जंगलातला रुद्र-भैरवगड (आणि दातेगड, अजिंक्यतारा)
राजमाची ट्रेक
हा खरं तर एक फिलर ट्रेक होता. म्हणजे जायचे होते कुठे तरी दूरच्या
ट्रेकला, पण ऋतू आणि वेळेचे गणित न
जमल्याने तो छोटुला-पिटुकला(?) ट्रेक म्हणून राजमाची केला. त्यामुळे
उन्हाळ्यातही करायचे ट्रेक असतात हे पक्के झाले. असाच एखादा ट्रेक असावा
आणि तो जास्त उन्हात पायपीट करायला लावणारा नसावा असा शोध
चालू केला होता. असा ट्रेक म्हणजे एखादा वनदुर्गच हवा. आणि पश्चिम
महाराष्ट्रात जंगल म्हटले सर्वात आधी नंबर लागतो तो कोयनेच्या जंगलाचा.
सुर्यकिरणांनाही शिरायला वाव मिळणार नाही
अशी दाट जाळी, जनावरांचा मुक्त वावर आणि मे वैशाखाच्या उन्हाने आटलेले
हिरवेगार थंड पाणवठे. पश्चिम महाराष्ट्राचा पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं नाव सध्या भारतभर गाजतंय. अशाच काही
प्रतिबंधित जंगलात काही वनदुर्ग वसले आहेत त्यातलाच एक म्हणजे भैरवगड.
रुद्रभैरवाच्या मंदिराने पावन झालेली भूमी तसल्याच रुद्रभीषण जंगलाने
वेढलेली आहे, आणि त्याची राखण करणारे वाघ-बिबटे-अस्वलं असे
भुत्या. पण निसर्गावर त्याचे नियम पाळत मनापासून प्रेम करणार्या
आमच्यासारख्या टोळभैरवांना त्याचीच कधी भीती वाटतेय होय. म्हणूनच जाऊन त्या
कोकणकड्यावरल्या भैरवासमोर जाऊन लोटांगण घालावे आणि पुढे असेच त्याने
आपल्या वेगवेगळ्या गडांवरील स्थानांवरुन बोलावणे करावे
यासाठी भैरवगडाकडे वाकडी वाट करायची असे मनसुबे रचत चार टोळभैरव मी, अमित,
अजय आणि अनिरुद्ध शुक्रवारी संध्याकाळी आपापले बोचकी आवळून कराडच्या
दिशेने निघाले.
घरातून निघताना अमितच्या घरी चहा घेऊन
गाडीला चावी मारली आणि मुग्धाने बांधून दिलेली टपोरी जांभळं खात खात
रस्त्याच्या दोहोबाजूंनी मावळतीच्या रंगात न्हालेल्या सिंहगड, पुरंदर,
वैराटगड असे आसपासचे किल्ले आणि बाकी इतरही गतकाळच्या आठवणींना
उजाळा देत भुईंजच्या ’विरंगुळा’च्या मिसळपर्यंत जाऊन पोचलो. (बे)चव तशी
काही खास नाही, उगाच मिरची टाकून जाळ केलेला होता. ती मिसळ त्रास देणार हे
पक्के होते. तिथून समोरच दिसणार्या वैराटगडावरल्या मंदिराला ओळख देऊन
चंदन-वंदनची जुळी जोडी पाहत पुढे कराडचा रस्ता जवळ
केला. कराडला पोचलो तेव्हा अमितचे आई-बाबा वाटच पाहत होते. त्याच्या
आईच्या हातची सर्वांगसुंदर कढी-खिचडी आणि मुरांबा खात तृप्त मनाने मांडी
मोडली आणि अक्षरशः एकमेकांना हात देऊन उठवले. त्यातच कराडच्या
वर्तमानपत्रात आलेल्या एका बातमीने ट्रेकवर प्रश्नचिन्ह उभे केले.
व्याघ्र प्रकल्पात जाणारे घाटावरले मार्ग निरीक्षणाखाली आणले असले तरी
कोकणातून वर येणार्या घाटवाटा मात्र मोकळ्याच सुटल्या होत्या. त्या
वाटांनी शिकारी घुसून परस्पर शिकारी करुन पुन्हा कोकणात उतरुन जात आहेत.
थोडेसे मन खट्टू झाले होते. या एकाच बातमीमुळे वनविभागाची
गस्त वाढली तर प्रवेश असलेल्या क्षेत्रातही आम्हांस जाता आले नसते.
