एक अविस्मरणीय (सुरेल) सकाळ !
पुण्याहून दोन गाड्यांमधून सात जण निघाले.
अगदी व्यवस्थित नाक्यावरचा चहा वगैरे सोपस्कार व्यवस्थित उरकून. कामशेतला
मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळाली तेव्हा नुकताच कुठे सूर्य उगवण्याच्या
बेतात होता. खिंड ओलांडून आलो तोवर त्याने आपला सोनेरी पट मांडायला
नुकतीच कुठे सुरुवात केलेली. पूर्वेच्या टेकड्यांआडून त्याची तांबडे
फुटलेले, काही क्षणांतच तांबड्याला सोनेरी झळाळी चढली आणि सारी सृष्टी
त्यात न्हाऊ लागलेली. एरवी टुकार वाटलेले एक्सप्रेस-वेवरचे जाहिरातींचे
मोठे फलकही आज किती सुंदर दिसू लागले. नेहमीचा कॅमेरांचा खडखडाट झाला.
अर्थातच आमचे कान त्या नीरस आवाजाला कायमच सरावलेले.
सूर्योदय |
ते उरकून बेडसे लेण्यांच्या पायथ्याशी
गाडी लावली. दहाच मिनिटांत लेण्यांशी जाऊन टेकलो. आधी कित्येकदा आलो होतो,
पण त्या कित्येक फेर्यांना आजचे भाग्य कसले. थोडा दम टाकून आसपासचे
सौंदर्य मनाशी साठवून घेतले. अजूनही लेण्यांना माणसाची जाग नव्हती. तिथे
होतो ते आम्हीच फक्त. सात जण आणि बाकी सूर्याची कोवळी किरणे. काही भिरभिरती
पाखरं. कदाचित लेण्यांना घडवणारे पवित्र आत्मेही आसपासच असतील, एका
सुखाच्या जाणिवेची वाट पाहत. सातपैकी एक जण आधी मुख्य लेणीत जातो. काहीच न
बोलता फक्त स्तूपाशी पद्मासन घालून बसतो. आम्ही उरले सुरले उगाच कॅमेरे
सावरुन तयार. मांडी घालून बसलेला तो आपल्याकडल्या जादूच्या पिशवीतून जादूची
छडी काढतो. हात्तिच्या… ही तर बासरी. मोबाईलवर तानपुरा गुंजन करायला
सुरुवात करतो आणि एक त्याची फुंकर बासरीत शिरते. सुर्याच्या
किरणांच्याबरोबरीन जादूगाराने पहिला सा लावलेला. आम्हांस अंगावर अक्षरशः
शहारा येणे म्हणजे काय याची प्रचिती. गात्रं न गात्रं फुलून आलेली.
पहिल्याच सुरावटीने अंगभर शहार्यांचे एव्हाना निवडुंगाचे काटे होत आले
होते. चैतन्याची एक सळसळ कानांतून प्रवेश करुन सर्वांगातून सतत लहरत असते.
पंधरा मिनिटांतच फोटो काढणे विसरुन आम्हीही मांड्या ठोकून समोर बसलो. पुढे
अनेक रचना, राग यांतून लीलया संचार करत दोन तास फक्त आम्ही आणि त्या
सुरावटी एकरुप झालो. आसपासचे पवित्र आत्मेही कदाचित याच सुखाच्या जाणिवेची
आस ठेवून असणार. बासरीच्या स्वरलहरी समोरच्या सह्याद्रीच्या कुशीत चैतन्य
सांडीत होत्या. आम्ही आपले कधी अंगावर शहारे, कधी तृप्त कान आणि कधी
पापण्यांच्या आड आलेली समाधानी आसवं परतवून लावण्याचा अयशस्वी प्रयत्न… अशा
मनाच्या विविध अवस्थांमधून हेलकावत त्या सुरावटींच्या हिंदोळ्यावर आनंद
लुटावा.
बेडसे लेण्यांतील स्तूप आणि अमित |
एखाद्या नवपरिणित माहेरवाशीण वधूने आपले
नवीन वस्त्रांचे गाठोडे मैत्रिणीच्या समोर मांडून तिला एक एक वस्त्र उलगडून
दाखवावे. प्रत्येक नव्या घडीनिशी मैत्रिणीच्या अंगावर जणू मोरपीस फिरावे.
