते दगडी एकसंध झुंबर. आजही उत्तम अवस्थेत आहे. सभामंडपाच्या बाह्यभागात बरीच मैथुनशिल्पे कोरलेली असून मंदिरसमूहाच्या बाह्यभिंतींवर देवादिकांची अतिशय प्रमाणबद्ध शिल्पे आढळतात. मंदिराची आधीची शिखरे विटांमध्ये बांधली असल्याने कालौघात ती नामशेष झाली आणि त्यावर सध्याची कॉंक्रीटची बेढब शिखरे चढवली गेली. मंदिराच्या भागातले ऑईलपेंटचे रंगकाम पदोपदी दाताखाली मिठाचा खडा चावला जावा असे नजरेत खुपते. परंतु सध्या पुरातत्त्वखात्याने मंदिर ताब्यात घेतल्याने पुढील कॉंक्रिटीकरण थांबले आहे ही त्यातल्या त्यात जमेची बाजू समजायची.
ताहाकारीचे हे मंदिर पाहून आम्हाला पुढे पोचायचे होते सिन्नरला. प्रसिद्ध शिवपंचायतन बघायला. ताहाकारी-ठाणगाव-आशापूर-दुबेरे खिंड आणि सिन्नर हा रस्ता छान होता. बाईक्स पळवायला मज्जा आली. दुबेरे खिंडीत दुतर्फा वनविभागाने वृक्षारोपण केल्याने राईड एकदम सुसह्य झाली. पुढे दुबेरेच्या जवळच्या घाटात पाणी-ब्रेक आणि फोटोब्रेक घेऊन गाड्या बुंगवत आम्ही सिन्नरमध्ये पोचलो तेव्हा आम्हांला जाणीव झाली की सकाळपासून फक्त एकदाच खाणं झालंय. सिन्नरच्या हायवेवर वडापाव आणि चहा रिचवून आम्ही गोंदेश्वर मंदिर शोधण्याच्या कामी लागलो. खरंतर कुणाला विचारलं असतं तर लगेच सापडले असते. पण एक्श्ट्रा आत्मविश्वासाने गाड्या बुंगवून आम्ही बारगावच्या दिशेने पाचेक किलोमीटर पुढे गेलो आणि पुढे काहीच दिसेना तेव्हा वाट चुकल्याचा साक्षात्कार आम्हांस झाला. थांबून एके ठिकाणी जरा चौकशी केली तेव्हा समजले की मुख्य सिन्नर गाव सोडून येण्याची काहीच गरज नव्हती. तिथेच पंचायत समिती ऑफिसजवळून एक रस्ता आतमध्ये दोनशे मीटरवर गेला की मंदिर दिसेल. परत फिरलो आणि आता कुणालाही न विचारता थेट मंदिराच्या दारात गाड्या उभ्या केल्या. येताना एका पंपावर ध्रुव त्याच्या KTM Duke390ची टाकी फुल करुन आला. तिची टँक रेंज कमी असल्याने मिळेल तिथे आम्ही ती फुल करुन घेत होतो. दाराशीच गाड्या लावून ते मंदिर पहावयास निघालो. एवढे भव्य मंदिर मी प्रथमच पाहत होतो.
