शिवजन्म
(ग्राफिक्स सौजन्य: http://kavibhushan.blogspot.
गेल्या आठवड्यापासूनच वरल्या जहागिरदाराच्या वाड्यातल्या पडद्याआड आणि माजघरात लगबग वाढली होती. खारीक-खोबर्यांचे पोते, तुपाचा भला थोरला बुधला, ओवा-बाळंतशेपांच्या पत्रावळींत बांधलेल्या पुडक्या गेल्या आठवड्याच्या जुन्नरच्या बाजारातूनच माजघरात येऊन पडल्या होत्या. नजर-दृष्ट-बाधा नको म्हणून वाड्याच्या बाहेर पडणार्या दरवाजांवर काळ्या बाहुल्या लटकल्या होत्या. तुपाच्या बुधल्याला, सामानाच्या पोत्यांना कोळशाचे तुकडे बांधले होते. कामावरल्या आया-बाया येऊन त्या सामानातले काहीकाही घेऊन मुसळात घालून खलत होत्या. त्यातून बाहेर पडणार्या मऊ मिश्रणात तूप घालून चांगले मळून ते तांब्याच्या डब्यांमध्ये भरुन ते डबे एका पितळी फुलं जडवलेल्या भल्याथोरल्या शिसमी संदूकात रचले जात होते. गोठ्यात बेल्ह्याच्या बाजारातून चार दुभत्या गाई आणून बांधल्या होत्या. गेली दोन महिने एक आजी सिंदखेडच्या जाधवगढीतून इकडे येऊन राहिली होती. ती मध्येच शेजारच्या खोलीत काळजीपोटी डोकावे आणि पुन्हा आपल्या कामाला लागे.
काम म्हणजे तरी काय माजघरातल्या बायांना सूचना देणेच जास्त चालले होते. काय होते त्या खोलीत? एवढी सगळी लगबग कशासाठी चालली होती? कसली तयारी होती? तिची जिज्जी होती. जिजाबाई. शिवनेरीच्या वाड्यात माजघराच्या शेजारीच आतल्या बाजूला बाळंतिणीची खोली होती. तिथे शहाजीराजांच्या जिजाबाईंचा पाळणा हालणार होता. प्रत्येकजण आत जाताना हातपाय धुवूनच जाईल याची पुरेपूर दक्षता ही म्हातारी घेत होती. शिवाय रोज जिजाबाईची दृष्ट काढणे, मानगुटावर बसून खायला घालणे, अवघडलेले कंबर चोळून देणे सगळे एकहाती करत होती. लहानपणापासून तिनेच तर सांभाळले होते जिज्जीला. नवरा गेला तसा आपल्या या दूरच्या आत्याला सरदार लखूजी जाधवांनी आपल्या गढीत आणले होते. घराची आणि स्वतःची अधिकारवाणीने काळजी घेणे हे एकमेव काम तिचे. पण जिज्जी पोटुशी राह्यल्यावर हिला कसचा दम पडतो. तडक जुन्नरला आली. आल्यासरशी सगळी माजघरातली सत्ता आपल्या हाती घेत हवं नको ते पाहत जिजाबाईची काळजी घेत होती.
सकाळची न्याहारी झाली की बराच रिकामा वेळ असायचा. मग ही आत्याआजी तिच्या जिज्जीशी गप्पा मारत बसायची. बाळंतपणाच्या काळात घ्यायची काळजी समजावून सांगायची. कधी तिची जिज्जी तिच्या मांडीवरही डोके ठेवून झोपायची. गप्पांमध्ये मध्येच लखूजी जाधवांचा विषय निघाला की जिज्जीला माहेरची ओढ लागे. खरं तर लखूजी मुघलांकडे चाकरीस गेले तेव्हापासूनच दोन्ही घराण्यांत दुरावा निर्माण झालेला. इकडची तिकडची खबरबात निरोप्याकडून समजत असली तरी प्रत्यक्ष भेट नसल्याचा खेद होई. नवरा निजामाकडे आणि वडील मुघलांकडे. महाखंडाच्या सत्ताकारणात या दोन्ही शाह्यांमधून विस्तवही जात नसे. हे असले असल्यापेक्षा सोडून द्यावी ती चाकरी, आपले जिवाभावाचे सोबती घेऊन रयतेसाठी आपले राज्य तयार करावे, एकोप्याने कारभार करावा, स्वतःचे राज्य – स्वराज्य. असे सुखद स्वप्न जिज्जीला पडे. पण सध्याच्या घुसमटीत आणि शहाजीराजांच्या धावपळीत जीव कासावीस होई. मग आत्याआजी तिला काहीतरी बालपणीच्या गमती सांगून हसते करी. हसून हसून अवघडलेलं पोट दुखेल म्हणून वर रागेही भरी. तिलाही ठाऊक होते आठवडाभरातच घरी नविन पाहुणा येणार आहे.
