Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)

By Pankaj - भटकंती Unlimited
/ in anwa aurangabad bike ride Lonar अन्वा औरंगाबाद कोकमठाण लोणार
1 comment
दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होते. सकाळी मंदिरापाशी पोचल्याबरोबर संजय कुठूनतरी आला आणि काल रात्री न आल्याबद्दल चौकशी केली. रात्री बराच वेळ आमची वाट पाहिल्याचेही त्याने नमूद केले. त्याची माफी मागून त्याच्यासोबतच मंदिर पहावयास सुरुवात केली. आम्ही मंदिर पाहत असताना त्याने मंदिराची आणि परिसराची झाडलोट केली, शिवलिंग पाण्याने धुवून काढले आणि सुंदर ताज्या फुलांनी त्याची पूजा बांधली. छानसा अगरबत्तीच्या दरवळ मंदिरात पसरला होता आणि आम्ही त्या वातावरणात तिथली शिल्पे निरखीत होतो. ताहाकारीच्या मंदिरासारखे या मंदिराचे छतही दगडात कोरलेल्या देठाला लगडलेल्या फुलांच्या आकाराच्या झुंबरांनी अलंकृत आहे. मंदिर भूमिज शैलीत बांधले असून शिखर विटांमध्ये रचलेले आहे. मुख्य सभामंडप, त्याला तीन दरवाजे आणि त्याच्या पुढे मुख्य गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. गोदावरी नदीच्या अगदी तीरावरच असल्याने एखाद्या मोठ्या पुराचा फटका बसला असावा असे त्या परिसरातील लहान भग्न मंदिरे पाहून जाणवते. या मंदिराच्या मूळ बांधणीनंतर पडझड झालेली आणि त्यानंतर ते पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो, याचे कारण म्हणजे मूळ दगडी मंदिरावर असलेले चुना आणि खडी यांचे मिश्रण असलेले बांधकाम. ते साधारण दोन-तीनशे वर्षांपूर्वीचे असावे. पण त्या प्रयत्नांतही मूळ मंदिराचे सौंदर्य कायम राखण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.


