पुन्हा एकदा नळीच्या वाटेने
आजकाल हरिश्चंद्रगडाचा पिकनिक स्पॉट झालाच आहे. उगाच खिरेश्वर आणि
त्याहून अधिकच सोप्पी अशी पाचनईची वाट अशा वाटांमुळे अट्टल ट्रेकबाज
हरिश्चंद्रगडाच्या पंढरीला (खरं तर जत्रा) बर्याच अंशी मुकला आहे. तरी
अजूनही अशा भटक्यांचा कस लावणार्या वाटा बर्याच अंशी कमी वर्दळीच्या
राहिल्यात. त्यातही खरा कस लागतो तो त्याचे मुख्य आकर्षण असलेला एक
किलोमीटर खोल असलेला कोकणकडा नळीच्या वाटेने उभाच्या उभा पायथ्यापासून चढत जाण्यात.
हरिश्चंद्रगड (सिरियसली) करणार्या लोकांमध्ये दोन प्रकार असतात.
१. हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने करण्याची इच्छा असलेले.
२. हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा असलेले.
मी
दुसर्या प्रकारातला असलो तरी पहिल्या प्रकारातले ध्रुव, अजय आणि परिक्षित
बर्याच दिवसांपासून मागे लागले होते. मग काय आम्हांला कसलेही निमित्त
चालते.मागल्या वेळी गेलो तेव्हा वाट चुकल्यामुळे बराच वेळ वाया गेला होता.
पण
यावेळी वाट माहित होती. त्यामुळे यंदा रेकॉर्ड वेळात वर पोचण्याचे ध्येय
होते. शिवाय त्या सॅकचे दृष्टीने वजनही कमी ठेवले होते. सख्खा कॅमेरा घरी
ठेवून लहानसा कॅमेरा घेतला होता.हरिश्चंद्रगड (सिरियसली) करणार्या लोकांमध्ये दोन प्रकार असतात.
१. हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने करण्याची इच्छा असलेले.
२. हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा असलेले.
पुण्याच्या बाहेर पडायला शुक्रवारचे रात्री साडेआठ झाले. ऐन वेळी अनुप ऊर्फ बोक्या जॉईन होणार होता. तो कल्याणहून डायरेक्ट मोरोशीला पोचणार होता. आणि आम्ह जुन्नर मार्गे माळशेज घाटात जाण्याचा निर्णय घेतला. गणेशखिंड मार्गे. अमावस्येच्या रात्री अकरा वाजता निर्जन अशा गणेश खिंडमार्गे घाटातून अतिशय खराब रस्त्याने गाडी चालवताना खरे तर चोर-लुटारुंचे टेन्शन आले होते. पण आता परत फिरणे आणि आळेफाट्याला जाऊन पुन्हा माळशेजकडे येणे शक्य नव्हते. अजयचा गाड झोपेमुळे खराब रस्त्यावर गाडीच्या मागच्या सीटवर कोप्रा-टू-कोपरा फुटबॉल झाला होता आणि पर्या दोन सीटांच्या मधून डोके पुढे काढून टेन्स होऊन समोरच्या काचेतून पाहत होता. माझ्या हाती दांडके आणि ध्रुवच्या हाती स्टिअरिंग. जोरात दामटवीत कसेबसे खिंड पार केली आणि मीही जरासे चेंज म्हणून सिस्टीमवर गाणे लावले. निशःब्द रात्रीला जणू बोल फुटले आणि आमच्या तोंडून सुस्कारे. आम्ही माळशेजला पोचलो. घाट उतरुन "साई-दरबार" हॉटेलमधून हायवेच्या मैलभर आतमध्ये उभ्या असलेल्या बोक्याला उचलला आणि वल्हिवरे aka बेलपाडा गावात पोचलो तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता. पटकन एका घराच्या ओसरीत आडवे होऊन पडी मारली ती दुसर्या दिवशीच्या ट्रेकला विश्रांती म्हणून. नाहीतर झोप कुणाला येणार होती? नळीच्या वाटेचा कंड होता ना सगळ्यांना.