साशंक मनानेच पहाटे पाच वाजता चहासोबत घर
सोडले आणि पाटणचा रस्ता कापू लागलो. थंडगार पहाटवार्यात दातेगडाच्या
डोंगररांगेच्या कुशीतले पाटण सकाळचे आळोखेपिळोखे देत होते. डावीकडे मोरगिरी
किल्ला निस्तब्ध उभा होता. समोरच्या पठारावरल्या
पवनचक्क्या रात्रपाळी करुन धूसर प्रकाशात जणू दमलेल्या दिसत होत्या. अजून
सूर्य उगवायचा होता. कोयनेचे खोरे हिरव्यागार शिवारांसरशी आपल्या
समृद्धपणाची खात्री पटवून देत होते. कोयनानगरकडे जाणारा फाटा मागे टाकून
आम्ही हेळवाक गावाच्या मुख्य चौकात आलो. ट्रेक खरंतर इथूनच
सुरु होणार, पण ‘चाफ्याचा खडक’ नावाच्या धनगरपाड्यापर्यंत गाडी जाते असे
ऐकून होतो. हेळवाक गावात काल रात्रीच्या मिसळीचा वाघ मारुन झाल्यावर
चहा-नाश्ता करुन आम्ही माहिती काढायला सुरुवात केली. एकच ‘ट्रिकी’ टप्पा
होता, पण बाकी रस्ता ठीक आहे असे समजले. प्रयत्न करावयाचे
ठरवले. परंतु एक टप्पा चढून गेल्यावर, एका खड्या चढणीवर अगदी पिठासारख्या
मऊशार मातीमुळे गाडीची चाके जागेवरच फिरु लागली. गाडीच्या प्रयत्नांचे
निश्वास धुळीच्या लोटांद्वारे हवेत विरु लागले. तेव्हा मात्र गाडी सोडून
पायांवर भिस्त ठेवावी असे ठरवले. जोखमीने गाडी पुन्हा
खाली आणून एका वस्तीवर लावली आणि सॅक पाठुंगळी मारुन चढाई सुरु केली.
पिठूळ मातीत बुट जवळपास अर्धा-एक इंच फसकत होते, त्याची धूळ उठून आजूबाजूला
विसावत होती. एव्हाना सकाळच्या उन्हाचा कोवळेपणा जाऊन हळुवार चटके बसू
लागले तशी धापही लागू लागली. श्वास आणि पावलांची
गती वाढवत एका पठारावरुन चालतच ‘चाफ्याचा खडक’ गाठला. जयराम कोळेकर घरातून
समोर आले आणि वाटाड्या म्हणून यायला तयार झाले. समर्थांच्या पदस्पर्शाने
पुनीत झालेली गुहा, जिथे दासबोधाच्या रचनेचा आरंभ करुन पुढे शिवथरला पूर्ण
केली अशा हेळवाक-रामघळीत आम्ही रात्री मुक्कामी
जाणार होतो. रामघळ तशी चाफ्याच्या खडकावरुन अगदीच पंधरा मिनिटांच्या
अंतरावर. आम्ही भैरवगड करुन पुन्हा चाफ्याच्या खडकाला येऊन मग रामघळीत
मुक्कामी जाणार होतो. म्हणून उगाच ओझे का सोबत नेऊन रान का तुडवायचे म्हणून
आम्ही अधिकचे सामान वाटाड्याच्या घरात टाकले, आणि फक्त
टोप्या, पाणी आणि जरुरीचे खाण्याचे सामान घेऊन खर्या अर्थाने ट्रेक चालू
केला.
आमचा वाटाड्या एक समोर मोठ्याने धनगरी गाणी
म्हणत निघालेला, पाठीशी लावलेला कोयता एका लयीत त्याच्या अडकावण्याशी
कुई-कुई आवाज करत असायचा आणि त्याच्यामागे आमची वरात. पाडा मागे
टाकल्यानंतर येणारा उजवीकडचा पहिलाच डोंगर आमचा कस लावू पाहत
होता. वाटेत एके ठिकाणी पाणवठा होता. थंडगार पाण्याने तो थकवा कसाबसा
शमवला. त्यानंतर एका प्रदीर्घ पठारावर आमची पायपीट चाललेली. वर वैशाखातला
सूर्य कळाकळा आग ओकत होता. त्यात आमच्या माना भाजून निघत होत्या. त्यापासून
स्वतःला कसेबसे टोप्या-चष्म्यांनी वाचवत भैरवाच्या
ओढीने अंतर कापीत निघालेलो. वाटेत तोरणाच्या झाडांना फळे लागलेली आढळली.
