लडाख ड्रीम्स-४ (पॅंगॉन्ग-त्सोमोरिरी-त्सोकर)
कुठल्याही फोटोग्राफरच्या लडाख ड्रीम्सचा
क्लायमॅक्स म्हणजे पॅंगॉन्ग त्सो (अर्थात पॅंगॉन्ग तलाव), त्सो-मोरिरी आणि
त्सो-कर. आरशासारखा लख्ख निळा जलाशय, अगदी हात लावला तरी फाऊल होईल अशी
स्थिरता, वरती विविध टेक्श्चर असलेली पर्वतरांग आणि त्याच्या वर असलेले
अथांग निळे आकाश, त्यावर ढगांची वेलबुट्टी. आज आम्ही त्या स्वप्नांच्या
दुनियेत पोचणार होतो. पण आधीच कप्ल्पनेचे इमले बांधण्यात अर्थ नाही,
त्यासाठी वेळेत तिथे पोचायला हवे. पॅंगॉन्ग ते लेह हे अंतर अंदाजे
सव्वादोनशे किलोमीटरचे. पण आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे लडाखमध्ये
अंतर किलोमीटरपेक्षा तासांत मोजले जाते. आजही आमचे सारथ्य सेवांग
दोरजीभाईकडेच होते. त्याच्या अंदाजानुसार पॅंगॉन्गला पोचण्यासाठी सकाळी
नऊला निघालो तर दुपारचे तीन वाजणार होते.
लेहच्या बाहेर पडल्यावर वीस किलोमीटर अंतरावर आमच्या प्लॅनमध्ये नसताना थिकसे गोम्पा दुरुन सुंदर दिसला म्हणून दोरजीभाईला गाडी तिकडे घ्यायला लावली. पण अगदी त्याचं फलित झालं. थिकसे गोम्पा हा एका टेकडीवर वसलेला लेह आणि परिसरातला सर्वात सुंदर गोम्पा असून ल्हासाच्या पोटला पॅलेसची (दलाई लामांचे अधिकृत निवासस्थान) प्रतिकृती आहे. लेह परिसरातील ही सर्वात मोठी गोम्पा. विविधरंगी दालनं, मंडप, प्रार्थनाकक्ष,भित्तिचित्रे यांबरोबरच हे ठिकाण प्रसिद्ध आहे ते पन्नास फुटी मैत्रेय बुद्धाच्या पुतळ्यासाठी. माझ्या मते ही बुद्धमूर्ती जगातील सर्वात सुंदर मर्ती असावी. पद्मासनात बसलेल्या या मूर्तीच्या चेहर्यावरील भाव, डोळ्यांतील अथांग निर्मळ शांतता, चर्येचे तेज आपणांस एका वेगळ्यात विश्वात घेऊन जाते. या गोम्पाचा परिसरही असाच अतिशय सुंदर. आकाशी भिडलेला ध्वजस्तंभ, गोम्पाचा शांत धीरगंभीर परिसर, नामजप करत फिरणारे भिक्खू, आवाराला असलेली सुंदर रंगीत चित्रे चितारलेल्या पुरातन सीमाभिंती, त्यापलीकडील सिंधू नदीचे खोरे आणि दूरवरील हिमालयाच्या रांगा. भान हरपून पहावं असंच.
थिकसे पाहून आम्ही उपशीच्या चौकात आलो. नाक्यावर आल्यावर लगेच बीआरओची चौकी आहे. तिथे आपले परमिट्स दाखवणे वगैरे सोपस्कार करावे लागतात. इथून पुढला रस्ता पुन्हा घाट चढत जातो. सिंधू नदीच्या खोर्यातून एक हिमालयाची रांग चांग-ला (चांग खिंड) ओलांडून चांगथांग खोर्यात जातो. चांग-ला ही जगातील दुसर्या क्रमांकाची सर्वाधिक उंचावरील खिंड आहे (पहिला क्रमांक खारदुंग-लाचा). चांग-ला टॉपला पोचलो तेव्हा लख्ख ऊन पडले होते, त्यामुळे थंडीचा त्रास नव्हता. शिवाय आता वातावरणाचा सराव झाल्याने तोही त्रास झाला नाही. तिथे एक स्पॅनिश तरुण भेटला जो लंडनहून निघून अफगाणिस्तानमार्गे लडाखमध्ये आला आणि पुढे श्रीलंका-व्हिएतनामला जाणार होता. त्याच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि पुढे निघालो. पुढला टप्पा होता टांगत्से (तांगत्से) चौकीवर पोचण्याचा. टांगत्से इथे सेनादलाचा तळ आहे. पुढे बराचसा त्यांचा प्रभाव जाणवतो. टांगत्से इथे पुन्हा परमिट्स दाखवून नोंद करुन आपण जसे पुढे सरकतो तसा आसपासचा परिसरातला बदल जाणवायला लागतो. एकदम अंगावर आलेले पर्वत आणि त्याच्या खाली खोर्यात पाणथळ जागा. त्यांच्या कडेकडेने तयार केलेले दुर्गम रस्ते. पाणथळ जागी काही ठिकाणी मैदानात उगवलेले गवत,त्यावर चरणार्या पश्मीना मेंढ्या. इथूनच