Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

त्रिंबकगड-दुर्गभांडार-अंजनेरी

By Pankaj - भटकंती Unlimited
/ in 2013 अंजनेरी ट्रेक त्रिंबकगड दुर्गभांडार
No comments
लडाखनंतर विशेष अशी भटकंती काही घडलीच नव्हती. कॅमेरा आणि फोटोची खाजही घरातच किंवा फारतर लक्ष्मीरोडला गणपती विसर्जनाची मिरवणूक शूट करुन शांत केली होती. लडाखमुळे खरं तर खूप ट्रेक मिस झाले होते. परंतु हिमालयाचे सौंदर्य आपल्या जागी आहे आणि  सह्याद्रीचे राकट कड्यांचे सौंदर्य आपल्या जागी. त्यातून नाशिक परिसर म्हणजे अनेक दुर्गशिल्पांचा खजिनाच. अर्ध्यावर चढत गेलेले सौम्य ते मध्यम चढावाचे टप्पे आणि तिथून अचानक आकाशात उठलेले ताशीव कातळकडे, त्याच ताशीव कड्याच्या पोटातून खोदलेली कुठेतरी लपलेली वाट, ती चढून वर गेले की अनेकविध दुर्गशिल्पांचा अमाप खजिना, आश्चर्य वाटावं अशा अनेक गोष्टी, नवल करावं तेवढं थोडं असं काहीसं सगळं... आता हेच वर्णन धोडप, साल्हेर या किल्ल्यांना किती शोभतेय. तर अशी ही नाशिक परिसराची महती. आता दोन दिवस जोडून मोहीम आखायची तर मग आजवर फक्त बागलाण भटकून चटक लागलेली असताना नाशकाला डावलून कसे चालेल? हाच बेत मनात ठेवून यावेळी बेत आखला होता त्रिंबकगड-दुर्गभांडार आणि अंजनेरी. भिडू होते पुण्याहून अजय, सध्या ठाण्याची कर्मभूमी असलेला पुणेकर ध्रुव (धुरड्या), केदार (केयो) आणि गजानान (गज्या). पुणे-नाशिक या भंगार रस्त्याचा प्रवास नको आणि ठाण्यातून "जास्तीची मेजॉरिटी" झाल्याने पुण्याहून शुक्रवारी संध्याकाळीच गाडी काढून ठाण्यात पोचलो. तिथे धुरड्याच्या सध्या बॅचलर असलेल्या घरी मुक्काम ठोकून शनिवारी पहाटेच मुंबई-नाशिक हायवेने सुट्ट्या-सुईईई करणार होतो. तत्पूर्वी रात्री ठाण्यात बिट्टू-दा-धाबामध्ये जोरदार मेजवानी झोडण्यात आली आणि वरुन देवांगची कुल्फीही हाणली गेली.
झोपण्यापूर्वीच उद्याच्या सॅक भरुन तयार ठेवल्या. रात्री कशीबशी तीन-साडेतीन तासांची झोप झाली असेल तोच सगळ्यांचे मोबल्यातले गजर खणखणले आणि सगळे खडबडून जागे झाले. पावणेपाचलातर आम्ही ठाण्याच्या नाक्यावर टोल भरुन इगतपुरीच्या दिशेला सुटलोही होतो. बाहेर पडून सूर्य उगवता चहाचे अर्घ्य अर्पण करुन धुक्याने वेढलेल्या कसारा घाटात पोचलो. नुकतीच न्हालेली सुंदरी केसांवरचे पाणी निथळत असताना जशी दिसेल तशीच सुंदर मंत्रमुग्ध करणारी सकाळ होती. पाऊस नुकताच पडून गेलेला, रस्त्यावर त्याची ओल अजूनही तशीच, दाट धुक्याने वेढलेला कसारा घाट आणि अतिशय तुरळक वाहतूक.
