खादाडमाची… ऊप्स ! राजमाची !
अजून राजमाची केला नाहीस? जीव दे!
काय? तू राजमाचीला गेलेला नाहीस? अरारारा…
मी पहिला ट्रेक राजमाचीचा केला.
काय? तू राजमाचीला गेलेला नाहीस? अरारारा…
मी पहिला ट्रेक राजमाचीचा केला.
असे ट्रेकला कालपरवा सुरुवात केलेली पोरंसुद्धा मला चिडवत होती. कारण एवढे
६०-६५ ट्रेक्सनंतरही राजमाची मला खंडाळ्याच्या घाटातूनच खिजवत होता.
त्याच्यापर्यंत काही पोचता आले नव्हते.दोनवेळा राजमाचीच्या उद्देशाने
लोणावळ्यात जाऊन पोचलेलो मी प्रत्येक वेळी अचानक प्रचंड मोठा पाऊस आला आणि
मध्ये असलेल्या ओढ्याची भीती म्हणून स्थानिकांचे सल्ले ऐकून मी जायचे टाळले
होते. एकदा तर राजमाचीच्या उद्देशाने गेलेलो मी स्वतःला चक्क भुशी डॅमच्या
पाण्याने बाटवून घेतले होते हे आज सांगण्याचीही मला लाज वाटते. पण या
वेळी मात्र कडक उन्हाळ्यातच दुपारी पुण्यातून कूच करुन संध्याकाळी राजमाची
सर करण्याचा चंग बांधला होता. साथीला होता खूप जुना ट्रेकंगडी श्रीकांत
ऊर्फ शिक्रांत ऊर्फ घंटासिंग. सुरुवातीचे काही ट्रेक आणि कोकण बाईक सफरी
त्याच्यासोबत केले होते. तेव्हापासून श्रीकांत वेडा श्रीकांत हेच गणित
पक्के डोक्यात बसलंय.या दिवसांच्या कडकडीत उन्हात दुपारी पावणेबाराला
घरातून निघून श्रीकांतचे घर गाठले आणि परिक्षित तिथे पोचलाच होता. आधीच्याच
आठवड्यात अमित आणि अजयने राजमाची ट्रेकमध्ये काय काय खाल्ले त्याचे अतिरंजित वर्णन करुन खुन्नस दिली होती. त्याचा वचपा आज काढने का हय असा पण करुनच बाईकला किक मारली.
पहिलाच स्टॉप चार किलोमीटरवर.“सरकारमान्य” नीरेचा स्टॉल दिसला. सरकारला
मान्य असेल तर आपण का मोडता घाला उगाच? आपसूक बाईकचे ब्रेक कसे लागले कुणास
ठाऊक, बहुतेक बाईकलाही आमची खोड माहित असेल. नीरा उपवासाला चालते… पासून
नीरा गर्भवतीला उपयुक्त आहे…पर्यंत सगळे फायदे पुन्हा एकदा वाचून काढीत
दोघांनी दोन दोन टंपास ती अमृतासमान चीज रिचवली. पुन्हा बाईक थोडी पुढे
काढली आणि देहू फाट्याच्या जरासंच पुढे “गोटी सोडा” दिसला. श्रीवर्धन
ट्रिपमध्ये गोटीसोडा कसा बनवतात हे प्रत्यक्ष पाहिले होते, तेव्हापासून
पर्याला तो चाखायचा होता. म्हणून मग पुढे गेलेली गाडी रॉंग साईडने बरीच
मागे आणीत लिंबू-सोडा घेतला. हाय काय अन नाय काय! देहूरोड टोलनाक्याला बाकी
लोकांची वाट पाहत सावलीला बसकण मारली. समोरुन कुल्फीवाला आमच्याच दिशेने
येत असल्याचा भास झाला. आम्ही घेतली नाही तर त्याचा धंदा कसा चालेल म्हणून
तीच पडत्या फळाची आज्ञा मानून पु्न:श्च एकदा हाय काय अन नाय काय!