दूरवर पॅंगॉन्गचे पहिले दर्शन घडते. परंतु मधल्या खोर्यातून नदीच्या कधी या काठावरुन तर कधी त्या काठावरुन प्रवास करत साधारण वीसेक किलोमीटरचा प्रवास बाकी असतो. त्यातच रस्त्याला छेदून वाहणारे प्रवाह. उंचावरील बर्फ वितळल्यावर त्याचे प्रवाह रस्त्यावरुन वाहू लागतात आणि ते एखादी गाडी वाहून घेऊन जाऊ शकतील एवढे तीव्र असतात. त्यातल्याच एका नाल्याचे नाव पागल नाला. म्हणजे दिवसातला उत्तरार्धातला ठराविक वेळ तो एवढ्या जोराने वाहत असतो की त्यातून गाड्या पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणून पॅंगॉन्गला पोचण्यासाठी सगळ्या गाड्या तो नाला दुपारी चार वाजण्यापूर्वी पार करतात. खिंडीतून जसे आम्ही मैदानी प्रदेशात आलो तसा पॅंगॉन्गचा विस्तीर्ण जलाशय नजरेच्या टप्प्यात आला. तेच स्वप्न जे आम्ही पाहिले होते. तोच निळा रंग, तसेच ढग, तोच संथ जलाशय, तसेच काठावरुन जाणारे रस्ते आणि तसेच जलाशयाच्या दर्पणात आपले रुपडे न्याहाळणारी समोरची गिरीशिखरे. अगदी लडाख ड्रीममध्ये पाहिले होते तसेच.
पॅंगॉन्ग तलाव हा "थ्री इडियट्स" या चित्रपटामुळे अधिक प्रसिद्ध झालाय,लडाखला येणार्या प्रत्येक पर्यटकाला तो पहायचाच असल्याने तिथे बर्यापैकी वर्दळ होती. तलावाच्या काठाशी मनसोक्त फोटो काढून झाल्यावर आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. जोरदार वारा सुटला होता आणि आमच्या मुक्कामाची सोय आज रात्री तलावाच्या काठी तंबूंमध्ये केली होती. सामान तंबूत टाकून आम्ही तलावाच्या दृष्याचा आनंद आणि चहाचा आस्वाद घेत त्या भन्नाट वार्यात सुर्यास्ताची वाट पाहत होतो. जसा दिवस कलला तसा तलावाच्या पाण्याचा रंग पालटू लागला. आम्ही बसलेल्या सृष्टीच्या त्या विशाल नाट्यगृहाचा पडदा वर गेला, तिसरी घंटा झाली तसे आधी निळसर भासणारे पाणी आता अगदी गडद निळे दिसू लागले. समोरची शिखरं कलत्या सुर्याच्या सोन्यात झळाळू लागली. मागे हिमाच्छादित शिखरांवर सोनेरी मुकुट दिसू लागले. ढगांची ये-जा सुरु झाली. आकाशात रंग उधळले गेले. तलावाच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांचे थवे उडू लागले. मिनिटागणिक आकाशाचे, तलावाचे, शिखरांचे रंग पालटत होते. कॅमेर्यात काय साठवू आणि मनःचक्षूंना किती तृप्त करु अशी द्विधा अवस्था झाली. शेवटी जमेल तसे कॅमेर्यात आणि उरलेले मनात साठवून आम्ही पसारा आणि सुर्याने आपली भैरवी आवरली. रात्रीच्या जेवणाच्या वेळी इतर गोष्टींपेक्षा आजच्या महानाट्याचीच चर्चा रंगली होती. पॅंगॉन्ग हे आकाशनिरीक्षणासाठी अतिशय सुयोग्य ठिकाण आहे. सुर्यास्ताचा काही वेळ सोडल्यास आकाश निरभ्र होते आणि हजारो तारकामंडले आपली सुरेख रांगोळी त्या विस्तीर्ण पटलावर रेखतात. शहरात कधीही न पाहिलेली आकाशगंगाही इथे साध्या डोळ्यांनी दिसू शकते. त्याच वातावरणाचा उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने सरकारने इथून पुढे साठ किलोमीटरवर हानले या जागी आकाशनिरीक्षण दुर्बिण उभारली आहे. देशोदेशीचे संशोधक तेथे खास परवानगीने येऊन अभ्यास करत असतात. आम्ही रात्रीच्या तारकामंडलाचे काही फोटो काढले. रात्री अचानक वार्याचा जोर वाढला,बोचरे वारे झोंबू लागले. तंबूही उडून जातील की काय अशी भीती वाटावी असा सोसाट्याचा वारा सुटला. उबदार पांघरुण घेऊन आम्ही त्या रात्री बराच वेळ गप्पा मारत जागे होतो. दुसर्या दिवशी आम्ही पोचणार होतो त्सो-मोरिरीला.
