संगीत संशयकल्लोळ
हृदयिं धरा हा बोध खरा । संसारीं शांतिचा झरा ॥
संशय खट झोटिंग महा । देउं नका त्या ठाव जरा ॥
निशाचरी कल्पना खुळी । कवटाळिल ही भीति धरा ॥
पहिल्याच गीताला पुढे अडीच-तीन तास काय मेजवानी असेल याची कल्पना येते. ‘संगीत संशयकल्लोळ’ या संगीतनाट्याच्या पुनरुज्जीवनाच्या संकल्पनेचे आम्ही तसे फार आधीपासूनचे श्रुत साक्षीदार. मित्रवर्य भूषणमुळे राहुल देशपांडे हा आमच्या जिव्हाळ्याचाच विषय. अगदी ‘कट्यार काळजात घुसली’ आणि दरवर्षीचा वसंतोत्सव यांद्वारे हे नाते अधिकच वृद्धिंगत झालेले. तीनेक महिन्यांपूर्वी भूषणने तो एका नाटकात काम करणार असल्याचे गुपित आम्हांसमोर उघड केले. आम्हांलाही तेवढीच उत्सुकता लागलेली. उदघाटनाच्या प्रयोगालाच आम्ही हजेरी लावणार हे नक्की केले. राजमाची मेगाशूटवरुन डायरेक्ट यशवंतराव चव्हाण नाट्यगृह गाठले. एवढ्या पुणेरी गर्दीत आम्ही दोनचार जण शॉर्टपॅंट आणि मळक्या टीशर्टवर संगीत नाटक पहायला आलो होतो. चकचकीत गाड्यांच्या मध्ये आमची राजमाचीच्या धुळीने माखलेली गाडी लाज काढत होती, पण नाटक आम्ही चुकवणार नव्हतो. खरं तर संगीत नाटकाचा अभिप्राय लिहावा किंवा समीक्षा करावी एवढी अक्कल माझ्याकडे नाही, पण मला जे पटले (आणि पटले नाही), आवडले, भावले ते सरळ सरळ इथे लिहितोय.

सुरुवातीलाच भूषणची एंट्री… “हृदयिं धरा हा बोध खरा । संसारीं शांतिचा झरा ॥ संशय खट झोटिंग महा । देउं नका त्या ठाव जरा ॥” वा… काय लाजवाब !! गोसाव्याच्या भूमिकेत भूषण आणि आयुष्यातल्या पहिल्याच प्रयोगाला तशी बर्यापैकी जमलेली त्याची आवाजाची फेक आम्हां मित्रांना आनंदून टाकते. मग त्याला हाकलून लावताना बेरकी फाल्गुनरावांचे संवाद मजेशीर आहेत. पहिल्याच सीनच्या पहिल्या संवादातच पात्रांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य उलगडून दाखवण्याचे श्रेय नाट्यकार गोविंद बल्लाळ देवल यांना. बायकोवर सतत संशय घेणारा नवरा असा एकंदर पात्राचा लूक. अमेय वाघने संवाद, डोळे फिरवणे, शरीराचे चाळे करत बोलणे यांमधून जे फाल्गुनराव उभे केले आहेत त्याला खरंच तोड नाही. (मी या नाटकाचे सलग दोन प्रयोग पाहिले. दुसर्या प्रयोगाला दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने स्वतः फाल्गुनराव रंगवले. पण मनापासून सांगतो त्याला अमेयची सर नाही आली). अमेय आणि सिद्धार्थ मेननचा ‘भादव्या’ नोकर यांचं टायमिंग अफलातून जमलंय.
पुढच्या दृश्यात अश्विनशेठ ऊर्फ राहुलची (देशपांडे) एंट्री. आणि पहिल्याच पदाला टाळ्या नाही पडल्या तरच नवल. यमन कल्याण रागातले (मला रागदारीमधले जास्त कळत नसले तरी ते मला खिळवून ठेवते हे नक्की) “सुकांत चंद्रानना” हे पद म्हणजे पावसाळ्याच्या आधी मृगाच्या पावसाने जसा मृदगंधाने आसमंत भरुन उरावा अशी अनुभूती. चला म्हणजे यंदाचा पावसाळा सुंदर होणार अशा आशयाचे जे समाधान असते ना… तसेच काहीसे तरंग राहुलच्या या पहिल्या नाट्यगीताने अंतरंगात उमटतात. पुढे प्रियांका बर्वेची रेवती आणि अश्विनशेठचे रोमॅंटिक संगीत संवाद आणि एका मागोमाग येणारी नखरेल “साम्य तिळही नच दिसत मुखाचे” सारखी पदे रंगत वाढवत नेतात. त्या दृश्याच्या शेवटी राहुलचे (माफ करा, अश्विनशेठचे) “कर हा करी धरिला शुभांगी” हे पद सर्वांगसुंदर झाले आहे.आणि “धन्य आनंददिन पूर्ण मम कामना, लाभ व्हावा जिचा लोभ होय महा” या पदाने दृश्य संपते. पुढच्या सीनला ठसकेबाज कृत्तिकाबाईंचा म्हणजे दिप्ती (आमच्या भूषणच्या सौ बरं) प्रवेश. म्हणजे बेरकी फाल्गुनरावांना असला जोडा अगदी चपखल शोभतो. ठसक्यात चालणे, पाय आपटणे, गतिशील हातवारे करत संवादफेक अगदी नाट्यप्रसंगांना सुयोग्य. सगळ्यात आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे कृत्तिकाबाईंच्या संवादांमध्ये बोलीभाषेतल्या म्हणींचा समर्पक आणि जोरदार वापर.
