Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

लडाख ड्रीम्स-३ (लेह-खारदुंगला-नुब्रा-डिस्किट-हुंडर-आलची-लामायुरु)

By Pankaj - भटकंती Unlimited
/ in 2013 खारदुंगला नुब्रा लडाख लामायुरु
4 comments
लेहमध्ये पोचल्या पोचल्या आधी काय केले असेल तर पोटभर खाऊन घेतले. गेले दोन दिवस मिळेल ते, मिळेल तसे नूडल्स, मॅगी, पराठा यावरच चालले होते. लेहच्या बाजारपेठेत मध्ये अगदी व्यवस्थित सर्व प्रकारची हॉटेल्स आहेत. त्यामुळे आता एकदम थ्री-कोर्स मेनू जेवण मिळाले आणि नंतर संध्याकाळपर्यंत मस्त ताणून दिली. जाग आली तेव्हा पाच वाजले होते. लडाखमध्ये सुर्यास्त हा अगदी उशिरा होतो. साधारण साडेसातला वगैरे. आम्ही राहत असलेल्या चांग्स्पा या भागातही पर्यटकांची बरीचशी वर्दळ होती. शिवाय आसपास चांगली सगळ्या प्रकारचे मेनू देणारी हॉटेल्स आणि खरेदीसाठी दुकाने. गिर्यारोहणाचे साहित्य, ट्रेकिंग सॅक्स, जॅकेट्स, काश्मिरी शाली, वूलन कपडे असे सर्वकाही लेहमध्ये बाहेरच्या जगापेक्षा स्वस्तात मिळते. फ्रेश झाल्यावर पहिले काम केले ते तेन्झिनला भेटून एक दिवस वाया गेल्याने बिघडलेला ट्रिपचा प्लॅन पुनःश्च हरिओम करुन आखणे, आणि तेही एकही ठिकाण मिस न करता. शिवाय त्याने केलेली विविध ठिकाणच्या हॉटेल्सची बुकिंग्ज आणि तारखांचा हिशोबदेखील बोंबलला होता. पण आमच्या हावरट फोटोग्राफर मित्र-मैत्रिणींना एकही ठिकाण मिस करायचे नव्हते. तलाव, आर्किटेक्चर, गोम्पा, बौद्ध भिक्खूंचे पोर्ट्रेट्स, वाइल्डलाईफ, पक्षी, नाईट फोटोग्राफी, सुर्यास्त सगळंच हवं होतं. त्यामुळे मी आणि चैतन्यने अर्धातास तेन्झिनसमोर डोकेफोड करुन नवा सर्वसमावेशक असा प्लॅन मिळवला. आणि सगळं फायनल झाल्यावरच तेन्झिनसाठी खास पुण्याहून नेलेलं बाकरवडीचं पार्सल त्याच्या हवाली केलं. ते पाहून ऑफिसच्या बाहेरुन चालणार्‍या एका बयेनं "व्हेअर कॅन बाय धिस?" असं आत येऊन विचारलं. आम्ही "पुणे" असं उत्तर  दिल्यावर एवढंसं तोंड करुन निघून गेली बिचारी. तोवर आमची बाकी मंडळी आवरुन बाहेर आली होती. तेन्झिनच्या ओळखीने तिथल्या बाजापेठेत फिरुन बरीच मोठी शॉपिंग लिस्ट हातावेगळी केली. रात्री उशिरापर्यंत खिसे हलके आणि पिशव्या जड होत गेल्या.
दुसर्‍या दिवशी सकाळी आमचा नुब्रा व्हॅलीचा बेत होता. टॉम आणि त्याच्या सोबतची गाडी अजूनही दुरुस्त न झाल्याने तेन्झिनने नवी कोरी इनोवा (आमच्या भाषेत इनो- व्वा वा !) आमच्यासाठी बुक केली. नवीन ड्रायव्हरसह... आता या भिडूचं नाव होतं सेवांग दोरजी, आमच्यासाठी फक्त दोरजी.  नुब्राचा रस्ता होता रस्ता जगप्रसिद्ध अशा खारदुंग-ला म्हणजे वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल रोड अर्थात जगातील सर्वात उंचीचा रहदारीचा रस्ता. लेह शहराच्या बाहेर पडलो की लगेचच हा घाटरस्ता वर वर चढत जातो. पुढे साऊथ पुल्लू नावाचं लष्कराचं चेकपोस्ट आहे. अर्थातच तिथे आपले इनरलाईन परमिट दाखवणे आलेच. नुब्रा आणि श्योक खोर्‍यांना लेहशी जोडणारा हा संपूर्ण रस्ता जगातील सर्वोच्च युद्धभूमी सियाचीनकडे जाणारा असल्याने कायम कडेकोट बंदोबस्तात असतो. लष्कराचे अस्तित्त्व पावलोपावली जाणवते. तेवढीच मेहनत रस्ता कायम सुरू ठेवणासाठी घेतली जाते.



