दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच
मनही सह्याद्रीत विहरु लागते. मग काय आठवडाभर काड्या आणि वीकेंडला
बुडाखाली गाड्या असल्यावर त्या मनाला देहाची जोड लागायला असा कितीसा वेळ
लागणार? पाऊस अजूनही म्हणावा तसा विसावला नसल्याने तो उंबर्यातून आतबाहेरच
करत होता. रोज पेपरात कुठवर आलाय हे चाळण्यात आणि तो मनासारखा बरसल्यावर
कायकाय करायचे याचे मनसुबे रचले जात होते. तो इकडे म्हणावा तसा घाटावर येत
नाही म्हणूनच की काय त्याला भेटायला आपणच जराशी घाट उतरुन त्याचे स्वागत
करावे, इतिहासाच्या पाऊलखुणा शोधीत किल्ले पालथे घालावेत असे मनाचे खेळ
मांडीत ट्रेकचा बेत आखण्यात आला होता. उन्हाचा त्रास आता सरल्याने तसा
जरासा ताणलेला बेत चालणार होता. म्हणून दोन-तीन दिवसांत वरंधच्या
माथ्यावरले दोन आणि महाड-माणगाव परिसरातले दोनतीन अशी दुर्गांची पंचरंगी
माळ ओवण्याचा प्लॅन तयार झाला.
मोहनगड-कावळ्या-सोनगड-चांभारगड-दासगाव-पन्हळघर. माऊलींच्या वारीसाठी
काढलेली सुट्टी आता ट्रेकला सत्कारणी लावायची हेही पक्के केले.
दोन दिवस, चार भटके, पाच किल्ले !
या वेळी अमित आणि अजयसोबतच शतदुर्गवीर
अनुप बोकीलबुवा बदलापूरकर हे नविन साथीदार होते. नुकताच त्यांनी
हरिश्चंद्रगडावर इंद्रवज्राचा पराक्रम केला होता. शुक्रवारी पहाटे अमितच्या
घरी पहिला चहा घेतच दिवसाचा प्लॅन आखला. बाईकवर भोरमार्गे निगुडघर आणि
दुर्गाडी म्हणजे मोहनगडाच्या पायथ्याचे गाव. झाडून सार्या ट्रेकर्सचा
नैवेद्य म्हणजे मिसळ-पाव. भोरच्या शिवाजी पुतळा चौकात स्वयंसेवा असलेल्या
हॉटेलात मिसळपाव खातानाच बोकीलबुवांच्या व्यक्तिमत्त्वाच्या उंचीची खात्री
झाली. टेबलाशी बसताच आले नाही. बसूनही गुडघे टेबलाच्या उंचीच्या वर.
साडेसहा फूट ताडमाड असल्यावर ट्रेक करायला किती सोप्पे जात असेल असा विचार
मी मिसळीवर ताव मारताना करत होतो. एका दूध डेअरीच्या ड्रायव्हरला रस्ता
विचारुन घेतला आणि निगुडघर हे देवघर धरणाचे गाव गाठले. तिथून दुर्गाडीला
दोन रस्ते जातात. एक थोडा कमी अंतर असलेला खराब रस्त्याचा रस्ता आणि दुसरा
दहाबारा किलोमीटर जास्त अंतर असलेला पण रस्ता चांगला असलेला महाड रस्त्याने
पुढे जाऊन शिरगावहून मागे फाटा येणारा. (©भटकंती अनलिमिटेड) साहजिकच दुसरा पर्याय स्वीकारुन
आम्ही महाड रस्त्याला लागलो आणि शिरगावच्या अलीकडे दुर्गाडी फाट्याला जरासा
ब्रेक घेतला.
