“तो आला”
ऊन चढलेलं. पाखरं कधीच दिसेनाशी
झालेली. उन्हाच्या झळांमधून हलणार्या माळावरल्या बाभळी फक्त मुळांना
जमिनीने कैद केलंय म्हणून स्थितप्रज्ञ वाटणार्या. एरवी त्यांनीही कुठं तरी
सावलीला धाव घेतली असती. गावाबाहेरला उसासे टाकणारा पाझर तलावही
तळाशी आपल्याच हृदयाशी आपल्या भेगांवर शिल्लक चिखलाचा मलम लावत बसलेला.
चरायला गेलेली जनावरंही वडाच्या सावलीला रवंथ करत बसलेली. बाप्यांनी
सकाळपासून नांगर-औत हाकून दमल्या बैलांना सोडून वैरण-पाणी करुन आपले जेवण
उरकलेलं. पाण्याचा तांब्या उशाशी घेऊन त्याने पाठ टेकली. नुकताच भाकर तुकडा
खाऊन ती अंधारल्या माजघराच्या दरवाजाशी वार्याच्या झुळुकेच्या आशेने
कलंडलेली. आता कधीही टॅंकर येऊन तिला उठावे लागेल. जरा पागोट्यावाले
म्हातारेकोतारे पारावर गप्पा छाटीत अर्धवट गुंगलेले. आरडाओरडा करत
खेळणार्या पोरांचाही गलका त्यांच्या आयांनी शेजारी दाबून दडपून झोपवलेला.
त्यांच्या चड्डीच्या खिशातला रुपया तिथूनच डोळे बारीक करुन बाहेर उन्हात
टुकूर-टुकूर बघत “गारीगार्रेय…”ची वाट पाहत बसलेला. एखाद दुसरा चुकार
‘तीर्थ’रुप छटाक पावशेर टाकून चावडीला आडवा पडलेला. अशीच धुळाटीत रेषा
उमटवीत एखादी मोटारसायकल येऊन निघून जाते. मागोमाग एक टमटम डुग.. डुग..
डुग… करत येऊन बाराच्या यष्टीला चुकलेले दोनचार वाटसरु पाटीवर सोडून
पुढल्या गावाला दूरवर डांबरीवर आवाज क्षीण करत निघून गेलेली. उतरलेला माणूस
उपरणे डोईवर पांघरुन मळ्याची वाट तुडवायला निघून गेलेला. दुसरी एक
म्हातारी शहरातून आठ-पंधरा दिवसांच्या सुट्टीला आलेल्या “शेरातल्या”
नातवाला काखोटीला मारुन डोक्यावरचा पदर सावरीत वाटेनं चाललेली. एक प्रकारे
सगळे वातावरण काहीतरी उबट घट्ट झालेले, लदलदून गेलेले. लवकर पाऊस आला तर बरं होईल, यंदा तरी पेरण्या वेळेत होतील, टॅंकरची कटकट मिटेल असे विचारांचे जडशीळ काहूर सगळ्यांच्याच मनात माजलेले.
त्या नातवाचा बाप तिकडे असतो. शहरात. शहरातही
दुपारचे जेवण करुन दुकानं शांत झालेली. त्यांची फळकुटं अर्धवट मिटलेली.
ढेरपोट्या मालक गल्ल्यावरच डुलक्या हाणतोय. कामगार किरकिर वाजणारा पंखा
लावून हळू आवाजात गप्पा छाटीत बसलेत. बाहेर रस्त्यावर वाहतूकही थंडावलेली.
एखादीच बस गरम उसासे टाकत दुपारच्या वेळी असह्य आवाज करत रस्त्याने निघून
जाते. आसपासच्या फळांच्या गाड्या कपड्याने झाकून सावलीला लोटलेल्या.