एखाद्या उंच शिडशिडीत बांध्याच्या तरुणीने अंगभर पिवळ्या-गुलाबी मोत्यांचे
दागिने घालावेत अशी तोरणाची झाडं दिसत होती. अवीट गोडीची चव जिभेवर रेंगाळत
असतानाच जांभळाची बेटं दिसू लागली. सुरुवातीला
जर्द लाल आणि नंतर काळ्या जांभळाचे घोसच्या घोस दृष्टीस पडू लागले. उन्हात
लोलकासारखी चमकणारी जांभळं मनसोक्त खाऊन आम्ही आमची तोंडं लाल करुन घेतली.
आता खरी वनखात्याची हद्द सुरु झाली होती,
कारण खुणेचा बांध आला होता. डोंगरउताराशी अगदी घनदाट म्हणतात तसले जंगल.
सगळीच झाडे एकमेकांशी स्पर्धा करीत आकाशाला गवसणी घालू पाहत होती. त्या
झाडांभोवती वेली आपल्या असंख्य बाहूंनी फेर धरुन
केशसंभार सावरीत नाचत होत्या. अवघ्या अरण्याने चैत्राची पालवी घेऊन हिरवा
वैशाख साजरा करण्याचे ठरवले होते. सुर्यकिरणांच्यात जमिनीशी बिलगण्याची
अहमहमिका लागलेली. पण झाडे आणि वेलींच्या जाळीतून त्यांनाही बरेच कष्ट पडत
होते. आणि आमचे कष्ट वाचत होते. जागोजाग प्राण्यांच्या
अस्तित्वाची जाणीव करुन देणार्या खुणा (जसे विष्ठा) नजरेस पडत होत्या.
अशातच दाट झाडी संपून अचानक आम्ही एका डोंगराच्या बोडक्या टोकावर येऊन
पोचलो. तिथून समोर अवघे वाघोणे नदीचे खोरे दिसत होते. खाली तळाशी सदाहरित
वृक्षांची गच्च जाळी, उजवीकडे दूरवर धक्का (संगमनगर),
नाव, पाथरपुंजवरुन येणारा लालमातीचा नागमोडी रस्ता मध्येच जाळीत गुडूप
झालेला. ते टोक उतरुन आम्ही खाली उतरलो आणि भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या
वाघोणे गावच्या घरांची जोती दिसू लागले. भग्न भिंती, आजूबाजूला शेतीसाठी
केलेली आणि आता उखडून गेलेली बांधबंदिस्ती, विदीर्ण
वाघजाईच्या मंदिराचे अवशेष सगळे मिळून जुन्या वाघोणेची अर्धवट राहून
गेलेली गोष्ट सांगत होते. गावकर्यांच्या कित्येक स्वप्नांवर त्या आघाताने
पाणी फिरवले असणार याचा विचार चमकून गेला. मन थोडे विषण्ण झाले आणि
त्यासरशी थकवा गडद झाला. पाण्याची जागा बघून विसावा घेण्याचे
ठरवले. पंधरा मिनिट चालल्यावर एक ओढा दिसला. कडक उन्हाळ्यातही या काही
मैलांच्या परिसरात हा भरपूर पाणी असलेला एकमेव ओढा. तिथे थोडा दम टाकून
सगळे गडी ताजेतवाने झाले आणि भैरवगडाला शेवटचा धक्का देण्याच्या निर्धाराने
उठले. पुन्हा एकदा जंगली जांभळांची चव घेत आम्ही
दाट जाळीत घुसलो. एका कोरड्या ओढ्याच्या पलीकडे जाताना खडकावर अनिरुद्धला
रानमांजराचे दर्शन झाले.