पुढे हे नाटक सगळ्याच पात्रांनी एकमेकांवर घेतलेला संशय, त्यातून उडणारा कल्लोळ, पुढे होणारा गंभीर गुंता, “ही बहु चपल वारांगना”, “संशय का मनी आला”, “कुटिल हेतू तुझा हा फसला”, “मानिली आपुली” अशा संगीतरत्नांनी साकार होते. अतीव टोकाचा संशय आणि पर्यायाने अश्विनशेठ-रेवतीचा विरह असा अंगाने पुढे गेलल्या नाट्याचा अशा गंभीर वळणावर मध्यांतर होतो. (अशा मध्यांतराला चहाही गोड लागत नाही आणि वड्यांनाही चव येत नाही हो). विरहाच्या वेळी मनाची अश्विनशेठच्या मनातली घालमेल आणि रेवतीच्या हृदयाचे आक्रंदन राहुल आणि प्रियांकाने साक्षात जिवंत केले आहे. शिवाय एक कलावंत नाट्यगीत म्हणत असताना समोरचा दुसरा कलावंत अवघडल्यासारखा उभा राहिलेला न दिसता हलक्या subtle कायिक अभिनयातून त्या दृश्यातली स्वतःची involvement दाखवून देत असतो हे मला विशेष आवडले. या बद्दल निपुणचे खास अभिनंदन.
मध्यांतरानंत्रचा एकही क्षण चुकवू नये, कारण लगेच सुप्रसिद्ध “मृगनयना रसिकमोहिनी” हे दैवी नाट्यगीत आहे. तसेच “आल्हादक मुखचंद्रहीहो ता” हे अश्विनशेठने रेवतीच्या स्वप्नात जाऊन म्हटलेले हे नाट्यगीत म्हणजे नाटकाचा परमोच्च बिंदू ठरावा. त्यासाठी नेपथ्याचा आणि प्रकाशयोजनेचा ज्या कल्पकतेने वापर केला आहे तो खरंच प्रशंसनीय आहे. या गीताला वन्स मोअर नक्की द्या. आम्ही दिला आणि राहुलनेही ते पुन्हा गायले. अश्विनशेठचा संशय दूर झाल्यानंतर “हा नाद सोड सोड, मित्र करिती बोध गोड” आणि रेवतीच्या मुखी असणारे “मजवरी तयांचे प्रेम खरे” ही पदे पुन्हा पुन्हा गुणगुणावीत अशीच आहेत. असा संशयकल्लोळ घडत घडत सुखांत होतो.
नाट्यगृहाच्या बाहेर आलो की ठळकपणे लक्षात राहतो तो अमेयचा बेरकी डोळे फिरवणारा फाल्गुनराव, टायमिंग साधणारा सिद्धार्थचा भादव्या, दिप्तीची ठसकेबाज कृत्तिकाबाई आणि सर्वांवर कडी म्हणजे राहुलचे गाणे… आणि आपणही गुणगुणत असतो “हृदयिं धरा हा बोध खरा”…!!!
या आजच्या काळात माझ्या वयाच्या (मी तरुण आहे असे सुचवायचा प्रयत्न आहे याची सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी) प्रेक्षकांनी गर्दी करुन संगीत नाटक पहायला येणे आणि मन भरुन उभे राहून टाळ्या पिटणे यातच राहुल, निपुण, अमेय, दिप्ती, भूषण, प्रियांका आणि सगळ्या टीमचे यश नाही का? मी तर हे नाटक सलग दोनदा पाहिलंय आणि आनखी खूप वेळा पाहणार आहे. तुम्ही?
0 comments