रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
एसीत बसे, पीसीत घुसे,
दिस काढी कसेबसे, हापिसात
दिस काढी कसेबसे, हापिसात
अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच
दिला कामांना खो, सह्याद्रीला ओ,
मनसुबा रचियेला, जावे रतनगडी, मित्रहो.
सगळ्या मित्रांना विचारुन पाहिले. पण प्रत्येकाला काही ना काही कामं होती.
एकंदर रागरंग पाहता फक्त अनिकेतू आणि मी असाच ट्रेक होतो की काय अशी
परिस्थिती निर्माण झाली होती. पण लगेच अमितआणि
अजयही कन्फर्म झाले. चला संगतीची मस्त भट्टी जमली होती. तीन भटके
फोटोग्राफर्स आणि एक दर्दी रसिक. आदल्या रात्री कुणी काय काय आणायचं याची
उजळणी करुन शनिवारी भल्या पहाटे सगळ्यांना वारज्यातून उचलले. अशा वेळी
फक्कड चहा आणि लुसलुशा पोह्यांसाठी एकच जागा आख्या पुण्यात वर्ल्ड फेमस
आहे, ती म्हणजे नळस्टॉप. तिथे हादडून झाल्यावर गाडी नाशिक हायवे वरुन
बुंगवली.मनसुबा रचियेला, जावे रतनगडी, मित्रहो.
पंक्याची गाडी, हायवेवरी उडी,
नाशिक रस्त्याच्या धडधडी, नविन नसे
ज्या ज्या वेळी सकाळच्या प्रहरी नारायणगावातून गाडी गेली त्या त्या वेळी
एसटी स्टॅंडसमोरच्या बजरंगाच्या भट्टीवरचे गरमागरम दूध मी कधीच टाळू शकलो
नाही. वडापावच्या मागोमाग एक एक पेला स्वर्गीय दूध रिचवून आम्ही अमृत कशाला
म्हणतात याचा याचि देहि अनुभव घेतला. पुढे आळेफाटा पार करुन बोट्याला एका
दुकानात चूल पेटवायला आवश्यक असा कापूर विकत घेतला. इथे एक ट्रेकर्ससाठी
शहाणपणाची टिप: रॉकेल किंवा पेट्रोल घेऊन जाण्याऐवजी कापूर खूपच सोयीचा
असतो. सांडण्या-गळण्याची भीती नाही.नाशिक रस्त्याच्या धडधडी, नविन नसे
गप्पा रंगल्या, आठवणी चांगल्या
जुन्या ट्रेकच्या, बढाया मारुनि.
बोट्याहून ब्राम्हणवाडा मार्गे कोतूळ गाठले. संपूर्ण रस्ता दॄष्ट लागावी
एवढा चांगला होता. राज्य महामार्ग असल्याने बराच मेनटेन केलेला. अपवाद फक्त
कोतूळ बाजारपेठेतून जाणार्या रस्त्याचा. कोतूळ गाव हे प्राचीन काळी फार
मोठी बाजारपेठ असावी. कारण रस्त्याच्या कडेलाच शानदार वाडे, त्यांचे घडीव
जोते हे प्राचीन समृद्धीची साक्ष देत होते. वाटेत घाटात एक उजाड
माळरानाच्या माथ्यावर हॉटेल गारवा (!!??) पाहून हसायला झाले. कोतूळहून पुढे
एक राजूरकडे जाणारा एक शॉर्टकट आहे आणि तो आम्ही मिस केला. त्यामुळे
अकोले-राजूर-शेंडी असे करत आम्ही भंडारदर्याच्या बॅकवॉटरवरुन रतनवाडीची
वाट चालू लागलो. पहाटे निघताना गाडीत लावलेली गाणी “अमृताचा घनु” पासून
सुरु झाली आणि वळणागणिक नाशिक आणि मुंबई असे घडीत सिग्नल बदलणार्या
एफएमच्या रिमिक्स मार्गे शेवटी आनंद शिंदेच्या गाण्यांवर येऊन थांबली
होती.तापत्या उन्हातच आम्ही रतनवाडीला पोचलो. ठराविक दाट जंगले वगळता बाकी
बरेचसे रान उन्हाने सोनेरी होऊन पुढे करपण्याच्या उंबरठ्यावर होते. उन्हाळा
जवळ आल्याची जाणीव अधिक तीव्र झाली.जुन्या ट्रेकच्या, बढाया मारुनि.
