ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी, मल्टीक्विझिन हॉटेल्स, दिमतीला गाड्या, सर्व रस्ते व्यवस्थित चालू झालेले. सगळ्या मुक्कामाच्या जागा निश्चित केलेल्या... म्हणजे अगदी आखीव रेखीव प्लॅन केलेला. क्षुल्लक(? ) अडचणी वगळता तो अगदी व्य्वस्थित पारही पडला होता. पण सगळं धोपट मार्गाने घडलं तर ती ‘भटकंती अनलिमिटेड’ कसली! जगावेगळं काहीतरी रानटी करायची खाज रक्तातच असल्याने जेव्हा सुट्ट्या जमून आल्या तेव्हा आम्ही धोपटमार्ग स्वीकारणार नव्हतोच. अशाच एका चर्चेतून ऐन हिवाळ्यात लडाखची ट्रिप करण्याची आयडियाची कल्पना आमच्या सुपीक डोक्यात उगवली. आता एखाद्याच्या डोक्यातून विचित्र कल्पना उगवली तर बाकीच्यांनी त्याला रोखावं ना! पण नाही, मित्रच असले हालकट भेटलेत की उगवलेल्या कल्पनेला पाणी घालायला सुरुवात केली. मी, ध्रुव, परिक्षित, तेजस चार टाळकी जमली, लडाखमधल्या गोम्पांचे महोत्सव कधी असतात त्याच्या तारखा काढल्या गेल्या. आमचा लडाखमधला brother from another mother तेन्झिंगला कसाबसा कॉंटॅक्ट करुन फक्त लेहमधल्या राहण्याची सोय बघायला सांगितली. खरं तर त्याच्या घरीच (फ्री) मुक्काम करण्याची त्याची इच्छा होती, पण घराचे चालू असलेले बांधकाम आणि त्याच्या कुटुंबाची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही वेगळी सोय बघायला सांगितली. अर्थातच ऑफ सीझन असल्याने कुठल्याही होमस्टेसाठी ते additional incomeच होते. म्हणून तेही अगदीच स्वस्तात मिळाले. अंदाजे ९००-१००० रुपये चौघांना मिळून. दोन खोल्या. हिवाळ्यात लडाखला कुणीच जात नसल्याने विमानाची तिकीटेही ‘स्कीम’मध्ये मारली. आणि सुरु झाला आमचा प्रवास.
मुंबईहून दिल्ली, दिल्ली विमानतळावर १६ अंशात फुकाचं पैसे उधळून सकाळी केलेलं खाणं, टकामका पाहत आय व्हिटॅमिन घेणं वगैरे नेहमीचे सोपस्कार झाल्यानंतर आमचं गो-इंडिगो लेहच्या दिशेनं झेपावलं तेव्हा दिल्ली अजूनही दाट धुक्याच्या रजईतून बाहेर पडली नव्हती. तिला तसेच पहाटेच्या साखरझोपेत सोडून विमानाने उत्तर दिशा पकडली आणि उगवत्या सूर्याच्या झळाळीत न्हालेल्या गढवाल-कुमाऊच्या हिरव्या प्रदेशातून पुढे अतिउत्तरेच्या पांढर्या शुभ्र हिमालयाच्या दिशेनं होणारं ट्रान्झिशन देखणं दिसत होते. अगदी त्या उंचीवरुनही मोरेय प्लेन्स आणि त्यातून जाणारा गोठलेला मनाली-लेह हायवे ओळखता आला. एखादं दूरवरचं हिमशिखर ओळखता येतंय का ही कसतर करत असताना, जसजसं लडाखमध्ये प्रवेश केला तसतसा खालचा हिरवा प्रदेश नाहीसा होऊन वॉलनट ब्राऊनीवर पांढर्या आयसिंग शुगरचं डेकोरेशन दिसू लागलं. हे दृश्य याआधी कधीच पाहिलं नव्हतं. आणि विमानाच्या दोन्ही बाजूंच्या खिडक्यांतून आम्ही आजूबाजूच्या प्रवाशांची पर्वा न करता आम्ही उड्या मारुन मारुन ते डोळ्यांत साठवत होतो. "crew, prepare for landing" हे पायलटचे शब्द हवाईसुंदरीआधी मीच ऐकले आणि कॅमेरा सरसावून बसलो तर ती बया आलीच "कुर्सी की पेटी बांध ले" करत. टचडाऊन झाल्यावर "लेह के कुशोक बकुला रिंपोचे हवाईअड्डेपर आप का स्वागत है। बाहर का तापमान शून्य से नीचे छ: डिग्री है!" हे सांगितल्यावर आम्ही उतरायला तयार झालो. परिक्षित प्रथमच आला असल्याने साहजिकच त्याला जास्त उत्सुकता होती. दरवाजाजवळचेच सीट्स असल्याने सगळ्यात पुढे हौसेने तो उभा राहिला. दरवाजा उघडल्यासरशी लेहच्या हवेनं असा काही हिसका दाखवला की त्या बोचर्या थंडीचा झटका सहन न होऊन चिंगाट मागे आला. एखादं जॅकेट सोबत ठेवून बाकी सगळे थंडीचं संरक्षण चेक-इन केलं असल्याने मांडीपासून पायांची खाली लाकडं झालीच होती. बॅगेज मिळेपर्यंत दुसरा काहीही पर्याय नव्हता. बाहेर आल्यावर तेन्झिनला कडकडून मिठी मारल्यावर त्याने पुढचे आठ-दहा दिवस आमच्या सोबत असलेली गाडी दाखवली. फक्त डिझेल भरुन वापरायला मिळणार होती. अर्थात तेन्झिन आमची सोबत करणार होताच.
