वारी हरिश्चंद्र
संक्रांती-पंचमीच्या सणाला
सासुरवाशिणीला जशी माहेरची आणि आषाढात वारकर्याला पंढरीची ओढ लागते तशीच
काहीशी ओढ आमच्या सारख्या एसी आणि पीसीच्या जगात नांदणार्या भटक्या
जमातीला पावसाळ्याच्या सुरुवातीला लागलेली असते. कधी एकदा वळिवाचा पाऊस
मुर्हाळी येतो आणि आम्हांला माहेराला बोलावतो असं होतं. त्यात
हरिश्चंद्रगड म्हटले की आम्ही कधीही ढुं***ला पाय लावून उधळायला
तयार.हाडाचा वारकरी जशी आषाढी-कार्तिकी चुकवत नाही तसाच हाडाचा ट्रेकर
वर्षातून किमान दोनदा तरी हरिश्चंद्राची वारी करतोच. पण तिथली गर्दी नकोशी
होते.वीकेंडच्या कुठल्याही संध्याकाळी किमान पंचवीस जण कोकणकड्याच्या
रेलिंगला लटकत आपापली फेसबुक फोटोची हौस पुरवीत असतात. आता गेल्या
फेब्रुवारीतच मागची वारी तशी जरा कमी गर्दीच्या नळीच्या वाटेने करुन कस
लावून घेतला होता. म्हणून आम्ही यंदाची वारी वीकेंड सोडूनच आखली होती. तीन
पूर्ण दिवस हरिश्चंद्राच्या अंगाखांद्याशी यथेच्छ बागडावे. यंदा नव्याने
येणार्या पावसाळी ढगांना कडकडून मिठी मारावी, त्यातून तयार होणारा
इंद्रवज्र नावाचा सृष्टीचा चमत्कार पुन्हा एकदा अनुभवावा आणि एकूणच लाईफ
रिचार्ज करुन येण्याचा बेत आखला.या वेळचे वारकरी होते माझ्यासह पर्या,तेजस
(चिन्या) आणि अमोघ-दिप्तीची नवरा-बायकोची जोडी.
आदल्या रात्रीच अमोघ आणि दिप्ती माझ्या घरी डेरेदाखल करुन घेतले आणि भल्या पहाटे गाडी तेलपाणी करुन नारायणगाव-ओतूर-ओझर-कोतूळ-राजू रमार्गे
पाचनईत आणून उभी केली. नारायणगाव सोडल्यानंतर हायवेचा निरसपणा जाऊन
सह्यकडे आकाशात झेपावलेले दिसू लागले.ढगाळ वातावरण, थंड हवा, शिखरांची
ढगांशी चालू असलेली सलगी असे असताना गाडीतल्या एसीची कुणाला गरज आहे?
पंढरीच्या विठूचा पुंडलिक असतो तसा अखिल हरिश्चंद्र वारकरी संप्रदाय
मंडळाचा पुंडलिक म्हणजे पाचनईचा भास्कर फाट्यावर येऊन वाटच पाहत होता.
त्याच्या घरी गाडी लावली आणि जड सॅक्स पाठीला बांधल्या. संध्याकाळी ये असा
निरोप देऊन भास्करच्या घरट्यापासून निघालो. त्यात आणलेल्या शिध्यामध्ये
नेहमीच्या शिरस्त्याला फाटा देऊन काहीही स्वीटडिश आणलेली नाही हे ऐकून मी
पर्याला शिव्यांचा लाखोलीच वाहणार होतो, पण या वेळी “लेडीज मेंबर” दिप्ती
असल्याने तोंड आवरुन होतो आणि त्यामुळे पर्या बचावला होता.
पाचनईची
वाट तशी महा-सोप्पी. अगदी डोळे झाकून जरी कुणाला सोडला तरी तो
हरिश्चंद्रेश्वर मंदिराशी जाऊन आपटेल. पण काल रात्री पाऊस पडून आज
सकाळपासूनच ऊन-सावलीचा खेळ रंगल्याने हवेतला उष्ण दमटपणा थकवा आणणारा होता.