समोर दोनतीन उंच डोंगर दिसत होते. त्यातला
नेमका मोहनगड कुठला हे माहित नव्हते. बाईकवर दहाच मिनिटांत वळणावळणांच्या
रस्त्याने दुर्गाडीत पोचलो. तिथे दुर्गाडी हा किल्ला आहे हे कुणालाच माहित
नव्हते. मग दुर्गामातेच्या मंदिरात कसे जायचे हे विचारुन घेतले. दुरुन
लोकांनी वाट सांगितली. नेमकी समजली नाही पण डोंगर तर पक्का झाला म्हणून
आम्ही माना डोलावल्या. एका मावशींच्या घरी जड बॅगा टाकल्या, पाणी प्यायलो
आणि जरुरीपुरते पाणी आणि काही खायचे सामान कॅमेरासह काखोटीला मारुन आम्ही
वाटचाल सुरु केली. दहा-पंधरा मिनिटे चालत पायथ्याच्या देवीच्या मंदिराशी
पोचलो. मंदिर मोठे सुरेख. गच्च झाडांच्या कौलारु गाभारा, पाषाणात घडवलेल्या
सुबक मूर्ती, समोर काही वीरगळांची मांडणी. एखाद्या पाचसहा लोकांच्या
मुक्कामास एकदम योग्य जागा. तिथून पुढे चाल सुरु केली आणि पहिल्याच खिंडीशी
वाट चुकलो. दोन वाटा पुढे जाऊन पाहिल्या, पण त्या माथ्याशी घेऊन जातील असे
वाटले नाही. म्हणून पुन्हा खिंडीतून डावीकडली वाट धरुन पुढे गेलो. तीही
भरकटली. मग समोर दिसणार्या निसरड्या घसार्यावरुन माथा गाठला. पुढे
रानातून जाणारी वाट घेत खड्या कातळाला बगलेतूनच वळसा घालत शेवटी एका
रुळलेल्या वाटेवर येऊन पोचलो. पुढे कातळात खोदलेल्या पायर्या चढून माथावर
पोचलो तर स्वागताला दुर्गेची प्रसन्न मूर्ती असलेले सुंदर मंदिर. (©भटकंती अनलिमिटेड) त्याआधीच
डावीकडे खाली जाणारी वाट पन्नास पावलांवर पाण्याचे टाके. खूप मधुर पाणी.
सगळा शिणवटा निघून गेला. मंदिरात जरासा विसावा घेतला. तेथून ढगांच्या
घरट्यातला वरंध्याच्या माथ्यावरला कडा स्पष्ट दिसत होता. त्यातून डोकावणारा
कावळ्याचा एक सुळका साद घालीत होता. पाठीमागे मंगळगड (कांगोरीचा किल्ला)
आणि (बहुधा) रायरेश्वराचे पठार. त्यापलीकडे महाबळेश्वराचा पाठीराखा
चंद्रगड. ते दृश्य डोळ्यांत साठवत गडाचा निरोप घेतला आणि परतीची वाटचाल
सुरु केली.
वाटेत अमितचा गुडघा चमकून दुखायला लागला.
कसाबसा तासाभरात पायथ्याला आलो. मावशींनी जेवणाचा आग्रह केला. नको नको
म्हणत असतानाच चहा केला. तो मग प्यावाच लागला. आम्ही सगळेच क्षुद्र
विचारांचे लोक, पैसे किती झाले म्हणून विचारते झालो. पण त्यांनी
पाहुण्यांकडून पैसे घेत नाही असे बजावून त्यास नकार दिला. मग घरातल्या
चिल्यापिल्यांसाठी बॅगेतला मोठ्ठा बिस्किटांचा पुडा खाऊ म्हणून हाती दिला.
तोही खूप आर्जवं केल्यावर घेतला. सह्याद्रीचा मोठेपणा या लोकांच्या
मनामनांत भरला होता. असे डोंगरातल्या माणसांच्या निरपेक्ष स्वभावरंगाचे
अनुभव घेण्यासाठीच तर ट्रेक करावेत.
मावशींचा निरोप घेताना आता पुढला टप्पा
होता कावळ्या किल्ला. अमितने गुडघ्याला जेल लावून जरा त्याला चालता केला.
वरंध्यात खेकडा भजी खाऊनच पुढे जायचे म्हणून एका मामांच्या टपरीवर विसावा
घेतला. भजी खात असताना़च मामांनी रस्ता सांगितला. जरा खाली पाहत जपून जा,
पावसाचं किडूक मिडूक गारव्याला बाहेर आलेलं असतं असा प्रेमळ काळजीचा
सल्लाही दिला. बॅगा त्यांच्याकडेच टाकून आम्ही पुन्हा जरुरीच्या सामानासह
वरंध्याच्या खिंडीतल्या सुळक्याला वळसा घालून कारवीच्या रानातून घसार्याची
वाट धरली. वाटला होता थोडा पण तसा कावळ्याने अपेक्षेपेक्षा अधिकच कस
काढला. पट्टीचे चालणारेही फासफूस करु लागले. मामांनी सांगितलेले
शिवरायांच्या नावे तयार केलेले एक वृंदावन दिसले. वाटेत साळिंद्राचा एक
काटाही सापडला. कसाबसा टेकड्यांना उजवी-डावी घालत जरीपटका लावलेल्या
निशाणाचा बुरुज गाठला.
