एक अनुभव डेंटिस्टचा
पेन किलर्स, आयुर्वेद आणि इतर उपायांनी हात टेकले आणि अगदी असह्य झाले तेव्हा दंतोपचाराची महती पटली. मग डेंटिस्टची रोज किती चांदी (दातांत भरण्याची चांदी नाही, पैशांची आवकवाली चांदी) होत असेल आणि कसे लोकांना त्याच्या उंबऱ्याला पाय लावल्याशिवाय गत्यंतर नाही, त्याची सर्वगुणसंपन्न खुर्ची, मग हरतऱ्हेचे गिरमिटं आणि फिलिंग्स, कवळ्या, टोप्या असे नेहमीचे चर्वितचर्वण घडले. मला खरंतर काही झाले तरी दात वाचवायचा होता. पण रुट कॅनॉल नको होते. ते काय असते माहीतही नव्हते पण ऐकीव माहितीवरुन खात्री पटली होती की एक अजब प्रकार असतो. शिवाय त्याचे नावच किती भयंकर आहे ’रुट कॅनॉल’ म्हणजे मुळापर्यंत कॅनॉल. दात पोखरुन काढतात म्हणे त्यात. ऐकावे ते नवलच. पण इलाज नव्हता.
दुपारी बाराच्या सुमारास काढली गाडी आणि निघालो डेंटिस्टकडे. जरा जुनाट बिल्डिंगमध्ये दवाखाना (की दातखाना). वर जाऊन बसलो. मस्त रेडिओवर जुनी-नवी गाणी चालली होती. काही जुने पेपर पडले होते. नंबर येण्याची वाट पहावी लागणार होती. शेजारी एक काका गालावर हात दाबून बसले होते. ते आले होते दात गमवायला. दंतोपचारातला सर्वांत स्वस्त उपचार. पण त्यांचे वय झाले होते आणि आता त्यांना कोण पाहणार होते. काकू तर कित्येक वर्षांपूर्वीच त्यांच्यावर लट्टू झाल्या असणार. आतमध्ये पण कुणीतरी पेशंट (क्लिनिकमध्ये आल्यावर "आजारी"चा "पेशंट" होतो) असणार. कदाचित खूप संयम बाळगणारा म्हणून "पेशंट" म्हणत असावेत. तिथे बसलो आणि अचानक कुठे तरी सुतारकाम चालू असल्याचा आवाज आला. मला वाटले असेल शेजारच्या गाळ्यात काम चालू. थोड्या वेळाने डॉक्टरांची हेल्परीण बाहेर आली तसा तो आवाज एकदम स्पष्ट झाला. म्हणजे मला कळून चुकले की तो "सुतारकामा"चा आवाज आतमधून येत होता. ड्रिलमशीन मारल्यासारखा. आतमध्ये कुशल सुतार काम करत असल्याची आणि माझ्या पुढे काय वाढून ठेवले आहे त्याची जाणीव झाली. रेडिओवर गाणे चालू होते... "अकेले है तो... क्या गम है... "
सगळ्या पेपरांची पाने उलटीपालटी करुन झाली होती. उगाचच शिळे मुक्तपीठ, लोकमत ऑक्सिजन असल्या पुरवण्या वरखाली करुन झाल्या. काय रद्दी क्लिनिक आहे, ताजे पेपर पण नाही ठेवत असा ’प्रथम तुज पाहता’ अभिप्राय नोंदवला गेला होता... मग उगाचच मोबाईलमधले जुने SMS चाळण्यात वेळ घालवला. एक SMS होता "चाहे जितनी भी मुश्कीलें आये..." पुढचे काही आठवत नाही आता. भिंतीवर ’राज डेंटल टेक्नॉलॉजी’ असे एक फुकटातले कॅलेंडर टांगले होते. आजूबाजूला रोज दोन वेळा ब्रश करा आणि आमची टूथपेस्टच वापरा अशा जाहिराती होत्या. जवळपास पाऊण तासाने नंबर आला. तोवर आतमधला "गिरमिट्या" आवाज कानात रजिस्टर झाला होता. आता भीती वाटत नव्हती. रेडिओवर पण छान गाणी लागली हो्ती "आज उनसे पहली मुलाकात होगी, आमनेसामने जाने क्या बात होगी" आणि नंतर "जाने क्यू लोग डरते है"
नंबर आला. आतला पेशंट उपचार केलेल्या दातांवर जीभ फिरवत हसत हसत बाहेर आला म्हणून मला पण थोडा दिलासा मिळाला. काचेचे दार ढकलून आल्यावर आत गेलो. स्वच्छ उभट खोलीत ओळीने ऑब्लिकली लावलेल्या तीन त्या सुप्रसिद्ध जादूच्या खुर्च्या. त्यांच्यामध्ये मोठे-मोठे पिवळे स्माईली छापलेले काचेची पार्टिशन्स, एका बाजूला कसलेतरी आडवा रोबोचा हात असावा असे वाटणारे मशीन, दोन-तीन खुर्च्या, किमान वीस-पंचवीस ड्रॉव्हर्स (कसे लक्षात ठेवतात देव जाणे) या सगळ्या गराड्यात डॉक्टरला शोधायला कमीत कमी मला अर्धा मिनीट लागला. मग तिकडे वॉशबेसिनच्या बाजूने नॅपकिनला हात पुसत एक, तोंडाचा मास्क गळ्यात ओढलेली लहान मूर्ती टेबलाकडे येताना दिसली. तर हा आहे होय आपला "सुतार" सॉरी डॉक्टर!! त्यांच्याकडे पाहून मला खुदकन हसू आले. लहानशीच उंची. डोईवर भरभरुन केस आणि त्यातून माथ्यावरची एक चुकार बट वर डोकावून पाहत होती. रेडिओ आज जरा जास्तच जुळत होता. यावेळी अप्पूराजामधले "राजा नाम मेरा..."