रतनवाडीला पोचल्याबरोबर पहिले काम केले असेल ते थोडेफार पोटात ढकलण्यासाठीची ऑर्डर. मग अमृतेश्वराचे दर्शन घेतले आणि मंदिर बारकाईने पहायला सुरुवात केली. काळ्या पाषाणात कोरलेले अप्रतिम शिल्प आणि त्याची हेमाडपंथी पद्धतीने केलेली बांधणी. प्रत्येक मूर्ती अगदी प्रमाणबद्ध,रेखीव, सगळे डिटेलिंग अगदी ठळकपणे केलेले. कित्येक ठिकाणी तर खांबांवरची नक्षी अगदी आरपार गेलेली आणि त्यातून नैसर्गिकपणे हवा खेळती राहून थंडावा निर्माण झालेला. जणू कुण्या अज्ञात कवीने रेखलेले खंडकाव्यच. पण जसा प्रत्येक काव्याला विडंबनाचा शाप असतो तसाच इथेही. मॉडर्न पिढीने बरेचसे काम ऑइलपेंटने रंगवण्याचा पराक्रम केलेला आहे. मनुष्यशिल्प दिसेल तिथे ग्रे, फुलं असतील तिथे अबोली आणि बाकी सगळीकडे पिवळा असा सगळा राडा घातलेला. थोडे मन खट्टू झाले. मंदिर पाहून अशा प्रकारच्या मंदिरांच्या यादीची पुन्हा एकदा उजळणी झाली. तयार झालेले पिठले भाकरी थोडीफार पोटात घातली आणि उरलेली बांधून घेतली. तयारी करुन रतनगडाच्या पायथ्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. आमच्या आधी एक पंधरावीस जणांचा ग्रुप पुढे गेलेला. एकदम टिपिकल मॉड ट्रेकर, बिनकामाचे ब्रॅंडेड शुजवाले. त्यातले एक काका तर फक्त कॅरीमॅटच घेऊन चालले होते, सगळ्यांच्या कॅरीमॅट. राजेशाही ट्रेकला आलेले दिसत होते. गडावर गर्दी असणार याचे आडाखे बांधायला लागलो.
बाजून प्रवरेचे पात्र आणि त्याला दोनतीनदा ओलांडून आपण रतनगडाच्या वाटेला भिडतो. समोरुनच त्याचा आवाका लक्षात येतो. डावीकडे कात्राबाईचे डोके वर काढलेले कडे उजव्या बाजूला रतनगडाचा सर्वज्ञात खुटा आव्हान देतो.पुढल्या वाटचालीत आपण तिथे असणार आहोत आणि नेढ्यात बसून वारा पिणार आहोत असे वाटून मज्जा वाटते. समोरच्या दोन टेकड्यांचे आव्हान पार केल्यावर आपण रतनच्या कड्याला बिलगतो. एकदा वाटचाल सुरु केली की या तापत्या दिवसांतले ट्रेक हे नवख्याचे काम नाही हे समजून येते. एकदा पायवाट लागली की रस्ता चुकण्याची शक्यताच नाही किंबहुना ट्रेकर्सपेक्षा दिशादर्शक बाणच जास्त दिसतील. फक्त एका ठिकाणी उजवीकडचे एक पायवाट जाते आणि डावीकडे रस्ता सरळ कात्राबाईच्या दिशेने पुढे हरिश्चंद्रगडाकडे जातो. तिथे एक दगडी चौथरा रचला आहे आणि पाच-पंचवीस लोक बसतील अशी बरीच मोकळी जागा आहे. ही खूण लक्षात ठेवली की पुढचे काम सोप्पे होते. या चौकातून उजवी घेऊन आपण एका पठारावर येतो. ऊन चढत असल्याने ही वाट बसत-उठत-धापा टाकतच पार करावी लागते. वाटेत जिथे पांदी आहेत तिथे अगदी थंडगार सावलीत विसावा घेऊन पाण्याचा घोट घेऊन ताजेतवाने होऊन पुन्हा वाटचाल सुरु करायची.