मुंबई नाशिक रस्ताही तसा एकदम मक्खन. गाडी कधी शंभर-सव्वाशेच्या घरात पोचत होती तपास लागत नव्हता. इगतपुरी परिसर आम्हांला एवढे दिवस का इकडे आला नाहीत असा जब विचारत होता. आता ध्रुव आलाय ठाण्यात आणि त्याने खास आमच्यासाठी "होऊ दे खर्च" म्हणत ठाण्यात तब्बल २ बीएचकेचा फ्लॅट (‘भाड्या’ने) घेतलाय मग आता रेग्युलर येऊ असं आश्वासन त्या डोंगररांगांना देऊन घोटीगाव मागे सारले. घोटी-लेफ्ट-अप्पर वैतरणा धरणाच्या कडेकडेने जाणारा रस्ता-हिरवीगार झालेली भातशिवारं. शाळेत चाललेली पोरं, सकाळची लगबग असलेल्या टमटम आणि  वडाप. अशा वातावरणात आम्ही तिथे आलो म्हटल्यावर काय... आपल्या वायुदलानं सुद्धा आकाशात जेट स्मोकट्रेल्सची कमान करुन स्वागत केलं. (कस्सं बरोबर समजतं त्यांना आम्ही आलोय ते) ;) घोटी, वाकी, भावली अशी गावं मागे सोडत आम्ही निघालो. सोबतीला डावीकडे दूरवर त्रिंगलवाडी, उजवीकडे कावनईची संगत.
घोटीवरुन त्रिंबकला जाताना पूर्वी दूरचा वळसा पडत असे. पण आता एक नवीन रस्ता झालाय ज्याने ५०-६० किमीचं अंतर २२ वर आलंय. हा नवा रस्ता सातुर्ली गावावरुन उजवीकडे वळालं की वैतरणा आणि मुकणे धरणाच्या फुगवट्यांच्या मधून जातो. रस्त्याच्या दोहो बाजूंनी जलाशय आणि मधोमध बांधलेल्या पुलावरुन गाडी घालायची. सुंदर परिसर. त्यात सकाळची वेळ. कुणाच्याही मनातला फोटोग्राफर जागा व्हावा असा नजारा. पण आजचा ट्रेकचा टप्पा अधिक असल्याने मनाला आवर घातला आणि सोनगड-बिंडाकडून खरोलीमार्गे पहिने गावात आलो. पहिने गावाशीच क्लाईंबर्समध्ये फेमस पहिने नवरा-नवरी सुळके आहेत. आता समोरला विस्तीर्ण सह्याद्रीविस्तार नजरेत सामावत नव्हता. देवाचा डोंगर, पहिने सुळके, त्रिंबकगड, कार्वी, अंजनेरी अशी सगळी रांग समोर दिसत होती. स्टाईल तीच. नाशिकछाप. अर्ध्यावर चढत गेलेले सौम्य ते मध्यम चढावाचे टप्पे आणि तिथून अचानक आकाशात उठलेले ताशीव कातळकडे. आमचे पहिले लक्ष्य म्हणजे त्रिंबक आणि दुर्गभांडारही समोर दिसल्त होते. आव्हान देत नव्हे तर प्रेमाने अंगाखांद्यावर बागडायला बोलावणारे. पहिने गावात एका काकांशी गप्पा मारत मारत काही फोटो काढले आणि  सोबतच सभोवतालच्या डोंगररांगेची नावं घेत उजळणी करुन घेतली.