गोंदेश्वराचे मंदिर हे शिवपंचायतन असून, एका प्रशस्त चौथऱ्याच्या मध्यभागी मुख्य सप्तस्तरीय (म्हणजे सात distinct थरांमध्ये असलेली रचना) मंदिर आहे व त्यात शिवलिंग आहे. मंदिरासमोर नंदी मंडप आहे. मुख्य मंदिराच्या बाजूंना विष्णू, गणेश, पार्वती व सूर्य या देवतांची उपमंदिरे आहेत. मुख्य मंदिर गर्भगृह व सभामंडप या दोन दालनांत विभागले असून त्याला तीन द्वारे आहेत. ते गोविंदराज या यादव राजाने बाराव्या शतकात बांधले. या मंदिराची रचना भूमिज शैलीत केलेली आहे. म्हणजेच मुख्य शिखराच्याच आकाराची लहान लहान शिखरे एकावर एक अशी रचना करत मंदिराचे शिखर बनवले जाते. मुख्य शिखर आणि त्याचे घटक असलेली उपशिखरे यांतील साम्य अतिशय लक्षवेधक असते. या रचनेलाच शिखर-शिखरी रचना असेही म्हणतात. सभामंडपातील खांब नक्षीने शिल्पालंकृत असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मुख्य मंदिरात देखभालीचे काम चालू असल्याने तिथे वाळू-सिमेंट आणि अन्य बांधकाम साहित्याचा राडा पडला होता. त्यामुळे आम्हांला ते व्यवस्थित पाहता आले नाही. आता खास त्यासाठी सिन्नरची वारी होईलच.
दुपारचे (की संध्याकाळचे) चार वाजून गेले होते. उन्हं आणि पोटातल्या वडापावचा डोलारा कलायला सुरुवात झाली होती. सकाळपासून काहीच नीट असे खाल्ले नव्हते. म्हणून आता सिन्नर-कोपरगाव रस्त्याचे एखादे चांगले हॉटेल पाहून वडा, पाव, मिसळ, भजी सोडून काहीतरी साऊथ इंडियन डोसा-उत्तप्पा-इडली-मेदूवडा असे काही पदरात पाडावे म्हणून रस्त्याने पाहत निघालो होतो. पण चार हॉटेलांत चौकशी करुनही कुठेच तसले काही मिळालं नाही. रस्ताही आमची परीक्षा पाहत होता. सुरुवातीचा पंचवीस किलोमीटरचा सुसाट रस्ता संपल्यावर काम सुरु असलेला, असंख्य डायव्हर्जन असलेला आणि फुटाफुटाला फुटाफुटाचे खड्डे असलेला रस्ता आमचा कस लावत होता. दिवसभराच्या राईडमुळे अंग आंबले होते आणि त्यात हा असा रस्ता आमच्या जिवावर उठलेला. शेवटी पाथरे गावाशी जिथे शिर्डी आणि पुण्याहून येणारे रस्ते एकत्र येतात तिथे साईराम, साईशाम, साईलीला, साईकृपा, साई अमुक तमुक अशी हॉटेल्स दिसली. तेव्हा थोडी आशा निर्माण झाली आणि लगेच धुळीसही मिळाली. जरा बऱ्या दिसणाऱ्या हॉटेल वजा टपरीवर थांबलो. पण तिथेही वडापाव, मिसळ असलंच उपलब्ध होते. शेवटी नाइलाज को क्या इलाज म्हणत पुन्हा वडापाव पोटात ढकलून कोपरगावच्या दिशेने दौड मारली. कोपरगाव हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार. तिथूनच पुढे मराठवाडा आणि विदर्भात रस्ते जातात. गोदावरी नदीच्या तीराशी असलेले कोकमठाणचे शिवमंदिर हे कोपरगावपासून साधारण १३ किलोमीटरवर आहे. संध्याकाळ होत आल्याने आधी मंदिर गाठून मुक्कामाची सोय लावणे आणि मगच रात्रीच्या जेवणाकडे पाहणे असे ठरले. मंदिर परिसरात पोचलो तेव्हा किमान चाळीस जणांचा एक ग्रुप मंदिराच्या परिसरात 'साइटसीइंग' करत होता. त्यामुळे आम्ही ते लोक जाईपर्यंत आवारातच बसकण मांडली. आवार तसे फरसबंदी. तंबू लावायला अत्यंत योग्य. म्हणून जागा हेरुन ठेवली आणि त्या मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या संजय नावाच्या तरुणाला तशी कल्पना दिली. त्याने बाहेर नका झोपू, रात्री फार थंडी पडेल असा सल्ला दिला. आमचे तंबू आणि स्लीपिंग बॅग पुरतील असे सांगूनही शेवटी तो म्हणाला जास्त थंडी वाजली तर दार उघडून मंदिरात जाऊन झोपा, मी कुलूप न लावता फक्त कडी घालून जाईन. बहुधा त्याला तिथल्या थंडीबद्दल जरा जास्तच खात्री होती.
