Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

चंद्र-मंगळ मोहीम

By Pankaj - भटकंती Unlimited
/ in 2013 चंद्रगड ट्रेक मंगळगड
1 comment
सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात त्रिंबक-दुर्गभांडार-अंजनेरीचा भन्नाट ट्रेक झाल्यानंतर नाशिक रिजनची तर खरंच चटक लागली होती. असं वाटायचं भसाभस नाशकाचे दौरे करावेत. म्हणजे शेर के मुँह को खून की लत पड गयी थी. पण ऑक्टोबरात अस्मादिकांचं "बाप" या पदावर मोठ्ठं आणि गोड प्रमोशन झाल्यानं ‘शेर’चे मायाळू गाय-वासरु झाले होते. शिवाय प्रेमाचा सगळा डोस घरातच वापरला जात असल्याने सह्याद्रीच्या वाटेला काही शिल्लक राहतच नव्हते. पण जशा लेकीला भेटायच्या नावाखाली सासुरवाडीला चकरा वाढल्या तशा त्यांच्या शेजारी पाजारी लोकांच्या नजरा "आलात का परत" अशा अर्थाच्या व्हायच्या आत ती मोनोटोनी बदलायला हवी होती. म्हणून नाशिक नाही तर निदान जरा पुण्याच्या आसपासच्या डोंगररांगांत पाय मोकळे करावेत म्हणून एक लहानसाच (?) दोन दिवसांचा बेत आखण्याचा विचार केला. शिवाय इस्रोने एका मागोमाग एक चांद्रयान आणि मार्स ऑर्बिटर नावाच्या मोहिमांची घोषणा केली, वरताण मंगळावरच्या मोहिमेला यान पाठवून आम्हांला प्रेरणा दिलीच होती तर आम्हीही चंद्र-मंगळाची मोहीम आखली. जिथे शिवरायांनी अफजलखानाला अस्मान दाखवले अशा मोर्‍यांच्या जावळीच्या जंगलात जायचे म्हणून आम्हीही जरा जास्तच थ्रिल्ड होतो. अमित अर्थात ककु (कराडचे कुलकर्णी), आंबेगाव बुद्रुकचे अजय ऊर्फ राजकुमार काकडे आणि दादर-ठाणे लोकलचे धक्के खाणारा (non-प्रांजळ) वाघ असे भिडू यावेळी सोबतीला होते. त्यातला वाघ आधीच राजकुमाराच्या शरणी जाऊन राहणार होता. पण मध्येच एका खंड्याने वाघाची शिकार केली आणि असा त्यांचा असा काही बेत झाला की वाघ राजमहालापर्यंत पोचलाच नाही. शेवटी तो रात्री उशिरा ’ककु’च्या गुहेत आश्रयास गेला आणि दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे मी या दोघांना फोन करुन उठवलं आणि वॉचमनला माझाच फ्लॅट या सोसाय़टीत आहे या थाटात गेट उघडायला लावले. दोघे जवळपास तयार झाले होते. पण त्यानंतर फक्त वीस मिनिटे ककु (अमित) हॉल ते बेडरुम अशा सात चकरा मारुन विसरलेली एक एक वस्तू घेऊन येत राहिला आणि शेवटी कुलूप लावल्यावरही नळ बंद करायचा विसरलाच. फायनली आंबेगावातून अजय काकडे नावाचं झोपेतलं मुटकुळं गाडीत टाकून ककुने जी काही सॅंट्रो बुंगवली ती थेट नटराजला इडल्या हाणायलाच थांबवली.
इडल्या तशा ताज्याच होत्या पण चटणी फ्रीजमधली कालची होती. पण वरुन चहा गेल्यावर ती पोटातल्या पोटात गरम झाली. आज वाघोबांकडे गो-प्रो नावाचं खेळणं होतं, ते पाहता पाहताच भोर फाट्यावरुन वळालो की रस्ता कसा आपला एकदम ओळखीचा वाटायला लागतो. बंद काचांआडून थंडी डोळ्यांना जाणवत होती. निघताना एकमेव अव्हेलेबल असलेली तीन वर्षांपूर्वी गाडीत पडलेली एकमेव गाण्यांची सीडी सिस्टीममध्ये सरकावली आणि ती चालू व्हावी म्हणून हात जोडून धरले. तर काय आश्चर्य... सुरुवातच सुरेल अभंगांनी झाली. मग काय... माहोल जमायला उशीर थोडाच होणार. भाटघर धरण, मांढरदेवी फाटा, भोर चौकातला शिवाजी पुतळा, थोडे पुढे गेल्यावर नेहमी दिसणारे ते आदर्श वडाचे झाड, रोहिडा, रायरेश्वराचा रस्ता हे नेहमीचेच ओळखीचे गडी हातांत हात गुंफून पाठीशी उभे असल्याचा भास घडवत होते. कित्येकदा नीरा-देवघर धरणाच्या जलाशयाच्या साक्षीने वळणांची गुंफण विणत या रस्त्याने वरंध घाटातून कोकणात उतरलो असू पण दरवेळी काहीतरी नवीन गवसतंच. एका ठिकाणाहून छोटा ब्रेक घेऊन नटून थटून आलेल्या नारायणाचे जलाशयाच्या पार्श्वभूमीवर काही फोटो काढले आणि मागल्या वेळी दोन-चार-पाच करताना , कावळ्याच्या वाटेवर ज्या मामांकडे बॅगा टाकल्या होत्या तिथेच भजी आणि चहा आपलासा केला.