आजच्या काळातील राज्यकर्त्यांना अशी सुबुद्धी लाभो अशी प्रार्थना त्या शंभूमहादेवाजवळ करुन आम्ही कोकमठाणचा निरोप घेतला.
(अवांतर: या कोकमठाण गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी अक्षयतृतीयेला गोदावरीच्या पलीकडील संवत्सर नावाच्या गावाला शिव्या देण्याचा आणि गोफणीने दगडफेक करण्याचा रिवाज. या दिवशी दोन्ही तीरांवर त्या त्या गावांतील युवक एकत्र येऊन एकमेकांना यथेच्छ शिव्या देतात, एकमेकांवर दगडफेक करतात. दोन्ही गावांच्या दरम्यान दगड युद्धाची परंपरा असलेले युद्ध खेळले जाते. गोफण या अस्त्राने दगड मारून प्रतिपक्षास पराभूत करणे हीच मुख्यत्वे भावना असते.  नदीपात्राच्या मधोमध हे युद्ध अक्षयतृतीयेपासून ५ दिवस दररोज सायंकाळी ४ वा. सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत चालते. युद्ध थांबावे यासाठी कोणीही एका पक्षाने पांढरे निशाण वर करून दाखविणे हा या युद्धबंदीचा संकेत होय. तद्नंतर दोन्ही गावातील मंडळी खेळाडू आपआपल्या दैवतांचा म्हसोबा की जय, लक्ष्मी माता की जय असे म्हणत घरी परततात. हे युध्द केले नाही तर गावात पाऊस पडत नाही, अशी अंधश्रद्धा समाजात होती.अलीकडच्या काळात दोन्ही गावांतील समंजस नागरिकांनी पुढाकार घेऊन ही शिव्यांची प्रथा अगदी उपचारापुरती सीमित केली असून गोफणगुंडा युद्ध पूर्णपणे बंद करवले आहे. व्हिडिओ - https://www.youtube.com/watch?time_continue=49&v=G8KjATcJfxs).
तर आम्ही कोकमठाणचा निरोप घेतला. आता कोपरगाव-वैजापूर-लासूर मार्गे औरंगाबादला पोचावयाचे होते. आम्ही आता मराठवाड्यात प्रवेश केला होता. सकाळी थोडे ऊन सुसह्य होते. मिळेल तिथे आणि मिळेत ते आम्ही खात होतो, परंतु साऊथ इंडियन कुठेच मिळाले नाही. कोपरगाव सोडल्यापासून पुढे तर फक्त पाववडा (बेसनपिठात बुडवून तळलेला पाव) आणि कुठेतरी कळकट मिसळ एवढे सोडले तर काहीच उपलब्ध नव्हते. खूप तेलकट आणि बेसन खाऊन त्रास होऊ नये म्हणून आम्ही चहा आणि बिस्किटांवर वेळा मारुन नेत होतो. त्यात तशा आमच्या दोघांच्याही गाड्या नवीन असल्याने आणि ही मॉडेल्स या भागात जास्त पोचली नसल्याने प्रत्येक ब्रेकला आमच्या बाईक्सभोवती बघ्यांचे कोंडाळे तयार होई आणि उगाचच हे बटन दाब, तो दांडा ओढून बघ, गियरच टाकून बघ, गाडीवरच बस असले उद्योग केले जात. त्यात आमच्या सॅडलबॅगही गाडीलाच बांधलेल्या असत. त्यामुळे आम्ही त्यातल्या त्यात निर्मनुष्य चौक शोधून टपरी गाठायचो आणि तिथे खायला काही तयार नसे. ते तयार होईपर्यंत गाड्यांभोवतीच्या गर्दीवर वॉच ठेवणे हाच एककलमी कार्यक्रम असे. हा रस्ता म्हणजे जीवघेणा होता. आमच्या बाजूचा औरंगाबादच्या दिशेने जाणारा अर्धा रस्ता चांगल्या गुळगुळीत अवस्थेत आणि अर्धा खडीकरण केलेला. त्यामुळे समोरुन येणारी जड वाहनेही आणि कारदेखील आमच्याच लेनमधून भरधाव चालत. समोरुन आलेली वाहने चुकवण्यासाठी रस्ता सोडून शोल्डरवरुन शिताफीने बाईक खाली घेऊन साइडपट्टीवरुन घ्यावी लागे. हे करण्यात थोडी जरी कुचराई झाली तरी समोरची गाडी बेफिकीरपणे आम्हांला घेऊन गेली असती. साधरण दुपारच्या सुमारास आम्ही डावीकदे दौलताबाद पाहत पाहत औरंगाबादेत प्रवेश केला. अडीच दिवसांत साडेसहाशे किलोमीटर प्रवास झालेला असल्याने माझ्या बाईकलाही भूक लागली होती. तिला भरपेट (टॅंकभर) खाऊ घातले आणि ध्रुवच्या आतेबहिणीच्या घरी पोचलो. आम्ही आता दोन दिवस तिथे मुक्काम टाकून बेसकॅंप करणार होतो आणि औरंगाबाद-सिल्लोड-अन्वा आणि औरंगाबाद-लोणार असे दोन लॅप्स मारणार होतो.
काय करावे? आज जावे की नाही? आराम करावा का? असे विचार सुरु होता. जवळपास अर्धा दिवस शिल्लक होता आणि औरंगाबाद अन्वा हे अंतर अंदाजे शंभर किलोमीटर होते. त्यात ते अजिंठा रोडवर असल्याने ती गर्दीही रस्त्यात असणार. तरीही थकलेल्या शरीराला फ्रेश करुन पुनःश्च घोड्यावर बसवून आम्ही अन्वाच्या दिशेन निघालो. वाटेत औरंगाबाद शहराच्या बाहेर पडता पडता पोटपूजा उरकून घेतली. आता मराठवाड्याचे ऊन चांगलंच जाणवत होतं. फुलंब्री-सिल्लोड बायपास असे करत आम्ही गोळेगाव नंतर अन्वा फाट्याला उजवीकडे वळालो. फाट्यापासून अन्वा गाव अंदाजे दहा किलोमीटर. पण तसल्या रस्त्यावरुन ते अंतर काटायला आम्हांला अर्धा तास लागला. गावात पोचलो तेव्हा मंदिर कुठे दिसेना. गावात अनेक चौकशा करत गल्लीबोळ-पेठा पार करुन एकदाचे आम्ही मंदिराच्या आवारात येऊन पोचलो.