खरं तर खारदुंग-लाच्या उंचीवर, म्हणजे १८,३८० फुटांवर वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबू नये असा फलक लावला आहे. आमचाही प्लान तसाच होता. फक्त पाच मिनिटांत फोटो काढून निघायचे होते. पण नियतीला आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनलाही ते मंजूर नसावे. सर्वोच्च खिंडीच्या आधीच्या वळणावरच त्यांनी सुरुंग लावून खडक फोडणे सुरु केले होते. सगळी वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद करुन त्यासाठीचं ड्रिलिंग करणे,  सुरुंगाचे डायनामाईट त्यात भरणे अशी कामं चालू होती. सोबत एका गाडीत मुंबईचा मराठी ग्रुप होता. पण त्यांचा एवढा गोंधळ चालला होता की आम्हांलाच लाज वाटू लागली. संताप होत होता. गाडीत जाऊन मेकप काय करुन येतील, मग चित्रविचित्र हावभाव करुन फोटो काय काढतील, लष्कराच्या कामावरुन शेरे काय मारतील. त्यातल्याच एका श्रीमतींनी तिथे असलेल्या लष्करी इंजिनियरला टोमणा मारला "पाच मिनट रुकने से आप का क्या जाता? तो हम आगे निकल नही जाते?" पण इंजिनियरही बेरकी निघाला. त्याने मॅडमना वर सुनावले "देश की तरक्की में आप वो पाच मिनट भी नही दे सकते क्या?" मॅडमची बोलतीच बंद झाली. आम्ही मात्र त्याच्याशी गप्पा मारत, त्याच्या ट्रेनिंगची, मुलाबाळांची चौकशी करत संवाद साधत होतो. इंजिनियर ओ.पी. देवासी त्याचं नाव. पुण्याच्या सीएमईला ट्रेनिंग झाल्यानं तोही खुश होता. त्याच्याशी गप्पा मारता मारता आम्ही त्यांच्या दिनचर्येबद्दल जाणून घेतले. रोज पहाटे ड्युटीवर आलं की सगळ्या तीस किलोमीटर घाटाची पाहणी करायची. सगळीकडेच ठिसूळ खडक आहे, त्यात वितळणार्‍या बर्फाच्या पाण्याचे प्रवाह. जिथे दरड कोसळली असेल ती बाजूला करायची, रस्त्याच्या वरच्या अंगाशी जे धोकादायक खडक ते सुरुंग लावून फोडायचे, रस्ता क्लियर करुन घ्यायचा असं त्यांचं रोजचं काम. सकाळी ड्यूटीवर येण्याची वेळ ठरलेली, परत क्वार्टरमध्ये जाण्याची नाही. कडाक्याची थंडी आणि वरुन तापणारे ऊन अशा विषम परिस्थितीत बजावले जाणारे कर्तव्य. त्यामुळे रापलेले चेहरे. "छुट्टी से वापस आते है तो हम भी आपके जैसे गोरे चिट्टे होते है" या एकाच वाक्यात तिथल्या भीषण हवामानाची कल्पना येत होती. त्याही परि्स्थितीमध्ये आपल्याशी संवाद साधणारे, मदत करणारे, हवं नको ते पाहणारे जवान पाहून त्यांना मनोमन एक सॅल्युट ठोकला. अर्थात सगळी वाहतूक थांबवली गेल्याने अडकलेल्या प्रवाशांना काही त्रास तर होत नाही ना हे पाहत एक आर्मी मेडिकल कोअरचा डॉक्टर राऊंड मारुन गेला. अत्यवस्थ प्रवाशांसाठी सोबत ऑक्सिजन सिलिंडरही आणि मास्क होता. त्या वातावरणाचा अर्थात आम्हांलाही थोडा त्रास झालाच. त्यात नीट जेवण नाही. प्रत्येकाचं डोकं चढलं होतं. काहींना उलट्या वगैरे झाल्या. टॉयलेट्सची सोय नव्हती. स्त्रीवर्गाला अक्षरशः ओढण्या-स्कार्फ लावून आडोसा करावा लागला. पण सगळं मॅनेजेबल होतं.
काही वेळात एक इशार्‍याची मोठी शिट्टी वाजली. लाल झेंडे उंचावले गेले. तसे सगळे शांत झाले. पुढल्या शिट्टीनंतर कानठळ्या बसवणारा आवाज घुमला आणि समोरच्या राशीतून धुरळा उधळला. सूं सूं करत दगड आकाशात उधळले. एवढे की अगदी दीड किलोमीटरवर असलेल्या आमच्या गाड्यांवरही काही खडे पडले. नंतर तासाभराने जेसीबीच्या सहाय्याने सगळा रस्ता मोकळा करण्यात आला. जिथे आम्ही पंधरा मिनिटे थांबणार होतो तिथे तब्बल सहा तास आम्ही अडकून होतो. खारदुंगला टॉपला पोचलो तेव्हा अधिक वेळ न दवडता पटकन दोन फोटो काढून आम्ही पलीकडल्या बाजूस उतरायला सुरुवात केली.


