एक रणगाडा द्या मज आणुनि!
अति-आदरणीय केशवसुतांची आदरपूर्वक माफी मागून!
एक रणगाडा द्या मज आणुनि, हाकीन मी जो त्वेषाने
पाळुनि वाहतुकीचे सगळे नियम.
धडकी भरेल ज्याच्या त्या आकाराने
एक रणगाडा द्या मज आणुनि
वाहतुकीच्या ओसांडीतले हॉर्न ते भयकारी
होतील ते गपगुमान सत्वरी
रणगाडा समोर असता जबरी
कोण रणगाडा तो मज देईल?
गाड्या-दुचाक्या यांची भेसूर, संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही नियमांना
पोलिसांचा धाक? पुसा मनाला!
रणगाड्याने या सावध व्हा तर!
सिग्नलला ना जुमानिती
दात विचकत उलट्या दिशेने येती
दिसता दिवा पिवळा गाड्या दामटती, कळप बरे यांच्यापरी
चिरडूनी टाकाया त्यांना,
एक रणगाडा द्या मज आणुनि
रस्त्यात वाहने उभी करती
चालक बसवूनि पार्किंगचे पैसे वाचवती
भ्रमनध्वनीवरती खिदळती
सावध! मी ठोकणार तुम्हासी
त्वेषाने रणगाडा हा भिडवूनी
लाल दिवा हा हा विशाल समोर
तरी पुढे पुढे गाड्या रेटती, हॉर्नवरी बसती
मोठ्या सिग्नलला गाड्या बंद तरी करा
फ्री लेफ्ट नच इथे, थोडा धीर धरा.
समोर असे तुमच्या चिलखती रणगाडा
अचानक समोर उलथती,
हेल्मेटशिवाय गाड्या उडवती
उदार झाले प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे, गतशतकांची पापे घोरे
पाहिजे रे! रणगाडा अशांना कुचलाया!
रिक्षावाले नसती थार्यावरी,
टीचभर हात दाखवती, झुरळावानी इकडून तिकडे घुसती
भाडे नाकारुनी, विद्यार्थी कोंबती अपार
नियम नसे हे आम्हांपरी, समज फार दृढ
एक रणगाडा मज हवा, इस्त्री कराया त्यांसी.
‘स्व’चे माजवुनी अवडंबर
वाहतुकीला आणिती अडथळे
पोलिसांशी तडजोड कराया निघाले खुळे
निर्लज्ज ज्यांचे मन असे ना ढळे
चिरडण्या त्यांनाच एक रणगाडा द्या मज आणुनि!
बसही बेफाम धावती, नसती त्यांना दिवे
पिवळ्या बोर्डाच्या कॅब भिवविती
धूर सोडिती रिक्षा, नसे शिस्त अवघ्या जगाला
ठोकण्या त्यांना
एक रणगाडा द्या मज आणुनि !!
एक रणगाडा द्या मज आणुनि !!
मस्त रे! पण यात एक भर घाल अजून ... "drive slowly, students on board" असे मेसेज मिरवत वाट्टेल तश्या घुसणार्या शाळेच्या व्हॅनचं काय करायचं रणगाडा घेऊन ते पण लिवा!
ReplyDelete