एरवी अडीच तीन तासांची असणारी चढाई, तापत्या उन्हामुळे चार तास लागले.शिडीच्या खाली थोडा विसावा घेतला, आणि एकदाची ती साठेक फूटांची दोन टप्प्यातली शिडी पार करुन दरवाजाशी पोचलो. वरुन पाहता जरा कोकणकड्याचा अंदाज आला. तो आपला नेहमीसारखाच स्थितप्रज्ञासारखा आमच्याकडे पाहत होता,गालातल्या गालात हसत म्हणत होता, आलात पुन्हा एकदा. बरेच दिवस झाले होते ना भेटून. या स्वागत तुमचे माझ्या कुशीत! मुख्य गुहेच्या दिशेने जाताना एक शेजारीच मंदिराची गुहा आहे. पण ती आधीच बुक झाली होती. आमच्यासारखेच चार भटके तिथे आडवे झाले होते. नाईलाजाने मुख्य गुहेत मुक्काम करावा लागणार होता. तिथे तो पंधरावीस जणांचा ग्रुप होता. प्रचंड बडबड-आरडाओरडा चालू होता. पण काही पर्याय नसल्याने तिथेच जागा शोधून बॅगा टाकल्या. लवकरच लक्षात आले की ही “फरसाण गॅंग” आहे, गुज्जूभाय. अखंडित पणे खादाडत होते.थकवा जावा म्हणून आम्ही दोन घास खाऊन घेतले. बाजूला फरसाण गॅंग ब्रेड बटर वर ताव मारत होती. बटरचे अर्धा किलोचे चार पुडे तर मी स्वतः पाहिले.चीझचेही तेवढेच. मग छुंदो छे, ठेपलो छे, आचार छे असे काय काय ऐकू येत होते.चिप्स आणि फरसाण त्यांच्या दृष्टीने खाण्याच्या नाही तर टाईमपासच्या पदार्थांत गणले जात असावे आणि ते कमीत कमी एकाने पाव किलो खाल्लेच पाहिजे असा नियम असावा. यथेच्छ खादाडी आणि कचर्याची इकडेतिकडे फेकाफेक चालू होती.त्यांना समजावून नीट सांगावे का असा विचार केला, पण त्यांच्या बटर खाल्लेल्या मेंदूत हे घुसणार नव्हते. म्हणून उद्या जाताना आपणच सफाई करावी हा विचार करुन शांत बसलो.
सुर्यास्ताची वेळ होत आली होती. म्हणून कोकणकड्याकडे धाव घेतली. दरम्यान अजयने एक स्वच्छ पाण्याचे टाके शोधून काढले. फरसाण गॅंगलाही ते टाके दाखवले. ते काहीतरी शुद्ध जल, निर्मल जल, मीठा जल असे काहीबाही पुटपुटत होते. आणि वर आम्हांला उपदेश देऊन गेला की “हमारे सिंहगडपर भी ऐसा पानी है,बहु मीठा”. भजी आणि पाणी याशिवाय काहीच माहीत नव्हते त्याला सिंहगडावरचे.अगदी टाक्याला देवटाके म्हणतात हेही नाही. जसा काय तानाजीने सिंहगड हा फक्त या फरसाणच्या पाण्याची सोय करण्यासाठीच लढला होता. इथूनच प्रवरेचा उगम होता. कारण त्याच टाक्यातल्या पाण्याचा धबधबा होऊन पुढे तळाशी नदीचे पात्र तयार झाले होते. शेजारीच लहानसे देवळीसारखे मंदिर आणि शिवपिंड होती. तिथे पाण्याने बाटल्या भरुन घेतल्या आणि मावळत्या दिनकरा डोळा भरुन पाहून घेतले.कोकणकड्याच्या तळाशी पात्र अरुंद होत चालले होते. नद्यांचे पाणी हिर्यासारखे चमकत होते. मधेच काही शेतांच्या बांधांची रांगोळी आणि खोपटांवरच्या धुरांच्या रेषा एकमेकांशी कानगोष्टी करत मनीचे गुज सांगत होत्या. क्षितिजापर्यंत मंद संधिप्रकाश विरुद्ध बाजूला कात्राबाईच्या कातळ कड्यावर त्याचा मोहक प्रकाश माखलेला. सुर्य अस्तावला तसे आम्ही गुहेत परत आलो.