अर्धा रस्ता उतरुन नॉर्थ पुल्लू इथे आलो तेव्हा डावीकडे नदीच्या विस्तीर्ण पात्रात रानटी याक चरत होते. त्यांचे काही फोटो काढले. अर्ध्या तासात आम्ही खारदोंग गावी उतरलो. तिथे काही लहानशी हॉटेलं आहेत. खाण्याची सोय होते. तिथे थोडंसं खाऊन गरम चहा पिऊन सगळ्यांनाच जरा बरं वाटलं. पुढला प्रवास त्यामानाने सुकर होता. वळणावळणाचे रस्ते असले तरी डांबरी सडक होती. डावीकडे उत्तुंग पर्वत आणि उजवीकडे अतिशय भयावह खोल, पाताळाचाही ठाव लागणार नाही अशा घळी... त्यांच्या मधून जाणारा अतिशय अरुंद रस्ता. आम्ही गाडीत जीव मुठीत धरुन बसलो होतो. पण दोरजीभाई एकदम अनुभवी. त्यांचा रोजचाच रस्ता. जसे आम्ही श्योकनदीच्या काठाकाठाने पुढे सरकत होतो तसा श्योक आणि नुब्रा खोर्‍यांचा अद्भुत सौंदर्याचा अजोड ठेवा आमच्यासमोर उलगडत होता. सुर्य पश्चिमेकडे झुकला होता आणि त्याची सोनेरी आभा आसपासच्या पर्वातांवर उमटली होती. जणू त्यांच्यावर सोने सांडले होते. पायथ्याशी रुप्याचं पाणी घेऊन वाहणारी श्योक नदी. नदीकाठावर चिमुकली गावं आणि काही ठिकाणी आर्मीची क्वार्टर्स. या खोर्‍यात उतरल्याबरोबर काहीतरी वेगळ्यात विश्वात आल्याचा बास होत होता. सगळाच सोन्याचा चमचमाट, नदीत रुप्याच लखलखाट. दूरवर धुंद झालेले पर्वत संध्याकाळ जवळ आल्याची नांदी.

आता मात्र आमची रेस अगेन्स्ट टाईम (वेळेशी शर्यत) लागली होती. आम्हांला सुर्यास्ताला डिस्कीट गोम्पा किंवा हुंडरच्या वाळवंटात पोचायचे होते. तसे दोरजीने गाडी रिकाम्या (आणि चांगल्या) रस्त्यांवरुन बुंगवली. डिस्कीट येथे नुब्रा आणि श्योक नद्यांचा संगम होतो. दोन वेगवेगळ्या खोर्‍यांतून आलेल्या नद्या आपापले अस्तित्व विसरुन एकमेकांत लीन होतात. डिस्कीट गोम्पाशी प्रकाशाची दिशा फोटोयोग्य नाही पाहून हुंडरकडे पळालो. हुंडरला पोचलो तेव्हा सुर्यास्त होतच होता. सोबतीला प्रत्येक फ्रेम परफेक्ट बनवण्यासाठी लागणारे दुहेरी वशिंडाचे (डबलहंप) उंट, हिमालयाची पर्वतरांग, नुब्राचा खळखळता प्रवाह, आकाशातला संधिप्रकाशाचा खेळ होताच. सौमित्र, देवेंद्र,स्वाती यांच्या कॅमेरांची क्लिकक्लिकाटाची एकच झुंबड उडाली. एक एक फ्रेम कैद होत होती आणि मनात आजचा प्रवास सार्थक झाल्याने समाधान चित्र आकार घेत होते. याचसाठी तर हा अट्टाहास केला होता.