वरंध उतरुन गेलो की ढालकाठी नावाचं गाव लागते तिथून कांगोरी ऊर्फ मंगळगडाच्या पायथ्याला जाणार्‍या गावास डावीकडे वळालो. पिंपळवाडी विचारत विचारत आम्ही जात होतो. तब्बल अर्धा तास झाल्यावर आम्ही एकदाचे पिंपळवाडीच्या गोगावले वस्तीला पोचलो.तिथेच अम्याला आणि वाघाला ’वाघ मारायची" लागण झाली. त्यांचे ते सोपस्कार उरकल्यावर आम्ही रस्ता विचारुन घेतला. एक कच्चा गाडीरस्ता वर अर्ध्यापर्यंत जात होता. पण भैरवगडाचा अनुभव गाठीशी असल्याने आम्ही गाडी गोगावलेवस्तीच्या शाळेपाशीच लावली. पाणवठ्यावरुन पाणी भरुन घेतले आणि समोरच्या वाटेन वन-टू-वन-टू सुरु केले. घाटमाथा उतरुन आलो की कोकणातले किल्ले तसे कस काढतातच. घाम निघत होता, धाप लागत होती, पाणी रिचवत आम्ही वाट काटत होतो. पण कातळकड्याच्या खालचे मधल्या टप्प्याचे पठार काही येईना. माथा तर दिसतोय पण वाट सापडेना. मग काय... केला सुलतानढवा... आणि गाठले पठार. पठार होते मात्र सुंदर... नुकत्याच परत गेलेल्या पावसाने कमरेइतके वाढलेले गवत चढत्या वाटेसरशी छातीइतके आणि पुढे डोक्याइतके झाले होते. पठारावरुन कड्याच्या डाव्या अंगाने ठळक वाट वर कातळाच्या बगलेतून आडवी जाते आणि पुढे वर चढते. जंगल आणि कारवीच्या झाडीतून जाणारी वाट संपली की गडाचा पहिला दरवाजा. आणि त्यापलीकडे त्याचे माची.
दरवाजातून आत गेल्यावर लहानशी खिंड आणि डाव्या हाताला विस्तीर्ण माचीची सोंड घुसली आहे. त्याच्या टोकाशी कांगोरीनाथाचे मंदिर. वाटेवर जाताना उजवीकडे मोठे टाके. पाणी इमर्जनीमध्ये पिण्यायोगे आहे. लहानशी घुमटी सोडली तर बाकी सगळं मंदिराचं पंधरावीस फुटी आवार उघडं बोडकं. कधीकाळी बसवलेले पत्रे उडून गेलेत. आवारात स्वयंपाकाची काही भांडी आहेत. म्हणजे मुक्काम करावा लागला तर सोय होईल. आपलं काम झालं की ती नीट स्वच्छ करुन ठेवायची अशी अपेक्षा असते. घुमटीत काही नीट, काही भग्न मूर्ती, अनेकांनी कांगोरीनाथाला वाहिलेले धातूचे घोडे, काही समया. तिथेच असलेल्या बाटलीतल्या तेलाचा वापर करुन आम्ही तिथे दिवा लावला. थोडा आराम केला आणि मंदिराच्या मागे असलेला बुरुज, तटबंदी पाहून परत बालेकिल्ल्याकडे निघालो. माचीच्या टोकावरुन आम्ही मोहनगड, रायरेश्वराचे नखिंड, प्रतापगड अशी ओळखपरेड घेत चंद्रगडही शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केला गेला. खिंडीत परत येऊन बालेकिल्ल्याच्या डाव्या अंगाने बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट धरली. ती वाट जिथून वर चढली होती तिथे दाट झाडी माजली होती. पायात काही ठिकाणी पायर्‍या ठेचकाळत होत्या हीच काय ती योग्य वाटेवर असल्याची खूण. डावीकडे एक मोठी बांधीव विहीर आहे. त्याच्यापुढे डोक्याएवढे उंच गवत, झाडी आणि वाड्यांचे काही अवशेष ... सगळाच मामला दाट गवतात. सगळे नीट पाहून घेतलं आणि परत फिरलो आणि खिंडीत येऊन थोडा आराम करुन पायथा गाठला. येताना एके ठिकाणी गवताखाली दगड न दिसल्याने माझा पाय असा काही मुरगाळला की असा काही विव्हळलो की