पॅंगॉन्गहून त्सोमोरिरीला पोचण्यासाठी खरं तर एक शॉर्टकट रस्ता आहे. परंतु तो भारत-चीन सीमेच्या फार जवळ असल्याने त्यासाठी विशेष परवानगी आवश्यक असते आणि गेल्या काही महिन्यांत पॅंगॉन्ग परिसरात चिनी सैनिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे ती देणे बंद झाले आहे. त्यामुळे दुसर्या दिवशी पुन्हा उपशीला उलट जाणे आणि मग वळसा घालून त्सोमोरिरीला पोचणे क्रमप्राप्त होते. त्सोमोरिरीपर्यंतचा प्रवास बारा तासांचा होता. आणि वेळेत पोचण्यासाठी लवकर निघणे गरजेचे होते. अधिक उशीर हऊ नये म्हणून आम्ही पहाटे साडेतीनलाच उठून निघालो. वाटेत चांग-लाच्या आसपास थांबून हिमालयन मॉरमॉटचे फोटो काढले आणि चांग-लामार्गे उपशीला पोचलो तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. बरेच वेळा आम्ही खाण्याची वेळ मारुन नेत होतो किंवा वेळ साधली तर खायला धड मिळत नसे. फक्त नूडल्स किंवा एखाद्या भाताच्या प्रकाराचा पर्याय समोर दिसे, त्याने भूक मरुन जाई. पण उप्शीला अस्सल पंजाबी पराठ्यांचं हॉटेल सापडल्यानं आम्ही सर्वांनीच आडवा हात मारला.
मनसोक्त फोटो काढून आम्ही पुन्हा हॉटेलमध्ये परतलो तेव्हा हवामान खराब झाले होते. त्या रात्री मुसळधार पाऊस झाला. कडाक्याची थंडी पडली तसे आपण हॉटेलमध्ये खोल्या घेऊन शहाणपणाच केला आहे याची जाणीव झाली. दुसर्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा पूर्वेकडील शिखरे उगवत्या प्रकाशात झळाळली होती, ढगांच्या फटीतून आडून त्यांचे दर्शन घडत होते. चकचकीत प्रकाश पडला होता. सगळं आवरुन आम्ही त्सो-मोरिरीच्या आसपास फिरुन आलो. काल पाहिलेला तलाव आणि आजचा तलाव काहीसा वेगळाच भासत होता. आज कुणीतरी त्यात शाईची नदीच सोडली की काय असे निळेशार पाणी. पलीकडील हिमशिखरांवर ताजा बर्फ पडला होता. तो उन्हात चकाकत होता. लडाखी प्रार्थना ध्वज वार्यावर फडफडत होते. ते सगळे कॅमेर्यात बंदिस्त करुन आणि मनावर कोरुन आम्ही त्या परिसराचा निरोप घेतला.
आता परतीचा प्रवास सुरु केला होता. परतीच्या रस्त्यावर त्सोकर तलावाचे दर्शन घडले. विस्तीर्ण मैलोनमैल पसरलेला मैदानी प्रदेश, कुठेही उंचवटा किंवा खड्डा नाही. नजर जाईल तेथपर्यंत फक्त गवताळ मैदान आणि खुरटी झाडी. त्याच्या मध्यावरुन जाणारा कच्चा रस्ता. स्वप्नांतून, आमच्या लडाख ड्रीम्समधून जाणारा.
परतीच्या प्रवासात येताना आम्ही पुन्हा मोरेय प्लेन्स, पांग, पद्मा आंटीची भेट, गटा लूप्स, दारचा-ला, झिंगझिंगबार, जिस्पा असं करत आम्ही पुन्हा केलॉन्गला पोचलो तेव्हा आमचे लडाख ड्रीम उरकत आले होते. घर वाट पाहत होते. केलॉन्गला रात्री पाठ टेकली तेव्हा उद्या मनाली-दिल्लीमार्गे घराची ओढ लागली होती. मनालीला पोचलो तेव्हा आकाशाचे रंग विटल्यासारखे दिसत होते. लडाखी निळा रंग जाऊन फिके पडले होते. लडाख ड्रीम संपल्याची ती खूण होती.
Simply Outstanding Photography!!!! Excellence Justified
ReplyDeleteपंगोंग च एवढ सुंदर वर्णन _/\_ वाह
ReplyDelete