झापावरचा पाऊस !
सकाळी जाग आली तीच मुळी पावसाच्या पाण्याच्या आणि गुरांच्या घंटेच्या
आवाजाने. काल संध्याकाळी गावात उतरुन डेअरीवर दूध घेऊन आलेल्या रामजीसोबत
आम्ही रात्रीच्या अंधारतच इथे झापावर येऊन पोचलो होतो. जेवण वगैरे सोबत
आधीच झाले होते. त्यामुळे थकल्या जीवाला थोडी कोरडी ऊब मिळताच पटकन डोळा
लागला. पाऊस रात्रभर रिपरिपत होता. झापावर त्याचा
आवाज एका लयीत चालूच होता. घोंगडीच्या आतून डोकावून अंधारलेल्या जागी
पाहिलं तो अगदी नाकासमोर बैलांचे खूर आपटत होते. दचकून उठून बसलो तो
रामजीचा आवाज आला... पाऊसकाळात जनावरं खोपटातच
बांदतो वो... भाईर कोल्ह्याकुत्र्याचं भ्या हाय आसतंय. एकांदुसर्या
टायमाला वाघराची बी आवई उठती. हट ... चल मानक्या, चंदी.... व्हा भाईर.
रानला आता हिरवा घास घ्या. जने... ए जने... !! वाईच जा यांच्यामागं. म्या
पाहुन्यास्नी च्या-न्ह्येरी करुन आलोच घेऊन. आज रोप लावाय पायजे, नायतर
पिवळं पडंल. उठ बिगी बिगी. रामजीनं जनीला म्हणजे त्याच्या दहा-बारा
वर्षाच्या पोरीला झोपेतून उठवून माणक्या, चंदी आणि बाकी दहापाच गुरांमागं
पिटाळलं.
"पावणं, मुक्कामाला आलायसा तर घ्या तोंडं खंगाळून मंग दावू तुमास्नी झापावरला पाऊस.
तसं काय बगणार तुम्ही ते आमाला ठाव नाय. पण लई इरंला पेटलसा तवा या
म्हणलं. तशी या दिसांत यष्टी बी चार मैल लांबच्या गावापतुरच येती. लईच हौस
तुमास्नी... आख्खं रान तुडवत, काट्याकुट्यातून, झाडोर्यातून, दोन वहाळ
वलांडून इथवर आलासा." रामजीच्या शब्दांनी आम्ही भानावर आलो. रामजीचं
गावातलं घर आमच्या नित्याच्या ट्रेकच्या वाटेवर आणि तिथं आमचा वर्षातून
दोनदा तरी मुक्काम पडत असे. पण पाऊस लागला की तो
आपला रानातल्या झापावर येऊन राही. डोंगराच्या दोन सोंडा उतरुन गावात
सकाळ-संध्याकाळ "डेरीवर" दूध घालण्याचं काम फक्त. बाकी पूर्ण वेळ भातशेतीची
कामं करण्यात आणि नंतर त्याची राखण करण्यात जाई. तोंड धुवून आम्ही जरा
त्या झापाचं निरीक्षण करुन लागलो. रामजीच्या गावातल्या घरासारखंच जरा, पण
थोडं लहान, गरजेपुरतीच जागा. बरंचसं अंधारलेलं. सरावलेल्या डोळ्यांना दिसले
ते गुरांना बांधण्यासाठी आत तयार केलेली जागा, त्याच्या अलिकडे स्वयंपाक
रांधण्यासाठीची दुहेरी चूल, वर गरजेपुरती भांडी आणि मीठमिरचीची डबडी. एक
मोठी संदूक आणि चुलीला काटकोनात आढ्याला बांधलेला कळक. त्यावर गोधड्या,
घोंगड्या, वापरायचे कपडे, दह्या-दुधाचे शिंकाळे, असे काय काय टांगलेले.
दुसर्या काटकोनात आम्ही सवंगडी गरम चहाच्या ग्लासच्या ऊबेने हात शेकत
रामजीशी गप्पा मारत बसलो होतो.
इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्यावर आम्ही बाहेर पडलो. पाऊस
थांबण्याचे नाव घेत नव्हता. आणि त्याने तसे करावे तरी का? दिवस त्याचेच
होते. रामजीनं आम्हाला इरलं दिलं आणि आम्ही ते डोक्यावर धरलं. बांबूच्या
कामट्यांचं विणलेलं आणि बाहेरुन प्लॅस्टिकचा कागद जडवलेलं इरलं आतून
गोणपाटानं अस्तरलं होतं. डोंगराच्या पावसापुढे हार मानणारे आमचे रेनकोट
कुठं आणि कितीही जोरदार पाऊस आला तरी न कोरडे ठेवणारं हे इरलं. अस्सल गावरान आणि कामाची चीज.