किंकाळीचा आवाज पंचक्रोशीत घुमला असेल. कळवळून तिथेच आडवा पडलो आणि जरा आराम घेतला. पुढचा उतार सगळा नीट सावकाश पावलं टाकत उतरला आणि पुन्हा गोगावलेवाडीत पोचलो. शाळेशेजारील पाणवठ्यावर फ्रेश झालो आणि शेजारच्या "सुपर मार्ट"मध्ये राजकुमारांच्या आवडीचे पेय म्हणजे "थंपास" प्यायले. तिथे चिक्की आणि बिस्कीटे घेऊन आम्ही चंद्रगडाकडे जायला महाडच्या दिशेने निघालो तेव्हा दुपारचे साडेतीन वाजले होते. सकाळी खाल्लेल्या स्टीम्ड इडल्यांची एव्हाना फक्त स्टीम शिल्लक होती. महाडवरुन पोलादपूरच्या दिशेने गाडी दामटली पण एक डोळा सदैव रस्त्याच्या कडेला कुठे बरे हॉटेल दिसतेय का याकडे लागून होता. तसे दिसताच तिथे गाडी घालून मेनू कार्डकडे न पाहता डोळे झाकून चिकन हंडी, बटर रोटीची ऑर्डर सुटलीदेखील. पोटोबा शांत झाल्यावर पोलादपूरवरुन गाडी डावीकडे महाबळेश्वरच्या दिशेने घातली, सावित्री धरणाच्या कडेकडेने जाणार्‍या रस्त्याने कापडे गावात येऊन पोचलो. कापडे गावात थोडं मुक्कामासाठी वाण-सामान भरलं. त्यावरुन आठवलं घरी वाण-सामान भरलं नाही म्हणून ट्रेकला निघतानाच टोमणे पडले आहेत. तर असो... घरोघरी मातीच्या चुली !!!
चंद्रगडच्या पायथ्याचे गाव म्हणजे ढवळे. कापडे गावातून ढवळे फाटा आहे. तो जातो नरवीर तानाजी मालुसर्‍यांच्या उमरठ या गावातून. आम्हांला अर्थातच ते स्मारकही पहायचे होते. ढवळे गाव पंचवीस किलोमीटर आणि पोचायला साधारण तासभर असा अंदाज धरुन आम्ही निघालो होतो. पण रस्ता एवढा ओम पुरीछाप होता की ढवळ्याला पोचायला तब्बल दोन तास लागले. ढवळे १२ किमी असा मैलाचा दगड पाहिला तेव्हाच सूर्य अस्तावला होता आणि हळूहळू संध्याकाळचे धुके सभोवतालच्या दरीवर विळखा घालत होते. आम्ही सातच्या सुमारास ढवळे गावात पोचलो, तेव्हा चांगलाच अंधार पडला होता आणि आमचा मुक्कामास पौर्णिमेच्या रात्री ढवळी नदीचा काठ गाठण्याचा बेत फसला आणि गावातल्या मंदिरातच झोपण्याचा शहाणा निर्णय झाला. ढवळे गावातल्या रवी मोरेला शोधले आणि त्याच्या पडवीत जरा वेळ आराम करुन त्याच्या वडिलांशी गप्पा झोडल्या. आख्खं आयुष्य जावळीचं जंगल पाहिलेला माणूस, गाठीला दांडगा अनुभव, त्यात सार्‍या कुटुंबालाच भजनाचा मृदंगाचा ध्यास. मुंबई-पुण्यातले मोरेंचे नातेवाईक, त्यांचे पोलिस-मिलिटरीतले सोयरे, जावळीतली जनावरं, त्यांची विळी, कमरेचे अडकावणे अशा एकदम आडव्या-तिडव्या गप्पा मारुन झाल्यावर आम्ही आमच्याकडचे मॅगी करुन घेतले आणि ते पोटात ढकलून जरा निवांत होतो नाही तेच तांब्याभर दूध उकळून आमच्या समोर आलं. त्या पौर्णिमेच्या दुधाळ चांदण्या रात्री साखर घातलेले ते दूध पिऊन आम्ही जे काही झिंगलो म्हणता... विचारता सोय नाही.