होमस्टेवर पोचून आराम करणे एवढाच आजचा अजेंडा होता. फारतर आसपास फिरणे जेणेकरुन अतिउंचावरच्या विरळ हवेचा त्रास होऊ नये. आमच्या फोटोगिरीमुळे आम्ही तेन्झिनलाही त्याचं वेड लावण्यात यशस्वी झालो आहे. म्हणूनच त्याने एक लेन्स आणायला सांगितली होती ती त्याच्या हवाली केली. आम्हांला चार वाजता पिकअप करायला येतो या बोलीवर गेस्टहाऊसवर सोडून तो परत गेला. आम्ही आता थंड वातावरणाला सरावत होतो. दोन खोल्या दिल्या होत्या पण त्या एवढ्या मोठ्या होत्या की आम्ही चौघांनी एकाच खोलीत राहण्याचे ठरवले. मालकाने उदार मनाने खोलीत गॅसवर चालणारा हीटर आणून दिला. त्याच्या काही सूचना, लडाखी ड्राय टॉयलेट कसं वापरायचं याचं प्रशिक्षण (थेअरी, प्रॅक्टिकल नव्हे) वगैरे झाल्यावर सामान लावून आम्ही पुढचे बेत आखण्यात मग्न झालो. हळूहळू वातावरणाला सरावत होतो. प्रथमच लडाखी टॉयलेट वापरण्याची माझी वेळ होती. आत गेल्या गेल्या खिडकीच्या नसलेल्या झडपेतून असा काही हवेचा झोत आला की सगळं विसरुन परत यावं लागलं ते पुन्हा पूर्ण मनाची तयारी करुन धाडस करुनच जाता आलं. चार वाजता तेन्झिनभाऊ आला आणि आम्ही लेह मार्केटमध्ये आलो. मागच्या फेरीला पाहिलेलं लेह आज किती वेगळं भासत होतं. चांगस्पाचा मोठमोठ्या शिळांमधून खळाळता ओढा आता पूर्णपणे गोठला होता. गोव्यातल्या बागा-कलंगुट बीचचे मार्केट वाटावे असे चांगस्पा बाजार निर्जन झाला होता. सुंदर शांतता तिथे वास करत होती. कचर्याचे ढीग नाहीसे झाले होते. एक निर्मळता वातावरणात भरुन राहिली होती. लेह मार्केटमध्ये शंभर एक दुकानांपैकी मोजकी चार-दहा दुकानं उघडी होती. गरमागरम चणेवाला भट्टी लावून ऊब देणारं खाद्य पुरवत होता. खूप ऐकून असलेलं नेहा स्वीट्सच्या लहानशा ऊबदार लाकडी रेस्टॉरंटमध्ये घुसलो तेव्हा तिथल्या समोशाच्या दरवळाने सगळं विसरुन जायला झालं. दोन दोन समोसे, कॉफी रिचवून आम्ही शांती स्तूप बघायला बाहेर पडलो. सारथी अर्थातच तेन्झिनच होता. शांती स्तूपाहून स्टोक कांगरीची पर्वतरांग, लेह शहर आणि मावळलेल्या सूर्याचे मागे विसरलेले रंग असा सुंदर नजारा दिसतो. त्यात कमालीच्या गारठ्याने त्याला एक प्रकारची स्थितप्रज्ञता लाभली होती. हीच हिमालयाची भव्यता आणि स्थितप्रज्ञता! अंधार पडला तसे आम्ही गेस्ट हाऊसवर परतलो आणि जेवण करुन दिवसाचा आढाव घेत हीटर सुरु करुन ऊबदार पांघरुणांत झोपी गेलो.