मंदिराच्या अंगाखांद्यावर गावातली पोरं खेळत होती. त्या मंदिराचा आवाका पाहून थक्क व्हायला होते. एकून  मीटर दीड मीटर उंचीच्या पीठावर आयताकृती सभामंडप आणि  ५० खांबांनी तोलून धरलेले घुमटाकार छत. एवढे जटिल शिल्पकाम असलेले हे आमच्या ट्रिपमध्ये पाहिलेले दुसरे मंदिर (याआधी सिद्धेश्वर मंदिराचे खांब असे अतिशय जटिल (intricate) शिल्पांनी नटवले होते. जरी हे मंदिर वैष्णव देवतांसाठीचे बनवले असले तरी कालौघात त्यात बदल होऊन सद्यस्थितीत तिथे शिवलिंग आहे. मंदिरात असलेली सारी शिल्पे विष्णूरुपातीलच आहेत. हे मंदिर पाहून आम्ही गोळेगावला परत आलो तेव्हा तिथल्या एका हातगाडीवर अंडाभजी नावाचा एक भारी पदार्थाचा शोध लागला. एका प्लेटमध्ये तीन उकडलेली अंडी अर्धी कापून बेसन पिठात बुडवून तळलेली. एकूणात पोटभरीचा आणि पौष्टिक नमुना. अशा दोन प्लेट आणि वर दोन अंडाभुर्जी पाव असे हलकेच (?) खाऊन आम्ही औरंगाबादला परतीचा रस्ता धरला. सिल्लोडला पोचता पोचताच अंधार पडला आणि पुढील सिल्लोड-औरंगाबाद हा परतीचा प्रवास सिंगल लेन रोडने समोरुन येणार्‍या गाड्यांच्या हेडलाईटचे बाण आमच्या डोळ्यांत खुपसून घेत, ट्राफिकच्या गर्दीतून मार्ग काढत काढत कसाबसा पूर्ण केला.
औरंगाबाद बेस कॅंपला (म्हणजे घरी) पोचलो तेव्हा मुस्तफाची खास मटण दम बिर्याणी आमची वाट पाहत होती. कडक पाण्याने अंघोळ केल्यानंतर बिर्याणीचा फडशा पाडला. अभू (म्हणजे ध्रुवचा भाऊ) सोबत रात्री गप्पा मारत मारत, त्याच्या अल्टोतून केलेल्या रेड-दि-हिमालयच्या आणि इतर ड्राइव्हच्या गोष्टी ऐकत मध्यरात्र कधी सरली समजलेच नाही.
सकाळी जाग आली तेव्हा आठ वाजले होते. आजचा प्लॅन लोणारचा होता. तसा बराच लांबचा टप्पा. अंतरापेक्षा जास्त टेन्शन रस्त्याच्या क्वालिटीचे. जालन्यापर्यंत चार लेन्सचा, दुभाजक असलेला सुंदर रस्ता आणि त्यानंतर नसलेला रस्ता सिंदखेडराजापर्यंत. पुढे परत दोन लेनचा समोरुन अंगावर वाहने येणारा रस्ता. जालन्यात पोचताना बायपास घेण्यास चुकला आणि आम्ही जरा लांबचा सार्‍या जालना शहराला वळसा घालून सिंदखेडराजाच्या दिशेने निघालो. अतिशय वाईट चवीचा नाश्ता केला, तसाच अतिशय वाईट रस्ता पुढे सामोरा आला. दोन फुटावर दोन फूट खोल खड्डे, खडी, धूळ, अंगावर उलट येणारी वाहने. कधी एकदा असा रस्ता संपतोय असे झाले होते. त्यात उन्हानेही वैताग आला होता. कसेबसे सिंदखेडराजाला पोचलो, एक चहा मारुन आम्ही लोणारच्या दिशेने सुटलो. हो हो.. सुटलोच. कारण एकेरी रस्ता असला तरी जरा बरा होता. बाईक बुंगवता येत होत्या. लोणारच्या एसटी स्टॅंड आणि आजूबाजूची गर्दी चुकवत मधूसुदन मंदिराची चौकशी केली. अगदी गावात असलेले मंदिर, गल्ल्यांमधून वाट काढत एकदाचे आम्ही मंदिराशी पोचलो. मंदिर मात्र सुरेख होते. परिसर स्वच्छ ठेवलेला. प्रांगणात गरुडस्तंभाचे काही अवशेष पडले होते. मंदिरात कुणीच नव्हते, म्हणजेच एका अर्थी बरेच झाले. निवांतपणे आम्ही आमच्या पद्धतीने मंदिर पाहून घेतले. एक राउंड मारुन झाला आणी आता फोटो काढावेत असा विचार करत असताना एक आवाज आला. एक्सक्युज मी! मी आता मंदिराबद्दल काही माहिती सांगणार आहे. तुम्हांला ऐकायची असेल तर ऐकू शकता. औरंगाबादचा आनंद मिश्रा हा मराठी (होय मराठीच) पुरातत्त्व अभ्यासक त्याच्या मित्रांसाठी मंदिराची माहिती सांगणात होता. आमची मंदिर पाहण्याची पद्धत पाहून आम्हांलाही त्याने सहभागी करुन घेतले. पुढील दीडतास आम्ही त्याच्या तोंडून मंदिर, स्थापत्यशास्त्र, तेथील शिल्पे, अलंकार, मूर्तींचे विविध पैलू, भावभावना, शस्त्रे आदीसंदर्भात ज्ञानामृत प्राशन करत होतो.