जरा मला तब्येत खराब झाल्यासारखे वाटत होते. त्यामुळे फक्त गारठ्यात मस्त गरमागरम सूप प्यायलो. पिताना अजयला आयडिया आली की फरसाण गॅंगकडे सूप दिसत नाही तर त्यांना टूकटूक करावे. पण अनिकेतने भीती व्यक्त केली की आपण एक सूप दाखवू, पण त्यांच्याकडे चार-चार प्रकारासतील. मी लवकरच स्लिपिंग बॅगमध्ये घुसलो. एव्हाना फरसाण गॅंग ठेपलो, ढोकळो, सॅंडविच, छुंदो, आचार,चिप्स, फरसाणवर ताव मारणे बंद करत नव्हती. आणि वर डिनर को क्या है असेही एकमेकांना विचारत होती. आम्ही अवाक. कारण एवढे खाऊनही त्यांना डिनर करायचे होते. त्या लाल सॅकमध्ये सगळे खाण्याचे आहे अनिकेतूच्या चाणाक्ष नजरेने बरोबर हेरले आणि आपल्याला काही कमी असले की सरळ अंधारात ती बॅग उघडायची असे आम्ही मनोमन ठरवून टाकले :-). रात्री अमितने काही फोटो काढले आणि मी आरामात ताणून दिली. पण रात्रभर गुहेत फरसाण गॅंग उशिरापर्यंत बडबड करत होती आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा वरचढ डरकाळ्यांनी (घोरुन) गुहा दणाणून सोडली. मध्यरात्री कधी तरी डोळा लागला.
सकाळी बरोबर सुर्योदयाच्या आधी जाग आली. तीही चिप्सच्या पिशव्यांच्या आवाजानेच. सूर्यदेव अवतरण्याआधीच अर्धे अधिक त्यांचे खाणे उरकत आले होते.या वेळी लाडू, फरसाण, खजूर, फ्रुट्स दिसत होते. पण त्याकडे दुर्लक्ष करुन आम्ही सुर्योदयाकडे डोळे लावून पाहिले. समोरच्या भंडारदरा धरणाच्या पार्श्वभूमीवर मागे सह्याद्रीच्या रांगेच्या वरुन नारिंगी अबोली रंग उधळीत तो अवतरला. वर आल्याबरोबर समोरच्या प्रवरेच्या खोर्यात सोनसळी हळदुला प्रकाश फाकला. कुशीतलं रतनवाडी गाव जागं झालं. गुहेतून ते दृश्य अधिकच साजरे भासत होते.
कड्यावरल्या दरडींमध्ये घरटी करुन राहिलेली कबुतरे आकाशी उडाली. समोर
दरीतल्या झाडांवर पेंगणारी माकडंही डोळे किलकिले करुन आळस झटकू लागली. अशा
वातावरणात सकाळच्या चहाची आठवण न झाली तरच नवल.लगेच राखुंडीनं दात घासून
आधण ठेवले आणि फक्कड चहा तयार झाला. एकाला एक पाठ लावून डब्बल पारले-जीच्या
बिस्किटांना डुबव-डुबव के खाऊन फ्रेश झालो.दरम्यान फरसाण गॅंग चहाचं सामान
विसरली असल्याचं लक्षात आलं. चला काही तरी विसरलीत म्हणून आम्हांला असुरी
आनंद झाला. त्यांच्यासमोत चहात आलं ठेचून टाकताना मला तर उकळ्या फुटत
होत्या. फरसाण जास्त झाल्याने गॅंगचे बरेच लोक परेडला म्हणजे वाघ मारायला
गेले होते. त्यांनी तर कहरच केला होता. बंदुकीत गोळ्या भरुन ठेवाव्यात तशा
पाच-सहा बाटल्या भरुन ठेवल्या होत्या. आलं प्रेशर की उचल बाटली आणि पळ असा
कार्यक्रम चालला होता. आमचा चहा उरकला तसा दहा-बारा माकडांचं एक टोळकं धावत
आलं आणि बेसावध फरसाण गॅंगच्या पिशव्या ओढून पळालं. सगळे फरसाण गुहेत
आतल्या बाजूला ग्रिल लावून चिडीचूप झालं.कालपासून आम्हांला या लोकांना शांत
करणं जमलं नाही ते या माकडांनी करुन दाखवलं :-)
खातच सुटे, पोट कसे ना फुटे,
गडावर कचरा कुठेकुठे, गुज्जु फरसाणचा !