बांधाबांधानं चालत होतो. पाण्याचे अवखळ ओहळ या शेतातून त्या
शेतात खेळत होते. एखाद्या शेतात जास्त झालेलं पाणी कुठून तरी चर काढून
उताराला लावून दिलेलं. तिथून ते खालच्या ओढ्यात मिसळलेलं. दूरवर धुकट
डोंगरात पुसटशी जनावरं चरत होती. मागे आमच्यासारखंच इरलं घेतलेली जनी उड्या
मारत खेळत होती. अलिकडे रिपरिप पावसात रामजीची
लगबग चालली होती. भाताचं रोप वाफ्यातून काढून जुड्या बांधायचं काम चाललेलं.
घोटा-घोटा, गुडघा-गुडघा खोल चिखलातून तो रचरच करत भराभरा रोप उपटून जुड्या
बांधून तालीला फेकत होता. त्याची तंद्री लागली होती. आम्हीही बांधावर चपला
काढून वाफ्याच्या कडेकडेने आमची इरली सांभाळत त्याच्यापाशी जाऊन पोचलो.
"आवो पाव्हणं, इकडं कशाला आलासा?" "आलो जरा, हे जमतंय का बघतो" म्हणत आम्ही
त्याच्यासारखं रोप उपटून त्याच्या जुड्या बांधायचे प्रयत्न करु लागलो. रोप
उपटणं, इरलं सांभाळणं, जुडी जुळवून बांधणं, त्याच झोकात ती बांधावर फेकणं
हे सगळं शिकायला वीसेक मिनिटं लागली. पण नंतर त्या पावसात आम्ही जवळपास तासभर ते काम करत होतो. रामजीचं सगळ्या वाफ्याचं काम लवकर उरकलं. त्यानं बैलजोडी घेऊन चिखलणीचं काम सुरु केलं. पावसाची
रिपरिप, बैलांच्या गळ्यातल्या घंटा आणि रामजीचे हाकारे यांनी सगळा आसमंत
भरुन गेला. आसपासच्या काही शिवारांतही अशीच काहीबाही कामं चालू होती. आगाऊ
रोप निघालं तिथं बाप्ये आणि बायका मुठीमुठीनं भाताची लावणी करीत होत्या. ते
सारे जन कौतुकाने आमच्याकडे पाहत होते.
तिथून निघून आम्ही ओढ्याला पोचलो. चिखलात बरबटलेले हातपाय साफ केले आणि पाण्यात पाय सोडून बसलो. पाऊस
एव्हाना उतरला होता. जनी गुरं घेऊन आली. तिचं रेडकू पाण्यात घुसताना ती
टुणकन उडी मारुन त्याच्या पाठीवर बसली. रेडकू पाण्याच उतरलं तशी तिनं पाणी
उडवून खेळायला सुरुवात केली. झटकन उडी मारुन गळाभर पाण्यातून तिच्या चंदीला
तिनं पाण्याशी ओढलं आणि तिच्या अंगावर पाणी उडवून धुवून काढलं. झापावर
येऊन पाण्यात भिजायचं नाही म्हणजे कसला करंटेपणा? असे विचार येतच होते.
तेवढ्यात जनी झापावर जायला निघाली. तिच्यासोबत रेडकूच्या पाठीवर आम्ही आमची
इरली पाठवून दिली आणि ओढ्याच्या खळाळत्या पाण्यात शिरलो. त्या थंडगार
पाण्याच्या स्पर्शाने सर्वांग शहारले. पण लवकरच सरावलो. मनसोक्त डुंबून
होते न होते तोच रामजी त्याची चिखलानं माखलेली बैलजोडी घेऊन आला. रामजी बैल
धूत असताना आम्हीही बैलजोडीवर ओंजळीनी पाणी उडवत होतो. मग त्यानं दोन्ही
बैलांची वेसण धरली तेव्हा आम्ही जवळ जाऊन बैलांची पाठ, मान चोळून स्वच्छ
केले.