डावीकडे ताशीव कडा आणि उजवीकडे पाचनईत येऊन पावणारी मळगंगा नदीच्या
धबधब्याची दरी. धबधब्याला नुकता पाझर फुटलेला. लहान लहान ओघळ चार-दोन
धारांत खाली उड्या टाकणारे. कस्तुराचे मंजुळ गाणे ऐकत सुंदर अशा जंगलातून
वाट तुडवत झाडांची नावं वाचत आम्ही दीड-दोन तासांत केदारेश्वराच्या गुहेशी
येऊन टेकलो आणि दर्शन घेतले. अवघ्या गडावर वर्दळ कमीच, म्हणजे जवळजवळ
नाहीच. एकदम निश्चल वातावरण. स्तब्ध-शांत-निवांत.मनाला एकदम समाधान
देणारे. केदारेश्वराशी कुणीतरी एक घंटा टांगली आहे.तिला हलकेच टोल दिला.
तिचे सुमधुर नाद आसमंतात उमटले. कसबी कारागिराने अतिशय कुशलतेने ही घंटा
घडवली आहे. एक हलकासा टोलही किमान अर्धा मिनिटभर आसमतात निनादत राहतो. आणि
त्याचे प्रतिध्वनी आपल्या अंतःरंगात ओंकाराच्या रुपाने बराच वेळ उमटत
राहतात. एवढे सुखद दर्शन क्वचितच कधी होते.बाह्यस्वरुपी भौतिक घंटानाद आणि
मानसिक अंतर्नाद एखाद्या अनामिक समान धाग्याने जोडले जाऊन याचि देहि याचि
डोळा अद्वैताची अनुभूती आम्हांला अनुभवता आली. एरवी सुट्टीच्या दिवशी
आलेल्यांना कुठून हे असले भाग्य मिळायचे.
हरिश्चंद्रेशवर
मंदिरात एक ट्रेकर्सचा ग्रुप दुपारचे जेवण उरकून आराम करत होता. तिथल्या
थंडगार टाक्याचे अमृत बाटल्यांमध्ये भरुन घेतले आणि कोकणकड्याकडे निघालो.
भास्कर आमच्या आधीच पोचला होता. कोकणकड्याला आम्ही सोडून अवघे इतर तिघे आणि
भास्कर. बरे वाटले.कड्यालाच मुक्काम ठोकायचा हे तर नक्की केले होते.
त्यामुळे मुक्कामासाठी काय सोय करता येईल याची चाचपणी केली. पण भास्करचा
कुडाचा आसरा दोन दिवसांपूर्वीच पूर्णपणे वादळात उद्ध्वस्त झाला होता.
त्याने त्याचे सगळे सामान कोकणकड्याच्या शेजारी एका कपारीत हलवले होते.
अशातही भास्करने आम्हांला “मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा” अशी
कवितेची एक ओळ म्हणून आश्वस्त केले. आम्ही कोकणकड्यावर बसून पाण्याचे थेंब
अंतराळात तरंगण्याचा खेळ करता करता तळाशी कोकणात बेलपाड्याकडे आणि
क्षितिजावर जमा झालेल्या ढगांकडे शंकित नजरेने आळीपाळीने पाहत भास्करला
आमच्या मुक्कामासाठी तंबू लावण्याची विनंती केली.
भास्कर
तंबू आणण्यासाठी कपारीत गेलाच होता तेव्हाच वातावरण कुंद झालेले. बॅगा आणि
कॅमेरे सुरक्षित नीट करतोय तोच ढगांना गळती लागलेली. वरुन आम्ही मनसोक्त
पावसात भिजतोय. कोकणकड्यावरुन खाली कोसळणार्या धारा उफराट्या वर आकाशात
उधळताहेत. वातावरण कुंद झालेले.पाहता पाहता पावसाने ताल धरला आणि तो
अक्षरशः बरसू लागला. आता उघड्यावर तंबू लावणे अशक्य होते म्हणून भास्करने
थोडा आतमध्ये झाडीत जिथे थोडी साफसफाई करुन सपाट जागा केली आहे तिथे तंबू
लावला. त्यात बॅगा टाकून दिल्या. आता एवढा पाऊस आहे आणि गरमागरम सूपची आठवण
झाली नाही तरच नवल.शिवाय आली लहर, केला कहर असा आमचा खाक्या. म्हणून
परिक्षित आणि मी छत्री घेऊन सूप तयार करुन आणण्यासाठी भास्करच्या कपारीकडे
गेलो. एक औढा जिथे लहान टेकाडाच्या कड्यावरुन पाचनईच्या बाजूच्या दरीत झेप
घेतो त्याच कड्याच्या पोटात ही कपार.
