दिवाळी: आठवणींचे भुईनळे
हटकून एखाद दोन गुहा करायच्या, पोतं घालून वरुन चिखल लिंपून होईल तो किल्ला. समोर जमिनीलगत घमेलं गाडून एखादं तळं, कधीतरी सलाईनच्या नळ्या मातीखालून आणून समोर बॉल काढून टाकलेलं रिफीलचं तोंड लावून कारंजे, हाळीव टाकून केलेली हिरवळ असलं बरंच काय काय. त्याच चिखलात बरबटलेले हात घेऊन स्वयंपाकघरात जाऊन फराळाचा समाचार घ्यायचा, तिथून उलथाने पळवून आणून किल्ल्याच्या पायऱ्या कापून घ्यायच्या. किल्ल्यासाठी घरातल्या मोरीतून बादल्या-मग पळवणे, कुणाच्या घरात काय काय फराळ तयार होतोय त्याचा अंदाज घेणे, परातीत घाणेरडे हात घालून बुचकुल्याभरुन शंकरपाळ्या खिशात घालणे असले उपद्व्याप एखादा धपाटा सहन करुन करत असायचो. शेवटी गेरुची अंघोळ किल्ल्याला आणि स्वतःला घडली की किल्ला प्रकरण सफल व्हायचं. एकदा ते झालं की आम्ही दिवाळी मिरवायला मोकळे.
गादीखाली अनेक वर्षं जपून ठेवलेला चांदणीच्या आकाराचा पिस्ता कलरचा आकाशदिवा वडील बाहेर टांगायचे आणि त्यात दिवा लागला की दिवाळी फील कंप्लिट! वर्षातून दोन वेळा नवीन कपडे असायचे. वाढदिवस आणि दिवाळी. दिवाळीचा ड्रेस परत परत पाहून कपाटात पुन्हा ठेवून द्यायला जीवावर येई. तो घालण्याची परमिशन लक्ष्मीपूजनलाच असे. बाहेर मित्रमंडळींच्यात कुणी केवढ्याचे फटाके आणले याबद्दल चढाओढीने चर्चा रंगत. गल्लीत रोल घालून पिस्तुलाने चोर पोलीस खेळत धुमाकूळ घालीत असू. टिकल्या वाजवण्यासाठी सांडशीत धरुन कुणाच्या पायात आपटून तोडणे, टिचकी मारुन हातात फोडणे, प्लास्टरच्या भिंतीवर घासून फोडणे, नटबोल्टाचा आपटीबार करणे असे अनेक प्रकारांचा शोध आम्हाला त्या काळी लागला होता. अभ्यंगस्नानाला ठेवणीतल्या तांब्याच्या घंगाळ्यात कढत पाणी, त्यात हजारी मोगऱ्याची फुलं. मोती साबण हातात मावत नसायचा. पहाटे उठवून खसाखसा उटणं घासल्याने हुळहुळणाऱ्या त्वचेवर कढत पाण्याचा चटका त्या थंडीत मस्त वाटे. अंघोळ झाली की आडवा हात मारुन फराळ. दुपारी जेवण झालं की अंगणातल्या रांगोळीची तयारी. हाफचड्डीवर रांगोळी काढताना चावणारे डास मारत मारत वैताग येत असे. रांगोळी झाली की नवीन कपडे घालून लक्ष्मीपूजन. त्यात ठेवणीतली एक रुपयांच्या नोटांची गड्डी, रुपयाचे वेगवेगळे ठोकळे, नवीन झाडू, लाह्या-बत्तासे आणि अनारसे. पूजेनंतर लवंगीची एकच लड वाजवून द्यायची, बाकीच्या लडी सोडून एक एक पुरवून पुरवून वाजवत बसायचो. कधीतरी एखादा फटाका कुणाच्या दोन्ही पायांच्या, बगलेतून जाऊन नवीन कपड्याला भोक पडले की वाईट वाटे. सुतळी बॉम्ब वाजवण्याचं धाडस तेव्हा आलं नव्हतं. मग हळूच कुणाच्या तरी खिडकीखाली उदबत्तीला बांधून त्याचा टाइमबॉम्ब बनवून ठेवून द्यायचा. सगळं सामसूम झाल्यावर तो धाडकन फुटायचा आणि लोकांची घाबरगुंडी पाहून आम्ही तोंड लपवून हसायचो. तीन दिवस असे संपले की दिवाळीच्या सुट्टीची दुसऱ्या अंकाचे वेध लागत. तो अंक म्हणजे गावी जाणे.
