Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

तेलबेलवरुन वाघजाई घाटाने ठाणाळे लेणी

By Pankaj - भटकंती Unlimited
/ in camping telbel thanale Trek
No comments
होळीचा चूड आणि रानातले पळस अगदी हातात हात घालूनच केशरी होतात. रानातले जंगलाचे माथे पळसाने पेटले आणि होळीला चूड लागला की सह्याद्रीच्या डोंगरवाटांची उन्हातली भटकंती थांबवावी आणि जरा घरी लक्ष देण्याचा“वर्षभराचा कोटा” पूर्ण करुन घ्यावा असे प्रस्थापित संकेत सांगतात. पण प्रस्थापित संकेतांना उधळून लावायचीच आमची जुनी खाज. मग त्या संकेताचाच उन्हातली भटकंती थांबवावी, पण रात्रीच्या आणि सकाळी लवकर केलेल्या भटकंतीला का नाराज करायचे असा सोयीस्कर अर्थ लावून आम्ही बेत आखलाच. सह्याद्रीच्या अनगड वाटांशी तर आमची जुनीच मैत्री. त्याच मैत्रीला स्मरुन अशीच एखादी बिकट वाट निवडून ती पायाखाली तुडवायची आणि पुन्हा एकवार आपला दमसासाचा कस लावायचा, भव्य अशा कोकणात उतरणार्‍या कड्याशी एकरुप व्हायचे असा विचार करुनच बाहेर पडायचे ठरले. शनिवारी दुपारी निघून तेलबेलच्या पठारावर रात्री चांदण्या रात्री हवा खात कॅंप लावायचा आणि चंद्र मावळला की चांदण्या मोजीत गप्पा छाटायच्या. पहाटेच उठून खाली कड्याच्या बगलेत लपलेल्या ठाणाळ्याच्या प्राचीन लेण्यांकडे जरा वाकडी वाट करायची. उन्हं चढण्याच्या आतच पुन्हा तेलबेल पठारावर येऊन दुपारच्या आधी घरी पोचून घरच्यांना एक सुखद “भॉ…”करायचं डोक्यात पक्कं केलं होतं. शिलेदार मागल्या रतनगड ट्रेकचेच होते. अमितआणि अजय. रतनगड ट्रेकला ज्याच्या कॅमेराबद्दलच्या सुरस कहाण्या ऐकल्या होत्या तो स्वानंद आणि त्याची बायको नभा. सोबत सागरही जॉईन झाला. फोनाफोनी करुन वेळ ठरवली दुपारी दोन वाजता अमितच्या घरी जमण्याची.

मी दुपारचे मटण-भाकरी खाऊन अमितकडे पोचलो तेव्हा त्याने अधिक सुंदर धक्का दिला. तो म्हणजे स्वानंद येताना दोन कोंबड्या मॅरिनेट करुन घेऊन आलाय आणि सोबत भाजणीच्या सळयाही आहेत. व्वा. कॅंपिंगला अधिकच मज्जा ना भो. सगळे पॅकिंग करुन निघलो आणि चांदणी चौकाच्या पुढेच “सरकारमान्य नीरा विक्री केंद्रा”ने वाट अडवली. त्यांचा आग्रह मोडून पुढे जाववेना. म्हणून मग माणशी एक ग्लास नीरा पोटात टाकून सगळा दाह शांत केला आणि पुढील वाट धरली.तेलबेलचा रस्ता आता तोंडपाठ झालाय. पिरंगुट, पौड, माले, मुळशी, गोनवडी,वारक, चाचवली, निवे मार्गे खिंडीतल्या भैरवनाथाचे दर्शन घेऊन लोणावळ्याच्या रस्त्याला लागलो. उन्हाचा दाह चांगलाच जाणवत होता. रस्ता तसा पिंप्रीपर्यंत बरा होता पण तिथून पुढे त्याने खरे रंग दाखवायला सुरुवात केली. पिंप्रीच्या तलावाच्या बाजूने कैलासगडाकडे पाहत डावीकडे वळण घेत तेलबेलाकडे निघालो. आतापर्यंत पाव फूट खोल असलेले खड्डे अर्धा फूट झाले,पुढे एक फूट आणि लुथ्रावनाच्या पुढे रस्ताच नाहीसा झाला. आम्हांला लवकरात लवकर तेलबेल गाठायचे होते. कारण गावात पोचल्यावर ठाणाळ्याच्या वाटेची माहिती काढून सुरक्षित जागी मुक्काम टाकायचा होता. नवरा-नवरी-भटजीच्या वर्‍हाडातून पुढे निघालो आणि भांबर्डे गावातून घनगड सामोरा आला.त्याच्याकडे पाहत पाहत एकोल्याकडे जातानाच मुंगुसाने वाट कापली. उजव्या बाजूने येऊन रस्त्याच्या मधोमध क्षणभर थबकले आणि आमच्याकडे तोंड वरुन पाहिले. पाचच मिनिटांत एकोल्याच्या पुढे उजवीकडच्या रानातून पिवळाधमक नाग सळसळत रस्ता ओलांडून डावीकडे चालला होता. त्याला पाहताच मी कचकावून ब्रेक मारला आणि मागच्यांना थांबायचा इशारा केला. उतरत्या उन्हात काय सुवर्णकांती चमकावी. जणू फक्त आम्हीच बघावे म्हणूनच त्याने अर्धवट फणा वर उचलला आणि यू-टर्न मारुन पुन्हा उजवीकडच्या रानात शिरला. रस्त्याच्या बाजूच्या चारीतून आमच्याकडे पाहत अंदाज घेत होता. आम्ही जागेवरच पाहून तो आतमध्ये शेतात सळसळत गेला आणि एका बिळात बसून फक्त डोके वर काढून चाहूल घेत राहिला.नभाचं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. तिने असा रानात कधीच साप पाहिला नव्हता. आणि चक्क आज नाग दिसला होता. त्याला अधिक त्रास व्हायला नको म्हणून आम्ही तिथून काढता पाय घेतला.