लवणासूर नावाच्या दैत्याचा विष्णूने इथे वध केला म्हणून ओळखले जाणारे लोणारचे दैत्यसूदन मंदिर निजामाच्या राजवटीत धर्मांध रझाकारांच्या विध्वंसापासून वाचवण्यासाठी गावकर्‍यांनी एका प्रचंड मातीच्या टेकडीखाली गाडून टाकले होते म्हणून तिथली शिल्पं सद्यस्थितीत शिल्लक राहिली आहेत. परंतु या उपद्व्यापात मंदिराचे दगडी शिखर कोसळले. रझाकारानंतरच्या काळात त्याची डागडुजी करण्याचा जेव्हा घाट घातला गेला तेव्हा उपलब्ध साहित्य (विटा आणि चुना) तत्कालीन स्थानिक (निजामाच्या राजवटीतील मराठवाडा) कौशल्य म्हणजे फक्त मशिदी बांधण्याचा अनुभव. म्हणून नंतरच्या विटांच्या बांधकामात दरवाजांवरुन महिरपी आणि कमानी यांमध्ये मुस्लिम स्थापत्यशैलीची छाप दिसून येते. मंदिराच्या शिल्पांत तत्कालीन व्यापार, श्रद्धा आणि इराणी संस्कृतीशी असलेलेल आपले संबंध दिसून येतात. मंदिरातील दैत्यसूदन विष्णूची मूर्ती एका वेगळ्याच पाषाणाची बनवली असून त्यात चुंबकीय गुणधर्म असलेल्या धातूचा अंश आढळून येतो. बोटांच्या सहाय्य्याने ती मूर्ती वाजवल्यास तिच्यातून घंटेप्रमाणे नाद घुमतो. गर्भगृहाबाहेरच्या खोलीच्या छतावर  विजेरीच्या (टॉर्चच्या) उजेडात आपल्या पुराण कथा मुर्तिरुपात चित्रीत केलेल्या दिसतात. ह्या अप्रतिम मुर्तींमध्ये आपल्याला कंस -कृष्ण, नरसिंह- कश्यप, रासक्रीडा, लवणासूरवध अशा अनेक कथा पहायला मिळतात. ह्या मुख्य मंदिराच्या शेजारी ब्रह्मा, विष्णु, महेश ह्या  तीनही देवतांचे एक छोटे देऊळ आहे. ह्या देवळातील प्राचीन महेशाची मुर्ती चोरीला गेल्याने, तिथे सध्या गरुडाची मूर्ती आहे.