तेथून समर्थांची शिवथरघळ आणि तिथला
सुंदरमठ दिसत होता. शिवथरनदीला अजून पाणी वाहते झाले नव्हते. समोरच्या
रांगेतले मढे, शेवत्या, गोप्या घाट कोकणात उतरायची शर्यत खेळत होते. पलीकडे
राजगड आणि तोरणा त्यांच्यावरुन डोकावून कावळ्याकडे पाहत होते. मावळतीला
निघालेल्या सुर्याची किरणे ढगांमधून पाझरुन एक सुंदर सोनेरी पट खाली
महाडच्या दिशेने उलगडला होता. तिथून परतताना पावसाची एक सर आली. पलीकडे
शिवथर खोर्याच्या दरीत सुंदर इंद्रधनुष्य उमटले. ते डोळ्यांत आणि मनांत
साठवत वरंध्यात परत आलो आणि पुन्हा एकदा मामांच्या हातचे लिंबू सरबत घेऊन
ताजेतवाने झालो. मामांनीही आमचा उत्साह पाहून हा ग्लास माझ्यातर्फे म्हणत
अजून एक लिंबूसरबत ऑफर केले. पुन्हा एकदा सह्याद्रीचा बुलंद मोठेपणा…
बोलण्यात, त्यांना वाटणार्या किडूक-मिडूकच्या काळजीत. आता घळीत मुक्कामी
जायचे होते. रस्ता ओळखीचाच होता. पारमाचीमार्गे कुंभे शिवथर असे करत समर्थ
रामदास स्वामींच्या सुंदरमठासमोर उभे ठाकलो.
मठातल्या सेवेकर्यांना आमची ट्रेकर्स ही
ओळख आणि निर्व्यसनीपणा पटवून देण्यासाठी अजयने प्रयत्नांची शिकस्त केली आणि
नशिबाने त्याला यश आले. तिथल्या सेवकाने आम्हांस सगळी व्यवस्था दाखवली,
जेवणाला काही तयार करु नका, आमच्यासोबतच करा असे सांगितले. शूचिर्भूत होऊन
जमेल तेवढा वेळ दैनंदिन उपासनेला हजर राहण्याचा नियमही समजावला. हातपाय
धुण्यास कडक गरम पाणी, लाईट-पंखा असलेली खोली, कॅमेरा चार्जिंगला पॉइंट्स,
झोपायला स्वच्छ सतरंजी म्हणजे आम्हां भटक्यांची अगदीच चैन. सगळा दिवसाचा
शीण नाहीसा झाला. प्रसन्न वातावरणात उपासना, मनाचे श्लोक, आरती करुन कसे
एकदम पवित्र वाटले. जेवणाला साधीच पण सुग्रास सोय. भाजी-पोळी, भात आमटी आणि
चक्क पुरण. आजवर ट्रेकमध्ये जिलेबी, बर्फी, पेठा, लाडू, गुलाबजाम खाल्ले
होते. पुरणाची हौस तेवढी शिल्लक होती, तीही आज पूर्ण झाली. मस्तपैकी ताक
प्यायल्यावर जमिनीला पाठ टेकल्याबरोबर झोप लागली तो जाग आली ती
सुंदरमठाच्या सकाळच्या घंटेनेच. रोजचाच दिवस असा सुरु झाला तर किती भारी
वाटेल असा विचार करतच आवरुन पुन्हा सकाळच्या काकडाआरतीच्या शेवटच्या चरणास
आम्ही पोचलो आणि प्रसाद आणि चहा घेतला. पुढे जाऊन घळ पाहून आलो, दर्शन
घेतले आणि पहिल्याच प्रहरी महाडच्या दिशेने चांभारगडास समोर ठेवून बाईक्स
दामटवल्या.
सकाळच्या पावसाळी कुंद हवेत महाडच्या
रस्ता तसा निर्मनुष्यच होता. त्या रस्त्याने जाणार्या कदाचित पहिल्याच
गाड्या आमच्या असल्याने तसा रस्ताही नुकताच झोपेतून उठला होता. शेतकरी
नुकतेच पावसापूर्वीच्या मशागतीला शेतात पोचले होते. वाटेतच एका हरणाच्या
पाडसानेही दर्शन दिले. आम्हाला पाहिल्याबरोबर ते आत रानात चौखूर उधळले.