दुसरा दिवसही तसा आरामाचाच होता. विशेष असा काही प्लॅन नव्हता. लेहजवळची चेमरी गोम्पा पाहून घेतली. तिथून परतताना थिकसे गोम्पा आणि तिचा सुप्रसिद्ध दोनमजली मैत्रेय बुद्धाचा पुतळा पाहिला. हा पुतळा एवढा सुंदर आहे की त्याने मला मागच्या ट्रिपने भुरळ घातली होती आणि त्याच भारावलेपणातून मी माझ्या मुलीचं नाव ठेवलं होतं. त्यानंतर सुप्रसिद्ध आणि भव्य अशी हेमिस गोम्पा पाहिली. ही लडाख परिसरातली सगळ्यात मोठी गोम्पा आहे. प्रशस्त आवार, देखणी भित्तिचित्रे, भव्य पडदे, लाकडी बांधकाम यांमधून तिची भव्यता प्रतीत होत होती. शेकडो भिक्खू तिथं शिक्षण घेतात. प्रत्येक गोम्पाचं एक वैशिष्ट्य आहे की तिच्या अंतरालात फिरताना एक अगम्य मनःशांतीचा अनुभव येतो. एकूणच गोम्पांचे अंतरंग, त्याच्या मातीच्या भिंती आणि रंगशैली, विविध भित्तिचित्रे, पिवळे लाल पडदे, आसपास वावरणारे बौद्ध भिक्खू आणि छायाप्रकाशाचा खेळ ही फोटोग्राफरसाठी पर्वणीच असते.
दिवसभराचे हे अनुभव गाठीला बांधून आम्ही पुन्हा नेहा स्वीट्सच्या दारात उभे ठाकलो. एकंदर आजचा दिवस आरामातच गेला. तीन गोम्पा, लेह मार्केटमध्ये फेरफटका आणि रात्री जेवण करुन दिवसभराच्या फोटोंचा आढावा यात दिवस संपला. उद्याचा दिवस महत्त्वाचा होता. किंबहुना उद्याच्या दिवसासाठीच ही लडाख ट्रिप या ऐन बर्फाळ हिवाळ्यात आखली होती.
स्टोक-कांगरीच्या पायथ्याशी आज बरीच लगबग दिसत होती. गाड्या भरभरुन लोक त्या दिशेने निघाले होते. प्रसिद्ध स्टोक फेस्टिवलचा दिवस होता तो. आम्ही खास या महोत्सवांचे दिवस साधूनच ही ट्रिप गुंफली होती. लेहहून निघून लेह एअरपोर्टच्या ATCच्या शेजारुन स्टोक गावाकडे रस्ता जातो. एखाद्या लहान खोलीएवढे आणि जमिनीवर बांधलेले ATC पाहून नवल वाटले. स्टोक गोंपाच्या पायथ्याला जरा लवकरच पोचल्याने गाडी लावायला जागा शोधायला विशेष सायास पडले नाहीत. लगीनघाईसारखी लगबग सर्वत्र उठली होती. अनेक सामान्य नागरिक गाड्यांमधून, पायी येऊन स्टोकला थडकत होते. गोम्पाला एक नवी झळाळी चढली होती. सगळ्या भिंती नुकत्यात पांढर्या आणि तांबड्या रंगाने चमकवल्या होत्या. गोम्पाच्या मुख्य प्रेक्षागारातून (गॅलरी) तलम रेशमी रंगीबेरंगी पडदे खाली सोडले होते. विशिष्ट प्रकारचे ध्वज उभारले होते. गोम्पाच्या अंगणात मध्यभागी एक मुख्य ध्वज दिमाखात फडकत होता. स्वयंपाकघरात आल्यागेल्या सर्वांसाठी मोफत चहा, पिण्यास गरम पाणी, थुकपा (एक लडाखी वन मील डिश) रांधणे सुरु होते. मोठमोठाल्या पातेल्यांमध्ये आचारी त्यांचे झारे ढवळत होते. परदेशी पर्यटकांचीही संख्या विशेष जाणवण्याइतपत होती. आणि सर्व पाहुण्यांकरिता बसायला आवाराच्या बाजूने बसण्यासाठी खुर्च्यांची सोय केली होती. विशेष म्हणजे आपल्याकडे होतं तसं त्या खुर्च्या स्थानिक टारगट पोरांनी व्यापल्या नव्हत्या. आम्हांला तिथं बसण्याचा भिक्खूंनी आग्रह केल्याने आम्ही फोटोसाठी चांगल्या सोयीच्या जागा पाहून स्थानापन्न झालो. तेन्झिनने आम्हांला काही उपयुक्त सूचना केल्या. स्थानिक चॅनेलचे, डीडी काश्मीरचे कॅमेरेही आले होते.