हातगाडीवाला त्याच्याच हातगाडीखाली गरमजाळ सावलीला लवंडलेला. नीरेच्या
टपरीवर मधुर चवदार नीरा चाखत एक जोडपं सावलीला विसावलेलं. रसवंतीच्या
घुंगराच्या आवाजातच आजूबाजूचा घामानं भिजट गोंगाट मिसळलेला. एखाद्या
झाडाच्या खाली त्याचीच पाने स्वतःभोवती गिरक्या घेत येऊन गरम सडकेवर
पडलेली. वरुन गाड्या जाऊन वितळलेल्या डांबराला चिकटलेली. कचेर्यांमध्ये
दुपारचे कामही फॅनच्या घरघरीखाली अगदी सोपस्कार म्हणून चाललेले. एसी
ऑफिसेसमध्ये गारव्याला बसूनही काळ्या काचांपलीकडच्या कडक उन्हाळ्याच्या
रंगलेल्या गप्पा. पोरांना दमदाटीनं घरात बसवलेलं. ते आपले बाहेर जायला मिळत
नाही म्हणून टीव्ही आणि गेमला चिकटलेले. शेजारी रिकामे सरबाताचे काचेचे
चिकट झालेले ग्लास, आईस्क्रीमचे कप. बाबा घरी जायला कधी एकदाचे पाच कधी
वाजताहेत याची वाट पाहत ऑफिसात बसलेले. एकंदर वातावरणात साचलेपणा. तो विचार
करतो येत्या रविवारी कुठं पोरांना वॉटरपार्कला घेऊन जावं की महाबळेश्वरलाच
दोन दिवस जाऊन रहावं याचा विचार. नुकताच पगार झालाय, पहिलाच आठवडा आहे तर
चला जाऊ दोन दिवस मजा करु. पण दोन दिवसांनंतर काय? खरंच लवकर पाऊस आला तर
बरं होईल.
हळूच एखादी थंडगार वार्याची झुळूक येते.
महाबळेश्वरच्या कल्पनेनंच गार वाटायला लागलं काय? म्हणून हा इकडे तिकडे
पाहतो तर बाहेरच जरासा वारा सुटलेला. गच्च वातावरणातही जरासा कोमट तरीही
सुखद वाटणारा वारा. आता या दुपारी या वार्याला काय झालंय म्हणून हा पहायला
गेला तर समोर हळूवार वाहणारा वारा जाऊन समोर लहानशी वावटळ. लहानशा
वावटळीतून मोठी वावटळ. त्यात मघाशी गिरकी घेत खाली आलेली पानं पुन्हा वर
उधळून आभाळाकडे जणू दोन्ही हाताने काही मागत होती. मुजोर वार्याने
रस्त्यावरची धूळ आसमंतात उधळून सगळी हवाच गढूळ करुन टाकलेली. उगाचच
रस्त्यावर गोंधळ माजवलेला. डोळ्यांत धूळ, घरात धूळ, दुकानांच्या तावदानांवर
धूळ. गावातही धूळ.
गावातही धूळ. पारावरली मंडळी उठून कपडे
झटकत बिगीबिगी घरी पळाली. वार्याने बैलाच्या गळ्यातल्या घंटा किणकिणल्या.
झोपलेले बाप्ये दचकून जागे झाले. बाया उंबर्यावर टेकवलेलं डोकं उचलीत
विचार करत होत्या, आजही टॅंकर नाही आला का? झोपी गेलेलं पोरगं उचलून
आतमध्ये खाटेवर नेऊन टाकलं. एव्हाना अंगणात पाचोळा जमा झाला होता. वाळायला
टाकलेले कपडे इकडे तिकडे उडाले होते. तोंडावरुन पदर घेऊन धुळीपासून बचाव
करत तिने कपडे गोळा केले. आभाळ धुळीनं काळवंडलं होतं. चुकार पाचोळा अजूनही
जमिनीवर विसावला नव्हता. शिवाराकडं त्याने एक नजर टाकली. क्षितिजावर एक
काळी रेघ दिसू लागली. जवळ येताना. तो म्हणाला “तो आला”, ती म्हणाली “तो
आला”, म्हातारे-कोतारे म्हणाले “तो आला”, झोपेतली पोरं म्हणाली “तो आला”,
शहरातला तो म्हणाला “तो आला”, घरात टीव्ही-गेमसमोरली मुलं म्हणाली “तो
आला”. आकाश काळे झाले होते. मेघ भरुन आले होते. ढगांनी दाटी केली होती. आता
वावटळ जाऊन सोसाट्याचा वारा सुटला. पालापाचोळा जरा जास्तच उडायला लागला.