पाऊस
आता चांगलाच लागून होता. मुसळधारच्या आधीची स्टेज. कपारीच्या समोर असलेला
धबधबा हळुवारपणे चारदोन ओघळांतून मिनिटाला तांब्याभर पाणी खाली लोटत होता.
खालच्या डोहातली वाळू आणि खडक दिसत होती. सूपचं आधण तयार करेपर्यंत पावसाचा
जोर वाढला. जणू आधी खाकरुन गळा साफ करणारा गायक पहिली तान घेतो तसा.
चांगलाच रंगला. रंगला कसला… आता धुवांधार कोसळू लागला. समोरचा धबधबा म्हणता
म्हणता अर्धाफूट रुंद, मग एक फूट, पाच फूट, वीस फूट आणि मग चाळीस-पन्नास
फुटी जलप्रपात झाला. पाण्याच्या रौद्र लोंढ्यासोबतच लहान लहान दगडगोटे,
मोठे मोठे खडक, उन्मळून पडलेली झाडे सगळंच वाहू लागले. सॄष्टीचं एवढ्या कमी
वेळात हे असं ट्रान्झिशन कधी पाहिलं नव्हतं. सह्याद्रीतला पाऊस म्हणजे काय
असतो याची प्रचिती आली. आता तिकडे तंबूत थांबलेल्या सवंगड्यांची काळजी
वाटू लागली. तसेच सूप न घेता तिकडे पळालो, तर खालून पाणी शिरुन तंबूंचे तळे
झाले होते. म्हणून आता तंबूत राहण्यात अर्थ नाही असे जाणवून मुक्काम
कपारीत हलवला. सगळ्यांच्या बॅगा कपारीत आणून टाकल्या आणि कोरडे होऊन
शेकोटीच्या ऊबेला विसावलो. दिवसभराच्या प्रवास-ट्रेक-धावपळीनंतर आता कुठे
जराशी विसावा मिळाला होता. निवांतपणे शेकोटीच्या ज्वाळांशी हात शेकत सूपचे
घुटके घेत गप्पा रंगल्या तेव्हा अंधारुन आले होते.
आता
जेवणाचे वेध लागले होते. आमचे सूप होईपर्यंत भास्करने भात शिजू घातला
होता. पिठले तयार झाले होते. बटाटे उकडत होते. त्याने आपले सगळे साहित्य
आमच्या हाती सोपवले होते. काय हवं नको ते रांधा. एक गुराखी आजोबाही सोबतीला
आलेले. भाकरी थापण्यासाठी भास्करची चाललेली तारांबळ पाहून दिप्तीने ते
महत्कार्य आपल्या हाती घेतले. भास्कर,परिक्षित, अमोघ आळीपाळीने ती तव्यावर
आणि नंतर निखार्यावर भाजीत. गरमागरम फुगलेली, वाफ बाहेर सोडणारी भाकरी
ताटात येऊन पडे आणि ती तिथे टेकण्याच्या आतच आम्ही ती हातांवर घेऊन तिचे
एखाद-दोन भागांत वाटप करुन त्यावर लोणचे लावून ती गट्टम करीत असू. अशा
कितीक भाकर्या आम्ही पाच-सहा जणांनी संपवल्या तपास नाही. पण भास्कर कधी
एका शब्दानेही आम्हांस बोलला नाही.ताटात पाचसहा भाकर्या पडल्यावर भास्कर
पिठले-भात आणि भाकर्या घेऊन दहा मिनिटांत येतो असं सांगून दुसर्या
ग्रुपसाठी घेऊन गेला. शिवाय तोवर जेवण करु नका असेही बजावले. कारण काय
असेल ठाऊक नाही, पण आमचा इकडे गरमागरम भाकरी खाण्याचा सपाटा चालूच होता.