गाड्या आपटवीत तेलबेल फाट्याला येऊन पोचलो. तेथून पुढे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली होती. थोडा रस्ता बरा होता तो संपला आणि अक्षरशः खाचखळगे म्हणायलाही लाज वाटेल एवढा वाईट रस्ता, त्यात खडे चढ-उतार, रस्त्यात मोठमोठाले दगडगोटे. म्हणजे कार घेऊन जायची तर स्पेअर ऍक्सल, ऑईल टॅंक आणि ऑईल कॅन घेऊन जायला लागेल असाच रस्ता. उताराला काही वेळा बाईकही “सिंगलशीट”घेऊन जावी लागली. कसेबसे गावात पोचलो, समोर दिसेल त्या घरात चहा मिळेल का म्हणून चौकशी केली आणि गाड्या तिथेच लावल्या. हेल्मेट त्याच काकांच्या घरात टाकून चहा सांगितला. पण चहा होता तो बिनदुधाचा. माझ्या घशाच्या खाली उतरण्याच्या पलीकडला. म्हणून मग बॅगमधली रतनगडाची उरलेली मिल्क पावडर त्यात टाकली आणि काडीच्या स्टरर ने ढवळले. मग त्यातून तरंगणार्‍या मुंग्या बोटाने बाजूला करुन चहा “मारला”.

आता सुर्यास्ताला दहा-पंधरा मिनिटेच शिल्लक होती. रस्ता विचारुन घेतला आणि लाल केशरी पश्चिमरंग पाहत मावळत्या सूर्याच्या दिशेने धुळाटीत पायपीट सुरु केली. समोर अस्तावणारा सूर्य आणि त्याच्या पार्श्वभूमीवर गावाबाहेर लागलेल्या गवताच्या गंजी, गावाकडे परतणार्‍या गाई. स्वप्नात पाहिला तसाच रस्ता. घाटाच्या कडेवरचा वायरलेस टॉवर ठळकपणे उठून दिसत होता. वाटेत सवाष्णीचा घाट चढून आलेले पाच्छापूरचे फासेपारधी दिसले, हातात गावठी रायफली. त्यांना वाट विचारण्यासाठी आवाज दिला, पण त्यांना काय वाटले कुणास ठाऊन जुजबी बोलून त्यांनी काढता पाय घेतला. नवीनच घेतलेल्या बेअर ग्रिल्सच्या सर्व्हायवल नाईफचे उद्घाटन आज होणे होते, म्हणून तो बाहेर काढला. तर तो सागरने गावापासूनच खुला हातात घेऊन खून करायला निघाल्याच्या पोजमध्ये चालायला लागला. त्यावरुन त्याला झापले आणि ट्रेकच्या शिस्तीचे धडे देऊन कान उपटले. मग त्याने गुमान तो कव्हरमध्ये ठेवला. खाली ठाणाळ्याला उतरणारी वाट शोधणे आता शक्य नव्हते. म्हणून मुक्काम टाकायला जागा शोधली.सगळीकडे गवत माजले होते. अशा जागी मुक्काम पडणे जिकीरीचे असते. कारण गवतात असणारे जीव आणि आजूबाजूचे रान आपल्या आगीने पेटण्याची भीती. अगदी अंधार पडण्याच्या वेळेला एक जागा मुक्रर केली. तिथले गवत आधीच जळून गेले होते.अगदी कड्याच्या टोकाला जागा. पाच-पन्नास पावलांवर कडा. कोकणातला खारा वारा अंगावर घेत आकाशाकडे पाहत गप्पा ठोकायच्या. ऐकूनच मज्जा वाटते ना? आम्ही तर प्रत्यक्ष अनुभवले ते. आता पाळी होती आग पेटवण्याची. वाळलेला लाकूडफाटा जमा केला आणि काडीपेटी असूनही चाकूने ठिणग्या पाडून आग पेटवण्याचा हट्ट मी आणि स्वानंदने पुरा केलाच.

