बागलाण भटकंती: स्वर्गीय साल्हेर
कालच्या दिवसानंतर
शशांकला मुंबईस रवाना केल्याने आता फक्त सुपरसिक्स उरले होते. बहुतेक
सगळेच ट्रेक्सची किमान पन्नाशी गाठलेले. प्रत्येकाचीच फिटनेस आणि स्टॅमिना
वादातीत. म्हणजे ओझे आहे काय, वाहतो की आणि डोंगर आहे काय चढतो की असेच
प्रत्येकाचे होते. श्रीकांत (उसेनचा बाप) नट,
योगेश-द फायर फायटर, प्रविण-द बिल्डर, देव्या आणि ध्रुव. योगेशच्या
मामाच्या घरुन कुकरभरुन खिचडी शिदोरी दिली होती. वाघांब्यात गावजेवण
घालायलाही ती कदाचित पुरली असती. शिवाय तोंडी लावण्यास लोणचे आणि लसणाची
चटणी. कालचा फसलेला स्टोव्ह तिथेच ठेवून नवीन फुल साईजचा स्टोव्ह घेतला
होता. मुल्हेरवरुन पाहिलेल्या हरणबारी धरणाच्या पाण्याला डावीकडून बगल
देऊनच साल्हेरच्या पायथ्याला वाघांबे गावाकडे रस्ता जातो. श्रावणी उन्हं
पडली होती, त्यात उजवीकडे न्हावी-मांगी-तुंगीची डोंगररांग हरणबारीच्या
पाण्यात आपले साजिरे प्रतिबिंब निरखून पाहत होते. वाघांबे गावात पोचलो तसे
शिदोरी सोडून पोटभर खिचडी खाऊन घेतली आणि पाणी पिऊन दहा मिनिटे आराम करुन
घेतला. उरलेली खिचडी पिशवीत भरुन घेतली. सॅक्स पाठीला मारल्या, बूटाच्या
लेस आवळल्या आणि एकवार साल्हेरकडे मान वर करुन पाहिले. तो आज सर होणार या
अभिमानाने नाही तर पुन्हा आदराने खाली झुकवण्यासाठी. साल्हेर… तेच जे गेले
काही दिवस पडणारे स्वप्न, महाराष्ट्रातले कळसूबाई खालोखालचे शिखर आणि
सर्वांत उंच किल्ला. आज त्याच्या कुशीत मुक्कामास जाणार, त्याच्या
अंगाखांद्यावर बागडणार या विचारानेच मन कसे तरंगू लागले होते.
वाघांबे गावच्या पाठीमागेच साल्हेर किल्ला
आहे. गावाच्या एका गल्लीतून बाहेर पडून वाटेत आडवा येणारा ओढा
गुडघ्याएवढ्या पाण्यातून ओलांडून आपण भातखाचरांच्या बांधांवरुन चालू लागतो.
अशा खाचरांमधून चालण्याची मौज काही औरच असते. सभोवार पिवळट हिरवी शेतं,
त्यामध्ये कामं करणारे शेतकरी भाऊ, बांधांवर वाढलेलं गवत, एखाद्या दगडावर
उन्हाला येऊन बसलेलं घोणसचं एखादं पिल्लू, त्याला सांभाळून ओलांडून पुढं
गेलो आणि डोंगरउताराशी पोचतो. साल्हेरच्या चढणीचा हा पहिला टप्पा. यावरच
छातीवर येणार्या नाशिक स्टाईल चढणीची सवय करुन घ्यावी. पुढे ही चढण अधिकच
अंगावर येऊ लागते. म्हणून मुंग्यांची शिस्त, पायांवर भिस्त करत आस्तेकदम
पाऊलवाटेनं चढत रहायचं. एखाद्या वेळी दम टाकण्यासाठी क्षणभर विसावून मागे
वळून पाहिलं की मागे कोवळ्या उन्हात भातखाचरांच्या पार्श्वभूमीवर घरांच्या
सोंगट्यांचा सुंदर सारीपाट मांडलेला असतो.
समोरच्या माळावर हिरव्यागार पठारावर
गावातली जनावरं चरत होती. आम्हांला पाहून मध्येच थबकून नजरेला त्यांची
मायाळू नजर भिडवून सांभाळून जा रे बाबांनो सांगत होती. ते पठार मागे टाकून
आपण एका सोंडेच्या माथ्यावर पोचतो. जवळपास पाच एकशे मीटर लांबीची ही सोंड
म्हणजे खरंच अद्भुत. सपाट हिरव्या गवताने पांघरलेले पठार. एका टोकाकडून
चालत सुरुवात करायची आणि दुसरे टोक भिडते ते थेट सालोट्याच्या भिंतीशी.
जोडीला भर्राट वारा, भटक्यांच्या कानांत घुसत उधळायला लावणारा. अधेमधे
चरणारी जनावरं.