पंधराच  मिनिटांत अंजनेरीच्या बगलेतून निघून त्रिंबकला वळसा देत त्र्यंबकेश्वरमध्ये पोचलो. तद्दन तीर्थस्थान जसे असते तसेच दृश्य. टपर्‍यांची दुकानं,थोडीफार अस्वच्छता, भटकी कुत्री आणि सतरा गावचे भक्त. अर्थातच मंदिरात जाण्यात रस नव्हता. आमचा देव तर तिथे वर... डोंगरात वसलेला, शोऑफ भक्तांच्या गर्दीला कंटाळून. सकाळचे "जेवाय जेवाय जेवाय" व्हायचे असल्याने आधी ते काम केले. नाशिक फेम रस्सावडा, पाववडा आणि इतर काही खावून आम्ही त्रिंबकच्या पायथ्याला गाडी लावली. आजकाल कार असल्याने बरी सोय आहे. सगळंच कॅरी करावं लागत नाही. कॅमेरा, पाणी, टोपी आणि एखादे इमर्जन्सी खाणे एका पिट्टूमध्ये भरले की झाले काम. चढाई सुकर होते आणि गाढवओझेही टाळले जाते.

पाऊस सरला होता, पण बंद झाला नव्हता. मधूनच एखादी सर येऊन सभोवताल चिंब करुन जाई. क्षणात सरकन चकाकते ऊन पडत असे. सगळीकडे नुकत्याच झालेल्या आषाढाने हिरवेगार झालेले. वरुन चकाकते ऊन. बालकवींची शाळेत शिकलेली कविता आठवली.
श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

थोडी चढण पार केल्यावर एका व्यापार्‍याने धर्मशाळा बांधलेली आहे. सध्या ती वापरात नसली तरी मुक्कामास योग्य अशीच जागा आहे. अगदी स्वयंपाकासाठी वेगळी खोली, महिलांना वेगळी खोली, समोर प्रशस्त पडवी अशी दुमजली इमारत. नक्कीच त्र्यंबकेश्वरला येणार्‍या भक्तांसाठी त्या काळी ही इमारत बांधलेली असावी. ती पाहून आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात त्रिंबकच्या कातळात खोदलेल्या पायर्‍या सुरु झाल्या. त्रिंबकगडावरील ब्रह्मगिरी हेही तीर्थस्थान असल्याने वाटेवर बर्‍यापैकी गर्दी होती. पायर्‍यांवर पावसामुळे शेवाळले होते. जिथे हवे तिथे (आणि नको तिथेही) रेलिंग्ज लावलेले होते. शिवाय वाटेवर भाविक खायला टाकत असल्याने सोकावलेल्या माकडांचाही उपद्रव वाढला आहे. हातात काठी असली की त्यांना थोडा धाक असतो अन्यथा पाठीवरच्या सॅकवरही हल्ला करतात. तासभर चढाई करुन पहिल्या टप्प्यावर पोचताच सामोरा येतो तो गडाचा पहिला दरवाजा. सातवाहनांचा वारसा सांगणार्‍या अखंड कातळात कोरलेल्या पायर्‍या आणि अखंड कातळात कोरलेला दरवाजा. आपल्या जवळच्या जुन्नर भागातही अशा किल्ल्यांचे जिवधन, हडसरसारखे नमुने पाहण्यास मिळतात. या पायर्‍या चढून गेल्यावर माथ्यावर प्रशस्त सपाटी आहे. एवढे मोठे सपाट असूनही राबता किल्ला  म्हणावा असे विशेष अवशेष आढळत नाहीत. थोडेफार घरांची जोती दिसतात आणि उजवीकडे थोडेफार तटबंदीचे अवशेष. मात्र पायर्‍या, दरवाजा मात्र अतिशय शाबूत आणि सुरेख. तिथे एका मामांकडे लिंबूपाण्याचा डोस घेऊन ताजेतवाने झालो आणि एकदम मळलेल्या वाटेने शिखराकडे जाता येते. समोर श्रावणाची स्वच्छ हवा असल्याने आजूबाजूचे अंजनेरी, त्र्यंबकेश्वर गाव स्पष्टपणे नजरेस येतात. शिखराच्या वाटेवर चढून गेलो की आपण माथ्यावर पोचतो आणि मग जाणवतो तो नाशिकचा सुप्रसिद्ध भर्राट वारा. अगदी चालता माणूस उडून जाईल असा. शिखरावरुन फोटो काढून आम्ही एका सोंडेच्या बगलेत असणार्‍या गोदावरी मंदिराकडे निघालो. तिथेही माकडांचा उपद्रव होताच. दर्शन घेऊन आम्ही कड्याला समांतर वाटेने जटा मंदिराकडे निघालो.
जटा मंदिराच्या मागे जी मळलेली वाट जाते तीच पुढे दुर्गभांडार या त्रिंबकच्या जोडकिल्ल्याकडे. फार कमी लोकांना हे अखंड कातळात कोरुन बनवलेले अनोखे दुर्गशिल्प ठाऊक आहे. जटामंदिर पाहून यात्रा संपली असा समज करुन परत फिरतात. तसेच आजही घडत होते. पण आमची तीर्थयात्राच वेगळी. खरी यात्रा तर आता सुरु झाली होती. आम्ही जटामंदिराच्या मागल्या टाक्यातून पाणी भरुन घेतले आणि त्या एकांती वाटेवरुन मागचा रस्ता धरला. अतिशय निसरड्या वाटेवर आम्ही चालत होतो तरी कमरे-छाताडाइतक्या वाढलेल्या गवतामुळे ते जाणवत नव्हते. रानफुलांनी बहरलेली वाट जास्त वापरात नसल्याने झाडीही बरीच वाढली होती. त्या फुलांच्या ताटव्यांतून चालताना थकवा असा जाणवतच नव्हता. वीस मिनिटांतच आम्ही कड्याच्या एका टप्प्याच्या टोकाशी पोचलो तरी किल्ल्याचा दगडही दृष्टीस पडेना. समोर दिसली फक्त समोर खाली एक कातळभिंत त्याच्या टोकाला समोरच्या कातळात जाणारे एक तीन फुटी भगदाड. पण तेथपर्यंत पोचायला वाटच दिसेना. पुन्हा थोडे मागे येऊन पुसट झालेली डावीकडे गेलेली वाट घेतली आणि समोर दिसले ते अभूतपूर्व. 