डॉ: हं, बसा. काय होतंय?
मी: दात दु... (खुर्चीवर बसता बसता).
डॉ: कुठला?
मी: हा वरचा... (मी बोटाने दाखवत)
टेबलावर एक दातांचे एक लाकडी मॉडेल, लहान एक्सरे फिल्म्सची चळत, दोन कवळ्या आणि दातांच्याच आकाराचे पेपरवेट, काही डायऱ्या आणि एक लॅपटॉप (हायटेक डॉक्टर आहेत म्हणजे).
चला, या इकडे असे म्हणत त्यांनी खुर्चीकडे हात दाखवला. मी खुर्चीवर जाऊन नुसताच बसून राहिलो. "अहो आडवे व्हा" इति वैद्यराज. मग मी एकदम आडवाच झालो. चाकांचा स्टूल ओढून ते पण बसले माझ्या उशाशी. हातात एक चमचा सारखे काहीतरी ओळखीचे आयुध. त्याही स्थितीत थोडा स्मरणशक्तीला ताण देऊन आठवले. कोलगेटच्या जाहिरातीत असते ते हेच की. मग मला "आ करा’ अशी आज्ञा झाली. केला मग मोठा आ. मग डॉ.नी आपले पुढच्या काही दिवसांचे त्यांचे मैदान पाहून घेतले. कसल्याशा हातोडीने दुखऱ्या दातांवर प्रहार केला आणि मी कलवळून उठलो. ते मास्कच्या आडून काही तरी पुटपुटले. (बहुतेक चांगला बकरा सापडलाय असे म्हणाले असतील). मग म्हणाले आपण एक एक्सरे काढू आज संध्याकाळी. आता दिवे गेलेत आणि मशीन बॅकपवर नाहीये. पण परिस्थिती चांगली नाहीये. मी चेहरा पाडून ठीकाय म्हणालो. पण वेदनेचे काय? मग म्हणाले आपण औषध सुरु करु. आज संध्याकाळी या एक्सरे साठी. प्रिस्क्रिप्शन लिहून दिले आणि फी घेतली. पण औषध मात्र जादूचे दिले बरं का... अर्ध्या तासात वेदना गायब!!!
संध्याकाळी पुन्हा गेलो. गर्दी होती. पण माझा एक्सरेच काढायचा असल्याने डायरेक्ट आत घुसलो. डॉ म्हणाले या या.. एक्सरे म्हणजे काय, फक्त एक बटन दाबायचे असते. माझी पुन्हा चिंतातुर स्थिती. मग त्यांनी कसलेतरी पिवळे जॅकेट घातले. मग मला पुन्हा त्या जादूच्या खुर्चीत झोपवून त्या रोबोसारखा हात असलेले मशीन पुढ्यात ओढले. मला पुन्हा टेन्शन. तोंडात कसले तरी प्लास्टिकचे पांढरे पाकीट ठेवले गेले आणि पुढे काय केले काहीच झेपले नाही. ना डॉं.चा आवाज, ना मशीनचा. आणि अचानक म्हणाले "झाले". तरी मी साशंकच होतो की खरंच एक्सरे झाला असेल म्हणून. मग पुन्हा डॉ- "या इकडे". उद्या दुपारी या. तेव्हा एक्सरे फिल्म डेवलप होईल आणि मग पुढील प्लॅन ठरवू. "ओके" म्हणून मी तिथून पळालो. बाहेरचे लोक चरफडताना दिसले... आमचा नंबर असताना हा कसा काय घुसला असे काहीसे बोलत असणार.