उजवीकडे साल्हेरची एक सोंड उतरलेली आणि
डावीकडे सालोट्य़ाच्या पल्याडून मुल्हेर-हरगडाची रांग. दोन्हीकडे दरीत
ऊनसावल्यांचा खेळ रंगलेला. सालोट्याच्या उजवीकडून दिसणारी साल्हेरकडे घेऊन
जाणारी खिंड, आकाशात घुसणारे साल्हेर आणि सालोट्याचे दिग्गज सुळके.
साल्हेरच्या दक्षिण भिंतीशी लगट करुन जाणारी वाट, येथूनच दिसणारी गुहांची
साखळी.
हीच सोंड चढून सालोट्याला उजवी घालून
आम्ही खिंडीत पोचलो. वर एकवार नजर टाकली. आता साल्हेरच्या पोटातून
जाणार्या कातळखोदीव पायर्या आणि डोक्यावरचा एक दरवाजा दिसू लागल्या
होत्या. अगदी थोड्याच अंतरात फारच मोठा हाईट गेन दिसत होता. थोडक्यात
चढताना फासफूस होणारच असे गृहीत धरुनच पुढे निघालो. खिंड ओलांडून साल्हेरवर
जाण्यासाठी पाठीमागल्या फेसवरुन डावीकडे जाऊन पुन्हा उजवीकडे वर चढणारी
वाट आहे. खिंड ओलांडून जरा एका कातळावर विसावलो. निळ्या आकाशात कापशी ढग
सालोट्याच्या माथ्यावरुन पलीकडे निघाले होते. बसल्या जागेवरुन त्याचे फोटो
काढले.
शेवटचा दम टाकून, पाणी पिऊन निघालो. एका
वठलेल्या झाडावरुन पुढे डावीकडे जाऊन वाट वर उजवीकडे चढते. वाट जरा पावसाने
निसरडी झाली आहे. कातळावर शेवाळले आहे. जरा काळजीपूर्वक हातांचा आधार घेत
वर चढलो की कातळात खोदलेल्या पायर्या दिसतात. त्या ओलांडून पुन्हा पुढे
आधी खिंडीतून दिसलेल्या खड्या पायर्या दोन दरवाजांच्या मालिकेत नेऊन
सोडतात. दरवाजाशी एक शिलालेख आहे. हे दरवाजे पार करुन आम्ही कातळाच्या
पोटातून जाणार्या वाटेवर चालू लागलो. ही वाटही साधारण चार-पाचशे मीटरची,
एकदम कड्याच्या पोटाशी बिलगून जाणारी. पाठीमागे सालोट्याचा सुळका आभाळात
घुसलेला, उजवीकडे सरळसोट खाली पाताळात जाणारा कडा आणि डावीकडे असंख्य गुहा
आणि टाक्यांची साखळी. अतीव सुंदर, दगडी गुहा, काही खांब असलेल्या, काहींवर
कोरीवकाम केलेले, काही टाक्यांच्या पोटात खोदलेली पोटटाकी. दोन-तीन ठिकाणी
कुणा गोट्या-शांता-रवीचे प्रेम निळ्या ऑईलपेंटमध्ये उतू चालले होते.
त्यांना मस्तपैकी मनसोक्त शिव्या हासडून घेतल्या. अशा अर्वाच्च्य शिव्या
(वाचा: भाषेचे अलंकार) मोठ्ठ्याने देण्याचा आनंद मिळवायची हमखास जागा
म्हणजे असे ट्रेक
हीच वाट सरळ साल्हेरच्या या वाघांब्याच्या
बाजूच्या फेसच्या टोकाकडे जाते आणि तिथल्या एका दरवाजावरुन वळून
किल्ल्याच्या माथ्यावरल्या माचीवर. माचीवर सुंदर ढग दाटून आले होते. मध्येच
एखाद्या खिडकीतून सुर्य डोकावून जाई आणि प्रकाशाची एक लाट सगळी हिरवीगार
माची सोनसळी करुन टाकी. डावीकडे उंचावर परशूरामाचे मंदिर आणि शिखर अजूनही
ढगांमध्येच हरवले होते. एवढा सुंदर नजारा आजवर कुणी पाहिला नसेल. दूर थोडी
उंचावर गुहा आणि त्यासमोरचा झेंडा दिसला आणि आम्ही मुक्कामाच्या जागेजवळ
आल्याची खात्री झाली. आता अधिक काम नव्हते. मुख्य काम होते ते समोरचे
महानाट्य अनुभवायचे. म्हणून माचीच्या कड्यावर अगदी टोकाला येऊन पाय पसरुन
बसलो. अगदी ध्यानाला बसतो तसेच. सुर्यास्त व्हायला अजून अवकाश होता. तिथे
ध्रुवने सोबतच्या कागदांवरुन गडाचा इतिहास आणि प्राचीन पत्रांतील उतारे
मोठ्याने वाचून काढले. काही लाखांच्या दिल्लीच्या पातशहाच्या फौजेस उघड
मैदानात पाणी पाजून शिवरायांनी संपूर्ण बागलाण प्रांतावर आपला वचक बसवला
होता. मावळत्या सुर्याला ढगांआडून साक्षी ठेवून अजोड पराक्रमाची ही गाथा
ऐकून ऊर अभिमानाने भरुन आला. जागेवरुन उठलो. सूर्य आता बाहेर आला होता.