अतिशय अरुंद अशा खाली उतरत जाणा‍र्‍या पायर्‍या. अगदी अंधारात गेलेल्या, पाताळात नेतात की काय असेच वाटावे. त्यांची रजना तरी किती अनोखी. आम्ही अगदी त्याच्या माथ्यावर आठ-दहा फुटांवर होतो तरी दिसल्या नाहीत. दुर्गरचनेचा अदभुत आविष्कार. त्या पंचावन्न पायर्‍या उतरत गेलो की समोर दिसतो तो दुसरा एक आविष्कार. अगदी माणूस जाताना सरपटतच जावा अशी रचना केलेला दरवाजा. म्हणजे किल्ल्याच्या संरक्षणासाठी आठ-दहा वर्षांचं पोर जरी तलवार घेऊन  पलीकडे बसवलं तरी एकजण किमान चार तास किल्ला लढवील. सरपटताना आली मान बाहेर की चालवा तलवार, एवढा सोप्पा कारभार. तिकडे धड आणि इकडे मुंडक्यांचा ढीग. त्या रचनाकाराला मनोमन सलाम करुन आम्ही त्या निरुंद कातळभिंतीवर पोचलो. दोन्हीकडे एकदम सरळ खाली सुटावलेले तीन-चारशे फूट कडे आणि पाच-सात फुटी निरुंद नैसर्गिक भिंत. तुच्यावरुन चालत गेलो की समोर तसाच एक दुसरा दरवाजा. त्यातून घुसून तशाच चाळीस-पंचेचाळीस पायर्‍या चढून आपण किल्ल्याच्या दुसर्‍या कड्याच्या पोटात पोचतो. तिथे माथ्यावरुन जाऊन टोकाशी असलेल्या बुरुजावर पाचच मिनिटांत पोचतो.