दोन संसार मांडले गेले. एक कोंबड्यांसाठी आणि एक सूप-मॅगीसाठी. गरमगरम सूप प्यायल्यानंतर जरा तरतरी आली. संपूर्ण चिकन पूर्ण तसे कुक होणे शक्यच नव्हते. म्हणून मग त्याचे तुकडे करण्याचे ठरले. खाटकाचे पुण्यवान काम अर्थातच मी केले. मग मंद अग्नीवर ते रोस्ट होत राहिले आणि आमच्या गप्पा उत्तरोत्तर रंगत राहिल्या. खाणे आटोपल्यावर सगळा कचरा जमा करुन पिशवीत भरुन जरा लांब ठेवला. कारण जवळ ठेवला तर गवतातून काहीही प्राणी त्याच्या जवळ येऊ शकतो. अगदी उंदीर आणि त्याच्यामागे सापही. कोल्हे-कुत्रे वेगळेच.स्लिपिंग बॅगमध्ये घुसलो तर गरम होतंय आणि बाहेर राहिलो तर थंड वारा लागतोय अशी विचित्र स्थिती. पण कसाबसा जरा डोळा लागला खालून कुसळे बॅगमध्ये घुसली. जिथे टोचेल तिथे हाताने काढून टाकतोय नाही तर कुणाचे तरी घोरणे सुरु झाले. सागर झोपेत घड्याळ्याच्या काट्यासारखा गरागरा फिरत होता. पहाटे साडेतीन-चारला उठलो तेव्हा “चंद्र नाही साक्षीला” म्हणून आता तार्‍यांचे फोटो काढता येतील म्हणून तो उद्योग करत बसलो. गुगल स्कायमॅपच्या कृपेने सगळी नक्षत्रं ओळखता आली. पूर्ण आकाशगंगा तर उघड्या डोळ्यांनी मी प्रथमच पाहिली. तीही कॅमेरात बंदिस्त केली.

अजयने फक्कड चहा जमवला. मंद शीतल पहाटवार्‍यात मित्रांच्या सोबतीने चहाचे घुटके घेत पुढे दिवसभरात काय काय करणार आहोत त्याची उजळणी केली. खाली ठाणाळ्याच्या लेण्यांत जाऊन टाक्याचे पाणी मिळेल, मग नाश्ता तयार करुन खाऊ. दुपारी घरी पोचून डेझर्ट कूलरच्या थंडगार हवेत मी कसा आराम करणार आहे हे अगदी रंगवून सांगितले.