सगळी मंडळी आल्यावर तेथून अर्ध्या-पाऊण तासातच लोणावळा गाठला. तिथे एकदा
ब्रेक घेऊन ओळख परेड झाली ती फक्त नावापुरती. परिक्षित ऊर्फ चीफ फायरफायटर,
श्रीकांत ऊर्फ शिक्रांत ऊर्फ(परोपकारी) गंपू, प्रशांत गुर्जी, सुबोध,
योगेश ऊर्फ डेप्युटी फायरफायटर,चेतन ऊर्फ अध्यक्ष ऊर्फ ५००, आदित्य ऊर्फ
३५० ऊर्फ सगळ्यांचा सुपरवायझर,माधव ऊर्फ सेक्रेटरी ऊर्फ डेप्युटी शेफ आणि
मी पंक्या ऊर्फ चीफ शेफ. चीफ शेफ मीच असल्याने सगळे खाण्याचे ठरवण्याची आणि
ते जमवण्याची जबाबदारी माझीच होती. पुण्यातूनच खिचडीचे साहित्य बॅगेत
टाकलेले. पण ट्रेकला काहीतरी गोड पाहिजेच म्हणून जिलेबी शोधण्याचे फर्मान
सोडले. पण लोणावळ्यात कुठेच हलवाई सापडेना. पण पुढे तुंगार्लीत दुकान आहे
हे समजले म्हणून जरासे हायसे वाटले.ते शोधण्याचे होल ऍंड सोल काम माझेच
होते. पण त्यात मला काहीच अवघड वाटले नाही, कारण असल्या गोष्टी ठरवून
विसरायचे म्हटले तरी माझ्या नजरेतून सुटणार नाहीत. तुंगार्लीत गाडीवरुन
सुसाट जातानाही गरमागरम जिलेबी तळणारा हलवाई पाहून काय सांगू… अत्यानंदाने
डोळे पाणावले माझे. करकचून ब्रेक लावून तिकडे पाय केले, जिलेबी ही काय फक्त
पैसे देऊन घेण्याची चीज नसतेच, कमीत कमी दोन केशरी वेढे तोंडात गेलेच
पाहिजेत. मग या सुसंस्कृत(?) कामाला मीच पुढे. एक किलो घेताना छटाकभर
विरघळलीच मुखात… हाय काय अन…. !
राजमाचीचा रस्ता तसा चिरपरिचित. लाल धुळीने आणि दगडगोट्यांनी परिपूर्ण.
माणूस झोपला नाही तरी दिसणार नाही अशा खाचखळग्यांचा. जणू प्रत्येक ट्रेकरला
आपुल्या स्वप्नातल्या गावा आल्याचा मनभरुन फील देणारा. तसाच सराईत
बाईकरचाही कस काढणाराही. अशात ५०० आणि ३५० मात्र त्यांचे बुलेटनामक घोडे
यथेच्छ दौडवित होते. कसल्या म्हणजे कसल्याच रस्त्याचा परिणाम त्यांच्यावर
होत नव्हता. त्यांचे फायरिंग आख्खे रान दणदणाटून टाकत होते. पण अशातच चीफ
फायरफायटरची गाडी पंक्चर झालेली दिसली.त्यामुळे मी त्यावरुन उतरुन त्याने
एकट्यानेच जबरदस्त कौशल्याचे प्रदर्शन करत कशीबशी गाडी चालवत राजमाचीच्या
पायथ्यापर्यंत आणली. तिथे नशिबाने एका“राहुल”कडे पंक्चर निघेल असे समजले.
त्याने चाक खोलून एकच लहानसे पंक्चर आहे असे सांगितले तेव्हा हायसे वाटले.
त्याला सकाळी येऊन गाडी घेऊन जातो असे सांगितले. आता वेळ झाली होती चहाची.
फक्त चहा कसा जाणार बरे? मग बिस्किटे हवीतच. बिस्किटांचा डब्बलबार काढीत
चहा भुरकावला. हाय काय आन… !
मग सगळे सामान पाठुंगळी मारुन आम्ही किल्ला चढाईला सुरुवात केली. अर्ध्यावर
आलो तेव्हा सुर्याजी (उन्हाळ्यामुळे“पिसाळे” म्हणता येईल) आपले दिवसाचे
काम डिलिव्हर करुन लॅपटॉप आणि डेस्क आवरत असल्याचे समोर दिसले. पण
दिवसाच्या शेवटी आमच्या कॅमेरात रिपोर्टिंग करण्याचे बाकी असल्याने आमचीच
वाट पाहत होते. मग त्यांना अधिक वेठीस न धरता लगेच आहे तिथे जरा बरी जागा
पाहून सुर्याजीला summon करुन त्याची कॅमेरात हजेरी घेणे चालू केले. इकडे
विरुद्ध बाजूस बालेकिल्लाही अप्रेजल झाल्यासारखा सोनसळी चमकत होता. आता
बरेच फोटो झाले, पोटाला काही नको का?प्रशांतने गूळ शेंगादाणे आणि सुबोधने
चिक्की आणली होती. हाय काय अन…. !