रात्रीचं जेवण उरकून हॉटेलच्या बाल्कनीत बसलो तेव्हा वारा राग दरबारी आणि मालकंसचे सूर आळवीत होता. हिमालयाच्या पार्श्वभूमीवर निरभ्र आकाशात तार्‍यांची मांदियाळी जमली होती, सभोवार नक्षत्रांची रांगोळी घातली होती. ती भान हरपून अनुभवत असताना मध्यरात्र केव्हा उलटून गेली ते समजलेही नाही.



आज पुन्हा खारदुंगलामार्गे लेहला परतायचे होते. कालच्या अनुभवावरुन आणि नुब्रा व्हॅलीच्या हॉटेल मॅनेजरकडून असे समजले होते खारदुंगलाच्या रस्त्यावर लष्कराचे मजूर सकाळी दहा-साडेदहाला कामावर येतात. जर त्याच्या आधी ती पार करुन गेलो तर कालच्या सारखे अतिउंचीवर अडकून राहणार नाही. त्याच हिशोबाने एकदम सकाळी सकाळी उठून आवरुन साडेसहालाच हॉटेल सोडले. हॉटेल मॅनेजरने सोबत ब्रेकफास्ट पॅक करुन दिला होता.  परत येताना काल राहिलेला डिस्कीट गोम्पा आणि मैत्रेय बुद्धाचा विशाल पुतळा पाहिला. एका उंच डोंगरमाथ्याच्या सपाटीवर उभारलेला शंभर फुटांचा हा पुतळा पंचक्रोशीतील कुठल्याही ठिकाणाहून दिसतो. समोर हिमालयाच्या पर्वत उतारावर असलेली डिस्किट गोम्पा, सकाळी सुरु असलेली भिक्खूंची लगबग, पुतळ्याची भव्यता, त्याच्या डोळ्यांतले प्रेमळ शीतल भाव, त्याच्या मागून होणारा सुर्योदय आणि तो झळाळल्यावर मैत्रेय बुद्धाच्या डोक्याभोवती दिसलेली नैसर्गिक सप्तरंगी प्रभावळ.




आपोआप ध्यान लागले. भानावर आलो आणि  फोटो काढून परतीचा रस्ता धरला. पुन्हा एकदा खारदोंग गावात येऊन नाश्ता केला आणि खारदुंगलाच्या माथ्यावरला "वर्ल्ड्स हायेस्ट कॅफेटेरिया" अर्थात जगातली सर्वात उंचावरची चहाची टपरी इथे गरमागरम लेमन टी घेतला. परत येतानाही तेच. पुन्हा सुरुंग  लावून रस्ता क्लियर करण्याचे काम सुरु होते. वाहने थांबवून ठेवली होती. सोबतच्या एका गाडीत एक जोडपे आणि त्यांचा लहानगा एखाद-दीड वर्षाचा ध्रुव होता. डोकेदुखीमुळे असावे कदाचित खूप रडत होता. काहीही करुन ऐकेना. त्याचे हाल पाहून त्यामुळे बाईंच्या डोळ्यातल्या अश्रूंना खळ नव्हता. मग आमच्या लहान मुलं सांभाळण्यात एक्स्पर्ट असलेल्या स्वातीने अशी काही जादू केली की मिनिटभरातच खुदकन हसायला लागला. मंजिरी आणि स्वातीने मिळून अर्धा तासभर खेळवले. त्यात तो त्याचा त्रासही विसरुन गेला आणि आम्हीही आमचा. रस्ता मोकळा झाला तसा आम्ही पुन्हा साऊथ पुल्लूमार्गे लेहला पोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. कालपासून धड जेवण न मिळाल्याने एकदम "मल्टीक्विझिन ताव" मारला आणि तेन्झिनच्या ऑफिसपाशी हजर झालो.