सगळं आवरुन गडफेरीला बाहेर पडलो. भांडी घासली, गुहा साफ करुन कचरा(फरसाण
गॅंगचाही) एका पिशवीत बांधला आणि ती सॅकला अडकवली. हे काय करतोय ते लोक
पाहत होते, वरमलेले चेहरे मला दिसत होते. चला काहीतरी डोक्यात प्रकाश पडला
असेल आपल्या कृतीनं. सोबत एक पुण्याचा तिघांचा ग्रुप (निहार, परिक्षित आणि
एक नाव विसरलो) भेटला. आम्ही नेढ्यातून जाऊन खुट्याच्या खालच्या वाटेने
खाली रतनवाडीत उतरणार आहोत हे ऐकून तेही आमच्या सोबत निघाले.मग वरचा
दरवाजा, टाके,बुरुज, गुहा आणि चोरदरवाजा पाहून घेतला. गडाला पूर्ण
प्रदक्षिणा मारुन नेढ्यात चढलो. नेढे हा एक अजब प्रकार. डोंगराला आरपार
असलेलं भोक. अगदी पंधराएक फूट रुंद आणि पाच-सात फूट उंच. निसर्गाचा एक
चमत्कारच. तिथे भर्राट सह्यवारा वाहत होता. त्या वार्यात बसून टाक्यातले
थंडगार पाणी पिऊन कुणी ताजेतवाने न होईल तरच नवल. खुट्याच्या खालून त्रिंबक दरवाज्यातून एका अवघड कड्याला बिलगत आम्ही खुट्याच्या खिंडीत आलो. येताना उगाचच दरीत “ए गुज्जुभाय, ठेपलो, ढोकळो,छुंदो, मुखवास छे?” असे जोरात बोंबलत होतो. तेथून उजवी घेत जंगलवाटेने पुन्हा कात्राबाईकडे जाणार्या दगडी चौथर्याच्या चौकात. तेथून खाली रतनवाडीच्या रस्त्यावर चालता चालता एकेक ठिकाणी प्रवरेच्या डोहात थंडगार पाण्यात डुंबून ट्रेकचा सगळा शीण धुवून काढला आणि खाली गावात लिंबू सरबतात उरलासुरला विरघळून गेला.
येताना आळेफाट्याच्या जवळ चौदा नंबरला चिकन भाकरीवर ताव मारायला अजिबातच विसरलो नाही.
कोतूळ गाव हे प्राचीन काळी फार मोठी बाजारपेठ असावी.
ReplyDeleteश्री. पंकज
आपला लेख अतिउत्तम जमला आहे, आपल्या छायाचित्रणाचा तर मी अतिशय चाहता आहे. आपल्या पुढच्या लिखाणाला शुभेच्छा. तुमच्यासाठी थोडी माहिती टाकत आहे कोतूळ गावाबद्दल. माझ्या मामा चे गाव आहे ते.
ह्या गावचे पूर्वीचे नाव कुंतलपूर होते, जी चंद्रहास राजाची राजधानी होती. येथे कोतुळेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे. व्यास लिखित महाभारतातील "जैमिनी अश्वमेध" या ग्रंथात कोतुळेश्वर तथा कुन्तलेश्वर देवस्थानाचा उल्लेख आढळतो. भागवत भक्त चंद्र्हास या दानशूर राजाची कुंतलपूर नगरी पुढे शब्द अपभ्रंशाने कोतूळ तथा कोतुळेश्वर या नावाने ओळखली जाऊ लागली. येथेच पांडवांचा विश्वविजयी अश्व अडविला गेल्याची कथा आहे. ऐतिहासिक काळात पेशव्यांच्या सेवेत असणा-या साडेतीन शहाण्यांपैकी एक विठ्ठल सुंदर परशुरामी याच गावातले.
कोतूळ येथे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी लवणस्तंभाची भौगोलिक रचना दिसून येते. एका ठिकाणी छोटीशी गुहा बनून तिच्यात लवणस्तंभ तयार झालेले दिसतात... स्थानिक लोक याला लवणस्तंभ म्हणत असले तरी भूगर्भात पाण्याच्या संचयन कार्यामुळं तयार झालेला हा भूआकार म्हणावा लागेल. भूगर्भतज्ज्ञाच्या मते दगडातून झिरपलेले ‘कॅल्शियम काबरेनेटयुक्त’ क्षार विरघळतात आणि ते तळाशी खडकांच्या पृष्ठभागावर जमा होतात. त्यांच्या संचयन क्रियेतून स्तंभासारखे आकार बनू लागतात. जाणकारांच्या मते, अशी भूरूप वैशिष्टय़े ग्रेट ब्रिटन, युगोस्लोव्हाकिया, अंदमान बेटांवर आणि भारतात उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आहेत.
Khup sundar lihilays lekh Pankaj. Guhetun tiplela photo tar apratim aalay. Lekh wachun agadi gadawar aslyachi ch feeling aali. Khup prasanna watla. :)
ReplyDeleteApratim lekh pankaj
ReplyDeleteapratim lekh pankaj
ReplyDelete