हा बुरुजदेखील अखंड कातळात कोरलेला. बुरुजात उतरायला वाट आहे, इथे जरा जपूनच गेलो. कारण डाव्या हाताला खोल दरी आहे. बुरुजावरुन उजवीकडे खाली ब्रह्मगिरी, गंगाद्वाराचे दर्शन होते. समोर हरिहर (हर्षगड) आणि बसगडाचेही दर्शन घडते. बास संपला किल्ला. रुढ अर्थाने खरं तर किल्ला म्हणावा असे अवशेष म्हणजे एक कोरीव मारुतीची मूर्ती आणि खोदीव पायर्‍या, सरपटत जावे लागेल असा दरवाजा. विशेष काहीच नाही, पण विशेष बरंच आहे. संरक्षणासाठी सज्ज दरवाजा, पायर्‍या आणि अरुंद भिंतीचा नैसर्गिक आविष्कार. एवढा सुंदर किल्ला प्लान केल्याबद्दल ध्रुवने मला तिथल्या तिथे एक सिक्रेट बक्षीस जाहीर करुन टाकले. (जे अजून दिलेले नाही). ते सगळे मनःचक्षूंमध्ये साठवून आम्ही परत फिरलो. पुन्हा फुटाफुटाच्या
 छातीवर येणार्‍या पायर्‍या, दरवाजातून सरपटणे असं करत अलीकडल्या कड्याशी आलो. तब्बल सात वर्षांनी फुलणारी कारवी इथे बहरली होती. अर्थातच कॅमेरे सरसावून फोटो काढले. नंतर आल्या वाटेने परत न जाता कड्याच्या डावीकडून येणारी, त्याला पूर्ण वळसा घालून जाणारी पुसट पायवाट पकडली. अर्थात ही वाट नवख्या ट्रेकर्ससाठी नाही. अतिशय अरुंद म्हणजे काही ठिकाणी फक्त फूट असलेली वाट फक्त उंचीला आणि खोल दरीच्या दृश्याला सरावलेल्या डोळ्यांचीच. त्या वाटेने पुन्हा शिखर चढण्याचा त्रास वाचल्याने आम्ही अर्ध्या तासातच लिंबूपाणी असलेल्या हॉटेलवजा टपरीवर पोचलो. पुन्हा तिथे ताजेतवाने होवून माहिती घेतली असता समजले की खाली त्या धर्मशाळेच्या मागे एक मोठे विहीर आहे. परतीच्या वाटेवर झरझरा पाय उचलत आम्ही ती पिण्याच्या पाण्याची विहीर पाहून तासाभरात पायथा गाठला. आता पुढे आमचा मनसुबा होता अंजनेरीचा माथा गाठून मुक्काम टाकण्याचा. पुन्हा त्याच त्र्यंबकेश्वरच्या हॉटेलात जेवण करुन घेतले. मुक्कामात अधिक स्वयंपाक रांधून अधिक श्रम न करता लगेच खाता येईल असा सुका खाऊ आणि भरपूर फळे बॅगांमध्ये टाकली.
त्र्यंबकेश्वरच्या बाहेर पडलो आणि अंजनेरीच्या दिशेने कार काढली तेव्हा दुपारचे तीन वाजत आले होते. अंजनेरी अर्धा ढगांत लपलेला होता. सुर्यास्त अंजनेरीच्या माथ्यावरुन फोटोत बंदिस्त करायला मिळावा म्हणून आम्ही घाई करत अंजनेरी पायथा गाठला. अंजनेरीच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या वनखात्याच्या तपासणीनाक्यापर्यंत गाडी जाते. फक्त रस्ता थोडा (!!??) खराब आहे आणि ऑफरोड ड्राईव्ह, अपहिल ड्राइव्ह असं सगळं कसब लहानशा स्विफ्ट गाडीवर आजमावून आम्ही तिथे पोचलो. तिथून पुन्हा पाठपिशव्या पाठुंगळी मारुन आम्ही अंजनेरी चढायला सुरुवात केली. अगदी रेस अगेन्स्ट टाईम. तासभर लागला पहिल्या पायर्‍यांपर्यंत पोचायला. या पायर्‍यांच्या मध्यावरच डावीकडे कातळात जैन लेणी खोदलेली आढळली. हा चारपाच लेण्यांचा समूह असून आतमध्ये अनेक सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. सुर्यास्ताला माथा गाठायचा असल्याने आम्ही ती लेणी परतीच्या वाटेवर पाहण्याचे ठरवले आणि पाय उचलून माथा गाठला. माथ्यावर दूरवर पसरलेले हिरवेगार पठार आणि त्याच्या टोकाला एक अंजनीमातेचे लहानसे मंदिर. शिवाय सुर्यास्ताच्या फोटोंचा भ्रमनिरास करणारा प्रसंग म्हणजे दाटून आलेले कुंद ढग :-( . आता मुक्काम टाकणे एवढाच उद्देश उरला होता. म्हणून तो प्रसिद्ध आश्रम शोधण्याच्या उद्योगाला लागलो. मंदिराच्या मागे थोडेसे वर चढून गेलो की आणखी एक आश्चर्य आपली वाट असते. ते म्हणजे एक नितळ पाण्याने काठोकाठ भरलेला तलाव. तलावाच्या बाजूने जाणार्‍या वाटेने शिखराच्या डावीकडून पुढे पाचच मिनिटांवर तो दाट झाडीत आश्रम नजरेला पडला. निबीड अरण्यात, गर्द वृक्षांच्या छायेत, माथ्यावर पानांच्या मधून येणार्‍या बिलोरी झळाळीत कुण्या योग्याने हा आश्रम वसवला त्याला खरंच दाद द्यायला हवी.