दिवाळीला आणलेले मोजके फटाके सुरुवातीलाच तीन भाग करुन ठेवायचे. लक्ष्मीपूजनला सगळ्यात जास्त, पाडव्याला त्याहून थोडे कमी आणि भाऊबीजेला नावापुरते. हे तीन दिवस आनंदात सरले की वेध लागायचे ते गावाला पळायचे. गावाला उधळायला मी कायम तयार असे. आई सोबत येणार असेल तर तिच्यासोबत किंवा ती मागाहून येणार असेल तर एकटा. यष्टीचा लाल डब्बा, पेपरचा मेटॅडॉर, दूधगाडी, वाळूचे ट्रक अशा मिळेल त्या वाहनाने फराळाच्या डब्या-पिशव्यांशी कसरत करत मी गाव गाठीत असे. आमच्या गावाला गावातच घर असल्याने तिथे कसाबसा एखाद दोन दिवस काढून मी तिथून जवळच असलेल्या मामाच्या गावी पळून जाई. कारण तिथं मामाचं घर सपराचं असलं तरी शेतावर बांधलेलं होतं. दिवाळीत त्या घराला भवताली आसपासच्या ज्वारी आणि हरभऱ्याच्या पिकांची सोबत असे. आम्ही गावाला गेलो की मग आजी आणि माम्या फराळाचे पदार्थ करायला सुरुवात करीत.
सकाळी शेळीच्या दुधाचा गूळ घातलेला चहा पिऊन आम्ही शेतावर उंडारायला पळून जात असू. मी गावात जाऊन मिळतील तेवढी वरच्या वर्गाची भाषेची पुस्तके, एखादं कथा असलेलं मासिक, चांदोबा, चंपक वगैरे पुस्तकं उसनी पैदा करीत असे. मग ती घेऊन चिंचेखाली, विहिरीच्या थारोळ्यात प्रचंड आडवी शिळा उशाला घेऊन, आमराईत, बांधाला, गुरांच्या शेणामुताचा सुगंध घेत गोठ्यात, सारवलेल्या अंगणात जांभळीखाली वाचत असे. फार गोंगाट वगैरे झाला असं वाटलं तर आणखी एक माझी सिक्रेट जागा असे. ती म्हणजे दोन वळईंच्या (रचलेली वैरण) मध्ये दोन बांबू आडवे घुसवून त्यात गोधडीचा घोळ करुन गावठी hammock तयार करत असे आणि दुपारी त्यात लोळून वाचत बसे. त्याच वळईत कुठं तरी सीताफळांची सिक्रेट अढी लावलेली असायची. ओढ्याला, पांदीत गुरांच्या मागे फिरताना सापडलेली डोळा पडलेली सीताफळं आम्ही त्या अढीत ठेवून सुट्टीभर खात असू. संध्याकाळी शेतावरुन मोठे लोक आले की चहा, हुरडा वगैरे चरणं होई. वैरणीतले एखादे ज्वारीचे ताट सोलून त्याच्या आतल्या फोमचा आणि काड्यांचा वापर करुन औत, चष्मा तयार करणे, गोठ्याच्या आढ्याला लावलेल्या गोणीतून वाख (घायपाताचे कमावलेले तंतू) उपसून मांड्या लाल होईपर्यंत ते वळून त्याचे चाबूक तयार करणे असे आवडीचे उद्योग करायचो.
रात्री शेतात पथाऱ्या घालून तारे मोजत, उशिरापर्यंत गप्पा-गोष्टी-खेळणं चाले. सगळे नातेवाईक जमले की एखाद्या संध्याकाळी आटीव दूध, सुगंधी भात आणि लाडू असा जेवणाचा बेत होई. त्याची चव एवढी सुंदर असे की आजही मला दूध भात आणि लाडू एकत्र खायला आवडते. नगर भागात पुऱ्यांचे किंवा दामट्यांचे लाडू करतात ज्याची mature चव दुसऱ्या कुठल्याच लाडवांना नाही. लाडू, कापण्या आणि कानुल्या (करंज्या) एवढीच दिवाळी. कानुल्याही गहू भरडून त्याची सोजी काढून केलेली असे. त्या मैद्यासारख्या पांढऱ्याफट्ट नसत. कडा फिरकीने न कापता आजीने हातावर गोठ घालून दुमडलेल्या. खूप चविष्ट. सुट्टी संपता संपता गावातून पाय निघत नसे. पण तसाच जड पायांनी आठवणींचा ठेवा गाठीला बांधून आम्ही सकाळची सातची यष्टी पकडून पुन्हा पुण्यात येत असू.
©भटकंती अनलिमिटेड (पंकज झरेकर)
0 comments