पहाटे जाग आली तेव्हा साडेचार वाजले होते आणि खिडकीतून दिसणार्या पूर्वेकडल्या फटफटलेल्या आकाशाच्या तुकड्यात रोहिदासची सावली डोकावली होती. तेव्हाच कोकणकडा साद घालतोय असं वाटून गेलं. तरी बाकी मंडळी अजून झोपेत असल्याने गेल्या वेळची नळीची वाट आठवत तसाच पडून राहिलो. कुठे रस्ता चुकला होता, कुठे वळायचे, कुठेपर्यंत झाडांची सावली आहे हे अजूनही शाबूत आठवत होते. वाटेची उजळणी झाली आणि तोवर बाकी मंडळी उठली. दरम्यान रात्री अजून एक ग्रुप आला होता, ज्यांना नळीची वाट करुन वन-डे रिटर्न जायचे होते. आम्ही मनोमन हसून घेतलं. सकाळी आण्हिकं उरकली तेव्हा बेलपाड्यातून कोकणकड्याचे दृष्य वेड लावत होते. कुठल्याशा पुस्तकात वाचलेलं आठवतं. बेलपाड्यातून दिसणारा कोकणकडा हा भव्य रंगमंचासारखा दिसतो. ज्यावर सुर्याची प्रकाशयोजना हळूहळू सुरु होते. ते आम्ही याचि देहि, याचि डोळा पाहत होतो. कड्याच्या मागून तांबडं फुटलेलं, राकट तरीही आपला दिसणारा कोकणकडा. तालमीतल्या वस्तादासारखा शड्डू ठोकून डाव टाकायला आव्हान देणारा, तरीही कुठे चुकलं तर पाठीवर हलका धपाटा घालून मार्गदर्शन करणारा.
चहा घेऊन कोकणकड्याची वाट चालू लागलो. काही अंतर गेल्यावर काळू नदीचे पात्र हाच आपला ट्रेक रुट होऊन जातो. नळीत गेल्यावर माकडं त्रास देतात, वरुन त्यांची हालचाल झाली तरी दगड-धोंडे कोसळतात म्हणून नळीच्या आधीच जंगलातल्या नदीच्या पात्रातल्या एका विशाल कातळावर आम्ही टेकलो आणि न्याहारी बाहेर काढली. अजयने आणलेले थालिपीठांचा फडशा पडला. त्यानंतर पुढे हळूहळू झाडी विरळ झाली आणि उरले फक्त दोन्ही बाजूंनी आकाशात घुसलेले नळीचे कातळ. छातीवर येणारा चढ. खुरटी झुडपं आणि कधी डोक्याएवढे उंच कातळ तर कधी नखाएवढे खडे. कधी पुढे एकून पंचवीस-पंचवीस फुटी रॉकपॅचेस. नळीच्या वाटेचे वैशिष्ट्य असे की जेव्हा आपण पूर्णपणे थकतो आणि exhaust होतो तेव्हा रॉकपॅचेस सामोरे येऊन आव्हान देतात. तिथे दम टिकवून ठेवणे आणि ते पार करुन जाणे यातच या वाटेचे यश सामावले आहे. हलक्या काळजाच्या ट्रेकर्सनी किंवा पिकनिकर्सने या वाटेच्या वाटेला कदापि जाऊ नये.
थोडासा ट्रिकी आणि अवघडसा मुळीचा पॅच चढून, दोराने बॅगा वर खेचून एक धोकादायक ट्रॅव्हर्स मारुन गेलो की एका माथ्यावर पोचतो. तेथून जंगलातून वाट काढत आपण चटके देणार्या कातळावरुन एका पठारावर पोचतो. तिथे जराशा गार सावलीला थोडा आराम केला आणि थोडेसे खाऊन घेतले. घरी फोनाफोनी करुन सर्वकाही आलबेल असल्याची वर्दी दिली आणि आम्ही शेवटचा टप्पा ओलांडून कोकणकड्याच्या माथावर पोचलो. दुपारचे दोन वाजले होते. ऊन मी म्हणत होते. पण पुन्हा एकदा नळीच्या वाटेने वर आल्याचा आनंद गारव्यासारखा सुखावत होता. शरीर पूर्णपणे थकले असले तरी मन आता हिंदोळ्यावर झोके घेत होते. कड्याशी आता बरीच वर्दळ असते. तिथेच आमचा मंगेश भेटला. एकदम गळाभेट झाली. छान वाटले त्याला तिथे पाहून. तिथल्याच एका झोपड्यात मिळालेले ताक लिंबू सरबत पिऊन आम्ही जरा आडवे झालो ते सुर्यास्ताच्या वेळेपर्यंत. आताशा बरीच जत्रा जमा झाली होत. उगाच