शिशिरातल्या सकाळी
शिशिराची चाहूल लागली की मनाला असे
अचानक उबदार फुटवे येतात. उगाच ते गुलाबी गुलाबी झाल्यासारखं
वाटतं.थंडीसारखंच. एरवी टाळला जाणारा सकाळचा तिसरा चहाही हवाहवासा वाटू
लागतो.अशातच मीही बाहेर एखादा फेरफटका टाकतो.
डोळे
चोळत मी बाहेर पडणार तेवढ्यात बायकोने अर्धवट झोपेत हातात स्वेटर दिलेला
असतो. एवढ्या सकाळी सकाळी कसे यांना झोपेत हे असे सुचते याचे नवल करतच तो
अडकावून मी बाहेर पडतो.सोसायटीच्या गल्लीबाहेर येताच समोर ताज्या भाज्यांचे
होलसेल मार्केट सुरु झालेले दिसते. हे लोक रात्रीच इथे येतात आणि सकाळी नऊ
वाजेपर्यंत सगळा कारभार आटोपून कॉर्पोरेशनने साफसफाई केलेली असते. अशा
मार्केटच्या बाहेरुन जाताना ताज्या भाज्यांचा मस्त सुगंध नाकाशी गुदगुल्या
करतो. थोडासा कोलाहल आणि टेंपोंची घरघर त्यासाठी मी सहन करतो. तसाच
पुतळ्याच्या बाजूने पुढे जाऊन मी हायवेला लागतो. पहाटेच्या वेळी एखाद-दुसरा
ट्रक सोडला तर विशेष गर्दी नाहीच. थंड हवा झोंबू लागते. रस्ता ओलांडून
पलीकडे एअरफोर्सची जमीन असल्याने तिकडे कॉंक्रिटचे जंगल नाही. आहे ते फक्त
एखाद-दुसरे क्वॉर्टर,गेटवर बॅरिकेड, गार्ड केबिन, त्यात एक उबदार बल्ब.
बाहेर काल रात्री पेटवलेली शेकोटी अजूनही राखेतून धूर सोडत शेजारच्या
रिकाम्या बर्फाळ थंड पत्र्याच्या खुर्चीला ऊब देत असते. गार्डच्या
वॉकीटॉकीवर सतत कसले कसले आवाज खरखर ऐकू येत राहते. आणि बाकी सगळे सपाट
गवताळ माळरान. त्यांच्या हद्दीच्या बाहेरुन बाजूने त्या वाडीत जाणारा
छोटासा डांबरी रस्ता. त्यावरदेखील अगदी थोडीच गजबज.
वेटलॉस तमाशाच्या संकल्पवीरांची गंमत मॉर्निंग वॉकला
निघालेली असते. एका मागोमाग एक असे सरस उत्साही हेल्थ कॉन्शस पहिला उत्साह
मावळलेला नसल्याने झपाझप हात खांद्याच्याही वरपर्यंत स्विंग करत, आपल्याला
कुणी बघावे आणि कौतुक करावे,किमान आपले आपणच कौतुक करावे म्हणून झपाझप चालत
असतात. गेली कित्येक वर्षे नियमाने जाणारे लोक मात्र उबदार स्वेटर,
कानटोपी, शाली लपेटून एका लयीत आणि तंद्रीत पावले टाकतात. मध्येच एखादा मॅन
धावत येऊन पुढे निघून जातो.अंधारातही त्याच्या कानात लावलेला मोबाईलचा
हेडफोन दिसतो. आपण आपला मोबाईल घरी ठेवून आलोय हे जाणवून किती छान वाटतं.