संध्याकाळी होळी पेटली तशी उगवत्या चंद्राच्या साक्षीनं जिजाबाई गच्चीतून होळीकडे पाहत शिवाईला नवस बोलली. वाड्यातून शिवाईला पुरणपोळीचा नैवेद्य गेला. दुसर्या दिवशी सकाळी वाड्याच्या समोर धुळवड रंगली होती. शहाजीराजांनी दक्षिणेतून खास रंगाची डबी पाठवली होती. आत्याआजीने त्याचा ठिपका जिज्जीच्या गालावर लावला. बाळंतपणाचे तेज, सुंठवड्याने आलेले बाळसे आणि तो रंगीत लाल ठिपका असे गोजिरे रुप पाहून आत्याआजी आनंदली. तिने पुन्हा एकवार जिज्जीची दृष्ट काढली. दोन दिवस कसे सरले समजलेच नाही.
तिसर्या दिवशी मात्र जिज्जीला सकाळपासून कसेसेच होत होते. काहीही खावंसं वाटत नव्हतं. तरी आत्याआजीने मऊ तूपभात बळेबळेच जिज्जीला भरवलाच. दुपारनंतर जिज्जीची झोप उडाली. सारखं परसाकडे जावंसं वाटू लागलं. तशी केस पांढरे केलेली अनुभवी आत्याआजी समजली की आजचाच तो भाग्याचा दिवस. संध्याकाळी जिजाबाईला कळा वाढल्या. तसं आत्याआजीने आणखी एका वयस्कर दाईला जुन्नरहून बोलावून घेतलं. अंधार पडला तसा कळांनी जिजाबाईंना वेढले. आत्याआजी धीर देत होत्या. एकदोन बायका आतबाहेर करत होत्या. शिवनेरीचा किल्लेदारही काळजीने बाहेर वाड्याच्या ओसरीवर येरझार्या घालू लागला. शेवटी शहाजीराजांनी पालनपोषणाची जोखीम त्याच्यावर टाकली होती. बायांनी कढत पाण्याचे हंडे तयार केले. आणि फाल्गुन वद्य तृतीयेच्या चंद्रोदयाच्या सुवर्णक्षणी बाळाचा रडण्याचा आवाज कानी आला. मुलगा झाल्याची बातमी घेऊन आलेल्या बाईला किल्लेदाराने हातातले चांदीचे कडे बहाल केले. तोही आनंदाने नाचू लागला. भानावर येत त्याने एक निरोप्या नवा पोषाख करुन “राजेसाहेबास्नी कळवाय नगं?” म्हणत दक्षिणेला धाडला. सोबत लहानशा चंदनी पेटीत रेशमी खलिता. बाळाच्या जन्माच्या बातमीचा. स्वतःच्या अक्षरातला. उंटांवर साखरेची पोती चढवून जुन्नरच्या पेठांत आणि आसपासच्या गावांत पिटाळली. “धाकलं सरकार आलं”ची दवंडी पिटायला सांगितली. गडावरची तोफ धडाडली. आख्ख्या पंचक्रोशीत आनंदवार्ता घुमली.