मला उद्याच्या दिवशी आणि पुढील दोन दिवस वेळच नाही मिळाला. मग तीन दिवसांनी गेलो तेव्हा एक्सरेकडे पाहत डॉ. म्हणाले दोन दातांवर रुट कॅनॉल करावे’च’ लागेल. माझ्या कानांत भूकंप झाल्याचा भास झाला. बंद असतानाही मला गिरमिटाचा आवाज यायला लागला. मर्फीचा नियम काय असतो याचा साक्षात्कारच घडला. मग नंतर दातांवर टोपी घालावी लागेल. पुढील १५ मिनिटे ते काय बोलले आणि मी काय ऐकले काहीच आठवत नाही. भूकंपाचे आफ्टरशॉक्स जाणवत होते. बहुधा ते टोप्यांचे प्रकार आणि किमती याबद्दल बोलत असावेत. मी मुकाट मान्य करुन पुन्हा त्या खुर्चीत जाऊन झोपलो (दुसरा काही ऑप्शन होता का?).
डॉ विविध आयुधं सरसावून तयार झाले. एक खरोखरचे ड्रिल मशीन आणले आणि उगाचच ड्रिंग... ड्रिंग...करुन भीती दाखवली (असे मला वाटले). मग आणि केले की चालू डायरेक्ट दातांवर.. "अरे भल्या माणसा... काही तरी दयामाया दाखव की", मी कळवळलो. मग एक इंजेक्शन जबड्यात तीन ठिकाणे खुपसले. पुढे काय केले ते दातांना आणि मला समजलेच नाही. फक्त डोक्यात आवाज येत होते. ड्रिंग... ड्रिंग... ड्रिंSSग.... खर्ररर... ठाक ठाक टॉक". मध्ये मध्ये तो सदगृहस्थ कसल्या कसल्या सुया खुपसून स्केलवर मापं घेत राहिला. मध्येच काहीतरी विचित्र चवीचे औषधाची पिचकारी मारुन चूळ भरायला लावल्या. अर्ध्या तासात दातांमध्ये खिंडी पाडल्या. मग कापसाचे बोळे ठासून बसवले आणि पुढे म्हणाले "झाले. पुढल्या व्हिजिटला जास्त वेळ लागेल आता". मी अजूनच घाबरुन रुकार भरला.
पुढल्या व्हिजिटला पुन्हा तेच. ड्रिंग... ड्रिंग... ड्रिंSSग.... खर्ररर... ठाक ठाक टॉक, सुया, मापं... पण आज भूल दिली नाही, किंबहुना तशी गरजच नाही पडली. मग तात्पुरते म्हणून सिमेंट भरु असे डॉ. म्हणाले. मी "हॉ"कार (तोंड सताड उघडे होते ना म्हणून) दिला. भरुन झाल्यावर थापीने प्लॅस्टर करतात तसे काहीसे केले आणि म्हणाले आता आठ दिवसांनी. भरलेले सिमेंट पेपरमिंट फ्लेवरचे होते. पुढचे काही तास मी त्याची टेस्ट घेत होतो.
आता मी पण एंजॉय करु लागलोय डेंटिस्टच्या व्हिजिट्स. त्या केबिनच्या बाहेर आलो त्या वेळी रेडिओवर गाणे लागले होते "यू ही कट जायेगा सफर साथ चलने से..."
पुढील घडामोडी जमल्यास कळवीनच.
वा.. एका दुखण्याची अगदी सुखद अनुभुती करुन दिली राव... ड्रिंग... ड्रिंग... ड्रिंSSग.... खर्ररर... ठाक ठाक टॉक, सुया, मापं...! हे मात्र लय भारी.
ReplyDeleteमीही गेलोय यातनं, ड्रिलिंग मशीन दाढेत लावल्यावर सुरुवातीला काही वाटत नाही पण जर का चुकुन पोकळ दाताच्या मध्ये असलेल्या हिरडीला लागली तर गोड यातना होतात, म्हणजे चांगले पण वाटते आणि असह्य सुद्धा होते.....
ReplyDeleteकसलं भारी रे. एक नंबर. रेडियोवरच्या गाण्यांचं टाइमिंग तर मस्तचं.
ReplyDeleteतिथे न जाता देखील सगळा दातखाना त्या डॉक्टर सकट डोळ्यासमोर उभा राहिला. पहिल्यांदाच डेंटिस्ट बद्दल चांगलं वाचायला मिळालं. ह्या पोस्टची एक प्रिंट काढून दे त्याला. खुश होईल. दातखान्यात लावेल नक्की.
अरे माझे आणि दंतवैद्याचे अतिशय घनिष्ट संबंध आहेत बरं का... माझ्या ३ दातांना रुट कॅनॉल केलेले आहे...
ReplyDeleteमज्जा आली वाचताना... पुढचा पार्ट पण लिही... आणि हो हे लिखाण एका डेंटिस्टकडे जातय वाचायला...