आश्रम आधी दिसतो आणि त्याच्याकडे जातानाच्या वाटेवर उजव्या हाताशी अंजनेरीची प्रसिद्ध सीतेची गुहा अर्थात सीतागुंफा. दोन खोल्यांची ही गुंफा असून भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. त्या गुहेतही मुक्काम करता येतो. पण त्या आश्रमात आधीच एक मोठा ग्रुप वस्तीला आला होता आणि खरा गड अनुभवण्याच्या उद्देशाने गोंगाट टाळण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही आधीच्याच अंजनीमातेच्या मंदिरात मुक्काम टाकण्याचे ठरवले. आश्रमाच्या नळकोंडाळ्याशी फ्रेश झालो, पाणपिशव्या भरल्या आणि मंदिराकडे माघारी पोचलो. तिथे मंदिर झाडून घेऊन कोनाड्यातला दिवा पेटवला तशी ती गुहा उबदार प्रकाशाने उजळली. गारठा वाढला होता. जेवणाला अजून वेळ असल्याने आम्ही उबदार स्लीपिंग बॅगमध्ये पडून बराच वेळ गप्पा मारत होतो. बाहेर जो काही सुसाट वारा सुटला होता तसा आजवरच्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. माणसालाही सरळ उभे राहता येणार नाही एवढा त्याचा जोर. दरम्यान त्या मंदिरात हिंदीभाषक ट्रकवरच्या ड्रायव्हर-क्लीनरची एक जोडी आली. त्यांना अंधारात रस्ता सापडणार नाही म्हणून अजय आणि ध्रुवने सुरक्षित आश्रमात नेऊन सोडले. ते परत आल्यावर आम्ही जेवण उरकले आणि पुन्हा स्लिपिंग बॅगच्या उबेला शरण गेलो. दिवसभराच्या शिणवट्याने गप्पा मारता मारता डोळा कधी लागला ते कळलेच नाही.
दुसर्‍या दिवशी मी सोडून बाकी मंडळी शिखरावर जाऊन आली. माथ्याला एक लहानसे मंदिर आहे. मंडळी परतल्यावर सीतागुंफेजवळ सर्वांनी "सांगाती सह्याद्रीचा"फेम पोजमध्ये एक एक फोटो काढून घेतला आणि ती जैन लेणी पाहून पायथ्याला आलो. एका पुस्तकात वाचल्याप्रमाणे अंजनेरीच्या पायथ्याच्या गावात प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आहेत असं वाचलं होतं. उतरतानाच समोर खोर्‍याच्या तळाशी ती हेरुन ठेवली होती. प्रत्यक्षात तिथे गेलो तर आम्ही खरंच अचंबित झालो होतो. अतिशय सुंदर आणि सुबक प्रमाणबद्ध मूर्ती, विविध प्रकारचे एकूण आठ मंदिरे, निबंध वाटावेत असे प्रचंड शिलालेख, मंदिरसंकुले असा प्रचंड मोठा खजिना आढळला. तशीच पुरातत्त्वखात्याची अनास्थाही पाहण्यास मिळाली. कधीतरी २००८ साली सर्वेक्षण केल्याच्या नोंदी काही शिल्पांवर आढळल्या आणि नंतर मंदिराला कुंपण घालण्यापलीकडे विशेष काही संवर्धन केलेलं आढळलं नाही. एक प्रचंड शिलालेख तर पालथा पडला होता, आम्हीच तो नीटनेटका करुन ठेवला. 



तो सुंदर ठेवा आणि ट्रेकच्या इतर आठवणी, नाशिक स्टाईलचे डोंगर, कालचा पठारवरचा वारा, दुर्गभांडारची कातळभिंत, सरपटायला लावणारा अजब दरवाजा असे सगळे आठवतच आम्ही नाशिकमार्गे ठाण्याकडे जाणारा मक्खन रस्ता धरला. अर्थातच येताना एका ढाब्यावर चिकन तोडणे आणि पुढला ट्रेक कुठे यावर चर्चा झडणे हे सोपस्कार पूर्ण केले गेलेच. 

Related Posts

0 comments

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1