पाऊस एव्हाना थांबला होता. समोरच्या धबधब्याची धार पुन्हा मंदावली, पण
त्याचा नाद मात्र घुमत होता. पंधरा-वीस मिनिटांनी भास्कर आला तो हाती काही
तरी पिशवीत घेऊनच. नीट पाहिले तर त्याने तळहाताएवढे किमान सात-आठ खेकडे
आणलेले.
आल्यासरशी
त्याने ते साफ करुन मीठ-मसाला-तेल टाकून शिजू घातले. उकळी आल्यावर त्यात
एक-दोन बटाटा आणि थोडे ज्वारीचे पीठ पाण्यात कालवून घालून रस्सा थोडा दाट
केला. एव्हाना त्या कालवणाचा घमघमाट चहूकडे दरवळत होता. रात्री कधीतरी
नऊच्या सुमारास आम्ही जेवण करायला घेतले. घासफूस पुण्यवान लोकांसाठी बटाटा
आणि पिठले आणि आम्हां पामरांसाठी खेकड्याचं कालवण, सोबत कांदा आणि ज्वारीची
भाकरी. जगातले सगळ्या चवीचे रस आणून त्या दिवशी भास्करने प्रेमाने
आम्हांला रांधून भरवले होते.माहेरपण असते ते यालाच तर म्हणतात. भरल्या पोटी
तृप्तीचे ढेकर देत आणि खेकड्यांच्या काचळ्यांचा अर्धा फूट उंचीचा ढीग
बाजूला करत, आम्ही गप्पा रंगवत स्लीपिंग बॅगमध्ये घुसलो. चुकार काजव्यांचे
दर्शन, पाण्याच्या धारेचा नाद, सोबत्यांच्या गप्पा, पाचनईच्या बाजूच्या
कड्यावर रेंगाळणारे ढग,पांघरुणाची खुसफुस अशा वातावरणात जागा अगदी लहान
असूनही अगदी शांत झोप लागली. प्रत्यक्षात सह्याद्रीच्या ऊबदार कुशीत जागा
मिळाल्यावर अजून वेगळे काय होणार होते म्हणा…
दुसर्या
दिवशी सकाळी सूर्य कासराभर वर आल्यावरच जाग आली. सूर्य दिसतोय म्हटल्यावर
ज्यासाठी इथवर आलो तो ढगांचा खेळ आणि त्यायोगे दिसणारे इंद्रवज्र
पाहण्याचाच योग. तडक पळत पळतच कोकणकडा गाठला आणि त्याच्या अगदी कडेवर येऊन
ठाण मांडून बसलो. कोकणची दरी ढगांनी पूर्ण भरली होती हे इंद्रवज्रासाठी
सुचिन्ह होते, पण मागे सूर्य मात्र नव्हता. त्याची वाट पाहत बसलो. कधी तो
येई तेव्हा ढग गायब होत. अगदी तपश्चर्येची घटिकाच जणू. सूर्य झाकला की
खाली बसणे आणि तो बाहेर आला की उभे राहून आपलीच सावली ढगांच्या पडद्यावर
दिसतेय का ते पाहणे. तासाभराच्या कंटाळवाण्या प्रयत्नांनंतर सूर्यदेव
प्रसन्न झाले आणि आमची सावली दरीत ढगांच्या चादरीवर पडू लागली. आणि खरंच
एकदोन प्रयत्नांनी दिसले की… याच साठी केला होता अट्टाहास, अजि म्या
ब्रम्ह् पाहिले !! स्वतःचीच पडलेली सावली, सावलीत डोक्याभोवती सप्तरंगी वलय
आणि संपूर्ण गोलाकर आकार घेतलेले इंद्रधनुष्य म्हणजेच इंद्रवज्र. पंढरीत
विठूरायाला पाहून जो आनंद होतो तो आनंद अनुभवायला मिळाला. सर्वांगावर
रोमांच उभे राहिले. सह्याद्रीच्या सृष्टीचा अजोड चमत्कार, मानवाच्या
खुजेपणाची साक्ष देणारा विराट अजस्त्र कोकणकडा आणि त्यावर हे नाजूक
सप्तरंगी रंगकाम… आणि त्यांचे एकत्र चित्र…निर्गुण ढगांमधून, रंगहीन
सुर्यकिरणांमधून साकारलेले सृष्टीचे हे सगुण साजरे सप्तरंगी रुप. सगळेच कसे
अजब, वेड लावणारे. नंतर ते थोड्या थोड्या कालांतराने पुन्हा पुन्हा दिसत
राहिले आणि आम्ही ते आमच्या डोळ्यांत,मनांत, सर्वांगात साठवीत राहिलो. ही
भेट पहिल्याच दिवशी सफल ठरली.