अजिबात ऊन लागत नसल्याने वाटचाल तशी सुखकर
होती. पण वाहता वारा मिळत नसल्याने एक प्रकारचा गच्चपणा दाटून राहिलेला. पण
भैरवाच्या ओढीनं कुणीच तक्रार करत नव्हते. साधारण पाऊण तास चालल्यावर एका
जाळीतून अचानक आम्ही एका पठारासमोर आणि त्यावरल्या
मोठ्या मंदिरासमोर उभे ठाकलो. शेवटी रुद्रभैरवाने दर्शन दिले. तिथे आधीच
एक चौघांचा पुण्यातला ग्रुप आला होता. त्यांच्याशी ओळख करुन घेत असतानाच
पुण्याच्या एव्हरेस्टवीरांनी ‘समिट’ केल्याची बातमी समजली. टाळ्या वाजवून
त्यांचे अभिनंदन केले आणि जरा अंग टाकतोय तोच गाडीच्या
इंजिनाचा आवाज आला. पाहतो तर समोर दोन जीप येऊन उभ्या राहिल्या. आम्ही
जिथे मरमर करत चार-पाच तास जंगलातून चालत-चढत-आपटत इथे पोचलो होतो तिथे एक
रिसॉर्टवाले ‘किड्स कॅंप’च्या नावाखाली गाडीत मेंढरं भरावीत अशी
कॉन्व्हेंटच्या पोरांची जत्रा घेऊन आले होते. यांचा इन्स्ट्रक्टर
जरा गुर्मीतच दिसत होता. आमच्याकडचे प्रत्येकाच्या कमरेला असलेले बियर
ग्रिल्स सर्व्हायवल नाईफ पाहून उगाचच आमच्याशी बोलायला लागला. आधीच तो
माणूस डोक्यात गेला होता. त्यात “हंटिंग इज माय प्राईम हॉबी” आणि “मी बोहरी
आळीत असे नाईव्ह्ज पाहिले आहेत” असे बोलून त्याचा
तिथेच कडेलोट करुन टाकावा असा आमच्या मनात आलेला विचार आम्ही शिताफीने
परतावून लावला होता. मंदिरासमोर उजवीकडे असलेला भैरवगड पहायला निघालो
तेव्हा त्याने त्याच्या किड्सची (मराठीत किडं) तिकडे उतरणीवर लाईन लावून
ट्राफिकजाम करुन टाकले होते.
दुसर्या रस्त्याने उतरुन आम्ही पटकन त्यांच्या पुढे जाऊन किल्ल्याचे भग्न झालेले बुरुज आणि दरवाजाचे अवशेष पाहून आलो तर हा माणूस इकडे किड्सना पुढे दुसर्या लीडर्सच्या हाती पाठवून स्वतः मंदिराच्या शेडमधे आडवा झाला होता. का तर म्हणे पाठ दुखतेय. तेव्हाच आम्ही “हंटिंग इज माय प्राईम हॉबी” म्हणणार्याचे ‘बोहरी आळीचा जखमी हंटर’ असे नामकरण करुन टाकले. थोडेफार बरोबर आणलेले खाणेही आम्ही थोडेसे खाऊन उरले होते आणि ‘बोहरी आळीचा जखमी हंटर’ त्यांच्या जेवणाची गाडी आली नव्हती म्हणून कुणावर तरी फोनवर उखडला होता. मुलं शांत होती पण यालाच खायची घाई झाली असावी. त्याच्या नशिबाने अर्ध्या तासाने गाडी आली. आम्ही आधीच्या वाटाड्याला (त्याला घाई असल्याने) परत पाठवून दुसर्या एका जयरामसोबत (हा जयराम लांबोर) चाफ्याच्या खडकाकडे परतण्याचे ठरवले. भैरवनाथाचं चांगभलं केलं आणि तिथला गुलाल भाळी लावला. शेजारी वाघजाईदेखील आशीर्वाद देत होती. मंदिराच्या शांत, धीरगंभीर, थंड गाभार्यात सगळा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. आम्ही घटकाभर तिथे विश्रांती घेतली आणि परतीच्या वाटचालीस निघालो. सोबत सातार्याचे दोन भिडू होते.