संध्याकाळचे चार वाजले होते. आता पुढला टप्पा होता आलची-लामायुरु गोम्पाच्या भेटीचा. पूर्ण प्रवास लेह-श्रीनगर हायवेवरुन होणार असल्याने अजिबात टेन्शन नव्हते. जाताना मॅग्नेटिक हिल, सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम अशीही काही ठिकाणं होती. आजचा मुक्काम आलची इथे करुन उद्या सकाळी लामायुरुला जाण्याचा प्लान तेन्झिनने बनवला होता. तेन्झिनही तसा फोटोग्राफीतला जाणकार. त्यामुळे या लोकांना कसले फोटो कुठल्या वेळी मिळतील याची त्याला बरोबर माहिती होती. तसाच प्लान त्याने आखला होता. लेहच्या बाहेर पडतानाच वाळूच्या वादळाने आमचे हायवेवर स्वागत केले. कललेल्या सुर्याच्या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर ही वावटळही विलोभनीय दिसत होती. मॅग्नेटिक हिलच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाण्याचा अनुभव आम्ही घेतला. खरं तर हा एक भास आहे. पण पब्लिक म्हणतेय ना जादू आहे, तर आहे असं म्हणून आम्ही पुढे निघालो. सिंधू (इंग्रजी नाव: Indus/इंडस) नदी आपली या प्रवासात कायम सोबत करते. झंस्कार नदी तिला येऊन मिळते तिथे तिचे पात्र अतिशय विस्तीर्ण झाले आहे. दोन्ही नद्यांच्या पाण्याचा वेगळा रंगएकमेकांत मिसळताना स्पष्ट दिसतो. निम्मू, कोकसर अशी गावं मागे टाकून आलचीला पोचलो तेव्हा संध्याकाळ होत आली होती. आलची गोम्पा (धर्मशाळा) ही लडाखमधली सर्वात जुनी गोम्पा. दहाव्या शतकाच्या मध्यात बांधली गेलेली. डोंगर उतारांवरुन वळणावळणाचे रस्ते, अरुंद गल्ल्या आणि त्यातून वाट काढत गोम्पाकडे घेऊन जाणारा अरुंद रस्ता, त्याच्या दुतर्फा अनेकविध पारंपारिक वस्तू विकणारे विक्रेते, अतिशय सुंदर मंदिरं, अनेकविध नाना प्रकारचे स्तूप, प्राचीनकाळातील बांधकाम, कोरीव लाकडी महिरपी, सुंदर भित्तिचित्रे हे सगळे पाहताना भान हरपून जायला होते. किती फोटो काढावेत आणि काय काय पहावं अशी मनस्थिती. गोम्पा बंद होण्याच्या वेळी आम्ही बाहेर पडलो आणि जवळच बुक केलेल्या हॉटेलमध्ये डेरा टाकला. रात्रीच्या उशिरापर्यंत हॉटेलच्या छतावरुन मागे दिसणारी हिमालयाची रांग, आकाशगंगा, पलीकडे असलेले धरण याचे फोटो काढत, गप्पा मारत कित्येक तास कॉफीच्या घुटक्यांबरोबर घालवले त्याचा हिशोबच नाही. पण खात्यावर भन्नाट फोटोंची जमा नक्कीच झाली होती.

लामायुरु गोम्पाचे सकाळच्या लाईटमध्ये फोटो मिळण्यासाठीही आम्ही असेच भल्या पहाटे आलची सोडले. जाताना हिमालयाच्या कुशीतून, सिंधू नदीचे बोट धरुन जाणारा वळणावळणांचा लेह-श्रीनगर रस्ता आणि त्या आसपासच्या लडाखी पर्वतांचे असलेले विविध आकार यांवर नजर ठरत नव्हती. चंद्राची भूमीही अशीच सुंदर असावी म्हणूनच या जागेला लामायुरु चांद्रभूमी (लामायुरु मूनलॅण्ड) म्हणतात. अकराव्या शतकात बांधलेली लामायुरू गोम्पाही अशीच टेकडीवर वसलेली. निळ्या आकाशात ढगांची आज दाटी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर टेकडीच्या टोकावर गोम्पा उठून दिसत होती. सगळ्या गावभर प्रार्थना लिहिलेल्या पताका लावल्या होत्या. त्यांची वार्‍यावर होणारी फडफड त्या प्रार्थना सर्वदूर पोचवीत होती.