सूर्य
डोक्यावर येईस्तो हे नाट्य उरकले आणि भास्कर कड्यावरच चहा घेऊन आला.
रेलिंगला टेकून चहाचे घुटके घेत कड्यावरुन खाली दिसणारे ढगांचे नाट्य पाहत
पाहत सुरेल बासरी ऐकत ब्रम्हानंदी टाळी लागली ती अगदी दुपारच्या जेवणाची
वेळ होईस्तोवर. सकाळी तसेच उठून कड्याकडे पळण्याच्या नादात अंघोळ आणि इतर
महत्त्वाचे विधी राहून गेल्याचे आठवले. लागलीच कपारीत येऊन टॉवेल-चड्डी
घेऊन कपारीच्या खाली असलेल्या डोहाकडे पळालो. काल दिवसभराच्या प्रवासाने,
ट्रेकने आणि रात्रीच्या आखडून झोपण्याने आंबलेली देहाची कुडी त्या थंडगार
पाण्यात डुंबून निवली. बराच वेळ डुंबून झाल्यावर पोटात कावळे ओरडायला लागले
होते.भास्करने आमच्यासाठी डाळखिचडी रांधली होती. लोणचे-पापड-कांदा आणि
खिचडी अशी भरपूर हाणून झाल्यावर पुन्हा कपारीत येऊन तासभर ताणून दिली. जाग
आली ती ढगांच्या गडगडाटाच्या आवाजानेच. समोर पाचनईच्या बाजूने ढग काळं
कांबळं घेऊन कलाडगडाकडून फिरुन गड झाकीत होते. कड्यावरुन सुर्यास्ताच्या
आशा आता मावळल्या होत्या. मग कपारीतच बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता.
पुन्हा कालचेच रुटीन. कुंद ढग-काळसर वातावरण-पाऊस-धबधब्याची धार-मग रौद्र
जलप्रपात-चहा-सूप-रिपीट !! दोन तीन दिवस आम्ही यासाठीच तर आलो होतो.
रोज
दुपारनंतर आम्ही पावसाची वाट पाहत बसायचो. ढग कलाडगडाकडून फिरुन पाचनईवरुन
येऊन गडावर पाणी ओतायचे. पाऊस आला की गुहेसमोरला धबधबा मग उसळू लागे.
रातच्या कालवणाला आयते खेकडे मिळत.आम्ही स्वतः भास्करसोबत अंधारात
ओढ्यांच्या बिळांमधून खेकडे धुंडाळीत फिरलो. बरेचसे खेकडे मिळायचे. रात्री
दिप्ती भाकरी थापायची, भास्कर भात घालायचा आणि भाकरी भाजायचा. आम्ही ती
गरमागरम भाकरी तशीच पळवून लोणचं लावून खाऊन टाकायचो. खालच्या गुहेतले
गुराखी बाबा येत. मग आमच्या त्यांच्या वाघ-बिबटांच्या आणि
कोल्ह्या-तरसांच्या आठवणींच्या गप्पा रंगायच्या.भास्करची शेळी वाघराने कशी
खाल्ली, बिबट्या कसे अजूनही बरेचदा तारामतीवरुन निघून कोकणकड्यावरुन
नळीच्या वाटेकडे आणि बैलघाटाकडे जातो, वगैरे वगैरे.त्या कथा ऐकून क्षणभर
भीतीही वाटे. पण भास्करने बोलता बोलता एक तत्त्वज्ञान सांगितले. ते म्हणजे
“वाघासारखा राजबिंडा प्राणी नाही. समोरचा माणूस काय करतोय याची त्याला
काहीही पडलेली नसते. माणूस सोडून कुठलाच प्राणी विनाकारण शिकार किंवा हल्ला
करत नाही. म्हणूनच आम्ही आयुष्य गडावर काहीही इजा न होता घालवलंय. आपण
त्याला त्रास देऊ नये आणि तो आपल्याला कधी देणार नाही.निसर्गाचा आदर करा
त्याचा आनंद घ्या, त्याला कधी आव्हान देऊ नका.” हजार पुस्तकं कोळून प्यायलो
तरी हे तत्त्वज्ञान कुणाला समजले नसते, तेवढे भास्करने आम्हांला एका
रात्रीतून जाणवून दिले. जेवता जेवता आमच्या भुता-खेतांच्या ऐकीव गोष्टी
रंगल्या. पण त्याची कधी भीती वाटली नाही.रात्री निवांत अंथरुणावर अंग टाकलं
तेव्हा भास्करचे शब्द मनात घोळत होते.समोर काहीतरी कुत्र्याच्या आकाराची
सावली गुहेसमोरुन आडवी गेली. उठून पाहीपर्यंत ती पळून गेली. सकाळी उठलो
तेव्हा भास्करला विचारले तर म्हणे खेकड्यांची कवचं खायला कोल्हा येऊन गेला.