रात्री उशिरा सगळे शांत स्थिर-स्थावर झाले. जिजाबाई भानावर आल्या होत्या. बाळाचे रुप पाहून त्याही हरखून गेल्या. चंद्राहून शीतल मायाळू रुप ते, किती गोजिरे. नऊ महिने पोटात राहिलेला हा कळजाचा तुकडा. आज आपल्या हाती आहे. केवढे धन्य वाटले असेल त्या माऊलीला? पटापट त्याचे मुके घेतले. बंद बाळमुठीत काजळाचा ठिपका आत्याआजीने लावून मग दरवाजातूनच सार्यांना त्याचे रुपडे दाखवले. कधीतरी मध्यरात्रीनंतर बाळ दूध पिऊन झोपी गेले.
दुसर्या दिवशी पहाटे जिजाबाई उठली. होळीच्या नवसाची आठवण तिला झाली. आत्याआजीशी मन मोकळे केले. पटापट आत्याआजीने चार निरोप धाडले, आणि अर्ध्या घटकेतच वाड्याच्या दाराशी पहाटेच्या अंधारात मेणा येऊन उभा राहिला. हळूच जिजाबाई मेण्यात बसली, आत्याआजीने बाळ तिच्या मांडीवर ठेवले आणि झडप लावून बंद केला. भोयांनी मेणा उचलला. फाल्गुनात रानात पळस पेटले असले तरी पहाटवार्यात जरासा गारवा शिल्लक होता. बाळाला पहिलाच वारा लागला तो मोकळ्या पहाटवार्याचा. जिजाबाईने त्याला दुकट्यात लपेटून घेतले आणि शिवाईच्या मंदिराच्या गुहेजवळ आल्यावर मेण्यातून खाली उतरली. पूजेची तयारी केली होतीच. मोठ्या भक्तिभावाने देवीला हात जोडून जिजाबाईने डोळे मिटून प्रार्थना केली, “हे देवी, तुझ्याच आशीर्वादाने हे लाभलेले मूल. याचे भविष्यही तुझ्याच हाती आहे. उदंड यश दे याला. तुझ्याच नावावरुन याचे नाव आजपासून शिवाजी ठेवले आहे”. हळूच सावकाशीने उचलून पुजार्याने बाळ देवीच्या पायाशी टेकवून पुन्हा जिजाबाईच्या हाती दिले. आरती झाल्यावर बाहेर आली. समोर उगवतीकडे सूर्य नुकताच उगवला होता. त्याची कोवळी किरणं बाळाच्या राजस मुखड्यावर पडली होती. त्याच्या उबेने बाळानेही हळूच डोळे उघडले. जणू सूर्य आणि बाळ शिवाजी एकमेकांचे तेज जोखत होते. क्षणभर दोघांचेही डोळे एकमेकांच्या दिव्य तेजाने दिपले असतील. मग शेवटी सूर्यानेच जराशी माघार घेऊन स्वतःच्या हाताने त्याचे गाल कुरवाळले असतील. नगारे झडले, तुतार्या फुंकल्या गेल्या, अभिषेकाच्या दुधा-मधाचे पाट शिवाईमंदिरातून वाहिले.शहाजीराजांच्या जहागिरीत आनंदीआनंद पसरला. पुढे शिवाजी एक दंतकथा बनून राहिला. पहिला मराठी स्वराज्यसंस्थापक जाहला, छत्रपती झाहला, अवघ्या भरतखंडाचा राजा जाहला.
कवीभूषणच्याच शब्दांत
दसरथ जू के राम भे बसुदेव के गोपाल ।
सोई प्रगटे साहि के श्री सिवराज भूपाल ॥
उदित होत सिवराज के, मुदित भए द्विजदेव ।
कलियुग हट्यो मिट्यो, सकल म्लेच्छन को अहमेव ॥
दशरथाचा राम हाच वसुदेवाचा कृष्ण झाला व तोच पुढे शहाजी राजांचा शिवराज नामक राजा झाला. शिवरायांच्या अवतरण्याने देव ब्राह्मण आनंदित झाले. कलियुग नाहिसे झाले व म्लेंच्छांचा अहंकार जिरला.
सुंदर, आजच्या दिवशी हा लेख वाचताना, तो सोहळा अनुभवता आला :)
ReplyDeleteसुंदर
ReplyDeletesundar. :)
ReplyDeletell जय जिजाऊ मासाहेब ll
ReplyDeletell जय शिवराय ll
विनोद परब, मुंबई
खुप सुंदर
ReplyDelete