सकाळी लहान लहान भिक्खूंची चाललेली लगबग, त्यांची झाडाखालची शाळा, प्रार्थनागृह, लहान मुलांच्या खोड्या, जेष्ठ भिक्खूंचे पोर्ट्रेट्स, हातात प्रार्थनाचक्र (प्रेयरव्हील) घेऊन सगळ्या लामायुरुमध्ये फिरणार्‍या धर्मसेविका सगळे एकदम छान फोटो मिळाले. देवेंद्र आणि सौमित्रच्या चेहर्‍यावरतर इथे आल्याचे समाधान स्पष्ट सांगत होते की त्यांच्या कॅमेरांमध्ये काय काय बंदिस्त झाले होते. मन होत नसताना लामायुरुचा निरोप घेऊन आम्ही दुपारच्या सुमारास लेहकडे परतलो.
लेहमध्ये आल्यावर फ्रेश होऊन पुन्हा एक शॉपिंगचा राऊंड झाला. उद्या आम्ही लेह सोडले की पुन्हा आता लेहमध्ये परतणार नव्हतो. म्हणून लेहच्या डोक्यावर असलेला शांतीस्तूप पाहून आलो. तेन्झिनने आज आम्हांला शॉक द्यायचेच ठरवले होते. आमची हौस आणि आवड पाहून आजच्या डिनरचा बेत स्वतःच्या घरी ठेवला होता. एकदम पारंपारिक लडाखी जेवण. रात्री तिथे पोचलो तेव्हा सर्व दोरजी कुटुंबियांनी आमचे दरवाजात स्वागत केले आणि एका हॉलमध्ये गाद्यांच्या बैठकीवर आम्हांला बसवले. थोड्या वेळाने तेन्झिनचे काका आले आणि एकदम लडाखी भाषेत मोठ्या आवाजात तेन्झिनला काही तरी बोलले. त्यांचा तो संवाद(?) पाहून आम्हांला वाटले आमचे काही चुकले असेल किंवा एवढ्या लोकांना का बोलावले म्हणून तेन्झिनला झापले की काय? पण नंतर समजले की फक्त गाद्या आणि त्यावर बेडशीट्स घातल्या होत्या म्हणून तेन्झिनची खरडपट्टी झाली होती. खास आमच्यासाठी आलेले काश्मिरी गालिचे त्यावर घातले गेले नव्हते. किमान हजार वेळा सॉरी सॉरी म्हणत त्यांनी स्वतः हे गालिचे घातले आणि आम्हांला बसायला सांगितले. त्यानंतर जे काही लडाखी जेवण आम्ही जेवलो तसे आजवरच्या आयुष्यात कुठेच मिळाले नव्हते. तोंडात घातल्याबरोबर विरघळतील असे लुसलुशीत मोमोज आम्ही पहिल्यांदाच खात होतो. अतिशय रुचकर जेवण, दोरजी कुटुंबियांशी गप्पा, विचारांची देवाणघेवाण, हास्यकल्लोळ, लडाखी आदरातिथ्याची आणि परंपरांची चर्चा, नवनवीन ठिकाणं, लडाखी जीवनशैलीची जवळून ओळख यांमध्ये रात्र रंगत गेली.

रात्री झोपताना मनात विचार येत होते हेच का ते लडाखी स्वप्न? तो अचल हिमालय, भारतीय संस्कृतीचा उगम जिच्या कुशीतून झाला ती अवखळ सिंधू नदी, बौद्ध धर्मशाळांमधल्या घुमणार्‍या धीरगंभीर प्रार्थना, "ज्युले" म्हणत एकदम हृदयाला भिडणारे लडाखी आदरातिथ्य, गालिच्यांऐवजी गादी-बेडशीट्सवर बसायला लागले म्हणून हळहळणारे सौजन्य... हेच असावे का ते? याचसाठी आपण येथवर आलो का? बहुधा हेच. हेच ते  स्वप्नरत्न. उद्यापासून या रत्नाचा नवा पैलू अनुभवायचा होता. उद्यापासून तीन दिवस आम्ही फिरणार होतो त्सो लॅण्डमध्ये...म्हणजे तलावांची भूमी. रात्र चढत गेली तसे जाणवत गेले की पाहिलेले स्वप्न आणि प्रत्यक्षात आलेले स्वप्न यामधली सीमारेषा एकदम पुसट झाली आहे. ते प्रत्यक्षात यायला हे सोबत असलेले मित्रमैत्रिणी, तेन्झिन, लडाखची भूमी, इथले आदरातिथ्य सर्वांचा हातभार आहे.

Related Posts

4 comments:

  1. सोनल28 February 2015 at 10:37

    सुरेख !

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. सोनल28 February 2015 at 10:38

    सुरेख !

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. Avi26 February 2016 at 14:17

    Tumchi Leh trip kiti divsanchi hoti? Aamhi 4 divas Leh la asnar aahot. Any suggestions?

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. Avi26 February 2016 at 14:19

    Tumchi Leh trip kiti divsachi hoti? Aamhi 4 divas Leh la asu. Any suggestions?

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1