बिरवाडी फाट्याला पुन्हा एकदा नाश्त्याला मिसळ चापली आणि हायवेवरुन
महाडच्या दिशेने चांभरखिंडीत पोचलो. पायथ्याला पोचलो, गावात रस्ता विचारुन
घेतला आणि शाळेसमोरुन जातानाच शाळेतल्या बाईंनी “एवढ्या जड बॅगा कशाला घेऊन
वर जाता, इथेच ऑफिसमध्ये ठेवा” असे हटकले. तीच पडत्या फळाची आज्ञा मानून
पुन्हा एकदा जरुरीचे सामान घेऊन चांभारगडाची माची गाठली. तिथून पुढे पुन्हा
एकदा वाट चुकली आणि घसार्यावरुनच वर चढाई सुरु केली. वरती थोड्याफार
खोदीव पायर्या, किल्ल्याचे अवशेष, बरीचशी पाण्याची टाकी आहेत. सगळी पाहून
दोनतीन तासांत पुन्हा पायथ्याला पोचलो. (©भटकंती अनलिमिटेड) पाणी पिऊन ताजेतवाने होऊन शाळेच्या
शिक्षकांशी थोड्याफार गप्पा करुन पुढे दासगावचा रस्ता विचारुन घेतला.
हायवेने अर्ध्या तासात दासगावात पोचलो. तिथेही बॅगा एका दुकानात ठेवून
शाळेच्या मागचा दासगाव किल्ला चढायला सुरुवात केली. वर पोचताच पाठीमागे
स्वप्नवत सुंदर दृश्य समोर ठाकले. पलीकडे कुठली तरी खाडीसदृश नदी,
विस्तीर्ण पात्र, हिरवीगार झाडी, पाण्यात मध्येच तयार झालेली बेटं, मधूनच
जाणारा कोकण रेल्वेचा पूल… एकदम टिपीकल कोकण. कदाचित या दृश्यासाठीच कुण्या
ब्रिटिश अधिकार्याने या किल्ल्यावर बंगला बांधला. त्या बांधकामाच्या
जोत्याचे अवशेष, एक दगडी घोडवाट, एक-दोन बुरुज, एक तलाव असे पाहून
पायथ्याला आलो.
पुढला किल्ला खरंतर सोनगड होता, पण अमितच्या दुखर्या गुडघ्यामुळे फक्त पन्हळघर किल्ला करुन पुण्याकडे परतण्याचा निर्णय घेतला. लोणेरेहून पन्हळघर गावाकडे जाणारा रस्ता घेऊन पन्हळघर गावात पोचलो. गावाशेजारीलच आदिवासीवाडीवरुन किल्ल्यावर वाट जाते. किल्ला तसा खड्या चढणीचा, त्यात कोकणातला. म्हणजे घाम काढणारच. वाडीत रस्ता विचारुन घेतला. अनुपने खालीच आराम करणे पसंत केले. आणि मी, अमित, अजय वर निघालो. मोहिमेतला शेवटचा किल्ला असल्याने अगदी “सुलतानढवा” करतच माथा गाठला. किल्ल्यावर पाण्याच्या काही टाक्यांव्यतिरिक्त बाकी काही अवशेष शिल्लक नाहीत. पुस्तकात दिलेले खोदीव पायर्या आणि बांधकामाची जोती झाडीत शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण ते काही सापडले नाही. माथ्यावरुन दुर्गराज रायगड, लिंगाणा यांचे दर्शन घडले. वरुनच एक नदी दिसली आणि शिरस्त्याप्रमाणे ट्रेकचा शीण त्यात बुडवून टाकण्याचे नक्की केले. माघारी फिरलो. पायथ्याला आल्यावर त्या नदीच्या उथळ डोहात बराच वेळ डुंबलो आणि मग ताम्हिणीमार्गे परत येताना माणगावात जेवण करुन घेतले. ताम्हिणीत येताना पाऊस घाट आमच्यासोबतच चढला होता. अगदी पौडपर्यंत पावसानेही सोबत केली आणि आम्ही पुण्यात पोचल्यावर दुसर्याच दिवशी मागोमाग तोही पुण्यात दाखल झाला. पुढल्या भटकंतीचे बेत विचारात सध्या तो बाहेर कोसळतो आहे आणि मी ही मोहनगड-कावळ्या-चांभारगड-दासगाव-पन्हळघर पंचदुर्गांची माळ माझ्या सह्याद्रीस समर्पित करत आहे.
0 comments