माझा ख़ास मित्र डेंटिस्ट आहे. आता आलो की त्याच्या क्लिनिकमध्ये एक कॉपी पेस्ट करतो काय .... हाहाहा...
हा हा हा.. झक्कास वर्णन एकदम. हेल्परीण हे तर लय झ्याक !!
ReplyDeleteawesome man ! maazi hi ek daadh saarkhi dukhatey!! kaadhun ghyaayalaa bhiti vaatat hoti, but now i feel relax!!
ReplyDeleteकिती पैसे घालवलेस रे रुट कॅनलवर? थोडे पैसे घालुन लेन्स आली असती बघ अजुन एखादी :-)
ReplyDeleteekdum mast varnana kelay..ड्रिंग... ड्रिंग... ड्रिंSSग.... खर्ररर... ठाक ठाक टॉक, सुया, मापं...! ekdum bhari
ReplyDeleteमला पण सांगितलं दोन लोखंडी दात लावायला. टाळतोय , पण फार दिवस जमणार नाही अव्हाइड करणं!!
ReplyDeleteआल इज वेल.. :D
दिपक, खरे आवाज ऐकले ते लिहिले. शब्दांत लिहायला जरा त्रासच झाला.
ReplyDeleteआनंद, हे...हे... गोड यातना.
सिद्धार्थ, डेंटिस्ट चांगला असतो? असेल बुवा. माझी ट्रीटमेंट झाली की देतो त्याला प्रिंट. नाही तर फीमध्ये बदल (वाढ) व्हायची.
रोहन, मित्र आहे तर मग लेबर चार्जेस पडत नसतील ना रे तुला? :-)
हेरंब, पाटलाची पाटलीण होते तर हेल्परीण होईलच की. नाही का?
दीपू, काढून नको घेऊ रे... रुट कॅनॉल कर. मज्जा येईल. अनुभव लिहिशीलच.
अनिकेत, अरे एवढ्या पैशात लेन्स येत असती तर आतापर्यंत एक टेंपो घेतला असता, लेन्स वाहायला.
तुषार, धन्यवाद.
महेंद्रजी, अव्हॉइड नका करू, नंतर बाळंतपणापेक्षा भयंकर वेदना होतात :-) "आल इज वेल" पण चालणार नाही मग. लवकर उपचार चालू करा.
रेडीओच्या गाण्यांशी जुळलेलं टायमिंग अफलातून आहे. मीही गेलेय याह दुखण्यातून. अक्कलदाढेवर हिरडीचं आवरण वाढलं होतं, त्यामुळे दाढेचा निकाल लागला. त्यात ती दाढ हाडामधून उगवलेली. मुळं वाकडी. माझ्या वेळेला तर रेडीओसुद्धा नव्हता :( नुसतंच झुईंऽऽऽऽऽऽऽऽऽ
ReplyDeleteमान्यवर,
ReplyDeleteतुमची ’दंत’कथा ऐकून ’दात’खीळ बसली. विनोदी तर तुम्ही आहातच पण ज्या टायमिंगने लिहीलयं ते पाहून तो ’दंत’वैद्य तुम्हाला ’दाती’ तृण धरून शरण न आला तरंच नवल !! गाण्यात कसा ’तीव्र मध्यम’ लागला किंवा ’कोमल रिषभ’ लागला की आपला हात जसा आपोआप ’वाहवा’ म्हणून वर जातो तसं हा लेख वाचताना अनेक ठिकाणी ’क्या दात है’ ... सॉरी ’क्या बात है’ झालं. उदा.
डॉक्टरांची हेल्परीण,
आतला पेशंट उपचार केलेल्या दातांवर जीभ फिरवत हसत हसत बाहेर आला,
पुढच्या काही दिवसांचे त्यांचे मैदान पाहून घेतले,
पटकन सगळी ट्रीटमेंट संपव म्हणजे तुला लुबाडू पाहणार्या या दातोबाचे दात त्याच्याच घश्यात जातील !!! शेवटी काय तर ’दातोंके भूत बातोसे नही मानते’.....
मायला अशी भानगड व्हती तर... म्हणूनच म्हणलं साला एवढा कसा काय परेशान होता म्हणून कित्येक दिवसांपासून... ते दातांमधी पेपरमिंटवालं फ्लेवरवालं शिमिट लयच भारी होतं का रे...?? जर तसं आसन, तं मी बी मव्हा दात हाटकून दुखायला लावतो अन पेपरमिंट फ्लेवरवालं शिमिट दातायमंधी घालून आणतो, डेंटिस्टकडून...! ;) मंग मी बी त्येच्यावरून मस्तपैकी जीभ फिरवित जाईन, हाय कीनाय...??? ;-p
ReplyDelete- विशल्या!
jhakassss! Treatment lavkar sampav and get back to bhatkanti! :)
ReplyDelete