दुसर्या रस्त्याने उतरुन आम्ही पटकन त्यांच्या पुढे जाऊन किल्ल्याचे भग्न झालेले बुरुज आणि दरवाजाचे अवशेष पाहून आलो तर हा माणूस इकडे किड्सना पुढे दुसर्या लीडर्सच्या हाती पाठवून स्वतः मंदिराच्या शेडमधे आडवा झाला होता. का तर म्हणे पाठ दुखतेय. तेव्हाच आम्ही “हंटिंग इज माय प्राईम हॉबी” म्हणणार्याचे ‘बोहरी आळीचा जखमी हंटर’ असे नामकरण करुन टाकले. थोडेफार बरोबर आणलेले खाणेही आम्ही थोडेसे खाऊन उरले होते आणि ‘बोहरी आळीचा जखमी हंटर’ त्यांच्या जेवणाची गाडी आली नव्हती म्हणून कुणावर तरी फोनवर उखडला होता. मुलं शांत होती पण यालाच खायची घाई झाली असावी. त्याच्या नशिबाने अर्ध्या तासाने गाडी आली. आम्ही आधीच्या वाटाड्याला (त्याला घाई असल्याने) परत पाठवून दुसर्या एका जयरामसोबत (हा जयराम लांबोर) चाफ्याच्या खडकाकडे परतण्याचे ठरवले. भैरवनाथाचं चांगभलं केलं आणि तिथला गुलाल भाळी लावला. शेजारी वाघजाईदेखील आशीर्वाद देत होती. मंदिराच्या शांत, धीरगंभीर, थंड गाभार्यात सगळा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. आम्ही घटकाभर तिथे विश्रांती घेतली आणि परतीच्या वाटचालीस निघालो. सोबत सातार्याचे दोन भिडू होते.
परतीची वाटही अशीच बिकट ठरली. एकतर कमी
खाल्लेले आणि पुन्हा दोन अंगावर आलेले डोंगर चढून पायपीट करायची. थकत, धापा
टाकत वाघोणे खोरे चढून आलो. रस्त्याने उतरतीला लागलेली तरीही चटका देणारी
किरणे आणि आमच्या पावलांचे आवाज यांखेरीज काहीच
नव्हते. अचानक पठारावर धडाधड दगड कोसळल्यासारखा आवाज झाला. आम्ही सारेच
दचकलो. या सपाट मैदानात दगड कुठून कोसळले म्हणून आवाजाच्या दिशेने पाहिले
तर दोन गवे चौखूर उधळत डावीकडल्या झाडीत दिसेनासे झाले. पुढल्याच क्षणाला
उजवीकडेही तसाच आवाज. आम्ही गव्यांच्या कळपाच्या
मधून गेलो होतो हे पाहून शहारलो. आता अनिरुद्ध थकला होता. मग आमच्यात अंतर
पडत गेले. अस्ताला चाललेल्या सुर्यासरशी सावल्या लांबल्या. अंधार
पडण्याआधी जयरामसोबत जाऊन रामघळीचा रस्ता माहित करुन घेणे ही माझी जबाबदारी
होती, म्हणून मी त्याच्यासोबत चालत होतो आणि बाकी
तिघे मागे पडले. रामघळीत येऊन पोचलो. अहाहा ! काय सुंदर जागा, पूर्वाभिमुख
अशी गुहा, पश्चिमेच्या वार्याच्या आडोशाला, चांगली शंभर-दोनशे फूट लांब,
चारपाच टप्प्यांत. समोरुन पावसाळ्यात मोठा धबधबा कोसळत असेल, खाली खळाळता
ओहळ असेल या कल्पनेनंच मन आनंदून गेलं.
गिरीचे मस्तकी गंगा।
तेथुनि चालिली बळे।
धबाबा लोटती धारा।
धबाबा तोय आदळे॥
कपाटे नेटक्या गुंफा।
तापसी राहती सदा।
नेमस्त बांधली नाना।
उत्तमे निर्गळे स्थळे॥
अशा अनेक रामघळी समर्थांनी शोधून काढल्या,
ठीकठाक केल्या आहेत. तिथून बाकी तिघांना बरेच आवाज दिले तरी काहीच उत्तर
येईना. अंधारुन यायला लागलेले. काळजी वाढली. जयरामसोबत पाड्यापर्यंतचा
रस्ता कापला आणि पाणी पिताच तिघांचा पत्ता काढण्यासाठी
पुन्हा जंगलाच्या दिशेने गेलो. खूप हाका मारल्यावर कुठूनसा क्षीण आवाज
आला. मंडळी सुखरुप होती, जराशी वाट चुकली होती.
पाड्यावर पोचलो तेव्हा जनावरे गोठ्यांत परतत
होती. आया-बाया पाणवठ्यावरुन हंडे-कळश्या डोक्यावर घेऊन निघाल्या होत्या.
चुली पेटल्या होत्या. पाडा धुराने वेढला. पाड्यावरल्या मठावरुन घंटेचा नाद
खोर्यात घुमला.
सांज ये गोकुळी, सावळी सावळी.