समोर आपल्याच वेगाने ते आजीआजोबा सोबत चाललेत. हलका त्यांचा बोलण्याचाही
आवाज येतोय. आजोबा सांगताहेत,“तुला काय करायचंय आता, तू कशाला त्यात लक्ष
देऊन त्रास करुन घेतेस. संसार त्यांचा आहे ना. आपल्याला एवढा मान देऊन
चाललाय हे पुरेसं नाही का तुला?”.आजी फक्त ऐकत राहतात. समोरुन त्या वाडीतून
एक सायकल डबलशीट येते. आता हे हायवेच्या तिथे सायकल लावून कंपनीच्या बसने
‘फस्शिप’ला जाणार. एवढ्या सकाळीही त्यांचे तीनमजली डबे पाहून घरची बाई
किती वाजता उठली असेल याचा मी अंदाज घेऊ लागतो. एक ट्रॅकसूटधारी ललना
जॉगिंग करता करता पास होते. सहजच मान वळते. कोण होती काय माहित. रोज येत
असेल का? एकटी कशी काय येते एवढ्या पहाटे?
मनाला
वाटेल तेवढे अंतर चालून मी परत फिरतो. उगवतीला पूर्वरंग दिसायला लागतात.
काळे आकाश जाऊन गडद निळे होते.पूर्वेकडे क्षितिजावर तांबूस रंग. आता आधी
नसलेले धुकेही दिसायला लागते.धुक्याचा पिंगट रंग हवाहवासा वाटू लागतो.
वाडीतून दुधवाले आपले कॅन टांगून आपल्या फटफट्या घेऊन रतीबाला निघालेले
असतात. एअरफोर्स स्कूलच्या बाजूला चुकून लवकर आलेली पोरं दिसायला लागतात.
त्यांच्या स्कूलबसही पोरासोरांना घेऊन येतच असतात. सूर्य वर आलाय. उबदार
उन्हं नाकाच्या शेंड्याशी जाणवताहेत. तोंडातून सोडला जाणारा श्वास उन्हात
धुरासारखा दिसतो म्हणून त्याची अजूनच गंमत वाटते. दोनचार वेळा मी तसे करुन
लहानपणी शाळेत जायच्या आठवणींत बुडून जातो. सायकलवर केलेले ज्युनियर कॉलेज,
बंक केलेले लेक्चर्स.आता ऑफिस जवळ आहे, येण्याजाण्याला एखादी सायकल घ्यावी
का हाही विचार मनात तरळतो. पण मघाशी पाहिलेले पिंगट धुके, आताचा
बॅकग्राऊंडला सुर्योदय आणि त्याच्या समोर शाळेतल्या पोरांची अवखळ किलबिल
आणि मस्त लाईट पाहून सध्या लिस्टवर असलेली लेन्स आठवते. सायकलचा विचार
आपोआप मागे पडलेला असतो.
अशातच हायवे ओलांडून पुन्हा मी मार्केटजवळ येतो. तोच सुगंध, त्याच गाड्या. फक्त त्यात आता किरकोळ खरेदीच्या लोकांची भर. घासाघीस चालू असते. बेकरी उघडलेली असते. स्वीटहोमच्या दारासमोरुन येणारी ऊबदार हवा आत भट्टी पेटली आहे याची ग्वाही देते. दुधाच्या पिशव्यांनी क्रेट्स बाहेर भरुन ठेवलेले असतात. ‘अमृततुल्य’ चहावाला आत पूजा करतो, बाहेर येऊन एक ग्लास पाणी आणि एक कटिंग चहा रस्त्यावर ओतून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करतो. स्टीलचा आणि काचेचा ग्लास तसाच हातात ठेवून कोपरापासून हात जोडून मनोभावे नमस्कार करतो. दिवसभराच्या चांगल्या गल्ल्यासाठी. मंदिरातल्या सकाळच्या आरतीच्या घंटेचा आवाज येत राहतो.
मी सोसायटीत वळतो. कोपर्यावर एक ओळखीचे काका भेटतात. दोघेही नुसतेच हसतो. गेट उघडून मी आत शिरतो, बायको तुळशीसमोर रांगोळी काढत असते. एवढ्या थंडीतही केस धुतलेले, पूजा करुन कपाळी दोन भुवयांच्या मध्ये लावलेलं कुंकू. तुळस आणि बायको दोघीही तेवढयाच सात्त्विक दिसतात… मी तिला पाहताच सांगतो… एक कप गरमागरम चहा देशील प्लीज !!
वाह एकदम बढ़िया सरज़ी
ReplyDelete