क्षणभर सर्र्कन अंगावरुन काटा गेला पण पुन्हा भास्कर म्हणाला… “माणूस
सोडून कुठलाच प्राणी विनाकारण शिकार किंवा हल्ला करत नाही.”
सकाळी
आन्हिकं उरकून पुन्हा कोकणकड्याकडे गेलो. पण आज काही त्याचा मूड नव्हता.
कड्याखालचे ढग गायब झाले होते. म्हणजे आज कालच्या महानाट्याची सुतराम
शक्यता नाही. चला तेवढाच गड फिरायला वेळ मिळेल म्हणून आम्ही तारामतीच्या
खालून रोहिदासच्या बाजूकडे फेरफटका मारुन आलो. विविध सुंदर रंगीत
स्फटिकांच्या गारगोट्या जमा केल्या होत्या. एक लहानशी आठवण म्हणून घेऊन
आलो. रोहिदासच्या बाजूच्या टोकाकडून खिरेश्वर,धरण, माळशेज घाट, जुन्नर
दरवाजाची घळ, दुसर्या बाजूला संपूर्ण कोकणकडा,नळीची वाट, पाठीमागे कलाड,
भैरव, आजोबा, कात्राबाई, कुमशेतचा खुटा अशी सगळी आवडती रांग दिसत होती. हाच
तो माझा सह्याद्री ! अगदी माहेरचा फील.
परत कड्यावर आलो तेव्हा भास्करने कुठूनसे दूध आणून चक्क चहा तयार ठेवला होता. पुन्हा एकदा कड्याच्या अगदी काठाला बसून कोकणात डोकावत बासरीच्या सुरावटीऐकत
चहाचे घुटके घेत राहिलो. भान आले तेव्हा बराच उशीर झाला होता. बॅगा आवरुन
पाठीवर टाकल्या आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडून पाचनईत उतरलो.पायथ्याला
करवंद आणि आंबे पाडून बायकोसाठी बांधून घेतले. तेवढीच पुढल्या ट्रेकसाठी
जामीन मिळण्याची तजवीज ;)
माहेराहून
परत निघालो तेव्हा गाडीच्या आरशातून तोच आमचा सखा, आमचा हरिश्चंद्रगड
विचारत होता… गड्या, परत कधी येतोयेस? मनातच म्हणालो… येईन रे लवकरच.
तुझ्या भेटीशिवाय का त्या पापी जगात आमचा निभाव लागतोय? येईन लवकरच
माहेराला !! तेव्हा मी असेन, नवे-जुने सवंगडी असतील, माहेरचा माणूस भास्कर
असेल आणि तोच कोकणकडाही असेलच. शाश्वत!
अपडेट-१:
ही पोस्ट पूर्ण लिहिण्याच्या आधीच भास्करचा SMS आलाय… कोकणकड्याला
काजव्यांचा चमचमाट, करवंदं, गावरान आंबे आणि खेकड्यांचे कालवण. कोकणकडा.
लवकर या. जल्ला लई जलवतोन हा भास्करा!
अपडेट-२: तो कोकणकड्यावर असलेला दुसरा ग्रुप हा स्वप्निलचा होता. त्यांनी आम्ही पोचण्याच्या आधी गडावरील मळगंगेचे पात्र साफ केले होते.
0 comments