सावळ्याची जणु, सावली..
धुळ ऊडवीत गाई निघाल्या
शाम रंगात वाटा बुडाल्या
परतती त्या सवे
पाखरांचे थवे
पैलघंटा घुमे राउळी
सांज ये गोकुळी..
पाड्यावर चुलीवरचा गरमागरम खडा चमचा चहा
पिऊन तरतरी आली. तिथेच जयरामच्या घरी जेवण तयार करायला सांगितले.
उन्हाळ्याचे दिवस असूनही गारठा वाढला होता. अगदी ओसरीवरही संध्याकाळी
आम्हांला स्लीपिंग बॅगमध्ये पडून रहावे लागले एवढी थंडी. गप्पा
निवत होत्या आणि त्या सांजवार्यात जनावरांच्या घंटेच्या किणकिणाटात कधी
आमचा डोळा लागला ते समजलेच नाही. जेवण तयार झाले तसे जयरामने आवाज दिला.
अर्धवट ग्लानीत जेव्हा मस्तपैकी तिखट आमटीभात खाल्ला तेव्हा सगळे भानावर
आले. सकाळी पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन आम्ही
रात्री दहाच्या सुमारास रामघळीचा रस्ता धरला. टॉर्चच्या उजेडात वीस
मिनिटांतच तिकडे पोचलो. अमावस्येची रात्र असल्याने आकाश चांदण्यांनी भरलेले
दिसत होते. जणू भैरवाच्या दर्शनानंतर “आकाश सारे, माळूनि तारे” आमचे
अभिनंदन करायला आले होते. आकाशभर चांदण्यांचा सडा पडलेला.
घळीसमोरच्या दरीत काजव्यांचा जागर. मधेच ते इकडून तिकडे उडत तारेच जमिनीवर
आल्याचा भास व्हायचा. पाठ टेकली तशी कधी निद्रादेवीच्या अधीन झालो ते
कळलेच नाही. रात्री एकदोन वेळा मध्येच जमीन उकरल्याचा आवाज वगैरे यायचा.
अस्वलांचा वावर असल्याने दचकून जाग यायची. टॉर्चच्या
प्रकाशात आसपास काही नाही आणि सगळे सुरक्षित आहे याची खात्री करुन आपोआपच
पुन्हा झोप लागायची.
भल्या पहाटेच कस्तुराच्या मंजुळ आवाजाने जाग
आली. अर्धवट झोपेत असताना कमीत कमी अर्धातास तरी तो आपल्या पहाटेच्या
गाण्याने मोहिनी घालत होता. साथीला शिंजीर, कोकीळ होतेच. सुतारही
टॉक..टॉक.. करत तालवाद्याची साथ देत होता. पूर्व क्षितिजावर
फटफटले तसे आम्ही घळीतला आमचा मुक्काम आवरुन पुन्हा पाड्यावर आलो.
सकाळच्या हळदुल्या उन्हात पाड्यातली लगबग पुन्हा वाढली होती. धारा काढल्या,
जनावरं रानात सोडली गेली, पोरं इकडेतिकडे खेळायला पळाली, कोंबड्या
खुराड्यातून बाहेर पळाल्या. आम्ही चहा पिऊन टाकोटाक हेळवाक
गावात आलो आणि तिथे नाश्ता उरकून घेतला.
येताना तांबड्या धुळीच्या रस्त्यात एक हरणटोळ साप दिसला. एखाद्या गाडीखाली यायचा उगाच, म्हणून त्याला बाजूला करता करता त्याचेही काही फोटो काढले.
येताना तांबड्या धुळीच्या रस्त्यात एक हरणटोळ साप दिसला. एखाद्या गाडीखाली यायचा उगाच, म्हणून त्याला बाजूला करता करता त्याचेही काही फोटो काढले.
आता हाताशी पूर्ण दिवस होता म्हणून पाटणजवळचा
दातेगड पहायचे ठरवले. पाटण-केर-टोळेवाडी करत आम्ही दातेगडाच्या पायथ्याला
पोचलो. तिथल्या गुराखी मुलाने पूर्ण गड फिरुन दाखवला. मोठमोठ्या गणेश आणि
हनुमान मूर्ती, प्रचंड मोठी पायर्या असलेली
विहीर आणि त्याभोवती गुंफल्या गेलेल्या दंतकथाही ऐकवल्या. उतरताना गडाच्या
पायथ्याला करवंदाच्या जाळ्या दिसल्या. मनसोक्त तोही रानमेवा खाऊन घेतला.