वार्यासरशी कुठूनसा मातीचा गंध आला. अहाहा… कुठलीच उपमा नाही त्याला. जगात
असला सुगंध कुठेच मिळणार नाही. सर्वांग शहारले. मोहरले. थोडे ओझरती गडगड
ऐकू येत हो्ती. अचानकशी “कडाड…काड”करुन वीज कडाडली. ती दचकली आणि सावरलीही.
आता पोरांच्या झोपा पार उडाल्या होत्या. तिने त्याच्याकडे पाहिले. दोघेही
मनातल्या मनात काहीतरी आठवून एकदम हसले. बाहेर आवराआवर करताना हळूच हातावर
एक थेंब पडल्याची जाणीव झाली. तो अलगद गालावर पुसला गेला. पहिला पाऊस आणि
पहिला थेंब गालानेही अनुभवला. मोठ्ठा श्वास भरुन तिने वर पाहिले.
टप.टप..टप…टपटपटप… आता एकामागोमाग एक थेंब गालांवर कोसळू लागले. वेड्यागत
पोरं पावसात नाचू लागली होती. फक्त पोरंच कसली तीही वेड्यागत झाली होती, पण
मनातून. चांगलीच सर आली. पन्हळीची धार चालू झाली होती. वडाखालची जनावरं
उभी राहिली. वेड्या बाभळी सारा भार सोसून डोलू लागल्या.
ती विचार करत होती, आज जनावरं लवकर बांधू.
गरमागरम आमटीभात आन भाजके सांडगे-पापड पोरं आवडीनं खातील. ह्यांना आवडतो
म्हणून एखादा बटाटे चुलीत भाजून काढू. पाऊस उघडल्यावर लवकर जेवून गार झालेल्या अंगणातच गोधडी टाकून
कंदीलाच्या उजेडात पोरांना गोष्ट सांगीन. पोरं पेंगल्यावर ढगाळ आभाळाखाली
झिरपलेल्या चांदण्यात सुंदर अंगाई म्हणीन. पोरांच्या शेजारी बसून हे पण
डोळ्यांनी कौतुक करतील. पेरणीला बियाणं काढून ठेवावं लागेल. एकदा चांगला
वाफसा मिळाला की पाबर धरायला ह्यांना मदत करावी लागेल. या वेळी काळी आई
नाराज करणार नाही. भरभरुन देईल. एखाद-दोन मणी गाठता येतील गळ्यात,
ह्यांनाही गळ्यात एखादं सोन्याचं पान करण्याएवढे पैसे शिल्लक पडतील.
चैतीच्या यात्रेला नवस फेडू. एक ना अनेक विचारांचा रंगीत कशिदा तिच्या
मनानं विणला.
इकडे ‘शहरातला तो’ काळसर काचेवर पडणारे आणि ओघळणारे थेंब पाहत होता. श्वासाला लय लागली होती. कार्ड स्वाइप करुन बंद दार उघडून बाहेर आला. त्यानेही खोलवर श्वास घेतला. मातीच्या सुवासाने तोही मोहरला. शहारला. पाऊस गालांवर झेलला. मग त्यात थोडासा भिजला. रस्त्यावरुन पाणी वाहू लागले होते. शहरातलीही पोरं पाण्यात थयथयू लागली होती. गाड्या फुर्रर्र…कन पाणी उडवत चाललेल्या. चांगला तासभर पाऊस लागून राहिला. धरणी मनसोक्त पाणी प्यायली, निवली. सगळ्यांची मनं चिंब झाली.