हे मंदिर पाहता पाहताच दुपार झाल्याने ऊन बरेच चढले होते. लोणार सरोवराच्या परिघावर बरीच प्राचीन मंदिरे आहेत. पण वेळेअभावी आम्ही ती न पाहता परतण्याचा निर्णय घेतला. परतीच्या वाटेवर जालन्यात सकाळी हुकलेला बायपास शोधून शोधून घेतला नंतर का घेतला याचा पश्चाताप केला. आख्खी बाइक गिळंकृत करतील असे मोठे खड्डे आणि त्यातून संध्याकाळच्या अंधारात वाट काढत आम्ही जालन्याच्या बाहेर हायवेवर चहा घेण्यासाठी टपरीवर थांबलो. तिथे दोन पोलिस उभे होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जालना शहरात धार्मिक तणाव निर्माण करणारी काही तरी घटना घडली होती आणि म्हणून त्यांनी आम्हांला लवकरात लवकर जालना शहर सोडण्याचा सल्ला दिला. आम्हीही पटकन घोड्यांना टाच मारुन (म्हणजे गाडीला किक) तासाभरात औरंगाबादेत पोचलो.
चार-पाच दिवस राईड करुन आम्ही खरे तर थकलो होतो. त्या रात्री औरंगाबादच्या तारा पानवाल्याच्या समोर उभे राहून ध्रुवने ओंकारला फोन करुन अंतूर किल्ल्याची माहितीही मिळवली. पण शरीराचे उसासे ऐकून मी अहमदनगरला गावी परतण्याचा निर्णय घेतला आणि ध्रुव एकटा दुसर्‍या दिवशी जाऊन जवळचा दौलताबाद किल्ला पाहून आला.
ध्रुव आणि माझ्यातले राइड कोऑर्डिनेशन सुधरवणारी ही एकूण १५०० किलोमीटरची राईड बरेच काही देऊन गेली.  फक्त नजरेने एकमेकांना संमती देणे, खाण्याच्या बाबतीत एकमत होणे, बाइकचे संगीत ऐकणे, वर्षाखेरीस एक मोठा ब्रेक मिळणे, दूरवर बाईकवर असतानादेखील कुटुंबाची आठवण येणे... आणि असेच बरेच काही मिळाले.
काही गोष्टी पाहण्याचे राहून गेले. त्यासाठी परत तेथे जाण्याचा योग घडवायचा असतो. कारण अपूर्णतेतच मज्जा असते.

The woods are lovely, dark and deep,  
But I have promises to keep,  
And miles to go before I sleep,  
And miles to go before I sleep.
-Robert Frost

Related Posts

1 comment:

  1. ahireyogesh16 August 2016 at 22:41

    १ नंबर भन्नाट दौरा आणि लेख.
    मराठवाडा त्यात औरंगाबाद विभागातले रस्ते खऱच कहर आहेत.
    मंदिरांची बांधकाम शैली स्थापत्य मोठा अभ्यासाचा विषय आहे.
    चांगलीच सफर घडवून आणलीस.

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1