दुपार होत आलेली. रामजीनं आता जेवणाची तयारी झाल्याचं सांगितलं. ओढ्यावरचे आमचे खेळ आटपून आम्ही पुन्हा झापावर परतलो. दूरवर रानात पुन्हा एकदा अंधारुन आलेलं होतं. जोरदार चळक येणार हे दिसत होतं. झापात शिरतो तो समोरच्या अंधारात तर सुरुवातीला काहीच दिसेना झालं. फक्त गरम गरम तांदळाच्या भाकरीचा सुगंध दरवळत होता. चुलीच्या बारीकशा उजेडाचा वेध घेत घेत आम्ही तिच्या समोर जाऊन बसलो. आता डोळे सरावले होते. गिरजाकाकू म्हणजे रामजीची बायको भाकरी करत होती. तिनं वाफाळतं कुळथाचं पिठलं, ताज्या दह्याची कढी आणि भाकरी ताटात वाढली. सोबत भाजलेल्या बिवड्या, कांदा आणि मडक्यातून काढलेलं गावरान लोणचं. स्वर्गात कदाचित, नव्हे निश्चितच हेच जेवण मिळत असणार. बाहेर आता पावसानं जोर धरला होता. त्या मुसळधार पावसात, त्या ऊबदार चुलाणाच्या शेजारी बसून खाल्लेल्या त्या गरमागरम पिठल्याची कशाशी व्यर्थ तुलना करायचा मूर्खपण आम्ही निश्चितच करणार नव्हतो. अगदी तृप्त होऊन अन्नदाता सुखी भव वदलो.

दुपारच्या जेवणानंतर अर्धा तासभर आराम केल्यानंतर आम्ही
"पुढे काय" अशा अर्थाने रामजीकडे पाहिले. "रोपाची लावनी करायची, पर पाणी
पडतंत. तुमास्नी सोसायचं नाई. तुमी बसा मी आणि गिरजा जातो. पावूस उतरला की
तुमी या पघायला" पण आम्ही भिजायलाच आलोय आणि आता सोबतच येणार म्हणताच
रामजीचा नाइलाज झाला. त्याच्या सोबत आम्ही निघालो. कोसळत्या पावसात
आम्ही भिजतच शेतावर पोचलो. रामजीनं रोपाच्या जुड्या शेतात ठिकठिकाणी
फेकल्या. त्या सोडायच्या कशा, मूठ कशी धरायची, चिखलात कशी रोवायची समजावलं
आणि आम्ही भिडलो. वेग रामजी आणि गिरजाकाकूएवढा नव्हता, पण बरा होता. वरुन पावसाची
रिपरिप, मूठ मूठ रोप शेतात लावणे, सोबत रामजीची पहाडी आवाजातली सुरेख
भलरीगीतं, गिरजाकाकूची कलकल, वाढत्या पावसानं चढलेला ओढ्याचा आवाज असा
सुरेख हिरवा सजीव सभोवताल. बास्स्स... याच अनुभवासाठीची काल रात्री
अंधारातली पायपीट केली होती.
जसे जमेल तसे अगदी सांजावेपर्यंत आम्ही शेतावर लावणी करत
होतो. नखशिखांत भिजलो होतो. रामजीलाही आमचे काम पटले आणि मदत झाली म्हणून
गाडी खुशीत होती. आज खास बेत जेवू घालणार असे त्याने आम्हांला सांगितले.
दुपारीच तर स्वर्गीय जेवण झाले आता अजून काय असेल बुवा असा विचार करत होतो.
ओढ्यावर जाऊन हातपाय धुतले, थोडावेळ इकडे तिकडे फिरत, या नाही त्या शेतात
जात, बांधावरुन उड्या मारत आम्ही "डेरी"वरुन परतलेल्या रामजीसोबत अंधारल्या
वेळी झापावर आलो. मिणमिणत्या कंदिलाच्या प्रकाशात गिरजाकाकू काहीतरी
जात्यावर दळत होती. तिच्या जात्यावरल्या सुरेल ओव्या त्या कुंद संध्याकाळी
वेडावून टाकत होत्या. तिच्या शेजारी जनी ‘बालभारती’त डोकं खुपसून काही तरी
वाचत होती. आम्ही कोरडे झालो आणि कपडे बदलून चुलाणासमोर शेकत बसलो. अजून
शेक मिळावा म्हणून की आमची स्वयंपाकात लुडबूड नको म्हणून रामजीने समोर
घमेल्यात निखारे आणून ठेवले.