पाऊस मस्त रेंगाळला होता. दरवर्षी होणारं
पाऊस पानोपानी, गंध रानोरानी, आसमंत कुंद, मनं धुंद असंच काहीतरी झालं
होतं. रानांतून ओढे चळकले, डोंगराच्या माथ्यावर गडद ढग दिसू लागले.
संध्याकाळ होत आलेली. ती ऑफिसातून निघाली असेल का? जाता जाता तिला पिक
करुया का? जातानाच मस्त मधोमध गुलाबाचं फूल माळलेला गजरा घ्यावा, तिला घेऊन रिमझिम पावसात जरा
दूरच्या रस्त्याने घरी जावं. गरमागरम भजीच्या पार्सलनं मुलं पण खुश होतील
आणि संध्याकाळचा स्वयंपाकही खिचडीवर भागेल. मग पाऊस उघडला तर मस्त टेरेसवर
चटई टाकून पोरांना घेऊन गप्पा माराव्यात. असलाच पाऊस तर खिडकीतूनच चमचमता
धुतला भवताल डोळ्यांत साठवावा. बेडरुमची खिडकी आज उघडी ठेवून छान मंद गार
वारा आत येईल. सगळे प्लॅन ठरले. महाबळेश्वर कॅन्सल. आता जायचे तर एकदम
कोकणातच, पावसाला मिठी मारायलाच, कित्येक दिवसांनी भेटलाय.
आता पुढले चार महिने हेच. आता टॅंकर नकोच.
एकदा वाफसा मिळाला की पेरुन घ्यायचे, मग मशागत करायची, काळ्या आईची कुस
उजवायची. शिवाय काडकाड विजा ऐकायच्या, धडामधड ढग फोडायचे, पावसात भिजायचे,
सुट्टीच्या दिवशी भटकायचे. पन्हाळीचे पाणी हातात झेलायचे, पानांवरची टपकती
टिपं न्याहाळायची, अळूवर ओघळणारे मोती निरखायचे, कागदांच्या होड्या
सोडायच्या, पाणी साठलेल्या मैदानावर फुटबॉल खेळायचे. जाता येता ढगांचे
नगारे आणि विजांचे ताशे ऐकायचे, त्यानंतर टपोर थेंबांचा लेझीमताल ऐकायचा…
खिडकीत बसून मुकेश-रफी ऐकायचे, कॉफी हातात घेऊन एखादे पुस्तक चाळायचे,
कंटाळा आला की ऑफिसला खुशाल दांडी मारुन दडपून झोपायचे,
चहा-भजी-झोप-पाऊस-भिजणं-चहा-भजी-रिपीट! सरसरुन भिजायचे, मन चिंब करायचे,
धरतीची हिरवी गाणी ऐकायची, रात्री पडलेली भिजट रातराणीची फुलं सकाळी ओंजळीत
आणून सुवास घेता घेता पावसाचे थेंब रोज नाकाला ओले करतील. तीच ओंजळ तिच्या
हातात उपडी करायची, मग ती हळूच लाजेल. मन वेड्यागत करायचं, बेभान व्हायचं,
सगळा पाऊस जगायचा… त्यासाठीच तर ”तो आला”. आपण सगळेच त्याला म्हणायचं रहा आता आल्यासरशी…!!!
काही ऐकण्यासाठी पाऊसगाणी:
- घन ओथंबून येती
- सरीवर सर
- नभ उतरु आलं
- गार वारा हा भरारा, नभ टिपूस टिपूस
- ऋतु हिरवा, ऋतु बरवा
- घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा
- ये रे घना ये रे घना न्हाउ घाल माझ्या मना
- चिंब भिजलेले रुप सजलेले
- श्रावणात घननिळा बरसला
- अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटूनी आभाळ आले मेघ बरसु लागले
- रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन..
- भीगी भीगी रातों में, मीठी मीठी बातों में
- लगी आज सावन की फिर वो झडी है
तुमच्या लिखाणात खरंच प्रचंड ताकत आहे हो. हिवाळ्यात सुद्धा पावसात भिजलो. मस्त. शेयर केल्याबद्दल धन्यवाद.
ReplyDelete