चहा आटोपून आम्ही वायरलेसच्या टॉवरच्या मागून आम्ही वाघजाईचा घाट उतरायला सुरु केला. एक टप्पा उतरुन आलो तेव्हा एक अगदी छोटे पठार लागले. पुढल्या वेळी मुक्काम इथे करायचा हे नक्की केले. अगदी प्रायव्हेट कॅंपिंगचीच जागा. तिथून खाली काही दगडी पायर्‍या होत्या. त्या उतरुन समोर वाघजाईचे ठाणे आले. दगडाच्या भिंती आणि वर पत्रा टाकलेले लहानसे मंदिर. तिथे दर्शन घेऊन पुढे उतरायला लागलो. आनंद पाळंदेंच्या चढाई-उतराईच्या पुस्तकाच्या पानांचे फोटो काढून आणले होते, ते वाचून अंदाजे वाट ठरवली. खाली कोकणतळात कोंडगावचा वेडा-वाकडा पाझर तलाव ओळखता आला.त्यावरुन बाकीच्या वाटेचा अंदाज बांधला आणि एका पठारावरुन कोंडगावकडे जाणारी वाट सोडून डावी घेतली. दोन डोंगरधारा पार करुनही लेणी कुठेच दिसेनात. आता मात्र बाकी मंडळी थकली होती. मग मी आणि अजयने पुढे जाऊन रस्ता मिळतोय का त्याचा अंदाज घेण्याचे ठरवले आणि एक वॉकीटॉकी घेऊन निघालो.अर्धा तास चालल्यावर एका खोबणीत आलो. दोन्हीकडे उंच चढत गेलेले डोंगर आणि मध्ये कोरडी पडलेली पांदी. तिथे बसून मी पांदीतून कड्याच्या दिशेने वर जाऊन झाडीच्या डोक्यावरुन काही दिसतंय का त्याचा अंदाज घ्यायला गेलो आणि अजयला समोरच्या नाकाडावर जाऊन पहायला सांगितले. शेवटी त्याच नाकाडाच्या पल्याड अजयला लेणी दिसली. दोघांनीही मोठा हुश्श्श केला. वॉकीटॉकीवरुन मागे राहिलेल्यांना यायला सांगितले आणि ते आल्यावर त्या दिशेन कूच केले.डोंगराला वळसा घालून गेल्यावर एक कोरडे टाके लागले. इथेही मुंगुसाने पुन्हा एकवार दर्शन दिले. निसरड्या उतारावरुन चालताना सागरची धावपळ होत होती.त्याला कसेबसे अमितने हाताला धरुन आणले. तोवर मी पोचून फोटो काढून घेतले.
एव्हाना आमच्याकडे असलेले जवळपास सगळेच पाणी “इल्ला” झाले होते.सगळ्यांकडे मिळून एखादा लिटर शिल्लक होते. अजय जाऊन कुठे टाके दिसते का ते पाहून आला. पण कुठेच सापडले नाही. त्यामुळे नाश्ता तयार करण्याचा बेत रद्द झाला. दोन-तीन बिस्किटे खाऊन साडेदहाला आम्ही परतीची वाट धरली. ऊन चढले होते. मानेला चटके देत होते. सगळ्या रानात वणवे पेट(व)ल्याने कोळसा आणि राख दिसत होती. हिरवे पान कुठे नजरेस पडेना. त्यात कोकणाचा जीवेघेणा दमट उष्मा आमच्या शरीरांतून पाणी खेचून घेत होता. मंदिराजवळ पाण्याचे टाके सापडू दे,चांदीचा मुखवटा चढवीन असे अजयने वाघजाईला साकडेही घातले. सपाटीची चाल संपल्यावर जशी चढाई लागली तसा नभाला त्रास सुरु झाला. तिला थोडे पाणी आणि साखर देत असतानाच सगळ्यांचे सारखेच हाल होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.कुणाचेच शरीर साथ देत नव्हते. पाणी पूर्णपणे संपले. आता शिल्लक काहीच नाही.होती ती बिस्किटे आणि साखर. पण ती खाल्ली तरी पाण्याची गरज अधिकच वाढणार.तेव्हा मिळेल ते पाणी पिण्याचे ठरवले होते. पण सगळ्या कोळसा झालेल्या रानात फक्त राख आणि ऊनच मिळत होते. वाघजाईच्या ठाण्याशी पोचता आले तर कदाचित पाणी मिळेल, एखादे टाके असेल, देवीला कुणीतरी अभिषेक करायला कळशी लावली असेल अशी सुरस स्वप्नं नभाला पडत होती. मलाही या रानात कोकचा धबधबा कोसळतोय असा भास होत राहिला. या सगळ्यातून एक आशा होती. माझ्या बॅगमध्ये सगळ्यात तळाला असलेली पाण्याची अर्धा लिटरची बाटली. पण ती फक्त नभाला चक्कर आली तरच तिला द्यायची आणि बाकी लोकांनी जमेल तसे स्वतःला वर पठारावर पोचवायचे असा गुप्त करार अमित, मी आणि अजयने केला होता. वाघजाईचे मंदिर आता सलग चाललो तर पंधरा मिनिटांवर होते, पण तीन मिनिटेही कुणी चालू शकत नव्हते. आता मला घाम येणे बंद झाले आणि डोके जड झाले. घाम येणे बंद होणे ही उष्माघाताची पहिली पायरी असतेहे पहाडविजयी गुरु बेअर ग्रिल्स यांनी सांगितले आहे. तेव्हा मी अंग टाकले. सागर आणि अमित वर पुढे जाऊन एकेक घोट का होईना पाणी घेऊन येतो म्हणाले. तेव्हा सिक्रेट बाटलीतले दोनशे मिली पाणी त्यांच्याजवळ देऊन उरलेले पुन्हा इमर्जन्सीसाठी ठेवून दिले. अगदी रांगतच मंदिरात कसेबसे पोचलो. सागरही दिलेल्या पाण्यावर मंदिरापासून पंधरा मिनिटांवर असलेल्या पठारावर पोचला आणि वायरलेस टॉवरजवळच्या बाबांना पाण्याची याचना केली.त्यांनी पाणी त्याला पाजले आणि खाली असलेला जिवंत झरा दाखवला. पाणी साठून राहिले होते, झरा आटला होता, बेडूक पोहत होता, पण आम्हांल कशाचीच फिकीर नव्हती. जे मिळेल ते पाणी जीवन होते. प्रत्येकजण कमीतकमी लिटरभर पाणी पिऊन मंदिरात कोसळला आणि आम्ही वाघजाईकडे पाहत होतो. तिचे उग्र रुप असूनही किती वात्सल्याने ओतप्रोत भरलेले वाटत होते. जवळपास अर्धातासभर झोपा काढल्या. जरा हुशारी आल्यावर पंधरा मिनिटांतच वायरलेस टॉवर गाठून तेलबेल गावची वाट धरली. मागे वळून पाहिले तर तेच दृष्य होते. कोकणातले धुकट वातावरण, खाली जंगल, जंगलात कुठेकुठे पेटलेले पळस. समोर तेलबैलाच्या जुळ्या भिंती, द्वैताची साक्ष देणार्‍या आणि आजवर आमच्याशी अद्वैत असलेला आणि पुन्हा कधी येताय विचारणारा आमचा तोच सह्याद्री.