निखार्यावर कुठूनशी आणलेली चार-दोन मक्याची कणसं टाकली आणि फट-फट आवाज करत ती गप्पा मारता मारता भाजली. शहरात मिळणार्या भुट्ट्यापेक्षाही लाखपटीने चवदार कणसं ती. गोडी लागण्याच्या आतच ती संपताच तोच गिरजाकाकूनं हाती कसलेसे वाडगे दिले. "घ्या... शेरातल्या मान्सांना कसलं मिळायचं आस्लं झापावरलं खानं. ह्येला मुगाचं माडगं म्हन्तेत". मूग भाजून वाटून, लसणा-मीठमिरचीची फोडणी देऊन केलेलं ते गरम पेय. आपल्या सूपच्या तोंडात मारणारं नक्कीच. चुलाणांवरुन कसलासा झटकेबाज सुगंध येत होता. अगदी अंघोळीचं पातेलं वाटावं एवढं पातेलंभरुन काहीतरी रटरतत होतं. रामजीसोबत आमच्या गप्पा रंगल्या. कोल्हा कशा कोंबड्या पळवतो, वाघरानं रामजीच्या चुलतभावाची कालवड कशी ओढून नेली, पलीकडल्या झापावरल्या श्रीपतीनं रानडुकराशी कशी झुंज देली, अशा एक ना अनेक गोष्टी त्याच्या पोतडीतून बाहेर पडत होत्या. तासाभरानं गिरजाकाकूनं थाळ्यांमधून जेवण वाढलं. हुलग्याचे शेंगोळे, म्हणजेच दिवशे. कित्येक दिवसांत खायला मिळाले नव्हते. किंबहुना त्याची चवच विसरलो होतो. पावसाळ्यात आणि थंडीत आवर्जून केले जाणारे शेंगोळे... हुलग्याच्या भरड पिठाचे केलेले करंगळीहून लहान असे लांबट गोळे आणि लहान लहान दामट्या. मिरची-लसूण घालून उकळलेल्या पाण्यातच रटरटून केला जाणारा एक स्वर्गीय पदार्थ. भाकरीची गरजच नाही. हवं तेवढं खा ! अगदी पोटाला तडस लागेपर्यंत जेवलो.
रात्री सगळं आवरुन आडवे झालो पावसाची
रिपरिप वाढली होती. बाहेर एका लयीत तो चालू होता. ओढ्याच्या आवाजाची गाजही
सभोवताल भारुन टाकत होती. शांत-निवांत रात्र, सोबत झापावरल्या अहोरात्र
पावसाचे संगीत. पागोळ्यांचा आवाज, झापात शिरलेला एखादा चुकार काजवा,
चुलाणांत अजूनही शिल्लक असलेले निखारे, गोधडीची ऊब... एक भन्नाट नविन अनुभव
गाठीला जमा झाला होता... दिवस तर संपला होता, स्वप्नही पाहण्याची आता
आवश्यकता उरली नव्हती. दिवसभर अंतर्बाह्य पावसात
नखशिखांत भिजलो होतो. शरीरापेक्षाही निथळत्या मनाचंच अप्रूप वाटत होतं.
चिंब मन, वेडं मन, तृप्त मन. दिवसभर डोळे झालेलं मन, आणि आता अंधारात मनाचे
झालेले डोळे पाहत होते, अनुभवत होते... झापावरचा पाऊस !!!
निखार्यावर कुठूनशी आणलेली चार-दोन मक्याची कणसं टाकली आणि फट-फट आवाज करत ती गप्पा मारता मारता भाजली. शहरात मिळणार्या भुट्ट्यापेक्षाही लाखपटीने चवदार कणसं ती. गोडी लागण्याच्या आतच ती संपताच तोच गिरजाकाकूनं हाती कसलेसे वाडगे दिले. "घ्या... शेरातल्या मान्सांना कसलं मिळायचं आस्लं झापावरलं खानं. ह्येला मुगाचं माडगं म्हन्तेत". मूग भाजून वाटून, लसणा-मीठमिरचीची फोडणी देऊन केलेलं ते गरम पेय. आपल्या सूपच्या तोंडात मारणारं नक्कीच. चुलाणांवरुन कसलासा झटकेबाज सुगंध येत होता. अगदी अंघोळीचं पातेलं वाटावं एवढं पातेलंभरुन काहीतरी रटरतत होतं. रामजीसोबत आमच्या गप्पा रंगल्या. कोल्हा कशा कोंबड्या पळवतो, वाघरानं रामजीच्या चुलतभावाची कालवड कशी ओढून नेली, पलीकडल्या झापावरल्या श्रीपतीनं रानडुकराशी कशी झुंज देली, अशा एक ना अनेक गोष्टी त्याच्या पोतडीतून बाहेर पडत होत्या. तासाभरानं गिरजाकाकूनं थाळ्यांमधून जेवण वाढलं. हुलग्याचे शेंगोळे, म्हणजेच दिवशे. कित्येक दिवसांत खायला मिळाले नव्हते. किंबहुना त्याची चवच विसरलो होतो. पावसाळ्यात आणि थंडीत आवर्जून केले जाणारे शेंगोळे... हुलग्याच्या भरड पिठाचे केलेले करंगळीहून लहान असे लांबट गोळे आणि लहान लहान दामट्या. मिरची-लसूण घालून उकळलेल्या पाण्यातच रटरटून केला जाणारा एक स्वर्गीय पदार्थ. भाकरीची गरजच नाही. हवं तेवढं खा ! अगदी पोटाला तडस लागेपर्यंत जेवलो.
thanks for sharing..mast vatale vachun..ekada ha anubhav yachi deyhi yachi dola ghava ase khup vatat ahe..kharech swargiy
ReplyDelete