ट्रेक आठवणीतला.
पाऊसभरल्या आकाशातल्या मेघरुपातल्या घटांना वार्याने गदागदा हलवले आणि विजांनी कडाका काढला की सरी सांडायला वेळ लागत नाही. आकाशातल्या मुळाक्षरांना ढगांच्या वेलांट्या आणि विजांच्या मात्रा लगडल्या की वार्याच्या हुंकारासंगे रानारानात, पानापानांत आणि मनामनांत पावसाचे काव्य रुणझुणते. अशा वेळी डोंगर भटक्यांना सभोवतालचे हिरवे रान खुणावू लागते. पहिल्या पावसातला रस्त्यावरचा चिकचिकाट, ट्राफिकचा खोळंबा, नेमका घरी येताना होणारा वैताग असले सगळे शहरी नखरे झाले की एसी आणि पीसीच्या युगातल्या भटक्यांना आडरानातले गडकिल्ले, आडोशाच्या गुहा, कपारी, चिखलणी होऊन लावणीला तयार झालेली भातखाचरे, सुपरसॉनिक वारा कधी एकदाचा अनुभवतो असे होते.
मग एकदा असाच सगळी जगरहाटीची ओझी झुगारुन देऊन भटक्या एखाद्या वीकेंडला ट्रेकला सज्ज होतो. पाठीवरच्या सॅकमध्ये एकात एक दोन प्लास्टिकच्या पॅकिंगमध्ये © कोरड्या कपड्यांचा सेट, खाऊचं सामान, रात्रीच्या स्वयंपाकाचा शिधा, आवर्जून घेतलेलं पापडाचं पाकीट, रेडिमेड सूप सॅशे, काही भांडी, मित्राच्या मित्राकडून उसना आणलेला स्टोव्ह असं सगळं पाठुंगळी मारुन एसटी स्टॅंडवर खुणेच्या जागी शुक्रवारी रात्री हजर होतो. मनात कित्येक ‘टूडू’ची लिस्ट असते, फोन बिल भरायची वेळ आलेली असते, आयटी रिटर्न पेंडिंग असतो, प्रोजेक्ट डिलिव्हरीजचं शेड्यूल कायमच टाईट असतं, बॉस डोक्यावर बसलेला असतो. पण आता कानात वारा शिरलाय, मागे हटणे नाही. शेवटी भिजट पावसात ट्रेक करुनच हे सगळं सहन करायला आणि तडीस न्यायला ऊर्जा मिळणार असते. ठरलेले भिडू (©भटकंती अनलिमिटेड) हजर होतात, ओळख नसलेल्यांची ओळख होते, मध्यरात्रीची गाडीची वेळ होते. आणि तिकीट काढून खिडकीच्या फटीतून येणारा गार वारा आणि पावसाचे चुकार थेंब अंगावर घेत घेत स्वप्नांच्या दुनियेत हळूहळू एकेक जण हरवून जातो. रस्त्यात कित्येक धक्के खात खात गाडी तालुक्याच्या गावी पोचते तेव्हा घड्याळात पहाटेचे अडीच-तीनच वाजलेले असतात. पायथ्याच्या गावाला जाणारी पहिली एसटी सकाळी सहाला. मग तिथेच स्टॅंडवर मच्छरांना हटवत काढलेल्या डुलक्या.
हवेतला गारठा, आकाशी कुंद ढग, रिमझिम पावसाच्या सरी अशा टिपिकल पावसाळी वातावरणात गाडी नाना प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांनी भरुन जाते. एक ग्रामीण महाराष्ट्राचे मिनिएचर रुपच तिथे अवतरलेले असते. शाळेला जाणारी खाकी चड्डीतली पोरं, आठवडे बाजारला निघालेली माय, तालुक्याच्या गावी कामानिमित्त निघालेला गडी, नातवांला भेटायला निघालेली म्हातारा-म्हातारी अशा एक ना अनेक रुपांत माणूसपण सामोरे येत असते. पायथ्याचे गाव आले की आपापल्या सॅक्स पाठुंगळी मारुन गर्दीच्या धक्क्यांमधून कसेबसे आपले मुटकुळे खाली घ्यायचे आणि पावसाचा पहिला शिडकावा डायरेक्ट अंगावर झेलायचा. यासाठीच तर आपण इथवर आलो, पावसात चिंब भिजायला. एक शहारा अंगावरुन सर्रकन फिरुन जातो. शहरातल्या पावसापेक्षा हा पाऊस किती वेगळा. अगदी भारुन टाकणारा. चहोबाजूंनी उठावलेल्या डोंगररांगा, त्यावरुन खाली झेपावणारे चंदेरी जलप्रपात, अंगाखांद्यावर खेळणारे कापशी ढग, खाली समोर हिरवे कार्पेट. (©पंकज