शब्दशलाका: "मी पुन्हा...वनांतरी..."
जंगलाचं एक बरं असतं. नागरतेचे पाश त्याच्या नरड्याला उगाच जाचत नाहीत. सगळाच अकृत्रिम आविष्कार!
जंगलाचे नियम हे कलाकारांचे नियम. स्वच्छंदी, सरळ आणि नैसर्गिक. उगाच फुकाची गडबड नको की भांड्याला भांडं वाजणं नको.
गूढ भासणारं जंगल तुम्हाला थेट प्रतिभेच्या एखाद्या लाडक्या अपत्याची आठवण करून दिल्याखेरीज राहत नाही.
जंगलाला संवेदनांची बधिरता येत नाही कधीच. इतकी मुळे, फांद्या, खोडे असल्यावर आपल्या अस्तित्वाचं भान कोणं कसं विसरेल बरं?
काही वेळा या खास राखून ठेवलेल्या असतात. प्रशांत पहाटे ध्यानस्थ बसायची वेळ, अंधूक दिसणार्या क्षितीजाकडे बघत घरी येणार्याच्या गुणांना आठवायची सायंवेळ, घमघमणार्या उत्तररात्रीच्या मदहोशीची वेळ आणि डोईवर सूर्य चढला की काढत्या पायाने खोपटी गाठायची वेळ.
तशीच जंगलाची आळस द्यायची पण एक वेळ असते. प्रातःकाळी किलबिलणार्यांनी अलार्मचं काम चोख बजावलेलं आहे. पूर्वेचा कर्मयोगी दिनकर आपली बाही सरसावून प्रवासाला निघालेला आहे. त्याच्या किरणांनी पानांच्या जाळ्यांना बाजूला सारून एव्हाना जंगलाला गुदगुल्या करायला सुरूवात केली आहे. आता कस्सं सरसरून उठेल हे वन!!
ही घनदाट जाळी म्हणजेच जीवन. ह्या मायेने गुंतलेल्या फांद्या म्हणजेच जीवन. ही धुक्यात विरलेली पर्णराजी म्हणजेच जीवन. आणि एकही शब्द न बोलता कायम आपल्याला खुणावणारं हे जंगल म्हणजेच खरं तर जीवन....
जंगलाची मस्तानी कलंदर वृत्ती पुन्हा कलावंतासारखीच. आता पाचोळा वाजो किंवा घुमोत या कृष्णधवल आसमंताचे श्वास.... जंगल आपल्यामध्येच मस्त रमून राहतं. प्रश्न हा की जंगलभेटीला गेलेल्या तुम्ही-आम्ही पहायचं तरी काय?
सही!
ReplyDeleteसुरेख वर्णन! त्या निसर्गासारखच सरळ, साधं आणि भिडणारं!
ReplyDeleteGahiwarun takanaare shabd....
ReplyDeleteFoto tar khupach chaan mhanje Lai Bhaari...
छान लिहिले आहेस
ReplyDelete