हळूहळू उत्सवाला सुरुवात झाली, मुख्य लामांचे आगमन झाले, विशिष्ट पूजा झाल्या. वाद्यांचे गजर झाले. विविध प्रकारची नृत्ये, नाटिका एक धीरगंभीर लयीत, खेळकर वातावरणात सगळे चालू होते. माझ्या मनात मात्र त्या वाद्यांच्या तरंगासोबत वेगळे विचार उमटत होते. आजवर लडाख आणि परिसरात दोन वेळा आलो पण अशी मनःशांती कधी लाभली नव्हती. पांढर्याशुभ्र बर्फाच्छादित पर्वतराजींच्या कॅनव्हासवर लडाखी जीवनशैलीचे विविध रंग आणि छटा ठळकपणे उमटत होते. त्यात ऐन पर्यटनाच्या मोसमातला कोलाहल अजिबातच नव्हता. त्यात वाद्यांचा ताल आणि सुशीरवाद्यांचा नाद मनात खोलवर पोचून एक आगळी शांतता लाभत होती. हिमालयात असलेला मूळ तिबेटचा बुद्धिझम आणि आपल्याकडे आढळणारा बुद्धिझम यांतला फरक प्रकर्षाने जाणवत होता. विविध मुखवटे, रंगीत झिलईचे वेश, हत्यारे, वाद्ये यांच्या सहाय्याने चांगल्याचा वाईटावर, सत्याचा असत्यावर विजय सार्थपणे सादर होत होता.
हे सर्व नृत्य आणि संगीत चालू असतानाच अचानक काही स्वयंसेवक येऊन आम्हांला कॅमेरे बंद करण्यास सांगून गेले. काही मार्ग मोकळे करुन गेले. तशी तेन्झिनने कल्पना दिलीच होती. आता "ओरॅकल" नावाचा प्रकार अवतरणार होता. म्हणजे आपल्याकडं अंगात येणं जसं असतं तसं काहीसं. तीन लोक अंगात आल्यासारखे करुन सगळ्या गोम्पात धुमाकूळ घालत पळतात, छतांवरुन उड्या मारतात, उअंचावरील अगदी अरुंद कठड्यांवरुन लीलया धावतात, चाकू-तलवारींने जिव्हा कापतात. काही अमानवी दैवी शक्ती असते अशी स्थानिकांची भावना असते. ते पुढील वर्षभराचं भविष्य, पंचांगासारखं सणवार वगैरे सांगतात अशी तेन्झिनने आम्हांला माहिती पुरवली. त्यांचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. आणि ती एवढी काटेकोरपणे पाळली जाते की स्थानिक चॅनेलवाल्यांनीही त्यांचे कॅमेरे बंद केले होते. पुढे बोलता बोलता मागल्या वर्षी काही कॅमेर फोडल्याची माहिती तेन्झिंगने दिल्याने आम्ही गुपचूप पॅकअपच करुन घेतले. गोम्पाच्या बाहेर पडलो आणि थोडंफार खाऊन लेहच्या दिशेने निघणार होतो. पण तेन्झिन आम्हांला दुसर्याच एका रस्त्याने घेऊन जाणार होता. सिंधू नदीच्या बाजूने आम्ही एक वेगळा रस्ता निवडून फोटो काढत काढत लेहला रात्री पोचणार होतो...

Superb detailing. A very unique experience of visit ung leh in singer is simply out of box.
ReplyDeleteAnd photos :- stupendafabulous