झरेकर) चिखलणी करुन तयार केलेली खाचरे, लावणीच्या प्रतीक्षेतली भातरोपं, किती पाहू अन किती नको. गावात पोचेपर्यंत पाऊस चिंब करुन टाकतो. ओलेत्या अंगानेच गावाबाहेर शिवाराच्या वाटेवर एका खोपटात टेकायचं. जास्तीचं सामान तिथेच सोडायचं आणि गरजेपुरत्या वस्तू बांधून, बिनदुधाचा कोरा वाफाळता चहा घेऊन तरतरी आली की सोबतीला एखादा गावातला सडा गडी घ्यायचा आणि त्याच्याशी पाऊसपाण्याच्या गप्पा करत रिमझिम पावसातच गडाची वाट चालू लागायची. सभोवतालची खाचरं पाण्यानं तुडुंब भरलेली, त्या पाण्याला कुठून कुठून बांध फोडून वाट करुन दिलेली. भातरोपे काढणीला आलेली. काही ठिकाणी रोपे काढणारे भलरी दादा. त्यांना रामराम घालत बांधांवरुन उड्या मारत पुढे निघातचे. पायथ्याची एखादी नदी, ओढे, गुडघा-गुडघा पाण्यातून एकमेकांचे हात धरुन धडधडत्या हृदयाने ओलांडायचे आणि चढाला लागायचं. पहिली धाप लागलेली असते, नशिबाने पावसामुळे घामापासून सुटका असते. थोडाफार दम टाकत पहिल्या पठारावर जरा टेकायचं. भिजलेला ब्रेड-बटर, ब्रेड चटणी पोटात ढकलायची आणि पुढली वाट चालू लागायची.
रात्री सगळी आवराआवर होऊन ऊबदार स्लीपिंग बॅगच्या आडून पुन्हा गप्पा रंगतात. अरे अमुक अमुक ट्रेक कसला खतरी आहे, अरे त्या तमक्या गुहा पाहिल्यास का, अरे आपली अमुक अमुक घाटवाट राहिली आहे, अरे इतिहासात अमके अमके काही संदर्भ आहेत, तमुक तमुक हेमाडपंथी मंदिर फार सुंदर आहे... एक ना अनेक विषय. बाहेर पावसाने आता जोर धरलेला असतो, बेडकांची गाणी सुरु झालेली. अशातच झोप लागून जाते आणि पुन्हा इहलोकातल्या स्वप्नांच्या दुनियेतून आपण भासमान स्वप्नांच्या दुनियेत शिरतो. पहाटवार्यात गारठ्याने झोप चाळवते, बाहेर पावसाची रिपरिप चालूच, मनात एक ना अनेक विचार, काही आयुष्यातल्या भरारीची स्वप्ने, त्या सगळ्यांसाठी बांधून घेतलेल्या ऊर्जेच्या अस्तित्त्वाची जाणीव... आणि त्या सर्वांना सामावून घेऊन पावसातही स्थितप्रज्ञ असा सह्याद्री... हा अनुभवच फार सुंदर असतो. अगदी कायम हवाहवासा वाटणारा.
उजाडते तसे सकाळचा पुन्हा एक चहाचा राउंड होतो, नाश्त्याला कोरडा खाऊ पुरतो, आवराआवर होते आणि उतरणीला लागतो. दुपार होईतो पायथ्याला पोचतो. मग पुन्हा वाटाड्याच्या खोपटावर ओले कपडे बदलून पिठलंभात ओरपायचा. त्याच्या पोराबाळांना खाऊ आणि आणलेली वह्या-पुस्तकं-पेन्सिली देऊन टाकायची, त्यांच्या डोळ्यांतली चमक बघून दोन दिवसांत कमावलेल्या ऊर्जेला इग्नाईट केलं की आपण पुन्हा जगरहाटीची आव्हानं नव्याने स्विकारण्यास तयार! मग परतीच्या एसटीत बसलो तरी मन मात्र मागेच रेंगाळत राहतं... त्या पठारावर फिरतं, त्या गुहेत विसावतं, धबधब्यांसवे कड्यावरुन झेपावतं, ढगांसारखं डोंगरांवरुन फिरुन येतं, खोपटातल्या पोरांसोबत हुंदडतं, आणि त्यांच्या डोळ्यांसारखं निरागस होतं. मग त्याला चिकटलेली अनेक व्यावहारिकतेची जळमटं निघून गेलेली असतात. पुढल्या ट्रेकपर्यंत शहरी जगण्याला नक्कीच एक नवा अर्थ गवसलेला असतो.
अप्रतिम....साक्षात स्वर्गाअनुभव....!
ReplyDeleteखल्लास, मस्तच...!
ReplyDeleteसुंदर.
ReplyDeleteएकदम जबरदस्त.....असा सह्याद्रि आपल्या पाठीशी आहे याचा खुप अभिमान वाटतो.
ReplyDelete