सूर्य हातात धरल्याचे, गिळ्याल्याचे, फुटबॉल सारखा उडवल्याचे फोटो पिकनिकर्स काढत होते. त्यांच्या माकडचाळ्यांना जरा दूर टाकून आम्ही थोडे पुढे गेलो आणि सृष्टीचा तो अवर्णनीय सोहळा अनुभवत बसून राहिलो. जणू काही आज उरलेले रंग सगळे आमच्या अभिनंदनासाठी याही वेळी आकाशात उधळले होते. सुर्यास्तानंतर कोकणकडा निर्मनुष्य झाला तेव्हा आम्ही हाती चहाचे पेले घेऊन तिथे पाय पसरुन बसलो. अजूनही सुर्यास्ताच्या रंगांची आणि आमची खाजगी मैफिल शिल्लक होती. त्यात भीमण्णा, कुमार गंधर्व आणि बासरीच्या काही सुरावटींनी अजून बोनस रंगभरला. आज पुन्हा ते नळीच्या वाटेचे स्वप्न दुसर्यांदा पाहिले होते. पुढल्या पिढीला सांगण्यासारखे बरेच काही जमा केले होते. कोकणकड्यावरच मुक्काम करण्याचे स्वप्न बरेच दिवस उराशी बाळगलेले. जेवण केली आणि तेही पू्र्ण केले. अमावस्येच्या रात्री आकशात नक्षत्रांची रांगोळी तेजाळत होती आणि आम्ही त्याखाली उबदार स्लिपिंग बॅगमध्ये उताणे पडून, दोन्ही हात उशाशी घेऊन निद्रेच्या अधीन होत होतो.
सकाळी जाग आली तेव्हा उजाडून गेले होते. वारा मी म्हणत होता. कोकणकड्यावर पुन्हा पिकनिकर्स आले होते. पण आम्ही आमचे उरकून नवीन काही पाहण्याच्या दृष्टीने परतण्याचे बेत करत होतो. फारच कमी लोकांना माहित असलेला बैल घाट आणि कोकण दरवाजामार्गे खाली पाचनईला उतरुन सादडे घाटाने बेलपाडा गाठायचा होता. सुरुवातीला रस्ता सापडला नाही. पण नंतर मिळाला. दरम्यान कड्यात खोदलेल्या पंधरा-वीस पायर्या, एक गुहा ज्या आजवर कधीच पाहिल्या नव्हत्या त्याही दिसल्या. कल्याण दरवाजाची वाट ही अतिशय दाट झाडीत लपलेली आहे. तीमार्गे उतरताना तीन दरवाजांची माळ आणि तटबंदीचे काही अवशेष पाहता आले. हा एकदम unexplored रुट बोक्याला माहित होता. परंतु तिथून नाळेतून खाली पाचनईला पोचायला आम्हांला चार तास लागले होते. भर दुपारी पाचनईच्या सपाट रानातून चालत आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. पाणी शोधून दुपारी चूल पेटवून चहा केला आणि पुन्हा झाडीत लपलेला सादडे घाट शोधला. सादडे/साधले घाट हा असाच एक निरुंद नळीचा मार्ग. दोन्ही बाजूंनी आकशात घुसलेले कडे आणि मधून घसार्याची वाट. अतिशय थकवणारा आणि गुडघ्यांची वाट लावणारा सादडे घाटही पूर्ण करुन आम्ही बेलपाड्यात पोचलो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. एकूण आठ तासांची उतराई करुन बेलपाड्यात पोचलो तेव्हा मावळत्या रंगात न्हाप्ता बेलपाडा आणि केळेवाडीला पहारा देत होता. धूळ उडवीत गुरे गोठात परतली होती, बाया सरपणाचे ओझे घेऊन वाटेवरुन परतत होत्या. गावात पोरं धुळीत घेळत होती. काही ठिकाणी झाडलोट चालली होती. गावात आलो तशा बॅगा खाली सोडल्या आणि फ्रेश होऊन परतीचा मार्ग धरला.
परत आलोय ते बुटांचे फोड आलेले पाय, सुजलेले खांदे, दुखरे गुडघे, दुखरी पाठ, तारवटलेले डोळे, असे "स्वीट पेन्स" घेऊन. सोबतीला राठ झालेले केस, करपलेल्या माना, घामेजलेले अंग आणि "सुखी माणसाचा सदर" म्हणजे ट्रेकर्सचे टीशर्ट्स आणि सॉक्स आहेतच.
पंकज अभिनंदन
ReplyDelete