ट्रेकर कसा असतो?
तथाकथित जगाहून वेगळी, पण त्याच जगाशी आपला मेळ राखीत आपल्याच विश्वात रमणारी जमात म्हणजे ट्रेकर्स. तो कसा असतो? ट्रेक म्हणजे कर्मधर्मसंयोगाने घडलेली किंवा मित्र घेऊन जातात म्हणजे करावयाची चैन नाही, तर तो असतो एक धर्म. श्वासा-श्वासांत, नसानसांत भिनलेली एक ऊर्जा. रात्री झोपेत आणि दिवसा जागतेपणे पाहिलेले स्वप्न. ट्रेकरची खरी ओळख म्हणजे हीच. तर हा प्राणी ओळखायचा कसा? सोप्पं आहे हो. खाली दिलेली काही जंत्री जुळली की त्याला खात्रीने ट्रेकर म्हणा.
- केस अगदी बारीक कापलेले आणि दाढी, कल्ले किंवा मिशा काही तरी हौसेने कोरलेली. पण सोमवारी केलेली दाढी आठवड्यात करण्याचा प्रचंड कंटाळा. त्यामुळे फक्त सोमवारी तुळतुळीत दाढी आणि इतर दिवशी खुंट.
- हाताच्या नखांच्या आजूबाजूचे सालं हमखास निघालेली असतात.
- मान, कानांच्या पाळ्या उन्हाने करपलेल्या असतात.
- चेहरा आणि पावडर-फेसक्रीम यांचा संबंध कधीतरी स्वतःच्याच लग्नाबिग्नात आलेला.
- डॉक्टरने कधीतरी गुडघा दुखतो म्हणून ट्रेक कमी करायला सांगितलेले असतात. पण तो सल्ला या पठ्ठ्याने हमखास धुडकावलेला असणार.
- फॉर्मल कपडे आणि शूज म्हणजे एखाद्या जगात सगळ्यात असह्य गोष्ट मानणारा. त्याऐवजी कार्गो ट्राऊझर आणि टीशर्ट ओवणारा (कपडे परिधान करणे नाही, ओवणेच).
- कळकटलेली जीन्स ही घरात बळेच घेतली तरच धुवायची असते असे मानणारा.
- खरेदी करताना या कपड्याची किंवा शूजची ट्रेकसाठी किती उपयुक्तता आहे या एकाच निकषावर खरेदी करणारा.
- ब्लॅक, ग्रे, ब्राऊन, बिज, ऑलिव्ह ग्रीन यापलीकडे रंग असतात हे गावीही नसते
- ट्रेकसाठी वेगळा बुटांचा जोड असलेला. लेदर ऐवजी कॅनव्हासच्या बुटांना पसंती देणारा.
- वुडलॅंडने कितीही आऊटडोअर म्हणून जाहिरात केली तरी बुटांची निरुपयुक्तता कायम जाणून असणारा. त्याऐवजी ऍक्शन ट्रेकर या स्वस्त बुटांना आपले म्हणणार.
- नियमित ट्रेकर कधीच ट्रेकला हाफ बाह्यांचे टीशर्ट/पॅंट किंवा जीन्स घालणार नाही. त्याऐवजी पूर्ण अंग झाकेल असाच टीशर्ट आणि ढगळ ट्राऊझर घालणार. त्यातही वर दिलेले तीनचार रंगच असणार.
- चष्मा असला तरी फायबरच्या फ्रेमचा घेणार.
- प्रवासात कमीत कमी गरजा असलेला. तीन दिवसांच्या मुक्कामासाठीही फक्त एकच लहान सॅक घेणार.
- बाटलीबंद पाणी म्हणजे निव्वळ चैन असे मानणार (किंबहुना माझ्यासारखा ते पाणी अगदी गरम जरी प्यायले तरी सर्दी होणारा).
- मिळेल ते जेवण आणि मिळेल तशी जागा “किती सही आहे” असे म्हणणार.
- कुणीही सोबत असले आणि कितीही वेळा किल्ला पाहिला तरी पुन्हा पुन्हा भटकणार.
- अंताक्षरी-छाप ट्रिप्स आणि पिकनिक्समध्ये काडीमात्र इंटरेस्ट नसणार.
- सिरियल्स पहायची की सर्व्हायवल स्टोरी यावरुन घरी रिमोटची खेचाखेची होणार.
- टीम गेट टुगेदरसाठीही रिव्हर राफ्टिंग किंवा रॉक क्लाइंबिंग अशा ऍक्टिव्हिटीज सुचवणार.
- टाय-डेला हमखास याच्याकडे घालयला चांगला टाय नसणार, पण पन्नास फुटी रोप नक्की असणार.
- सगळे रस्ते माहित असणार. गोव्यापासून कुत्र्याच्या चाव्यापर्यंत सगळी माहिती असणार. कालवणापासून मालवणापर्यंत आख्खी दुनिया पालथी घालणार. पण ऑफिसात कुणी वीकेंडला फॅमिली घेऊन जायला जवळची जागा विचारली तर विचारात पडणार.
- शहरात बाईकने फिरताना वाहतुकीचे नियम पाळणार, हेल्मेट नियमित वापरणार.
- याच्या कीचेनला बायकोने दिलेल्या बाहुली किंवा बदामात कोरलेल्या नावाच्या आद्याक्षराऐवजी कॅरिबिनर आणि होकायंत्र असणार.
- पाकिटात गणपतीच्या फोटोसोबतच एखादे बॅंडएड नक्की असणार.
- चॉकलेट खाल्ले तरी त्याचे रॅपर खिशातच ठेवणार आणि घरी जाऊन डस्टबिनमधेच टाकणार, त्याच्या गाडीचे पीयुसी अपटूडेट असणार.
- वॉशरुममधले उघडे नळ स्वतः बंद करणार.
- मोबाईल घेताना जीपीएसवाला घेणार. ट्रेकचा एक वेगळा मोबाईल आणि बीएसएनएलचे सिमकार्ड असणार. मोबाईलमध्ये लुनार कॅलेंडर आणि डिजिटल कंपास हमखास इन्स्टॉल केलेले असणार.
- आठवडाभर इंटरनेटवर नवनवीन ठिकाणं आणि त्याची माहिती शोधणार.
- याच्या ब्राऊझर बुकमार्क्समध्ये डेकॅथलॉन, प्लेग्राऊंडॉनलाईन अशा साईट्स असणार. हा सतत त्यावर हेडटॉर्च, कॅरिबिनर, स्लीपिंग बॅग, टेंट यांच्या किंमती पाहणार.
- निम्मे इमेल्स फक्त आणि फक्त ट्रेक्सबद्दलचे असणार.
- दिवसातून किमान तीन मित्रांशी ट्रेकबद्दल चॅट करणार, लिंका पाठवणार.
- पुढली जोडून सुट्टी कधी येतेय हे त्याला माहित असणार.
- शुक्रवारीच ऑफिसला जाताना मोठ्ठी सॅक घेऊन जाणार.
- सोमवारी आल्यावर याचे डोळे लाल होऊन तारवटलेले असणार, थोडेसे पाय दुखत असणार, तरीही मोठा तीर मारुन आल्याचा भाव चेहर्यातवर मिरवणार.
- याच्याकडे एकतरी स्विसनाईफ नक्की असणार आणि आणखी जास्त फंक्शनवाला याला हवाहवासा वाटणार.
- अमेरिकेतून येणार्यास मित्राला (किंवा मित्राच्या मित्राच्या मित्राला) मोठा सर्व्हाववल नाईफ आणता येईल का हे विचारणार.
- अनोळखी व्यक्तीला काका, मामा, भाऊ, मावशी, काकू, ताई म्हणायला अजिबात नाही लाजणार .
- एकवेळ दगडूशेठ आणि सिद्धीविनायक कमी वेळा आठवतील पण रतनवाडीचा अमृतेश्वर, रायरेश्वर, वाघजाई अधिक वेळा आठवणार.
- रायगडावर कितीही वेळा जाऊन येणार.
- दिवसातून एकदा तरी कोकणकड्यावरुन झोपून डोकावण्याचे स्वप्न पाहणार.
- “एएमके”च्या ट्रेक कुणी बजेटमध्ये घेऊन जातोय का त्यावर नजर ठेवणार.
- सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणार.
- राजांचा इतिहास माहित असणार.
- गडकिल्ला दुरुन पाहिला तरी छाती चार इंच वर येणार.
- कितीही गबाळा असला तरी स्मार्ट असणार.
Solid ahe ....
ReplyDeleteट्रैकर काय असततो कसा असतो ट्रेकिग दरम्यान जगतो कसा भिडतो कसा निसर्गाशि संन्गनमत होऊन बागतो पडतो धडपडतो उटतो सर्वकाहि तथाकथित आहे
ReplyDeleteEk Number...!!!
ReplyDeletemla pn gheun chala ki trek la.......mitrano
ReplyDeletepankaj ji loksatta la kal vachl khup chan..mla pn firanyacha khup nad ahe ya veli mla pn gheun ja pls...9673030730
ReplyDeletezhati bharun aali dada thod thod mazyashi relate zhal yatun..
ReplyDelete