अंधार पडला आणि आमच्या पोटात थंडी जरा जास्त थरथरु लागली. म्हणजेच आम्हांला भूक लागल्याचा साक्षात्कार घडला. खाण्याची बाब असल्याने एकमताचा प्रश्नच नव्हता. जरा आसपास चौकशी करता असे समजले की शिर्डी रोडवर स्वस्तिक पॅलेस नावाचे चांगले हॉटेल आहे. सॅडलबॅग गाडीलाच होत्या. तशाच मोटरसायकल पंधरा किलोमीटरवरच्या स्वस्तिककडे दामटल्या. त्या छोट्याशा प्रवासातही थंडीने आपले रंग दाखवले आणि मंदिरात झोपण्याबाबत आमच्या दोघांच्याही मनात वेगवेगळे एकमत झाले ;-)
त्या रात्री स्वस्तिक पॅलेसमध्ये प्रत्येकी दोन कडक कॉफी, प्रत्येकी तीन तीन रोट्या, आणि काहीतरी व्हेज भाज्या (व्हेज असल्याने आठवण्याचा संबंधच नाही) एवढे(च) खाल्ले. आमचे जेवण संपत आले तेव्हा सगळेच वेटर प्रत्येक टेबलवर पांढऱ्या रंगाची घमेली नेऊन ठेवताना दिसत होते. आणि चारेक लोक एक घमेले तोडून खात होते. त्याने आमचे कुतूहल चाळवले. वेटरला विचारता ती या हॉटेलची स्पेशालिटी रुमाली खाकरा असल्याची माहिती मिळाली आणि तद्सोबत वेटरला आधी न सांगितल्याबद्दल मनातून चार शिव्या. तर ते असो, त्या घमेल्यांसाठी कोपरगावला पुन्हा जावे लागणार.
बाहेर तद्दन भिकार क्वालिटीचे मघई पान रवंथ करताना स्वस्तिक हा पॅलेस निवासाचीही व्यवस्था करत असल्याचे वाचले आणि बाहेर जेवण झाल्यावर वाजणारी थंडी पाहून पुन्हा आमच्या दोघांच्याही मनात वेगवेगळे एकमत झाले आणि एकमेकांना स्माइल दिले. पुढच्या पाचव्या मिनिटाला आम्ही अतिशय किफायती असे डील ठरवून खोलीत तंगड्या वर करुन टीव्हीसमोर लोळत पडलो होतो. दोन दिवस अंघोळ मिळाली नव्हती. त्याची खरं तर अजिबातच खंत नव्हती, पण उगाचच एकमेकांना त्रास नको म्हणून रात्री गरम पाणी आणि तेही शॉवरमधून उपलब्ध झाल्याने मस्त कडकडीत पाण्याने स्नान उरकून घेतले. ते झाल्यावर अंग असे काही मोकळे झाले की विचारायची सोय नाही. जी काही सुरेख झोप लागली ती एकदम सकाळीच जाग आली.
मध्ययुगीन मंदिरांचा भन्नाट दौरा, दमदार सुरूवात !
ReplyDeleteपंकज आणि ध्रुव , मित्रानो तुम्ही खरोखरीच एक चांगली आवड जपताय आणि आम्हाला अडवाटेवरची मंदिरे आणि माहिती देताय. ह्या ब्लॉग च्या लेखन शैलीचे विशेष कौतुक. अतिशय प्रवाही पणे आणि शेवटपर्यंत वाचायला लावणारी भाशा... सलाम तुम्हा दोघांना !!
ReplyDeleteकाय भाऊड्या तु, हा लेख थोडा आधी का नाही लिहीला, मी आताच जावुन आलो औरंगाबाद ला, यातील एक दोन मंदिर राहीली ना बघायची
ReplyDelete