समोरच्या दरीत हळद्या उन्हाचा आणि शिराळाचा खेळ मांडला होता. सूर्यनारायण
मुक्तहस्ते सृष्टिदेवतेवर भंडारा उधळत होता. दरीच्या तळाला जीवनाचा एक
सोनेरी पट उलगडला जात होता. जीवनदायिनी नद्या, अडवलेले पाणी, तलाव आणि
दूरवर अनंतापर्यंत दिसणारा माझा सह्याद्री. कितीही फोटो काढले तरीही कुठलाच
फोटो या दृश्याला न्याय देऊन शकणार नाही याचे भान येऊन मी कॅमेरा बंद केला
आणि फक्त डोळ्यांने तो क्षण अनुभवून रोमारोमांत साठवून घेतला.
सूर्य मावळतीकडे झुकला तसे आम्ही परत
फिरलो. आता फक्त गुहेपर्यंत जायचे होते. पाचच मिनिटांची चाल. वाटेत एक भग्न
गणेश मंदिर, एक सुंदर बांधीव गंगासागर तलाव आणि त्याच्या बाजूला
पिण्याच्या पाण्याचे टाके. समोरुन गंगासागराच्या पल्याड अस्ताला जाणारा
सूर्य. त्याने आकाशात उधळलेले संध्यारंग. हवेत गारवा सुटलेला. खोल
श्वासासरशी तो छातीत भरुन घेतला आणि गुहेची वाट धरली. गुहा मोठी स्वप्नवत.
गुहा, समोर आकाशाशी उघडे देवालय, त्यापलीकडे गंगासागर आणि गंगासागराच्या
पलीकडे विस्तीर्ण दरी.
गुहेत एक गुराखी वस्तीला असतो.
पावसाळ्याचे चार महिने तो वरच राहतो. चाळीसेक गुरं एका गुहेत कोंडलेली.
दुसर्या वनरुम-किचन टाईप गुहेत त्याचे वास्तव्य. येणार्या जाणार्या
ट्रेकर्सना कायमच मदत करणारा हा तुकाराम भाऊ. आम्हांस कुठे स्वयंपाक करता
येईल, कुठे झोपता येईल हे नीट दाखवून दिले. पहिल्या गुहेत शेकोटी पेटली
होती. आतल्या गुहेत स्वच्छ कोरडी जागा, भिंत बांधून बंद केलेली, त्यात एक
खिडकी ठेवलेली. त्यातून गारठा गुहेत डोकावणारा. कोरडे कपडे बदलून शेकोटीशी
उबदार गप्पा रंगायला वेळ लागला नाही. काळाकुट्ट अंधार झाल्यावर स्टोव्ह
पेटवला. सुंदरसा चहा तयार झाला. दूध नसले तरीही तो चहा ‘अमृततुल्य’च झाला
होता. चहासोबत सटरफटर खाणं झालं आणि पोटातला डोंब थोडा शांत झाल्यावर
गरमगरम सूपच्या ग्लाससोबत गप्पा रंगू लागल्या. बाहेर आताशा रिमझिम पाऊस
सुरु झाला होता. त्या पावसाचा सूर, हातात वाफाळता सूपचा ग्लास आणि सोबत
सह्याद्रीच्या वेड्या पुत्रांच्या डोंगरातल्या आठवणी. या वातावरणाचे वर्णन
करण्यास शब्द थिटे पडावेत. गप्पा थंडावल्यावर दुपारची खिचडी गरम केली. पापड
भाजले आणि लसूण चटणीसोबत खिचडीवर सर्वांनीच ताव मारला. रात्री उबदार
पांघरुणाच्या आड पुन्हा गप्पांचे फड रंगले. एकमेकांचे आजवरच्या भटकंतीचे
किस्से आणि आगामी बेत यांच्या गप्पा मारता मारता कधी डोळा लागला ते समजलेच
नाही.
मध्यरात्रीनंतर कधी तरी जाग आली तेव्हा
बाहेर पावसाने जोर धरला होता. एकसंथ लयीत त्याने वरचा “सा” लावलेला. मिट्ट
काळोख, गुहेत शिरलेला चुकार काजवा, थकलेल्या सवंगड्यांचे या कुशीवरुन त्या
कुशीवर वळण्याचे खुसफूस आवाज, बाहेर गळणार्या पागोळ्यांच्या धारा हे सगळे
एक होऊन एक मधुर संगीताची मैफिल जमून आली होती. थंडगार पहाटवार्यात बाहेर
साल्हेर उभा होता, आम्हांस कुशीत घेऊन, एखाद्या तपस्वी ऋषीसारखा !
आज दि. २७ एप्रिल २०१६ च्या लोकसत्ता दैनिकात लोकभ्रमंतीमध्ये माझा ई-भटक्यांच्या जगात हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात आपल्या या ब्लॉगचा उल्लेख केला आहे. जरुर वाचा:
ReplyDeletehttp://prabhunarendra.blogspot.in/2016/04/blog-post_27.html