देव्यासोबत टपरीवर संध्याकाळी चहा पीत होतो तेव्हा अचानक फोन वाजला आणि लगेच पळालो. सगळे टेन्शनमध्ये. निर्णय झाला आणि ऑपरेशन थिएटरमधून बरोब्बर रात्री ११:१५वा. डॉक्टरने आलबेल असल्याची बातमी दिली. त्यानंतरची १५मिनिटे उत्सुकतायुक्त तणावाची. नर्सने हाती आणून ठेवलं... अवघं पंधरा मिनिटे वय असलेलं माझं काळीज! धड पाहताही येईना... सगळं धूसर झालेलं. डोळ्यांतून धारा ओघळून गालावरुन त्याच्या इवल्या हातांवर पडल्या तसं ते काळीज दचकलं. मग जाणवलं आता असं नेहमी होणार. शिवाय बाकीही लोक सोबत आहेत. डोळे पुसताना नेमकं सासरेबुवांनी पाहिलं.
आमचं पिल्लू हातात. आधी कधीच कुणाचं बाळ हाती न घेताही आज जमून गेलं होतं. काही मिनिटे वय असलेलं बाळ सराईतासारखं घेतलं होतं. तेवढ्यात शी सुद्धा करुन झाली होती. काय त्या बापाचं भाग्य. पहिल्या पंधरा मिनिटांत बापाला प्रसाद. आयुष्य बदलून गेलं हो एकदम. तेव्हा पाहिलेल्या अश्रूंवरुन सासरेबुवांनी अंजलीला विचारलंही की मुलगी झाली म्हणून जावईबापू रडले काय? त्यांना काय माहित माझं नशीब किती उजळलं होतं... किती भाग्यवान होतो मी की साक्षात लक्ष्मी-गौरी-सरस्वती घरात अवतरली होती.
तेव्हापासून पिल्लू, ससू, मीतू, शोन्या, बबड्या रोज नवीन नाव. रोज सकाळी माझ्या नसलेल्या ढेरीवर झोपणं म्हणजे नियम झाला होता. दिवस कसा जाई समजतही नसे. ऑफिसमधूनही व्हाट्सआपवर फोटो मागवले जाई. सगळे कैमरा ओव्हरटाईमवर. गौरीसाठी या वर्षीपासून गणपती बसवणं सुरु झालं. कित्येक दुरावलेली नाती पुन्हा जोडली गेली. काय हा पायगुण म्हणावा!
भटकंतीला फ्रिक्वेन्सी कमी झाली पण ती सुरुच राहिली.
झंस्कार ट्रिपला जाताना जीवावर आलं होतं. आख्खे दहा दिवस पिल्लूचा दुरावा... कसा सहन होईल याची शाश्वती नव्हती. तिचा मोठ्ठासा व्हिडिओ रेकॉर्ड करुन घेतला सोबत. प्रवासात कैक वेळा पाहिला, कधी कधी डोळ्यांतून पाणीही ओघळले तर एकदा ढसाढसा रडलोदेखील. काय हे अजब घडले, रानवट पंक्या एवढा भावुक?
अंजली, ही केवढी सुंदर भेट दिलीस तू! आपल्या वेलीवर गोड कळी! बास... सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आता. फक्त तिचे लाड करायचे आणि एक जबाबदार व्यक्ती बनवायचे आपण.
गेले कित्येक महिने घरात छुमछुमचा आवाज कानांना गोड वाटतोय. साताठ दातही आले. पिल्लू लवकरच रांगायला लागले, हळूहळू धरुन चालायलाही लागले, बोबडे बोल अई, ब्बाब्बा, द्दद्दा, क्काका, काये, मम्मं सुरु झाले. गोकुळाचा अनुभव घेतोय आपण. आपलं हे पिल्लू आज एक वर्षांचं होईल. अर्थातच आपण मित्रमंडळींसह एक दिवस साजरा करु. पण आपण गेले एक वर्ष साजरे करतोय आणि यापुढे चिरकाल सेलिब्रेशन करतच राहू. आजचं आपलं वय एक वर्ष!
त्याचंच हे सर्वांसाठी निमंत्रण!
(टीप: आपणाकडे नसल्यास पत्ता आणि फोन नंबरसाठी प्लीज pankajzarekar[AT]gmail[DOT]com वर इमेल करा)
तुमच्याच शब्दात "एक वर्षाच्या बापाला" हार्दिक शुभेच्छा :)
ReplyDeleteKhup Chan Lekh!
ReplyDeleteKhup chan vatala vachun :)
ReplyDeleteekdam sunder lihile ahe
ReplyDeleteखुपच छान
ReplyDelete