भर उन्हात चांदण्याचा आणि नक्षत्रांचा अनुभव कधी घेतलाय? आज घ्या मग…
पायथ्याशी गावात गाडी लावली तेव्हा दहा वाजत आलेले. आणि चढत्या उन्हात
रस्ता विचारुन चालायला सुरुवात केलेली. सोबत एक अगदी आपले लोक आणि
एक“शामु”. चढत्या श्वासाने धाप लागली. धुळाटीच्या वाटेवरची जडशी धूळ
कपड्यांवर विसावली. केसांतून थंडगार घामाची धार ओघळताना जाणवे. पानगळ
झालेली, रानांनी तुरळक पळस पेटलेले, उन्हाच्या झळांनी रानाचे ते चित्र
हलताना भासे.
Mulay&Co
पाऊण तासांनी गर्द राईत शिरताना अचानक अंधार झाला. त्याची शीतलता नजरेला
सुखावून गेली. सभोवाताली गच्च रान. प्रकाशालाही शिरायला जागा
नाही.जंगलाच्या छताला आकाशीच्या सुर्याचे बिलोरी झुंबर टांगलेले. त्यांचे
कवडसे आकाशात जणू फेर धरुन नाचत आहेत. अवती भोवती कवेत मावणार नाहीत अशा
झाडांचे बुंध्यांचे खांब आकाशात सरळसोट घुसलेले. धिप्पाड योग्यासारखा
त्याचा आकार आणि माथ्यावर जटांसारखा पर्णसांभार, अनेक युगे तप करत
असलेला.अंगाखांद्यावर खेळणार्या तरुलतांचेही भान त्या योग्यास नाही.
बिलोरी छताला पोटरीपासून करंगळीपर्यंतच्या सर्व जाडीच्या वेलींची छतांपासून
पायथ्यापर्यंत तोरणे लागलेली. खाली सुबक रानवाटांची रांगोळी.
जंगलाची जमीनही रात्रीच्या आकाशासारखीच. काळीशार, थंडगार. मधेच पिवळ्या
पिवळ्या, जांभळ्या, गुलाबी रानफुलांच्या चांदण्यांची नक्षत्रांची
नक्षी.त्यावर छतामधून टांगलेल्या झुंबरांचे चुकार कवडसे थेट जमिनीशी
पोचलेले.मधूनच दिसणारे फुलत्या पळसांचे निखारे. रानभर वेडावणारा आंब्याच्या
मोहराचा सुगंध. दूरवर सुतारपक्ष्याने ठेका धरलेला. कस्तुराने त्याच्या
तालावर मंजुळ स्वर लावलेला. अगदी भुंग्याचा आणि मधमाशांचा तानपुराही
स्प्ष्ट कानांपर्यंत पोचता होत होता. त्या तालावर फुलपाखारांची थिरकणार्या
अदा.दूरवरुन येणारा अस्पष्ट ओढ्याच्या पाण्याचा आवाज. सुभग, लालचुटूक
निखार,नावासारखाच राजबिंडा युवराज सगळेच आपापली हजेरी लावून गेलेले. सोबत
आमच्या“शामु”चे ‘बोबले’बो. शब्दशः वेड लावणारे हे सगळेच. स्वतःला हरवून
टाकणारे.काही ताडाच्या झाडांना मडकी बांधलेली. एवढीच काय ती आसपासची मानवी
खूण.
भरीस भर म्हणून की काय. समोर त्या गर्द राईत एक देवालय. आतमध्ये डोंगराच्या
दरडीत आदिशक्तीची ठसठशीत कुंकू लावलेली तरीही प्रेमळ दिसणारी मूर्ती, समोर
ताजी फुले वाहिलेली. थंडगार गाभारा. एक दीड फुटाची सुंदर घंटा. त्याला
हलकासा स्पर्श केला तरी कित्येक आवर्तने घेणारा तिचा सुंदर नाद. खरंच ती
घडवणार्या कारागिरालाही या राईनेच प्रेरणा दिली असणार.
याच आधिशक्तीच्या नावे राखलेली ही सुंदर देवराई, मंदिर, अंधार,चांदण्या,
पाखरांची गाणी, उन्हाच्या कवडशांचा झिम्मा, आंब्याच्या मोहराचा सुगंध…
पुन्हा पुन्हा बोलावणारी, वेडावणारी, मोहरुन टाकणारी…!!!
0 comments