नंतर निवांतपणे साडेनऊला ढवळे गावाच्या आसपासच्या रस्त्यावर ओढ्याकडे चक्कर टाकली. जगन्नियंत्याने पिठूर चांदणे ढवळी नदीच्या खोर्‍यात शिंपले होते, थंडगार वारा वाहत होता. चांदण्याचा सुगंध रोमारोमात भिनला होता. गोठ्यात गाईंच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिणाट शांत होत आलेला. एखाद्या घरातले बाळ कुरकुरत होते. अगदी कानाशी चाललंय असं वाटणारा गावातल्या भजनाचा सूर टिपेला भिडला होता. त्या टिपूर चांदण्यात रात्रीच्या फेरीचा आनंद आम्ही घेत होतो. मंदिराच्या पडवीत परतलो तेव्हा कीडामुंगीचा त्रास नको म्हणून तंबू उभा केला. काही भिडू त्या मंदिराच्या पारावर गप्पा टाकीत बराच वेळ बसून होते.
सकाळी उठून चहा घेऊन रवीच्या सोबतीने आम्ही चंद्रगडाच्या दिशेने कूच केले. वाटेतली कोळीवस्ती मागे टाकली की एक पुसट वाट जंगलात घुसते. जावळीचे जंगल म्हणजे काय चीज होती ते प्रत्यक्ष अनुभवत होतो. आता माणसांचा पायरव वाढला असूनही अगदी वीस फुटांवर माणूस आला तरी दिसणार नाही अशी जाळी. प्रकाशाकिरणांना शिरायलाही अगदीच जंगलाने उपकार केल्यासारखी जागा दिलेली. त्यातून कुठेतरी तळाशी येऊन किरणांनी रांगोळी रेखलेली. तासाभराच्या चढणीनंतर आम्ही म्हसोबाच्या खिंडीत पोचलो. तिथे थोडा आराम करुन वरच्या दिशेने नजर टाकली. आता वाट अगदी छातीवरच आणि घसार्‍याची. नेटाने पाय रोवून वर चढावे असेच. वीस मिनिटांतच आपण पहिल्या चौकीशी पोचतो. उजवीकडे दूरवर महाबळेश्वरचे आर्थरसीट डोंगराच्या आडून डोकावत असते. त्याच्यासमोर एक आडवाच्या तिडवा डोंगर पसरलेला. चंद्रगडाच्या कड्याच्या अंगाने सूर्य त्याची किरणं फेकीत होता. वाटेत ठिकठिकाणी झाडांवर ठोकलेले ओम नमः शिवायचे फलक म्हणजे आपण योग्य वाटेवर असल्याची खात्री. अर्थात सोबत रवी असल्याने चुकण्याची शक्यता नव्हतीच. आणखी पाऊण तासाने आम्ही माथ्यावर पोचलो.
माथ्यावर उघड्यावर एक सुबक नंदीशिल्प आणि महादेवाची पिंड. वर्षानुवर्षे अशीच उघड्यावर ऊनवारा झेलीत. त्या रुद्राला ना राऊळीची आस ना कुणा भक्ताच्या फुलांची. तिथे बाटलीतल्या पाण्याने रवीने त्याला अंघोळ घातली आणि अगरबत्ती लावली. तिथून आणखी थोडे पुढे बालेकिल्ल्यावर काही वाड्यांची जोती आणि उत्तर टोकाशी एक दिंडीवजा दरवाजा. तो उतरतो समोरच्या बुरुजात. बुरुजाशीच एक पिण्याच्या अमृतासमान थंडगार पाण्याचे टाके. तिथे आम्ही थोडे ताजेतवाने होऊन परत फिरलो. तासाभरात म्हसोबाची खिंड आणि कोळीवस्तीमार्गे ढवळे गावात उतरलो. कोळीवस्तीवर भात झोडण्याचे काम चालू होते, त्याचे काही छान फोटो मिळाले.
परतीच्या वाटेत येता येता खोपडचा मोरझोत नामक धबधबा आणि उमरठे गावात तानाजींची आणि शेलारमामांची समाधीचे दर्शन करुन कापडे गावातून आंबेनळी घाट चढायला लागलो तेव्हा दुपारचे दीड-दोन वाजले होते. प्रतापगड फाट्याला पुन्हा एकदा चिकनहंडी आणि बटररोटी अशी डोळेझाक ऑर्डर देऊन आत्मशांती करवली. पुन्हा परतीच्या रस्त्यावर तोच सोपस्कार घडला.... डिस्कशन = व्हॉट नेक्स्ट !!

Related Posts

1 comment:

  1. Satish Chandratre6 August 2014 at 02:12

    ...हाती चार चाकी असेल तर वाटेल तसे आणी वाटेल तेंव्हा फिरता येते....त्यातुन मने जुळणारा ग्रुप असेल तर धम्माल.

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1