गावात पोचल्यावर पुन्हा अर्धा तास विश्रांती घेऊन सालथर खिंडमार्गे लोणावळ्याला पोचलो ते रामकृष्णमध्ये सहाशे रुपयांचे बिल करुनच उठलो. काल रात्रीपासूनचे अधाशी जीव कळकटलेल्या कपड्यांसह लोणावळ्याच्या चांगल्या हॉटेलमध्ये अधाशासारखे पाणी, कोक, लिंबू सरबत ढोसत होते, पण तेव्हाच हात धुताना मात्र हवे तेवढेच पाणी घेऊन नळ नीट बंद करत होते. शेवटी पाणी हेच जीवन तिकडे शाळेत शिकलो असलो तरी ते आम्हांला वयाच्या तिशीत या डोंगरातल्या शाळेतच समजले होते ना… !!!

Related Posts

0 comments

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • झापावरचा पाऊस !
    सकाळी जाग आली तीच मुळी पावसाच्या पाण्याच्या आणि गुरांच्या घंटेच्या आवाजाने. काल संध्याकाळी गावात उतरुन डेअरीवर दूध घेऊन आलेल्या रामजीसोबत ...
  • “तो आला”
    ऊन चढलेलं. पाखरं कधीच दिसेनाशी झालेली. उन्हाच्या झळांमधून हलणार्‍या माळावरल्या बाभळी फक्त मुळांना जमिनीने कैद केलंय म्हणून स्थितप...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • शिवजन्म
    (ग्राफिक्स सौजन्य: http://kavibhushan.blogspot. in/ ) गेल्या आठवड्यापासूनच वरल्या जहागिरदाराच्या वाड्यातल्या पडद्याआड आणि माजघरात लगबग...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • आता प्रतिभेवरही डल्ला
    मागच्या आठवड्यात महेंद्रजींनी शेरिल ऊर्फ व्हाईट इंडियन हाऊसवाईफ चा फोटो ’सकाळ’ वृत्तपत्रात अगदी काहीही परवानगी न घेता अगदी गरीब पद्धतीने मॉर...
  • पाऊसवेडा !
    पाऊस रानारानांत, पानापानांत आणि मनामनांत रुणझुणू लागला की सह्यभ्रमरांना साद घालतात ते सह्याद्रीचे कडे.राकट कडे, उन्हाळ्यात वणव्यांनी उजाड...
  • मालवण ट्रेलर.
    या शनवार-आयतवारी मालवणाक गेलो व्हतो. हयसरची अर्दांगिणी आणी एक दोस्त सपत्नीक सोबत व्हते. शुक्रवारी राती निघून पहाटे चारला मालवणात, आणि दोन दि...
  • शिवरायांचा दसरा
    भर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्‍यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • मालवण ट्रेलर.
  • शिवरायांचा दसरा
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • सह्याद्रीतल्या देवता

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • bikeride
  • Harishchandragad
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • Sahyadri
  • travel
  • Trek

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1