रहा आता आल्यासरशी...
मागल्या आठवड्यात दोन दिवस येऊन ओझरतं दर्शन देऊन गेलास. त्याने काही
समाधान झालंच नाही. थोडेसे केस, डोके भिजले, भजी खावीशी वाटली, पण मनाचं
काय? ते तर कोरडंच राहिलं ना. तू कसा पाहिजेस? येताना ढगांचे नगारे आणि
विजांचे ताशे यांनी हलकल्लोळ करावा, त्यानंतर टपोर थेंबांनी असा काही
लेझीमताल धरावा की बास… सरसरुन भिजवणारा, मन
चिंब करणारा, धरतीची गात्रं न गात्र उलहसित करणारा, आताच्या आता सगळं फेकून
भिजायला जावे असे वाटायला लावणारा… पण मागल्या आठवड्यात तसा काही तुझा रंग
दिसला नाही. उगाच आपल्या नावाला पन्हाळी पाणथळ झाल्या, रस्ते लाल पाण्याने
वाहू लागले, छ्त्र्या माळ्यावरुन खाली आल्या.. तिथपर्यंत सगळं ठीक, पण
त्याच पन्हाळ्यांना बदाबदा वाहून लावणारा, छत्र्यांना उडवून काड्या
मोडणारा, रस्त्यात गुढघाभर पाणी साठवणारा तू कुठे होतास?
असो, आज जरा मूड आलेला दिसतोय तुला. सकाळपासूनच आभाळ भरून आलेलं.
त्यातूनच तू तुझ्या मैफिलीची आश्वस्त वर्दी दिली होतीसच. आताशा रिमझिम सुरु
झालायेस. पण झड लागून राहणार असे वाटतंय. आता आलाच आहेस तर रहा आता चांगला
महिनाभर. अशी काही ताणून दे की आम्हांलाच कंटाळा यावा (तो येणार नाहीच खरं
तर). पत्र्यावर ताड-ताड वाज, अशी काही झाडं न झाडं हलवून दे खाली पानांचा
आणि फुलांचा सडा महिनाभर दिसत रहावा. सगळ्या गाड्यांन चिखलाने माखून टाक,
मागच्याच्या अंगावर चिखल उडाला तरी आपणही कुणाच्या तरी मागे असतोच,
त्यामुळे ती चिंता सोड. रस्ते तर कायमच जाम असतात, तू आल्याने त्यात काहीही
फरक पडणार नाही, फक्त त्याच्या बाजूला छत्र्यांची रंगीत फुलं उमललेली
दिसतील, लहान मुलं आईचं बोट सोडून ‘दाग अच्छे है’ सारखं उगाच पाण्याच्या
डबक्यातून खेळताना दिसतील, कुणाची तरी ‘ती’ पावसाने भिजून छत्रीत अधिकच जवळ
येईल, हळूच तिच्या केसांमधून सरकन ओघळलेले थेंबांचे मोती अलगद ‘त्याच्या’
डोळ्यांनी टिपले जातील. विजा लकाकत असताना घरी कुणीतरी काळजीने वाट पाहिल,
मग आम्ही एखादा आडोसा शोधून हळूच प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला मोबाईल
काढून पटकन घरी कळवून टाकू. पोचल्यावर प्रेमाने हाती दिलेला टॉवेल घेऊन केस
कोरडे करत असतानाच हातात वाफाळलेला चहाचा कप येऊन विसावलेला असेल.
रानावनांत तू पोचशील, धरणी तॄप्त करशील. बळीराजा सुखावेल. डोंगरखोरे
हिरवेकंच होऊन जाईल, दरी धुक्याने आणि ढगांनी भरुन जाईल. पठारांवर
बरसलेल्या जलधारा डोंगर आपल्यात सामावून घेतील, जास्त झालेल्या वैशाखात
तापलेल्या काळ्याकभिन्न कड्यांवरुन खाली दरीत धबाबतील, दुरुन पाहताना
धबधब्यांची चंदेरी जानवी घातलेले पाषाण युगपुरुष दोन्ही हातांनी आपल्याला
बोलावतील. अशातच भटकंतीचे बेत ठरतील. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून
सॅक भरल्या जातील, मिळेल ती गाडी घेऊन भटके सह्याद्रीच्या कुशीला
येऊन पोचतील, त्याच्या अंगाखांद्यावर बागडतील, कधी थोडीशी जोखीम पत्करुन
चढाई करतील, सह्याद्री युगपुरुषासारखा समाधानाने त्यांचे यश डोळे भरुन
पाहील. सहा जणांच्यात सात फूट कोरडी जागा मिळेल. त्यातच गरमागरम खिचडी
रटरटेल, बटाटा रश्शाचा वास घुमेल, तिथेच मुक्कामाची रात्र काढली जाईल.
कॅमेरे सरसावतील, मित्रांना दाखवले जातील. परत आल्यावर एका नविन अनुभवाने
समॄद्ध झालेली माणसं पुन्हा-पुन्हा असे भटकतील.
त्यासाठी मात्र तू… आलायेस तर रहा चांगला महिना-दोन महिने. कधी गर्जून
टाक सारे, कधी नुसताच बरस, कधी मुजोरपणे धोधो उधळ, कधी झड लावून टिच्चून
रहा… हे सगळं जीवनच तर तुझं आहे…!!!
सही ........ यापेक्षा दुसरा शब्द नाही ...
ReplyDeleteSharing on Facebook W/o Permission any way I know you wont mind it... मस्तच (नेहमी सारखं)
ReplyDelete