पुढे पाटणच्या पठारावरुन पवनचक्क्यांच्या जंगलातून अतिशय खराब रस्त्याने ठोसेघर गाठले. तीस-पस्तीस किलोमीटरच्या अंतरासाठी दीड तास गेला. त्यात ‘बोहरी आळीचा जखमी हंटर’ची टोळी इकडेही भेटली. ठोसेघरला जेवण करुन पाण्यात डुंबल्याने सगळा शीण नाहीसा झाला आणि आम्ही अजिंक्यतारा पाहण्याच्या उद्देशाने सातार्याच्या दिशेने निघालो.
पुढे पाटणच्या पठारावरुन पवनचक्क्यांच्या जंगलातून अतिशय खराब रस्त्याने ठोसेघर गाठले. तीस-पस्तीस किलोमीटरच्या अंतरासाठी दीड तास गेला. त्यात ‘बोहरी आळीचा जखमी हंटर’ची टोळी इकडेही भेटली. ठोसेघरला जेवण करुन पाण्यात डुंबल्याने सगळा शीण नाहीसा झाला आणि आम्ही अजिंक्यतारा पाहण्याच्या उद्देशाने सातार्याच्या दिशेने निघालो.
आठदहा किलोमीटरवर आल्यावर सज्जनगडाच्या
फाट्याशी अमितला अचानक कॅमेरा बॅग सोबत नाही याची जाणीव झाली. त्यातच
पाण्यात उतरण्याच्या आधी अजयने स्वतःचा ब्लॅकबेरी, पाकीट ठेवले होते.
त्यामुळे पुन्हा ठोसेघरला जाऊन त्या हॉटेलमध्ये चौकशी करणे
भागच होते. अमितचा जीव कंठाशी आलेला. गेल्याच आठवड्यात ट्रायपॉड हरवलेला,
त्यात कॅमेरा गेला तर बायको घरात घेईल का याची काळजी. पण तिथे हॉटेलमध्ये
विचारताच त्या भल्या मालकाने अमितने विसरलेली जपून ठेवलेली बॅग हाती दिली.
एकदाचा अम्याचा जीव भांड्यात पडला. आता या प्रसंगाची
वसुली अम्याकडून पार्टी घेऊन केली जाईलच याची (मुग्धाने) कृपया नोंद
घ्यावी.
सुर्यास्ताच्या समयी अजिंक्यतारा आणि तिथली
गडफेरी आटोपून आम्ही पुण्याचा परतीचा मार्ग कापू लागलो तो पुढला प्लॅन काय
करायचा याचा विचार करतच. दुसर्या दिवशी अनिरुद्धचे सुंदर इमेल
इनबॉक्समध्ये येऊन पडले होते.
वाह, काय होते ते तीन दिवस.
म्हणतात ना, सुरुवात चांगली झाली की शेवटही गोड होतो. अगदी तसंच झालं.
काकूंच्या हातची गरमागरम खिचडी, त्यावर आंब्याचा मुरांबा ह्यांनी सुरुवात आणि शेवट आंब्याच्याच मिल्कशेकने.
ऑफिसला जाताना रुक्ष आम्हांस आठवण करुन देतोय तो कराड-कोयनानगरचा रस्ता, हिरवीगार शाल पांघरलेली झाडं, त्यातून वाहणारे कालव्याचे पाणी.
एरवी एसीमध्ये बसून काम करणार्या शरीराला आठवतीये घातलेली घामाची ओलीचिंब अंघोळ.
बिल्डिंगच्या आजूबाजूला चार झाडं लावून स्वतःस निसर्गप्रेमी म्हणवणार्या आम्हांस घनदाट जंगलातली पाऊलवाट.
बर्गर-पिझ्झा खाऊन फुगणार्या पोटास दाखवली धनगराच्या हातचे साधाच पण अमृत असलेला आमटीभात आणि रानमेव्याची चव खास.
डनलपची गादी जास्त मऊ की समर्थांचं अस्तित्त्व असलेली रामघळीतली आमची झोपायची जागा जास्त मऊ?
ऑफिसमधून घरी आल्यावर झालेली दमणूक खरी की गडाचे चढउतार खाचखळगे पार करुन पाठ टेकवल्यावर जाणवलेली दमणूक खरी?
0 comments