तेथून निघून बालेकिल्ल्यावर पोचलो तेव्हा साधारण अंधार झालेला. पाण्याची
सोय केली, कपडे बदलले आणि पुन्हा चिवडा आणि भडंगवर हाय काय अन…. ! जिलेबीच
सुगंध दरवळत होता. तेवढ्यात तिथे आगंतुक असे एक सद्गृहस्थ आणि त्यांची दोन
लहान मुले गडभेटीस आली होती. त्यांच्याशी गप्पा मारत मारत आधी केलेल्या
भटकंतीच्या गप्पा मारत त्यांना जिलेबी ऑफर केली. त्यांना परतीच्या
प्रवासासाठी आमचा एक टॉर्च दिला. त्यांनीही काहीही अडचण आल्यास किंवा मदत
लागल्यास सांगा इथे पाठवू शकतो असे सांगितले.त्यावरुनच ही कुणीतरी असामी
असावी असा अंदाज आलाच. तर ते खरंच होते.इन्स्पेक्टर श्री. घनवट. त्यांचे
आभार मानून त्यांना निरोप दिला आणि चीफ फायरफायटर आणि इतर टीमला सरपण गोळा
करायला पाचारण केले. त्यातून सुपरवायझर आणि चीफ शेफने गुपचुप टांग मारली
;). चीफ फायरफायटरने जरा बरी आग लावल्यावर त्यावर हेडशेफने (म्हणजे मी)
खिचडीसाठी आधण ठेवले. खिचडीत आपला हातखंडा आहे. त्यात ही तर डाएट खिचडी
होती, कारण तेल आणलेच नव्हते. असिस्टंट फायर फायटर त्यांना सेक्रेटरीने
दिलेल्या गॉगलच्या सहाय्याने डोळ्यांचे रक्षण करीत अग्नी फुलवत होते. तो
फुलल्यावर त्यात कांदे आणि बटाटे आगीत भाजायला टाकले. ते भाजेपर्यंत कुणाला
दम निघतोय. आला बाहेर की पुनःश्च हाय काय अन…. ! आधण वाफेला आल्यावर त्यात
खडा मसाला, बिर्याणी मसाला, बटाटे आणि एक पनीरची रेडिमेड भाजी अशी आहुती
दिली आणि हेडशेफ आणि सेक्रेटरी कम डेप्युटी शेफ यांनी संगनमताने त्यात
करेक्ट मापात मीठ घालण्याचे अतिशय अवघड यज्ञकर्म पार पडले. दर तीन
मिनिटांनी उघड झाकण, बघ पाणी, कमी आहे, ओत पाणी अशी कर्मकांडे चालूच होती.
साईड बाय साईड भाजलेल्या कांदे-बटाट्यांचे “हाय काय अन नाय काय”चा सपाटा
चालूच होता. खालून गावातून आलेल्या अंडाकरी आणि भाकर्या आपली उपस्थिती
सुगंधातून जाणवून देत होते. कर्जतहून मुंबईचे तीन ट्रेकर आले होते,
त्यांनाही आग्रहाने जिलेबी खाऊ घातली.
खिचडी रटरटली तशी पंगत बसवली. बरेच काय काय सामान काढले गेले. जेवण ट्रेकचे
आहे की श्रेयस-सुकांतामधले असा प्रश्न पडावा. अंडाकरी, भाकरी, आमची खिचडी,
भाजके कांदेबटाटे, लोणचे, लसूण चटणी,मुरांबा आणि जिलेबी. आडवा हात मारला
प्रत्यकाने. हाय काय आन… ! एवढे खाऊन पुढे एकमेकांना हात देत कसेबसे उठलो
आणि अंधारात चांदण्या मोजीत शतपावली केली तेव्हा कुठे आडवे व्हायला पोटात
जागा झाली. रात्री गारव्याला गप्पा छाटत, मागच्या ट्रेकच्या उजळण्या करत
आणि पुढल्या ट्रेकचे मनसुबे रचत डोळा कधी लागला कुणालाच कळले नाही.
सकाळी सुर्याची किरणे उलगडली तीच मुळी अंधाराची घडी विस्कटत. उगवतीला
आकाशात रंग फाकले आणि प्रत्येकजण आपापली आवडती कामे करु लागली. म्हणजे
फोटोबाज फोटो काढायला पळाले आणि झोपबाज मस्त गारव्याला घोरत पडले होते. जसा
तो केशरी रंग हळदीचा झाला तसा त्याचा चटकाही बसू लागला.
सगळ्या कॅंपला जाग आली. हेडशेफने फक्कड चहा बनवला आणि चहासोबत पुन्हा एकदा
चपाती-धिरडी हाय काय आन नाय काय! सोबत कालची उरलेली जिलेबी आणि बिस्किटांचा
डबलबार. मी आलं घालून केलेला चहा मैफिल न जमवेल तर तो हेडशेफ कसला? सकाळी
सकाळी तापत्या उन्हातही जी काही जमली होती त्यातून प्रत्येकाबद्दल माहित
नसलेले पैलू सामोरे आले. खरंच सह्याद्रीत भटकंती ही एकच अशी गोष्ट आहे की
जिथे कालची झालेली ओळख एका रात्रीत मैत्री बनून जाते. त्यासाठी ट्रेकरच्याच
वंशा जावे तेव्हा कळे.ग्रुप फोटो आवरुन कॅंप आटोपला. कचरा गोळा केला आणि
खाली आलो. खाली लिंबू सरबत… हाय काय अन नाय काय !
आता घरचे वेध लागले होते. वेळेत घरी पोचलो तरच पुढल्या ट्रेकला परवानगी
मिळते हा विकेट पडलेल्या ट्रेकर्सचा आतापर्यंतच्या अनुभवावरुन आत्मसात
केलेली गोष्ट. पण राजमाचीवरला थंडगार तलाव खुणावत होता. त्यात डुंबून
पुण्याची वाट धरली. येताना पुन्हा एकदा कामशेतला वडापाव आणि कोल्ड्रिंक्स.
हाय काय अन …!!
0 comments