हे रेशमी, हे बनारसी, हे आजीने दिलेले उबदार सुती, हे आईकडून आलेले
मोरपिशी, हे सख्याने दिलेले चिंतामणी… असे तलम घड्या उलगडून दाखवत असताना
शेवटचे वस्त्र एकदम भरजरी वेलबुट्टीच्या नक्षीचे, जरीकाठाचे रेशमी अंगाचे
आणि आवडत्या रंगाचे असावे. त्याने आपले सर्वांग मोहरुन यावे, अचानक मन
कुठल्याशा अनामिक जगात हरवून जावे असेच झाले जेव्हा त्या जादूगाराने
सुरांची जादू केली. एकामागून एक विविध राग, स्पॅनिश ट्यून्स, पाश्चात्त्य
आणि भारतीय संगीतातील फरक, सृष्टीच्या विविध आवाजांवरुन स्वर कसे निर्माण
झाले याचे उदाहरणासहित विवेचन, विविध भजन रजना असे त्या सुरमयी वस्त्रांचे
विविध पदर आम्ही आमच्या मनचक्षूंनी अनुभवत होतो. शेवटचा भरजरी वेलबुट्टीचा
रेशमी पदर हा राग पहाडीचा होता आणि त्याची साथ घेऊन आम्ही पहाडी प्रदेशात
कसे पोचलो हे आम्हांलाच समजले नाही. अगदी पहाडी प्रदेशात कित्येक
मैलांवरुनही अशीच सुरावट स्पष्ट ऐकू येत असल्याचा साक्षात अनुभव बसल्या
जागी आम्ही घेत होतो.
अमित आणि त्याची जादुई बासरी |
तर हा जादूगार होता अमित काकडे. पुण्याचाच
आमचा मित्र आणि त्याची जादुई बासरी. त्याने सुरुवातीला घेतलेल्या पहिल्या
सुरावटींपासून सुरुवात करुन पुढले “तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल” ही अभंग
रचना ही थेट पंढरपूरच्या विठूमाऊलीच्या पायाशी बसल्याचा अनुभव देणारी
अद्वैताचा याहून सुंदर आविष्कार आणि अनुभव यापूर्वी कधीच घडला नव्हता.
मल्हार रागातील विविध जागा, त्यातून केलेले सृष्टीचे वर्णन, पावसाळी हवा,
ढगांची दाटी, कुंद हवा, विजांचा लखलखाट, मग हलकीशी पावसाची सुरुवात,
त्यायोगे सॄष्टीत निर्माण झालेले चैतन्य आणि त्यासोबतच अमितने कोमल निषाद,
शुद्ध निषाद, मींड (त्याला दिलेली लोहगड विसापूरच्या मधल्या गायखिंडीची
उपमा) अशा मारलेल्या गप्पा या यापुढे प्रत्येक पावसाच्या वेळी नक्कीच
आठवणार. पुढल्या प्रत्येक उत्तर पहाडी प्रदेशातल्या प्रवासात त्याचा राह
पहाडी एक अनामिक रुखरुख लावत राहणार की आज अमित माझ्याशेजारी बसलेला का
नाही? पण हे जे सोन्याचे दोनतीन तास अमितने आमच्यासाठी दिले ते खरंच वेड
लावणारे.
हे थोडे वेड तुमच्यासाठी पिशवीत भरुन
आणलंय… (सर्वाधिकार अमित काकडे). पण काहीही असले तरी “दुबळी माझी झोळीची”
अवस्था इथेही झाली आमची.
धन्यवाद पंकज, खूपच सुंदर लिहीलं आहे... :-)
ReplyDeleteधन्यवाद पंकज, खूपच सुंदर लिहीलं आहे... :-)
ReplyDeleteखरच सुरेल सकाळ !!!
ReplyDeleteSunder...Basari apratim........man harpun taaknari.......sunder varnan....sundar vaadan......sunder jeevan !! mastach
ReplyDeleteखूपच छान लिहिले आहे. अक्षरश: वास्तव समोर येत असल्याचा भास होतो असे वाटते. आणि त्यात बासरीची जादू काही ओरच….!!!
ReplyDeleteअप्रतिम, झकास शब्द नाहीत बोलायला....
ReplyDeleteअप्रतिम, झकास शब्द नाहीत बोलायला....
ReplyDeleteलेखन खूपच ओघवते आहे . वाचताना खूप सुंदर वाटते , शिवाय photography अप्रतिम .
ReplyDeleteलेखन खूप ओघवते आहे. वाचताना खूप सुंदर वाटते . शिवाय photography अप्रतिम आहे.
ReplyDeleteलेखन खूप ओघवते आहे. वाचताना खूप सुंदर वाटते . शिवाय photography अप्रतिम आहे.
ReplyDeleteछान
ReplyDeleteलेखन खूपच ओघवते आहे . वाचताना खूप सुंदर वाटते , शिवाय photography अप्रतिम .
ReplyDeleteछान
ReplyDeleteछान
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete